सुश्रुत संहिता - भगंदरनिदान

सुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिले .


आता ‘‘भगंदरनिदान ’’ नावाचा अध्याय सांगतो . जसे भगवान् धन्वंतरींनी सांगितले आहे ॥१ -२॥

वात , पित्त , कफ , सन्निपात व अगंतुक अशा पांच कारणांनी अनुक्रमे शतपोनक , उष्ट्रग्रीव , परिस्रावी , शंबुकावर्त व उन्मार्गी अशी पाच प्रकारची भगंदरे होतात . त्यांना भग म्हणजे गुद व बस्तिप्रदेश ह्यांचे विदारण करितात म्हणून भगंदर अशी संज्ञा आहे . ह्या भगंदराची आरंभी उत्पन्न होणारी पुटकुळी (फोड ) अपक्व असली म्हणजे तिला ‘‘पिडका ’’ पुळी -किंवा फोड , म्हणतात . आणि ती पिकली म्हणजे तिला ‘‘भगंदर ’’ असे म्हणतात .)

त्याचे पूर्वरूप -कटिकपालामध्ये (माकड हाडात ) वेदना आणि गुदाचे ठिकाणी कंडु , दाह व सूज हे विकार होऊ लागतात .

शतपोनक लक्षण -अपथ्य सेवन करणार्‍या मनुष्याचा वायु प्रकुपित होऊन उन्मार्ग गति होतो . गुदाच्या आसमंतभागी राहून त्या ठिकाणच्या एक अगर दोन अंगुल क्षेत्रातील रक्त व मांस दूषित करून तांबुस रंगाची पुटकुळी उत्पन्न करितो . त्या पुटकुळीमुळे टोचणी वगैरे वातजन्य वेदना होतात . ही उत्पन्न होताच तिजवर ताबडतोब उपचार केले नाही तर ती पिकते . ही मूत्राशयाच्या सान्निध असल्यामुळे ती फुटून झालेला व्रण नेहमी ओलसर असतो त्याला चाळणीप्रमाणे लहान लहान अशी पुष्कळ छिद्रे असतात म्हणून ह्याला ‘‘शतपोनक ’’ असे म्हणतात . ह्याच्या त्या छिद्रांतून स्वच्छ फेसयुक्त व पुष्कळ असा स्राव सारखा होत असतो . व्रणामध्ये ताडण केल्यासारखे , फोडल्याप्रमाणे व सुयांनी टोचल्याप्रमाणे वेदना होतात . आणि गुदप्रदेश विदीर्ण होतो . ह्याची उपेक्षा केली असता अधोवायु , मल , मूत्र व शुक्र ह्यांचा उत्सर्गही त्या व्रणाच्या छिद्रांतून होतो . ह्या भगंदराला ‘‘शतपोनक ’’ असे म्हणतात .

उष्ट्रगीव लक्षण -प्रकुपित झालेले पित्त वायूने खाली नेले म्हणजे ते वरीलप्रमाणे गुदप्रदेशाचा आश्रय करून रक्त व मांस दूषित करून आरक्तवर्ण लहान आकाराची , उंच उंटाच्या मानेच्या आकाराची पुटकुळी उत्पन्न करिते . हिच्यावर उपचार केले नाहीत तर ती पिकते आणि त्यामुळे झालेल्या व्रणात अग्नि किंवा क्षाराने डागल्याप्रमाणे अतिशय दाह होतो . आणि त्यामधून दुर्गंधयुक्त व उष्ण अस स्राव होतो . याकडे दुर्लक्ष केले असता ह्या व्रणांतून अधोवायू मल मूत्र व शुक्र ही बाहेर येऊ लागतात . त्या भगंदराला ‘‘उष्ट्रग्रीव ’’ असे म्हणतात .

परिस्त्रावी भगंदर लक्षण -प्रकुपित झालेला कफ वायूने प्रेरित हेाऊन खाली जाऊन वरीलप्रमाणे गुदप्रदेशाचा आश्रय करून त्या ठिकाणचे रक्त व मांस दूषित करून पांढर्‍या रंगाची , कठीण व कंडुयुक्त अशी पुटकुळी उत्पन्न करितो . हिच्या ठिकाणी कडु वगैरे कफजन्य वेदना होतात . हिच्यावर उपचार केले नाहीत तर ती पिकते . व त्यामुळे झालेला व्रण कठीण , सूजयुक्त व कंडुयुक्त असतो . ह्यामधून बुळबुळीत असा स्राव सतत होतो . ह्याची उपेक्षा केली असता ह्यातून अधोवायु , मल , मूत्र व रेत ही बाहेर येऊ लागतात . ह्या भगंदराला ‘‘परिस्रावी भगंदर ’’ असे म्हणतात .

शंबुकावर्त भगंदर लक्षण -प्रकुपित झालेला वायु प्रकुपित झालेल्या पित्त व कफदोषासह खाली जाऊन वरीलप्रमाणे गुदप्रदेशाचा आश्रय करून त्या ठिकाणचे रक्त व मांस दुषित करून पायाच्या अंगठ्याप्रमाणे मोठी व तीनही दोषांच्या लक्षणांनी युक्त अशी पुटकुळी उत्पन्न करितो . हिजमध्ये टोचणी , दाह , कंडु वगैरे तीनही दोषाच्या वेदना , वर्ण वगैरे असतात . हिजवर उपचार केले नाहीत तर ती पिकते . व त्यामुळे झालेल्या व्रणातून अनेक रंगाचा स्राव हेातो . आणि भरलेल्या नदीच्या वेगाप्रमाणे व शंखातील भोवर्‍याप्रमाणे त्यात वेदना होतात . ह्या भगंदराला ‘‘शंबुकावर्त ’’ असे म्हणतात .

उन्मार्गी भगंदर लक्ष्मण -मांसभक्षणाविषयी लोलुप अशा अविचारी मनुष्याने जेवताना मांसगत असलेले अस्थिशल्य (हाडाचा तुकडा ) अन्नाबरोबर नकळत गिळले असता ते मळांतून अपानवायूने प्रेरित होऊन वाकडेतिकडे गुदामध्ये शिरून त्या ठिकाणी व्रण करिते . तो व्रण पिकतो व त्यातून पू व रक्त वाहते . त्यायोगाने तेथील मांस कुजून त्यांत ओलसर जमिनीत ज्याप्रमाणे कृमी (गाढवे ) होतात त्याप्रमाणे कृमी होतात . ते कृमी त्या गुदाच्या आसमंत भागांतील मांस खाऊन गुदाचे विदारण करितात . मग त्या कृमींनी केलेल्या छिद्रातून (मार्गातून ) वायु , मूत्र , व शुक्र ही बाहेर पडतात . ह्या अगंतुक कारणाने होणार्‍या भगंदराला ‘‘उन्मार्गगामी ’’ भगंदर असे म्हणतात ॥३ -९॥

गुदाच्या शेवठी (काठाला ) सूज येऊन त्या ठिकाणी एक लहानशी पुटकुळी उत्पन्न होते , तिला वेदना फारशाा नसतात व ती लवकरच बरी होते . ही पुटकुळी भगंदराची नसून ती निराळी असते . हिच्यापासून भगंदर होत नाही .

गुदाच्या आसमंतात दोन अंगुळे क्षेत्रात जिचे मूळ फार खोल आहे अशी एक पुटकुळी उत्पन्न होते तिच्यामध्ये ठणका फार असतो व ज्वरही असतो . तिला भागंदरी असे म्हणतात . ही वरील अभागंदरी (भगंदर न करणारी ) जी पुटकुळी तिच्या उलट लक्षणाची असते .

भगंदराचे पूर्वरूप -रथादिकांतून (रेल्वेतून ?) प्रवास करीत असता मलविसर्ग करण्याने (योग्य प्रक्षालन न झाल्याने ) गुदामध्ये कडु , ठणका , दाह व सूज हे विकार उत्पन्न होतात . व कंबर दुखू लागते . ही लक्षणे भगंदर होण्यापूर्वी होतात .

सर्वच प्रकारची भगंदरे अत्यंत दुःखदायक असून फार कष्टाने बरी होणारी आहेत . त्यापैकी त्रिदोषजन्य भगंदर व आगंतुक व्रणापासून झालेले भगंदर ही दोन असाध्य आहेत .

ह्याप्रमाणे ‘‘भगंदरनिदान ’’ नावाचा अध्याय चवथा समाप्त .


References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP