नामस्मरण - सप्टेंबर ३

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा , म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल .


आपापल्या स्वभावानुसार प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या तर्‍हेने भगवंताची ओळख करुन घेता येईल . मारुतीने दास्यत्वाने भक्ती केली . दशरथाने पुत्राप्रमाणे देवाला मानले . भगवंत माझा कसा होईल याचा आपण विचार करावा . भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्ती हे सर्वांत श्रेष्ठ साधन सांगितले आहे . मनुष्य जे प्रेम व्यसनात लावतो ते प्रेम भगवंताकडे लावले तर सर्व काम होते . हट्टी आणि व्यसनी माणसे एक प्रकारे चांगली . त्यांचे मन त्यांना सांगत असते की व्यसनापायी आपल्या मुला -बाळांचेही नुकसान होते आहे . पण आपले व्यसन ते हट्टाने सोडीत नाहीत . हाच हट्ट किंवा निश्चय भगवंताकडे लावला की परमार्थ झाला ! माझे गुणदोष मी देवाला वाहिले की अर्पणभक्ती होते . आपण देवाची भक्ती करतो . परंतु त्या भक्तीत खरे प्रेम येत नाही ; याचे कारण म्हणजे आपली दृष्टी चारी दिशांना फाकलेली असते . ती प्रथम एकाग्र करावी . थोडे करावे , पण एकाकार होऊन करावे .

परमार्थ कंटाळवाणेपणाने करु नये . आपल्या भावनेला व्यक्त व्हायला योग्य दिशा कशी मिळेल इकडे लक्ष द्यावे . परमात्मा पंढरपुरात आहे असे साधुसंत म्हणत आले , परंतु आपल्याला तो दगडच दिसतो , हा दोष कुणाचा ? आपल्या भावनेचाच . जशी भावना ठेवू तशी कृती होते . भगवंताजवळ आपला पूर्ण भाव ठेवावा . दिवा थोडा बाजूला झाला की वाट चुकते ; म्हणून सतत भगवंताकडे नजर ठेवून वागावे . साधनावर सतत जोर द्यावा . तालासुरावाचून प्रेम येत नाही असे थोडेच आहे ? मी ज्याच्यापुढे भजन म्हणतो , तो ते ऐकतो या समजुतीने म्हटले म्हणजे झाले . भगवंताचाच मी आहे असे म्हणवून घ्यावे , त्याची कृपा केव्हा होईल ही तळमळ बाळगावी , आणि मी जे करतो ते मनापासून करतो की नाही हे पाहावे . झाल्यागेल्याचे दुःख करु नका , उद्याची काळजी करु नका , आणि आजचे अनुसंधानही चुकवू नका . भगवंत साक्षात पुढे उभा आहे असे समजून नामस्मरण करावे . प्रत्येक नामात ‘ भगवंत कर्ता ’ असे म्हणावे , म्हणजे अभिमान वाट अडवणार नाही . लाभहानीचे सुखदुःख न वाटणे ही खरी भक्तीची प्रगती होय . देहाच्या कर्तव्याच्या मर्यादा सांभाळून , विषयातली वृत्ती भगवंताकडे लावणे , हेच खरे सीमोल्लंघन होय . जो अत्यंत आकुंचित आणि स्वार्थी आहे , तसेच जो ‘ माझ्या सुखाकरिता सर्व जग आहे ’ ही बुद्धी ठेवतो , तो मनुष्य अभिमानी समजावा . मनुष्य जितका स्वार्थी , तितका तो पराधीन असतो . पाचजणांपासून सुख मिळविण्याचा मार्ग म्हणजे प्रपंच , आणि एकापासून सुख मिळविण्याचा मार्ग म्हणजे परमार्थ होय .

N/A

References : N/A
Last Updated : September 29, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP