नामस्मरण - सप्टेंबर ८

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा , म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल .


माया म्हणजे काय , तर जे परमात्म्याशिवाय असते ती माया . जे दिसते आणि नासते ती सर्व माया . आपण जोपर्यंत नामस्मरणात आहोत , तोपर्यंत आपण मायेच्या बाहेर आहोत , आणि जेव्हा त्याचे विस्मरण होते तेव्हा आपण मायेच्या अधीन आहोत असे समजावे . सर्व काही करण्यामध्ये आहे , सांगण्यात आणि ऐकण्यात नाही . निर्गुणाचे कितीही वर्णन केले तरी निर्गुण रुप समजायचे नाही . म्हणून सगुण रुपच आपण पाहावे आणि त्याचेच पूजन करावे . ‘ मी निगुणाची उपासना करतो ’ असे जो म्हणतो , त्याला खरे म्हटले म्हणजे निर्गुण हे काय ते समजलेच नाही ; कारण तिथे सांगायलाच कुणी उरत नाही .

एकाने मला सांगितले की , " मी सर्व वेदांतग्रंथ वाचले आहेत . " त्यावर मी त्याला म्हटले की , " तर मग तुम्हाला समाधान मिळालेच आहे ! " त्यावर तो म्हणाला , " तेवढेच काय ते मिळाले नाही . " मग एवढे वाचून काय उपयोग झाला ? आपल्याला त्या वेदान्ताला घेऊन मग काय करायचे आहे ? आपण आपली भोळीभाबडी भक्तीच करावी . देवाला अनन्य शरण जाऊन , त्याचे नामस्मरण करीत जावे , म्हणजे सर्व काही मिळते . जो जेवायला बसतो , तो ‘ माझे पोट भरावे ’ असे कधी शब्दांनी म्हणतो का ? पण जेवण झाले की आपोआपच पोट भरते ! आपण ग्रंथामध्ये जे वाचतो ते जर आचरणामध्ये आणले नाही तर त्या वाचनाचा उपयोग काय ? म्हणून आपण फारसे वाचनाच्या वगैरे नादी लागू नये , कारण त्याने खरे साधन बाजूलाच राहते आणि त्या वाचनाचाच अभिमान वाटू लागतो . म्हणून थोडेच वाचावे आणि त्याचे मनन करावे .

शरीराच्या अगदी लहान भागाला लागले तरी सबंध देहाला वेदना होतात . त्याप्रमाणे दिवसाची एक घटका जरी आपण भगवंताच्या स्मरणात घालविली तरी सबंध दिवस त्यामध्ये जाईल ; आणि दिवसांचेच महिने , महिन्यांचेच वर्ष , आणि वर्षांचेच आपले आयुष्य बनलेले असते , या दृष्टीने आपले सर्व आयुष्य भगवंताच्या स्मरणात जाईल . प्रपंचाची आवड असू नये , पण प्रपंचातल्या कर्तव्याची आवड असावी . प्रपंचातली कर्तव्ये करणे हे पवित्र आहे खरे पण त्यामध्ये गुंतून राहणे बरे नव्हे . म्हणून आपण मनाने भगवंताचे होऊन राहावे . आपण मनापासून भगवंताला स्मरले तर तो आपल्याला सुखासमाधानात ठेवल्याविना राहणार नाही . प्रपंचात सुखी होणे म्हणजे भगवंताचे होणेच होय . देवाला मानावे , आणि त्याला आवडेल तेच करावे , हेच परमार्थाचे सार आहे .

N/A

References : N/A
Last Updated : September 29, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP