नामस्मरण - सप्टेंबर १८

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा , म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल .


प्रत्येकाने गोंदवल्याच्या रामाचे एकदा तरी दर्शन घ्यावे असे मला फार वाटते . ह्या रामाचे वैशिष्ट्य असे आहे की , त्याच्यापुढे उभे राहिले म्हणजे आपल्या अवगुणांची तो जाणीव करुन देतो . हेच काम विशेष महत्त्वाचे आहे ; कारण दोषांची जाणीव झाली तरच मनुष्य त्यातून सुटण्याच्या प्रयत्नाला लागेल . आपल्याला एखादा रोग झाला आहे असे समजले तरच मनुष्य त्यातून मोकळा होण्याच्या प्रयत्नाला लागेल ; तसे , दोषांचे जाणीव झाली तरच मनुष्य त्यातून सुटण्यासाठी रामाची प्रार्थना करुन त्याला शरण जाईल . शरणागतावर कृपा करणे हे रामाचे ब्रीदच असल्यामुळे तो त्याला त्यातून सोडवीलच , आणि त्याचे काम होऊन जाईल . चांगला वैद्य कोण ? तर जो रोग्याला भूक उत्पन्न होईल असे औषध देऊन नंतर त्याला भरपूर खायला देतो , आणि ते पचेल असे औषध देऊन त्याला निरोगी आणि सशक्त बनवितो , तो . तसाच माझा राम आहे . म्हणून प्रत्येकाने त्याला एकवार तरी पहावे असे मला मनापासून वाटते .

मंदिरामध्ये मुक्तद्वार असावे , पण ते कुणाला ? तर फक्त भगवंताच्या उपासकाला ! भगवंताच्या उत्सवाला थोडेच लोक जरी जमले , पण ते नामात राहणारे असले , तर तो खरा आनंद आहे . उगीच पुष्कळ लोक जमावेत हा हेतू नसावा . मंदिर हे भगवंताच्या उपासनेचे मुख्य स्थान आहे ; म्हणून ते अगदी साधे असावे , आणि तिथे उत्तम उपासना चालावी . मंदिर नेहमी भिक्षेवरच चालावे . मंदिरातून व्रताची आणि ब्रीदाची माणसे उत्पन्न झाली पाहिजेत . भगवंताला उपासना प्रिय आहे . म्हणून सोन्याची मंदिरे बांधण्यापेक्षा दगडमातीच्या मंदिरामध्येच उपासना वाढवायचा प्रयत्न करावा .

भगवंताच्या इच्छेनेच सर्व चालले आहे ही भावना ठेवून , जे येईल त्याला नको म्हणू नये , आणि जे येत नाही त्याबद्दल दुःख करु नये . आपल्याला भगवंताचा विसर पडला आहे . त्याचे स्मरण होण्यासाठी आणि ते सतत टिकविण्यासाठी भगवंताचे उत्सव करणे जरुर आहे . एखाद्या माणसाला पुष्कळ नाती असून तो जसा वेगळा राहू शकतो , त्याप्रमाणे भगवंत सगळ्या ठिकाणी राहूनही आपल्या ह्रदयात राहू शकतो . तो सूर्याच्या प्रकाशासारखा एके ठिकाणी राहून सर्व ठिकाणी सत्तारुपाने राहातो . ज्याची भावना खरी शुद्ध म्हणजे निःसंशय असते , त्याला दगडाची मूर्तीदेखील देव बनते ; भावना मात्र शंभर नंबरी पाहिजे , तीमध्ये भेसळ उपयोगाची नाही . आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेर वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील , त्याला परमार्थाचा अनुभव फार लवकर येईल . नामाचा अनुभव जसा नामातच घ्यायचा असतो , तसा भगवंताचा अनुभव अनुसंधानात येतो .

N/A

References : N/A
Last Updated : October 12, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP