नामस्मरण - सप्टेंबर १०

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा , म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल .


राम हा तारक मंत्र निराकार । जपा वारंवार हेंचि एक ॥ हेंचि एक करा राम दृढ करा । पुनरपि संसारा येणें नाहीं ॥ येणें नाहीं पुन्हा सांगितली मात । जानकीचा कांत आळवावा ॥ पार्वतीरमण जपे रामनाम । विषाचें दहन तेणें झाले ॥ दीनदास म्हणे वाल्मीक तरला । पापी उद्धरिला अजामेळ ॥ जयासी लागला रामनामचाळा । आठवी गोपाळा सर्वकाळ ॥ सर्वकाळ मति संतांचे संगतीं । जोडिला श्रीपति येणें पंथें ॥ तिन्ही लोकीं श्रेष्ठ रामनाम एक । धरुनि विवेक जपे सदा ॥ हनुमंतें केलें लंकेसी उड्डाण । रामनाम ठाण ह्रदयामाजीं । दीनदास म्हणे वानर तरले । नामीं कोटि कुळें उद्धरती ॥ रामनामाविणें साधन हे जनीं । बरळती प्राणी स्वप्नामाजीं ॥ स्वप्नींचा विचार तैसा हा संसार । सोडुनि असार , राम ध्यावा ॥ रामनामध्वनि उच्चारितां वाणी । पापाची ते धुनी होय तेणें ॥ सिंधूचें मंथन रत्नांची ही खाण । तैसें हें साधन रामनाम ॥ वेदांचेंही खंड योगाचें ते बंड । त्याचें काळें तोंड , दास म्हणे ॥ मन हेंचि राम देहीं आत्माराम । जनीं मेघश्याम पाहे डोळा ॥ पाहूनियां डोळां स्वरुपीं मुरावें । वाचेसी असावें रामनाम ॥ नारायणनामें प्रह्लाद तरला । अजामिळ झाला एकरुप ॥ एकरुप झाले वसिष्ठ महामुनि । तया चापपाणि वश झाला ॥ दीनदास म्हणे स्मरे रघुनाथा । संसाराची चिंता त्यासी नसे ॥ जनीं जनार्दन रामाचें चिंतन । सत्याची ही खाण रामनाम ॥ गाईचें रक्षण भूतदया जाण । अतिथीसी अन्न घाला तुम्ही ॥ संताचा संग विषयाचा त्याग । रामनामीं दंग होऊनिया राहे ॥ राम कृष्ण हरि एकचि स्वरुप । अवताराची लीला वेगळाली ॥ दीनदास सांगे लावूनियां ध्यान । तुम्ही आत्मज्ञान जतन करा ॥ यत्न परोपरी साधनाचे भरी । आंवळे घेतां करीं तैसें होय ॥ तैसें होय , म्हणुनी करा , त्याग । साधावा तो योग रामनामें ॥ रामनामीं आस ठेवूनियां खास । वृथा न जाय श्वास ऐसे करा ॥ ऐसें करा तुम्ही संसारीं असतां । वायां आणिक पंथा जाऊं नका ॥ दीनदासाचे बोल मानूं नका फोल । भक्तवत्सल राम ह्रदयीं धरा ॥ मनाचिया मागें जाऊं नका तुम्ही । येतों आतां आम्ही , कृपा करा ॥ शेवटची विनवणी ऐका तुम्ही कानीं । संसारजाचणीं पडूं नका ॥ रामपाठ तुम्हां सांगितला आज । आणिकांचे काज नाहीं आतां ॥ नित्यपाठ करीं माणगंगातीरीं । होसी अधिकारी मोक्षाचा तूं ॥ ब्रह्मचैतन्य नाम सदगुरुचे कृपें । दीनदास जपे राम सदा ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 29, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP