नामस्मरण - सप्टेंबर ९

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा , म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल .


खरोखर , भगवंताचे अस्तित्व जिथे पाहावे तिथे आहे . भगवंत आहे की नाही हे जाणण्याकरिताच बुद्धीची देणगी आपल्याला मिळाली आहे . भगवंताचे मर्म ओळखायला , मी कसे वागावे हे पाहावे . ज्यांनी भगवंताला जाणले , त्यांनी भगवंताला काय आवडते हे सांगून टाकले आहे . ‘ सर्व विषयवासना सोडून भगवंताला शरण जावे ’ हे त्यांच्या सांगण्याचे सार आहे . हे आप्तवाक्य आपण प्रमाण मानले पाहिजे ; कारण स्वतः अनुभव घेऊन , म्हणजेच स्वतः मुक्त होऊन , त्यांनी आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखविला . जन्ममरणापासून जो आपल्याला मुक्त करतो तो खरा आप्त . जे भगवंताचे होऊन राहिले त्यांना जगाची भीती नाही वाटत . आपण विषयांना नेहमी शरण जातोच की नाही ? मग भगवंताला शरण जायला का भ्यावे ? खरोखर , सर्व चमत्कार करता येतात , पण भगवंताला शरण जाणे फार कठीण आहे .

नामस्मरण करु लागलो तर विषय हात धुऊन मागे लागतात . म्हणजे मी आतबाहेर विषयाने किती भरलेला आहे ! तथापि काही झाले तरी दृढनिश्चयाने नाम चालू ठेवावे . प्रपंच करीत असताना नाही का वाईट विचार मनात येत ? मग परमार्थ करीत असता तसे आले म्हणून भ्यायचे काय कारण ? प्रह्लादाने एकदा नाम घेतले ते शेवटपर्यंत काही सोडले नाही ; त्या नामानेच तो तरला , त्या भावनेनेच तो उद्धरुन गेला . म्हणून ही भावना वाढविण्याकरिता आपण नामाचे अखंड स्मरण ठेवावे . आपली पापे मनात आणू नयेत . माझा पूर्व संस्कार मी आपल्या बुद्धीनेच ठरवितो , नाही का ? स्वतःचे मनच स्वतःला खाते याला काय करावे ? काल झालेले आज नाही सुधारता येणार ; पण चालू क्षण मात्र वाया दवडू नका . निराश कधीच होऊ नका . प्रत्येक साधन आपल्या परीने श्रेष्ठच आहे . साधनाला पतिव्रतेसारखे मानावे . भगवंताचे होणे हे सर्व साधनांचे आणि धर्माचे मूळ आहे हे पक्के ध्यानात ठेवावे . प्रपंच पुरा होण्याकरिता आपण मरेपर्यंत काम करतो , मग भगवंताचे होण्याकरिता , भगवंत जोडण्याकरिता , थोडे कष्ट का घेऊ नयेत ? खरोखर , भगवंताचा विसर पडणे ह्याहून दुसरे मोठे पाप नाही . देव हवा असे वाटणे ही देवाची बुद्धी , आणि विषय हवा असे वाटणे ही देहाची बुद्धी . वासना म्हणजे देवाच्या विरुद्ध असलेली आपली इच्छा . ही वासना , म्हणजेच विषयांचे हवे -नकोपण जसजसे कमी होईल , तसतशी बुद्धी नामांत स्थिर होत जाईल . अशा तर्‍हेने , ‘ तू आहेस , मी नाही ’ ही स्थिती जेव्हा नामस्मरणाच्या योगाने आपली होईल , तेव्हाच परमेश्वर आपण जोडला किंवा मी परमेश्वराचा झालो असे सार्थपणाने म्हणता येईल . निदिध्यासाने आनंदसाक्षात्कार होणे हाच मोक्ष होय .

N/A

References : N/A
Last Updated : September 29, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP