भगवंत - नोव्हेंबर ३

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा , म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल .


‘ भगवंता, माझा भोग बरा कर, ’ असे आपण जर त्याला म्हटले नाही, तर त्याच्या स्मरणाची जाणीव आपल्याला होईल. भगवंताच्या स्मरणात आनंद आहे. आनंदाची जाणीव झाली की दुःखाची जाणीव कमी होईल. अनुसंधानाने जे काय साधायचे ते हेच. भगवंताच्या आड येते त्याची पर्वा करु नये. भिक्षा मागण्याचा जरी प्रसंग आला तरी भगवंताचे अनुसंधान सोडू नये. घरादाराला रात्रीच्या वेळी आपण पहारा ठेवतो, चोर येतील त्या वेळेस सावध राहातो, तसेच संधीच्या वेळेस भगवंतापासून दूर होऊ नये म्हणजे झाले. वेळेला सावध राहाणे ज्याला साधत नसेल त्याने अखंड सावध राहावे. विषय मनात आले की तिथे भगवंताची आठवण ठेवून द्यावी. ‘ अंते मतिः सा गतिः ; अशी आपल्यात म्हण आहे. जन्मात जे केले नाही ते मृत्यूच्या वेळेला कसे आठवता येईल? एवढ्याकरिता भगवंताच्या अखंड स्मरणात राहावे. भगवंताचे नाम हे औषध समजावे; भगवंताची प्राप्ती हे त्याचे फल. औषध मात्र थेंब थेंब आणि सतत पोटात गेले पाहिजे. नामस्मरण जर शेवटपर्यंत चालू राहिले तर तो ‘ योगच ’ आहे; आणि त्या ‘ एकाशी ’ योग साधणारा तो योगी समजावा.
एकच ठिणगी सबंध कापसाचा नाश करायला समर्थ असते, त्याप्रमाणे भगवंताचे नाम सर्व पापांचा नाश करायला समर्थ असते. आपण ते आवडीने, तळमळीने, भावाने घेत नाही, त्यात नामाचा काय दोष? नामाची भावना वाढविणे हीच उपासना. एखाद्या आईला सांगितले की, ‘ तू मुलाला जवळ ठेव पण त्याच्यावर प्रेम करु नकोस, ’ तर ते जसे शक्य नाही, त्याप्रमाणे नाम घेणाराला सत्कर्म टाळू म्हटले तरी टाळता येणार नाही. एकवेळ भजनाला देहबुद्धीची झळ लागेल, पण नामाला ती नाही, हे लक्षात ठेवावे. मरणाच्या मागे स्मरणाचा ससेमिरा लावून ठेवावा, म्हणजे मरणाची भीती नाहीशी होईल. खरोखर, भगवंताच्या नामाची तळमळ मनापासून लागायला हवी. तेरा कोटी जपामध्ये अंतःकरणाची तळमळ ही जास्त उपयोगी पडते, यात शंकाच नाही. भगवंतापासून वेगळे न राहणे, त्याचे विस्मरण होऊ न देणे, त्याच्या स्मरणात राहणे, त्याच्या नामात राहणे, यांतच खरे समाधान, शांती आणि सुख आहे. खरे सांगतो मी, मनुष्याने जन्माला येऊन एकच करावे; आपण नामात राहावे आणि दुसर्‍याला नामास लावावे. संसारात न्यून पडू देऊ नये, पण भगवंताला विसरु नये, भगवंताच्या स्मरणात स्वतःस विसरावे. सर्वांभूती नम्र होणे हाच अभिमान घालविण्याचा उपाय होय. इतर साधनांनी जे साधायचे ते नुसत्या अनुसंधानाने साधते हाच या युगाचा महिमा आहे.

N/A

References : N/A
Last Updated : November 01, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP