भगवंत - नोव्हेंबर २०

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा , म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल .


मी कोणाचा कोण? । मी आलों कोणीकडून । तू आहेसी अजन्म आत्माचि निधान । आत्म्यासी नाहीं जन्ममरण । हें सत्य आहे जाण ॥ आत्म्यास नसे जन्ममरण । तरी तो देहांत आला कैसा कोण? ॥ आत्मा निर्गुण, निराकारी । त्यास नाहीं जन्ममृत्यूची भरी । तो सत्तामात्र वसे शरीरीं ॥ आत्मा नाहीं कर्ता हर्ता । तो कल्पनेच्या परता ॥ तूं आहेस आत्मा । सर्व व्यापुनी वेगळा तो परमात्मा ॥ सर्व पोथ्यांचे सार । सर्व साधुसंतांचा विचार । परमात्मा एकच सत्य जाण ॥ रामापरतें सत्य नाहीं । श्रुतिस्मृति सांगतात हेंच पाहीं ॥ रामसत्तेविण न हाले पान । हें सर्व जाणती थोर लहान ॥ श्रीरामरुप ब्रह्मस्वरुप, निर्गुण, सगुण, सुंदर, । तयासी माझे अनंत नमस्कार ॥ रामाविणें सत्य कांही । सत्य जाण दुजें नाहीं ॥ दुःखाचा हर्ता व सुखाचा कर्ता । परमात्म्यावाचून नाही कोणी परता ॥ रामापरते हित । सत्य सत्य नाहीं त्रिभुवनांत ॥ आजवर जें जें कांहीं केलें । तें भगवच्चिंतनानें दूर झालें ॥ विषय मला मारी ठार । हा जेव्हां झाला निर्धार । तेव्हांच तो होईल दूर ॥
सर्व कांहीं पूर्ववत चालावें । तरी पण मन रामाला लावावें ॥ वैभव, संपत्ति, मनास वाटेल तशी स्थिति, । ही भगवतकृपेची नाहीं गति ॥ न व्हावें कधी उदास । रामावर ठेवावा विश्वास ॥ स्वार्थरहित प्रेम । हीच परमात्म्याची खूण ॥ जसा सूर्याला अंधार नाहीं । तसें परमात्म्याशीं असत्य, अन्याय, नाहीं ॥ आपले आधीं आला । आपले संगत राहिला । आपले मागें उरला । त्याची संगत धरतो भला ॥ रामाचा आधार जन्माआधीं आला । पण माझे-मीपणानें सोडून गेला ॥ सर्व स्थिति-लय-कर्ता । एकच प्रभु माझा राम त्राता ॥ राम सर्वव्यापी भरला । तो माझेपासून दूर नाहीं जाहला ॥ परमात्मा सर्व ठिकाणीं भरला ॥ त्याचेविण रिता ठाव नाहीं उरला ॥ सर्व जीव पराधीन । सर्व परमात्म्याचे अधीन ॥ म्हणून जें जें घडेल कांहीं । तें तें त्याचे सत्तेनेंच पाहीं ॥ चातुर्य, बुद्धी, देहभाव, वासना, कल्पना । ही मायाच अवघी जाण ॥ माया बहुत जुनाट । तिनें बहुतांस भोगविले कष्ट ॥ मुख्य देहबुद्धी अविद्यात्मक । अविद्या पराक्रम साधी फार । तिची शक्ति फार मोठी । आत्मदर्शन न होऊं देई भेटीं ॥ म्हणून जें जें दिसतें तें तें नासते । हा बोध घेऊन चित्तीं । सज्जन लोक जगीं वर्तती ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 01, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP