भगवंताचे अस्तित्व जिथे पाहावे तिथे आहे. भगवंताचे मर्म ओळखायला, मी कसे वागावे हे प्रथम पाहावे. भगवंत आहे की नाही हे जाणण्याकरिता आपल्याला बुद्धी दिली आहे. भगवंत निश्चित आहे हे काहींना अनुभवाने कळले. आपण त्यांचे आप्तवाक्य प्रमाण मानले. भगवंताचे अस्तित्व जर निश्चित आहे तर त्याचे ओळख तरी कशी करुन घ्यावी? बीजगणितामध्ये उदाहरण सोडविताना एक अज्ञात ‘ क्ष ’ घ्यावा लागतो. उदाहरणाचे उत्तर येईपर्यंत त्या ‘ क्ष ’ ची खरी किंमत काय आहे हे आपल्याला कळत नाही, पण तो घेतल्याशिवाय चालत नाही; त्याप्रमाणे, जीवनाचे कोडे सोडविण्यासाठी आज अज्ञात असा भगवंत आपल्याला गृहीत धरलाच पाहिजे. त्या भगवंताचे खरे स्वरुप, जीवनाचे कोडे सुटेल त्या वेळी आपल्याला कळेल. खरोखर, जन्ममरणापासून मुक्त होण्याचा मार्ग जो आपल्याला दाखवितो तो खरा आप्त. भगवंताला सर्वांत अधिक काय आवडते, हे संतांनी सांगून टाकले. ते म्हणजे ‘ आपण विषय, वासना, इत्यादि सर्व काही सोडून भगवंताला शरण जावे. ’ आपण नेहमी विषयांनाच शरण जातो. भगवंताला जो शरण गेला त्याला जगाची भीतीच नाही उरत. सर्व चमत्कार करता येतात, पण भगवंताला शरण जाणे फार कठीण आहे.
आपण जिना चढतो ते जिन्यासाठी नसून, वरच्या मजल्यावर जाण्यासाठी असते. वरच्या मजल्यावर जाणे हे साध्य असून, जिना हे त्याचे साधन आहे. त्याप्रमाणे तीर्थयात्रा, व्रते, नेमधर्म ही साधने असून, परमेश्वरप्राप्ती हे आपले साध्य आहे. पण परमेश्वरप्राप्ती बाजूलाच राहिली आणि आपण साधनालाच घट्ट धरुन बसलो आहोत, याला काय करावे? मूळ भगवंत हा निर्गुण, निराकार आणि अव्यक्त आहे, पण मनुष्य त्याला आपल्या कल्पनेमध्ये आणतो. आपल्या ठिकाणी असणारे गुण पूर्णत्वाने त्या भगवंताच्या ठिकाणी आहेत, अशी आपण कल्पना करतो. याचा अर्थ असा की, आपण प्रथम भगवंताला जडामध्ये पाहतो, आणि मग त्याच्या नामाकडे जातो. भगवंताने केलेली ही सृष्टी, आहे तशीच सर्व जरुर आहे. तिच्यामध्ये बदल करायला नको, बदल आपल्यामध्ये करायला हवा. आपले सगळे जीवन जर भगवंताच्या हातामध्ये आहे, तर मग जीवनातल्या सर्व घडामोडी त्याच्याच हातात आहेत यात शंका कोणती? झाडाच्या मुळांना पाणी घातले की त्याच्या सर्व भागांना ते पोहोचते, तसे, भगवंताचा विसर पडू न दिला म्हणजे सर्व काही बरोबर होते. भगवंत हवासा वाटणे, यामध्येच सर्व मर्म आहे. आत्मा हा समुद्रासारखा आहे; त्याचा अगदी लहान थेंब, त्याप्रमाणे हा जीव आहे. त्याची ओळख होऊन आत्म्याशी समरस होणे, हेच खरे तत्त्वज्ञान आहे. या आत्म्याचे नित्य स्मरण ठेवून आनंदात असावे.