भगवंत - नोव्हेंबर १२

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा , म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल .


बद्ध हे जगाचे असतात. मुक्त हे जगाचे नसून एका भगवंताचे असतात. संताची चौकशी करताना, त्याची उपासना कोणती, गुरु कोण, हे पाहतात; त्याच्या आईबापांची नाही चौकशी करीत. संतांना देहाची आठवण नसते; ते आपला देहाभिमान, मीपण, भगवंताला देतात. परमात्म्यापेक्षा विषयाची गोडी ज्याला जास्त तो बद्ध. विषयाचे प्रेम कमी होणे म्हणजे मुक्तदशेच्या मार्गाला लागणे. ‘ मी भगवंताचा ’ म्हटले की तिथे बद्धपणा संपला. आपण बद्ध आहोत हे तरी, आपणच, बद्ध आहोत अशी भावना करुन घेतली आहे म्हणून, आपण, मूळ तेच रुप स्वयंसिद्ध असताना, सर्व इंद्रिये मिळून होणारा देह मी आहे असे म्हणतो; आणि त्यामुळे देहाला जे सुखदुःख होते ते आपल्याला झाले असे म्हणतो. आत्मा स्वतः त्यापासून अलिप्त असतो. परंतु आत्मा आणि देह वेगळा नाही असे आपण म्हणत असतो; म्हणून मी तोच देह आणि हा देह तोच आत्मा, अशी आपली भावना दृढ झालेली असते. परंतु आपण बोलण्यात मात्र ‘ माझा ’ हात दुखावला किंवा ‘ माझ्या ’ पोटात दुखते, असे म्हणतोच की नाही? म्हणजे, प्रत्येक अवयव ‘ माझा ’ म्हणणारा कुणीतरी वेगळा आहे हे खरे; आपल्याला ते बरोबर समजत नाही इतकेच. मीपणा हा आपल्यात इतका बाणलेला असतो.
आपले मन विषयाच्या आनंदात रंगते, म्हणून तिथे आपण आपलेपणाने वागतो. परंतु विषयच जिथे खोटे, तिथे मन रंगूनही, ते नाहीसे झाले म्हणजे आपल्याला दुःख हे होणारच. आपण दुसर्‍यावर अवलंबून राहिलो म्हणूनही सुखदुःख होते. म्हणून, आपण त्या सर्वांपासून निराळे आहोत असे समजून वागावे. हे होण्यासाठी परमेश्वराची भक्ती करायला पाहिजे. भक्तीला जर काही आड येत असेल तर आपली देहबुद्धीच होय; आणि ती गेल्याशिवाय खरी भक्ती होणारच नाही. तरी आपण परमेश्वराचे आहोत असे समजून वागावे. जे जे होईल ते ते त्याची इच्छा म्हणून झाले असे समजून वागू लागलो, म्हणजे आपली देहबुद्धी हळूहळू कमी होत जाईल. याकरिता काही तप, याग वगैरे करावे लागत नाही, संसार सोडून वनातहि जावे लागत नाही आणि विशेष आटाआटीही करावी लागत नाही. जे घडते ते ‘ मी केले ’ हा मीपणा टाकून, ‘ मी देवाचा आहे ’ असे म्हणून, आणि जे होईल त्यात आनंद मानून राहावे, म्हणजे मीपणा सुटत जाईल. हे ‘ मी ’ केले नाही, परमात्म्याच्या इच्छेने झाले, असे मानले म्हणजे मीपणा राहिला कुठे?

N/A

References : N/A
Last Updated : November 01, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP