भगवंत - नोव्हेंबर २६

ब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.


भगवंताचे नाम मुखातून न येण्यापेक्षा मुकेपण बरे नाही का? दृष्टी जर भगवंताची मूर्ती पाहात नसेल तर ती दृष्टी काय कामाची? आपले कान त्याची कीर्ती जर ऐकत नसतील तर ते कान काय कामाचे? डोळ्यांनी भगवंताची मूर्ती पाहणे, मुखाने भगवंताचे नामस्मरण करणे, कानांनी त्याचेच गुणानुवाद ऐकणे, हाच खरा अभ्यास आहे. भगवच्चरित्र ऐकायचे कशासाठी? तर त्याप्रमाणे वागण्यासाठी.
भगवत्प्राप्तीसाठी एक सुलभ उपाय आहे: भगवंताशी आपले नाते जोडावे, कोणते तरी नाते लावावे. भगवंत हा माझा स्वामी आहे, मी त्याचा सेवक आहे; तो माता, मी लेकरु; तो पिता, मी पुत्र; तो पती, मी पत्नी; तो पुत्र, मी आई; तो सूत्रधार, मी बाहुले; असे काही नाते लावावे. मुलगा दत्तक घेतल्यावर मग त्याच्याशी पुत्रप्रेम लावतो की नाही? लग्न होण्यापूर्वी कोण नवरा आणि कोण बायको? पण लग्न होताच ते नाते लावतो, आणि सहवासाने प्रेम वाढवितो. प्रेम केल्याने प्रेम वाढते. तसे भगवंताविषयीचे प्रेम कोणचे तरी नाते लावून वाढवावे. किंबहुना तो स्वभावच व्हावा, म्हणजे भगवत्प्राप्ती सुलभ होते. हनुमंताने दास्यभक्ती केली, रामाला आपल्या ह्रदयातच ठेवले. गूहकाचे रामावर तसेच प्रेम होते. रावणाने शत्रू म्हणून, भरताने भाऊ म्हणून, सीतामाईने पती म्हणून, बिभीषणाने मित्र म्हणून, हनुमंताने स्वामी म्हणून, भगवंताला आपलासा करुन घेतलाच.
ज्या गावात मारुती नाही त्या गावात राहूच नये. मारुती गावात नसेल तर निदान आपल्या घरी तरी ठेवावा. घरात देवाची उपासना करावी. घर हे मंदिराप्रमाणे असावे. परान्न म्हणजे दुसर्‍याने मिळविलेले अन्न. आपण घरी जे अन्न खातो ते देखील परान्नच आहे, कारण अन्नदाता परमात्माच आहे. त्याचे स्मरण ठेवून अन्न खावे. चवीला बळी न पडता, जरुर असेल तेव्हा आणि तेवढेच खाणे, याचे नाव सात्त्विक आहाय होय. मुख्य म्हणजे, प्रत्येक गोष्टीत भगवंताची आठवण राहिली पाहिजे; मग ते खाणे, पिणे, गाणे, बजावणे, हिंडणे, काहीही असो. गायनामध्ये ठरलेल्या सुरात शब्द म्हणायचे असतात, त्यामध्ये भगवंताची आठवण राहाणे कठीण असते. गायन हे करमणुकीकरिता असले तरी भगवंताला अशा प्रेमाने आळवावे की त्याच्या डोळ्यांत पाणी यावे. राम आपल्या जरुरीपुरते कुठेही देतो, म्हणून भगवंत देईल त्यात समाधानाने राहायला शिकावे. प्रपंचात दुःखप्रसंग आले म्हणजे रामस्मरण होते; तसे ते सर्व काळी करावे. रामावर श्रद्धा पूर्ण असावी, म्हणजे आपली काळजी त्याला वाटते.

N/A

References : N/A
Last Updated : November 07, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP