श्रीज्ञानेश्वरसमाधी महिमा - अभंग १ ते १०
श्रीसंतज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतलेली पाहून श्रीनामदेवांना भरून आले आणि त्यांनी श्रीसंतज्ञानेश्वरांच्या स्तुतीपर हे अभंग लिहीले.
१
ज्ञानदेवो म्हणे विठठलासी । समाधान तूंचि होसी ।
परि समाधि हे तुजपासीं । घेईन देवा ॥१॥
नलगे मज मुक्ति । नलगे मज मुक्ति ।
तुझां चरणीं आर्ती । थोर आथी ॥२॥
विठोजी म्हणे ज्ञानदेवा । ज्ञानसागरा अनुभवा ।
वचनेंचि विसांवा । जाला मज ॥३॥
ऐकें ज्ञानचक्रवर्ती । तूं तंव ज्ञानाचीच मूर्ती ।
परि पुससी जे आर्ती । ते कळली मज ॥४॥
येक येक अनुभव कृपा । पद पदांतरें केला सोपा ।
परि यांत माझिया कृपा । सकळही वोळली ॥५॥
ज्ञानदेवें चरणीं मिठी । मनेंसी पडली एके गांठी ।
दृश्यादृश्य जाली एक दृष्टी । प्रत्यक्ष भेटविलेंसी ॥६॥
कर ठेउनी कुरवाळी । सर्वांग न्याहार न्हाहळी ।
म्हणे तुवाम घेतली जे आळी । ते सिद्धितें पावेल ॥७॥
नामा उभा असे सन्मुख । ऐकतां थोर खेद दुःख ।
म्हणे ज्ञानांजन महासुख । समाधि घेतसे ॥८॥
२
ज्ञानदेव उभा जोडोनि हस्त । पाहती समस्त ।
विठोजी म्हणे सकळा स्वार्थ । या ज्ञानांजनाचा ॥१॥
कैसे वोळले त्वाम ज्ञाना । समाधान तया ध्याना ।
मन नाठवें मीतूंपणा । समाधि खूना ज्ञानासी ॥२॥
मग म्हणे विठोजी दातार । समाधि तुज निरंतर ।
आतां प्रस्थान करी साचार । मज निरंतर आठवी ॥३॥
कैसे परिपूर्ण वोळले । आपण समाधिरुप जाले ।
मनातें मन समरसलें । विठठलरुपीं ॥४॥
दशमी प्रस्थानाचा समयो । येकादशी जागर उत्सावो ।
द्वादशी क्षीरापती महोत्सवो । ज्ञानदेवेम केला ॥५॥
त्रयोदशीं म्हणे पांडुरंग । कांहीं न करीं गा उद्वेग ।
आळकापुरीं समाधि प्रसंग । करीं करीम लवलाह्या ॥६॥
माता रुक्मणी वाढी ताटीं । विठोजी म्हणे उघडी दृष्टी ।
तुज मज आहे नित्य भेटी । येई पंढरीये ॥७॥
नामा म्हणे ज्ञानउदयो । आळंकापुरीं सिद्ध समयो ।
परी विठठलीं मुराला भावो । या ज्ञानदेवाचा ॥८॥
३
विठोजी म्हणे ज्ञानदेवा । तुझी विश्रांति मन ठेवा ।
ते मुराली आमुचिया भावा । निःसंदेहें ॥१॥
कैसें समाधान ज्ञानदेवा । आळंकापुरीं समाधि ठेवा ।
विठठल ओळला वोल्हावा । नित्यरुपसमाधि ॥२॥धृ०॥
संत करिती महा खेद । म्हणती ज्ञानांजन उद्धोध ।
मग चालिले विद्गद । आळंकापुरीसी ॥३॥
महावल्ली वृक्ष अजान । तो निक्षेपिला पूर्णधन ।
मग विठोजी म्हणे आपण । ज्ञानदेवासी ॥४॥
धन्य धन्य ज्ञानेश्वरा । पुण्यभूमि समाधि स्थिरा ।
कृष्ण-पक्षीं तुज निर्धारा । भेट देत जाईन ॥५॥
कार्तिक मास शुद्ध एकादशी । पंढरीयात्रा होईल सरिशी ।
दुसरी कृष्णपक्षीं निर्धारेंसी । तुज दिधली असे ॥६॥
हें ऐकोनि संत-जनीं । जयजयकार केला ध्वनी ।
दिंड्या पताका मेळ गगनीं । देव सुमनें वर्षताती ॥७॥
नामा म्हणे आले विष्णव । आलंकापुरीं मिळाले सर्व ।
समाधिं सुखी ज्ञानदेव । बैसते जाहले ॥८॥
४
महा उत्साव त्रयोदशी । केली त्या ज्ञानदेवासी ।
मग नामा म्हणे विठोबासी । चरण धरुनियां ॥१॥
समाधिसुख दिधलें देवा । ज्ञानांजन आळंकापुरीं ठेवा ।
आजानवृक्षी बीज वोल्हावा । या ज्ञानंजनासी ॥२॥
कृपा आली विठठलासी । म्हणे ज्ञानदेवा परियेसी ।
तीर्थ भागीरथी अहर्निशीं । तुज नित्य स्नानासि दिधलीसे ॥३॥
इंद्रायणी दक्षिणवाहिनी । भागीरथी मणिकर्णिका दोन्ही ।
इया मिळालिया त्रिसंगमीं । पुण्यभूमि तुझिये ॥४॥
येथें जरी नित्य स्नान घडे । तरी नित्य वैकुंठवास जोडे ।
तुज नाहीं नाहीं रे कुवाडे । मी वाडें-कोडें उभा असे ॥५॥
येथें हरिकथा नाम वाचे । जो उच्चारिल विठठलाचे ।
तयासी पेणें वैकुंठीचें । दिधलें साचें तिअक्षरीं ॥६॥
आणिक ऐके रे ज्ञानराजा । जो या सिद्धेश्वरीं करील पूजा ।
तो अंतरंग सखा माझा । मुक्ति सहजा जाली त्यासी ॥७॥
नामा म्हणे ऐसें अंतरंग । कैसा वोळला पांडुरंग ।
ज्ञानदेवीम समाधि सांग । हरिपाठ कीर्तनें ॥८॥
५
सनकादिकीं मंत्रघोष । केले विधिपूर्वक पांच दिवस ।
मग पांडुरंग यथावकाश । भक्ता वास महिवरी ॥१॥
धन्यभूमि आळंकापुरी । ज्ञान समाधि खेचरी ।
पूर्ण परिपूण श्रीहरी । स्वयें आपण उभा असे ॥२॥धृ०॥
संत भागवत देव्हडे । अमर उभे चहुंकडे ।
नारद तुंबर पुढें । वीणा वाजविती ॥३॥
एकीं केला जयजयकार । ज्ञानदेवीं धरुनियां कर ।
विठठल चरणा समोर । निकट बैसते जाले ॥४॥
करें कुरवाळिलें ज्ञाना । कांसवी अवलोकिला पान्हा ।
आंसुवें येताती नयना । तया ज्ञानदेवाचिया ॥५॥
विठोजी म्हणे ज्ञानांजना । तुझेनि कवित्वें हर दारुणा ।
उच्चारितां महाविघ्ना । सकळै पळतील ॥६॥
तुज आठविले जो भक्त । तो होईल विरक्त ।
ऐसें विठोजी बोलत । येरु चरणीं रुळे ॥७॥
नामा म्हणे सकळ तीर्थराज । तया कृपा कैसी केली सहजा ।
एकादशीं दिधली पूजा । तया ज्ञानदेवासी ॥८॥
६
स्नानविधि केलियां भक्तीं । नाममंत्राचिया आवृत्ति ।
मग प्रत्यक्ष पूजिली मूर्ति । विठोबची ॥१॥
धन्य धन्य तो देव ज्ञान । राजा निवृत्ति निधान ।
विठोजी आपण । भक्तां साह्ये ॥२॥
मग सकळहि भक्तमेळीं । सहित वनमाळी ।
बैसले तये पाळीं । इंद्रायणीचे ॥३॥
एकीं केलें स्तुतिस्तोत्रें । एक जपाताती नाममंत्रें ।
एक गाताती वेदस्तोत्रें । विठोबासी ॥४॥
तंव पुढारा जाला नारा । तो नामयाचा पुत्र सैरा ।
तो पुसतसे विचारा । नामयासी ॥५॥
ये संतभेमाजीं । राऊळ बैसले असे सहजीं ।
यातें पुसि जो कां जी । कवण क्षेत्र म्हणोनी ॥६॥
उठिला नामा प्रेमें डुले । वंदिलीं विठ्ठल पाउलें ।
मग करद्वयें जोडुनि बोले । साशंकित ॥७॥
नामा म्हणे पूर्णब्रह्म । तें कैसें सभासदीं मन ।
तें बोलतसे परम । ज्ञानदेवा भाग्यें ॥८॥
७
मग सकळ प्रेम पुतळे । बैसले माजीं ब्रह्ममेळे ।
तेथें नामा वचन बोले । स्वामीप्रति ॥१॥
वोळलें चैतन्य सतरावें । पूर्ण वोघ नामा विठठलदेवें ।
पव्हे घालुनी ज्ञानदेवं । जग तारिलें कीर्तनें ॥२॥
नामा म्हणे स्वामी सर्वज्ञ । परि आमुचें मन निमग्न ।
चरणरजें पापभग्न । पवित्र जालों ॥३॥
तरी स्वामिराजा विनंति । परियेसी गा माझी पुढती ।
हे आळंकापुरीं होती । कवणियें युगीं ॥४॥
हें सांगिजे जी समर्था । कवण क्षेत्र कवण तीर्था ।
येथें क्षेत्रज्ञ हा सर्वथा । कवण धर्म असे ॥५॥
तूं आत्माराम संपन्न । जुगा जुनाट नारायण ।
तुनप्रति हें वचन । न साहे माझें ॥६॥
कासवीचा तुषार गाढा । तैसा तुझा पवाडा ।
हें पुसणें कवणियां चाडा । तें तूंचि जाणसि ॥७॥
नामा उभा तिष्ठत प्रेमें । संत दाटले सप्रेमें ।
आपण तें तें अनुक्रमें । सांगतसे देव ॥८॥
८
देवासी कळलें गौप्यगुज । म्हणे रे नामया हेंचि चोज ।
तो निजभाव सहज । प्रगट सांगूं आतां ॥१॥
कृतयुगीं क्षेत्र आदि । ज्ञानदेवा तेथेम समाधि ।
देव सांगतसे शुद्धी । योगबुद्धी जुनाट ॥२॥
ऐकें भक्तजनश्रेष्ठा । भूमिनामें वैकुंठपीठा ।
तें हें आळंकापुरीं श्रेष्ठा । आदि वरिष्ठा पीठा आठरा ॥३॥
आणिक ऐकरे वचन । हे पंचक्रोशी पुरातन ।
यासी युगें सांगता संपन्न । चतुरानन जाणतसे ॥४॥
कांहीएक किंचित सांगों । युगसंख्या मार्गांत रिघों ।
तरी वैवस्वत हाचि मागो । पूर्ण वोळंगो यापासोनी ॥५॥
मनु सहस्त्र युगें संख्या । तैं आळंकापुरीं आदि लक्षा ।
कोटी याग असंख्या । सहस्त्र दक्ष येथें जाले ॥६॥
आदि क्षेत्र संख्यारहित । ऋषमुनीं तपती सप्त ।
आणि नारदमुनि असे जाणत । हेचि पुरी पुरातन ॥७॥
नामा म्हणे कैसें दिधलें । हें ज्ञानासी सिद्ध लाधलें ।
हेंचि आम्हासी जोडलें । पूर्ण लाधलें पीयूष ॥८॥
९
देव म्हणे नामया । ऐकें येथें चित्त देउनियां ।
एक एक तीर्थ सांगावया । हें तों पुराणीं असे ॥१॥धृ०॥
नकळे देवाची थोरी । कैसें पुढारिले मुरारी ।
गौप्यगुज श्रीहरी । सांगतसे नामया ॥२॥
पुराण म्हणसी कोण कथा । तरी ऐकें गा तूं सकळार्था ।
शैवशास्त्र हा ग्रंथ सर्वथा । सिद्धमार्ग असे ॥३॥
जें जें जुनाट क्षेत्रतीर्थ । जें जें ब्रह्मनामें परमार्थ ।
तो तो सांगितला हेत । चतुरानाननें ॥४॥
ऐसें देवमुखीचें वचन । ऐकतां संतोषले पूर्ण ।
मग देताति आलिंगन । येकमेकांसी ॥५॥
जयजयकाराचा ध्वनी । विठठनामें गर्जे वाणी ।
प्रेम ओसंडत नयनीं । स्फुंदन रोमांचित दाटले ॥६॥
स्फुंदत नामा नाचे गाये । परिसा म्हणे वोळली माये ।
तो ज्ञानासी पान्हा होये । पूर्ण बोधाचा ॥७॥
नामा म्हणे सकळ संतमेळीं । कथा सांगितली रसाळीं ।
तंव ज्ञानदेवा करतलमळीं । समाधि शेज घातली ॥८॥
१०
मग म्हणे सर्वज्ञ विठठल । न लावावा वाढवेळ ।
मग पातले निर्मळ । सिद्धेश्वरलिंगी ॥१॥
धन्य धन्य हरिदिवस । धन्य धन्य हा निवास ।
आपण ह्रषिकेश । भक्ता साह्य ॥२॥
वैष्णव मिळाले संपन्न । गाती हरिनाम कीर्तन ।
तंव पातले सोपान । प्रेमें वोसंडत ॥३॥
चरणीं घातली मिठी । विठोजी म्हणे उठी उठी ।
लवलाहें उघडी दृष्टी । भेटे ज्ञानदेवा ॥४॥
येरु म्हणे मी कृतकृत्य । नामस्मरण तुझें नित्य ।
तेणें सकळ हित । आमुचें जालें ॥५॥
तूंचि गा जनकजननी । तूंचि एक त्रिभुवनीं ।
पाहतां नित्य उन्मनीं । लागे आम्हां ॥६॥
समाधि शेज ज्ञानेंसी । घातली अहर्निशीं ।
ते कर्णीं परिसत जिवेंसी । तुवां चरण धरित आलों ॥७॥
नामा म्हणे ज्ञान सोपान । एक जाले जनीं जनार्दन ।
समाधिसंगें संजीवन । आळंकापुरी आले ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : January 02, 2015
TOP