श्रीज्ञानेश्वरसमाधी महिमा - अभंग ३१ ते ४०

श्रीसंतज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतलेली पाहून श्रीनामदेवांना भरून आले आणि त्यांनी श्रीसंतज्ञानेश्वरांच्या स्तुतीपर हे अभंग लिहीले.


३१
ऐसें देखिलें वैष्णवीं । वैकुंठ नगरी चिरंजीवी ।
आणि ज्ञानदेव गोसावी । विष्णुमूर्ती चतुर्भुज ॥१॥
तालालोरी वाजविती पावा । समाधान होतसे जीवां ।
नामा विनवितो केशवा । तुझ्या दरुशनें निवालों ॥२॥
तंव रुक्मिणीनें विनविलें । यासि भोजन सारा कां वहिलें ।
तंव अक्रूरें पाचारिलें । समस्तांसीं देखा ॥३॥
उद्धव घालित आसनें । ताटें विस्तारिलीं बोनें ।
राही रुक्मिणी विचक्षणें । पंचामृतें वाढिती ॥४॥
समस्त भक्त दाटले । पांतीकर एकवटले ।
नानापरी भात विस्तारिले । परिमळित मघमघां ॥५॥
वरी मिरवे मुगांचे वरण । कथिका वाढिली संपूर्ण ।
नाना कोरिकें विस्तीर्ण । रुक्मिणी वाढितसे ॥६॥
कामधेनूचें घृत । पयोदधिक्षीर वाढित ।
नानापत्र शाखा शोभत । वैष्णवांचा ताटीं ॥७॥
ऐसें समस्तांसीं संपूर्ण । ताटें जालीं विस्तीर्ण ।
तंव देव बोलती आपण । ज्ञानदेवासी ॥८॥
निवृत्ती सोपान बोलवा । मुक्ताईस वेगीं आणवा ।
पांथिकरासी रिघावा । ताटीम बैसवा समस्तांसी ॥९॥
विष्णुमूर्ती चतुर्भुज । पूजी ब्राह्मण द्विभुज ।
तुळसी मंजिरी केसिराज । त्यांचे मस्तकीं वाहतसे ॥१०॥
चरणतीर्थ घेतलें । तेणें समस्त मंदिर शिंपिलें ।
आपण मुखीं घातलें म्हणे । कृतकृत्य जालों मी ॥११॥
नामा तिष्ठत उभा द्वारीं । त्यासीही रुक्मिणी ताट करी ।
ऐसीं भोजनें परोपरी । जालीं वैष्णवांचीम ॥१२॥

३२
ऐसेम भक्त जेवुनि धाले । समस्त पांतिकरु उठिले ।
गोपाळें विडे दिधले । आपुलेनि करकमळें ॥१॥
धन्य धन्य तें भोजन । धन्य धन्य तें निधान ।
धन्य धन्य तो वृक्ष अज्ञान । धन्य नारायन आळंकापुरी ॥२॥
विठ्ठलें दिधलें वचन । यांसी घाला रे आसन ।
तंव उद्धवें आपण । समस्तां बैसकार दिधले ॥३॥
पूजिलें गंधाक्षता लावुनि । टिळे उटी कर्पुर चंदनीं ।
ऐसे तिये वैकुंठभुवनीं । वैष्णवांसी पूजी हरी ॥४॥
तंव म्हणे रुक्मिणी । नामा आणा बुझावुनि ।
आपलेनि हातें चक्रपाणि । त्यासी घांस घालावे ॥५॥
ऐसें सांगताम हरीसी । बुझाविती नामयासी ।
तो स्फुंदत उकसा बुकसीं । मग चहूंकरीं उचलिला ॥६॥
सवेम संतांचा मेळा । तयामाजीं परब्रह्म पुतळा ।
नामा बुझावोनी तत्काळा । देहावरी आणिला ॥७॥
तंव विस्तारुनी आणिलें ताट । माजी षड्रस अन्ने बरवंट ।
रुक्मिणी आणि जेथें वैकुंठ । भक्तांसहित उभे असती ॥८॥
नामयातें संबोखोनि हरि । बैसविला मांडियेवरी ।
कवळ घ्यावचा मुख पसरी । निजकरें हरी घालितसे ॥९॥
नामा आनंदें डुलत । तृप्त जाला प्रेमें ओसंडत ।
सकाळ संतां कवळ देत । आपुलेनि निजकरें ॥१०॥

३३
ऐसा येकवळा भक्तांचा । भोक्ता हरी वैकुंठींचा ।
उतरोनी आळंकापुरी साचा । करी भक्तांचा उत्छाव ॥१॥
ऐसे जेवुनि धाले । हरिकरेंचि निवाले ।
मग सुखें रहिवासले । सकळै भक्त वैकुंठीं ॥२॥
देव म्हणती निवृत्तीसी । तुम्ही जावें त्र्यंबक सिखरासी ।
मग समाधी सरिसी । गंगोदकें करुनि घ्यावी ॥३॥
तंव सोपान म्हणे स्वामी । पूर्वीं बोलिले होतेति तुम्ही ।
कर्‍हे पठार संवत्सरे ग्रामीं । समाधे देऊं म्हणोनि ॥४॥
देव म्हणती संतासि पुसा । हा ज्ञानदेव असे सरिसा ।
हाहि दिव्यदेही आम्हांसरिसा । येईल तेथवरी ॥५॥
मुक्ताई म्हणे देवाधिदेवा । आम्ही करावी चरणसेवा ।
तुझेनि विचारेम जी केशवा । समाधीधन भक्तांसी ॥६॥
ऐसा करीती विचार । तंव पातला राजा इंद्र ।
भक्तीं केलें जयजयकार । देवें दुंदुभी वाजविल्या ॥७॥
संत सनकादिकीं स्तोत्रें । मुखीं आरंभिलीं पवित्रें ।
गाती हरीनाम चरित्रें । ऋषिगण सकळीक ॥८॥
धन्य आळंकापुरी ग्राम । जेथें प्रत्यक्ष पुरुषोत्तम ।
नामा नाचे हरिचे द्वारीं । ब्रह्मांद गरजे जयजयकारीं ।
निवृत्ति सोपान म्हणती हरी । आम्हां निरंतरी सांभाळीं ॥१०॥

३४
नानागंधें तुलसीमाळा । वैष्णवीं घातलिया गळां ।
नमस्कार करीती गोपाळा । चरणरजा वंदिती ॥१॥
दोहीं बाहीं देव्हडे । संत सनकादिक गाढे ।
जयजयकार पुढें । महाशब्दें गर्जिन्नले ॥२॥
ऐसे इंद्रायणीचां तटीं । हरि रुक्मिणी जगजेठी ।
संत सनकादिकांची  गोमटी । मांदी मिळाली असे ॥३॥
तंव पुंडरिकें नमस्कार केला । म्हणे तूं कां गा येथें विठो उगवला ।
बहुत दिवस येथेंचि राहिला । या ज्ञानेदेवाकारणें ॥४॥
तरी पंढरीहुनि हे श्रेष्ठ । तूं येथें उभा अससी प्रगट ।
भूमी उतरलें वैकुंठ । ज्ञानदेवाकारणें ॥५॥
बहुत दिवस येथेंचि जाले । मी न देखें विटेवरी जंव पाउलें ।
तंव नयन माझें भुकेले । न राहाती देवराया ॥६॥
देव म्हणती पुंडरिका । तूं भक्त माझा निजसखा ।
आणि हा ज्ञानदेव देखा । दुजा न देखोम आणिक ॥७॥
हें संत सनकादिक माझे । यांचेनि समागमें माझें बीजें ।
नामा डौरिन्नला यांचे चरणरजें । मग जावों रे पंढरीसी ॥८॥

३५
सवें तीर्थें मिळालीं अनंतें । तीं सुखी करुनी कृतार्थें ।
संवत्सरा जावोनी सोपानातें । समाधीसी बैसंवू ॥१॥
अनंत सुखाचिया रासी । उदैल्या भक्तांचिया मानसीं ।
आनंद जाला पुंडरिकासी । मग न बोले कांहीं ॥२॥
सोपान म्हणे वैकुंठा । बिजें किजो महाश्रेष्ठा ।
संवत्सर ग्राम कर्‍हे तटां । वैकुंठासहित चालावें ॥३॥
इंद्रचंद्रब्रह्माहर देव । आणि गण मिळाले सर्व ।
तेहतीस कोडी देव । विमानीं आरुढले देखा ॥४॥
निवृत्ति सोपान ज्ञानदेवो । त्रिमूर्ति तिन्ही देवो ।
धर्मरक्षणार्थ पाहा हो । मनुष्यरुपें अवतरले ॥५॥
तिघेही उभे सन्मुख । तिघांही थोर संतोष ।
विनविती केशवास । स्वामी विनंति अवधारिजो ॥६॥
ये आळंकापुरीसी ।स्थापावें कोटी तीर्थांसी ।
जो जो भक्त येईल स्नानासी । तो वैकुंठासि आणावा ॥७॥
ऐसें आइकोनि श्रीहरी । म्हणे धन्य धन्य तुमची वैखरी ।
जगदोद्वार केला संसारीं । बावीस वरुषें असतां पैं ॥८॥
जो जो दिवस उगवला । तो तो ज्ञानदेवें सफळ केला ।
पद पदांतर कथिला । जेणें आत्माराम संतोषे ॥९॥
पूर्वीं अनंत भक्त जाले । पुढें ही भविष्य बोलिलें ।
परी निवृत्तीं ज्ञानदेवेम सोडविले । अपार जीवजंतु ॥१०॥
जो अभक्त मनुष्य जनीं प्राणी । ज्याचा भार न साहे मेदिनी ।
मग इहीं अवतार घेउनी । जग तारिलें कीर्तनें ॥११॥
नामा पंढरीस नाचत । ज्ञानेश्वर आळंकापुरीं शोभत ।
सोपान संवत्सरी मिरवित । निवृत्ति त्र्यंबकसिखरीम ॥१२॥

३६
ऐसें पांडुरंग बोलिले । मग सकळ तीर्थांसी सांगितलें ।
आळंकापुरीं वसिजो वहिलें । भक्त तारावया ॥१॥
जो जो करील कीर्तन । तो तो तरेल जाण ।
आळंकापुरीं नारायण । स्वयें उभे असती ॥२॥
ऐसा निरोप तीर्थांसि । ते तिष्ठति अहर्निशीं ।
कीर्तन करितां गजरेंसि । वैकुंठासी नेवों म्हणती ॥३॥
देव म्हणे यमुना नर्मदा । सरस्वति भागीरथी त्रिविधा ।
गंगा कृष्णा तुंगभद्रा । इंद्रायणीस मिळावें ॥४॥
जो जो भक्त येईल स्नाना । तो पवित्र कराया ये क्षणा ।
वैकुंठ कैलसापर्यंत जाणा । त्यासी घेवुनि यावें ॥५॥
हो म्हणती तीर्थें सकळें । मग मीनली आपुलेनि मेळें ।
गुप्त राहोनि यथाकाळें । आज्ञा शिरसा वंदिती ॥६॥
गया काशी त्रिवेणी । त्या शोभती विठठलचरणीं ।
ज्ञानदेवा समाधिरंगणीं । अखंड वाहों लागल्या ॥७॥
सुवर्णाचा अश्वत्थ । द्वारीम स्थापुनि निवास ।
भोवते देव्हडे तापस । समाधीस बैसले ॥८॥
देव म्हणे जो करील तप । तो होईल निष्पाप ।
केवळ होईल शिवरुप । आत्माराम साक्षात ॥९॥
जप तप नेम मंत्र ध्यान । कोटि याग घडले पूर्ण ।
अथवा द्विजीं दिधलिया अन्न । चतुर्भुज नर होती ॥१०॥
ऐसें वचन सांगे हरी । ज्ञानदेवासी धरिलें करीं ।
निवृत्ति सोपान अंतरीं । ध्यान धरोनी राहिले ॥११॥
नामा म्हणे कोटि तीर्थांचे । तीर्थं वोळलें पैं साचें ।
पाप जाईल अनंत जन्मांचें । एक स्नान केलिया ॥१२॥

३७
मग अष्टदिशा व्यापुनी । तीर्थें राहिली स्थानीं स्थानीं ।
आळंकापुरीं पाटणी । इंद्रायणीचां तटीं ॥१॥
धन्य धन्य सृष्टीतळीं । आळंकापुरी महितळीं ।
कीर्तन करितां वैष्णव मेळीं । ते चतुर्भुज नर होती ॥२॥
मग पुंडलिकासी सांगितलें । कृष्णपक्षीं येथें पाहिजे आलें ।
येरु म्हणे स्वामीनें सांगितलें । ते शिरस वंदीन ॥३॥
देव म्हणे आम्ही तुम्ही । पंढरीहुनि समागमीं ।
येवों आळंकापुरा ग्रामीं । सकळ तीर्थांसहित ॥४॥
मग व्यास वाल्मिक बोलीविलें । त्यांसही हें तीर्थ सांगितलें ।
तें तिहीं शिवपीठ ऐसेम म्हणितलें । जुनाट असे केशवा ॥५॥
या शिवतीर्थाचा महिमा । कवणा वर्णवेल पुरुषोत्तमा ।
पंढरी पांडुरंग महात्मा । भीमातीरही उत्तम ॥६॥
आणिक आइकें वो सर्वोत्तमा । येथें अधिक अष्टतीर्थ ग्रामा ।
पंचक्रोशीची उपमा । सिद्धि होती तात्काळ ॥७॥
ब्रह्मा विष्णु इंद्र तप । आणि योगेश्वर उमप ।
पाताळीं शेष समीप । याज खालता आहे ॥८॥
स्कंदासी उपदेश स्थान । लोहोगिरीसी येऊन ।
पुरुरवा पुण्य क्षेत्रमहिमान । पूर्वीं येथुनि जालें ॥९॥
येथून भीमरथी नदी । भीमाशंकरा घेऊनि गेला नंदी ।
तेथुनि उगमीं पडली सर्वां आधीं । मग शंकरें तेथें स्नान केलें ॥१०॥
तें भीमा माहात्म्य प्रसिद्ध । तो हा सिद्धेश्वर अगाध ।
महा योगेश्वरा निजबोध । आळंकापुर पाटणीं ॥११॥
ऐसें व्यास बोले तये क्षणीं । नामा गेला लोटांगणीं ।
समाधी मूळपीठस्थानीं । आळंकापुरीम ज्ञानदेव ॥१२॥

३८
मग व्यासपूजा सारिली । तैसीच वाल्मिकाची केली ।
वसिष्ठादिकीं अंगिकारिली । समस्त ऋषि पूजियले ॥१॥
धन्य धन्य धरातळीं । येऊनियां देवीं सकळीं ।
माजीं सहित वनमाळी । आळंकापुरीं नगरीये ॥२॥
मग साठी तीनशें गंगा । माजी शिव द्वादश लिंगा ।
अष्टोत्तर तीर्थें समर्थें पैं गा । तिहीं स्तवन आरंभिलें ॥३॥
कोटी तीर्थांचा रहिवास । अष्टभैरव सावकास ।
वसू कोटि गणेश । साठीसहस्त्र गणासहित ॥४॥
ऐसे रहिवासले षण्मास । दिव्यद्रुमफळें प्रतिदिवस ।
दिव्य अन्नें सावकाश । अमृत भक्षिती देव ॥५॥
ऐसा सकळ तीर्थांचा मेळा । तयामाजीं परब्रह्म पुतळा ।
करी ज्ञानदेवाचा सोहळा । आळंकापुर नगरिये ॥६॥
गरुड हनुमंता ऐसे । पुढें कामारी ह्रषिकेशें ।
साक्षात वसिजे महेशें । गौरीसहित आळंकापुरीं ॥७॥
नंदि श्रृंगी त्राहाटण । प्रतिदीनीं विभूतीचे उधळण ।
जयजय शंकर शिव पूर्ण । ऐशीं स्तोत्रें गाताती ॥८॥
महा सभास्थळ वैकुंठ । सभे श्रेष्ठ वैकुंठपीठ ।
आणि शिवमूर्ती घनदाट । नीलकंठ सभेसी ॥९॥
रंभा उर्वशी नाचती । नारद तुंबर वीणे वाती ।
गणेश सारजा आळविती । सा राग एकवीस मूर्च्छना ॥१०॥
ऐसा रंग स्थिरावला । जयजयकारेम घोष केला ।
तेणें चवकोनि उठला । पाताळींचा शेष ॥११॥
ऐकोनी विष्णुकीर्तन । तयासी आलें पैं स्फुंदन ।
मग उच्चारित रामकृष्ण । मृत्युलोकासि आला ॥१२॥
सहस्त्र वदनें स्तुति करी । हर नमस्कारिले हरी ।
वाहुनि तुळसीमंजिरी । ज्ञानदेवा पूजियेलें ॥१३॥
नामा म्हणे ज्ञानउदयो । ज्ञानदेवा भाग्याचा पहा हो ।
आपण येऊनि वैकुंठरावो । समाधि दिधली जिनहस्तें ॥१४॥

३९
ऐसे स्वर्गवासी अमर । ते आपुलाले ठायीं स्थिर ।
राहोनि करिती जयजयकार । पुष्पवृष्टे ज्ञानदेवावरी ॥१॥
धन्य धन्य तूं विष्णुभक्ता । ज्ञानदेवा तूं समर्था ।
म्हणौनि पडती पुष्पचळथा । ज्ञानदेवावरी ॥२॥
अनंत तीर्थांचा मेळ । उदकें शिंपिती ब्रह्मगोळ ।
लोहगिरी सुवर्णचळ । त्यावरी आळंकापुरी ॥३॥
म्हणती धन्य धन्य हे जन । जेथें जो करील कीर्तन ।
तया जोडे वैकुंथस्थान । चतुर्भुज होऊन जाईल ॥४॥
देव म्हणती इंद्रासी । तूं पूर्वीं येथेंच होतासी ।
आणि ब्रह्मा रुद्र तापसी । पूर्वापर हे पुरी असे ॥५॥
कृत त्रेत हे द्वापारादि । येथें सकळांची समाधी ।
धन्य ज्ञानदेव गोविंदीं । रतोनी येथें बैसले ॥६॥
इंद्र म्हणे विष्णुभक्त थोर । प्रत्यक्ष हेहि हरिहर ।
निवृत्ती सोपान ज्ञानेश्वर । हेहि अवतार हरीचे ॥७॥
ऐसें सांगितलें समस्तां । मग विदित जालें उभयतां ।
शक्र जाहला निघता । ब्रह्मा आदि करुनीं ॥८॥
शेषही पाताळासी गेला । पुंडरिक गोपाळ राहिला ।
आळंकापुरा स्थिरावला । सकळां भक्तां सहित ॥९॥
सवें संतांचा मेळ । ऐसा राहिला गोपाळ ।
नामा म्हणे चक्रचाळ । पुढें कैसें वर्तलें ॥१०॥

४०
गगनपंथें शुभ्र विमानें । देव लक्षिती अधोवदनें ।
तंव आळकापुरीं कीर्तनें । टाळ मृदांग झणत्कारले ॥१॥
जयजयकार क्षितीं होत । महादोषां संहार घात ।
नामा असे नाचत । पांडुरंगापुढें ॥२॥
रामकृष्ण अवतार । चरित्र गाती सविस्तर ।
वैष्णवीं केला जयजयकार । पांडुरंग म्हणितलें ॥३॥
ज्ञानदेव बैसले समाधी । पुढें आजान वृक्ष निधी ।
वामभागीं पिंपळ क्षितीं । सुवर्णाचा शोभत ॥४॥
निवृत्ती सोपान खेचर । ज्ञानदेव मुक्ताई साचार ।
हे उत्तर द्वारासमोर । बैसते जाले ॥५॥
देव म्हणे ज्ञानेश्वरा । चंद्र सूर्य जंव तारा ।
तुझी समाधि स्थिरा । राहो हे निरंतर ॥६॥
जंववरी हें क्षितीमंडळ । जंववरी हें समुद्र्जल ।
मग कल्पक्षी यथाकाळ । माझां ह्रदयीं ठसावें ॥७॥
आणिक एक सोपारें । ज्ञानदेव च्यार अक्षरें ।
जो जप करील निर्धारें । त्यासी ज्ञान होईल ॥८॥
ऐसा दिधला आशीर्वाद । मग संतासीम बोले गोविंद ।
ज्ञानदेवा ऐसा उद्‌बोध । दुजा न देखो दृष्टीसी ॥९॥
ज्ञाना म्हणे स्वामी माझा । अंगिकार केला वोजा ।
पावला भक्तांचिया काजा । गरुडारुढ होऊनी ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP