श्रीज्ञानेश्वरसमाधी महिमा - अभंग ५१ ते ५५

श्रीसंतज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतलेली पाहून श्रीनामदेवांना भरून आले आणि त्यांनी श्रीसंतज्ञानेश्वरांच्या स्तुतीपर हे अभंग लिहीले.


५१
परब्रह्म परममूर्ती । परमधाम परात्पर कीर्ति ।
परमप्रियो परंज्योती । श्रुतिस्मृति स्वानुभव ॥१॥
अकळ विकळ निरंजन । ज्ञाताज्ञेय विवेकधन ।
संशय दृश्य निरसन । विश्वप्रिये ॥२॥
नलिनीकमलविकाशा । नयनघन विश्वेशा ।
नमन चरणलेशा । चित्सुखा ॥३॥
चराचर सच्चिदानंदांग । शुद्धस्नान शंकर दिव्यांग ।
विष्णुमूर्ति पांडुरंग । सगुणरुप भीमातटीं ॥४॥
सजळ जलघना । दशन कोटी सूर्यकिरणा ।
मुक्ताहार जडित रत्ना । किरिटी मुगुट विराजित ॥५॥
नीलोत्पल नीलवर्णा । श्यामसुंदराअ मूर्तिघना ।
स्तविताम सहस्त्रवदना । नकळे पार तुझा ॥६॥
रजतमाचे मेहुडे । पाहतां तूं न सांपडे ।
नाहीं तुझिया पडिपाडें । भूमंडळीं दैवत ॥७॥
अनंत ब्रह्मांडधीशा । गुण न वर्णवे परेशा ।
तुंवा ज्ञानदेव सर्वेशा । अपणामाजीं सामावला ॥८॥
निवृत्ती म्हणे आम्ही दीनें । तारावीं तुम्ही नारायणें ।
मग काय आदरिलें सोपानें । तेथवरी येणें घडेल ॥९॥
ऐसी निवृत्तिदेवाची स्तुती । ऐकुनियां श्रीपती ।
नामा म्हणे देव तयाप्रती । बोलत जाले ॥१०॥
नारायणें स्तुति परिसिली । ऐकुनियां अव्यक्त बोली ।
म्हणे तुवां गीतेची टीका केली । ते प्रमाण आम्हासी ॥११॥
नामा म्हणे हरी देवें । जाणोनियां अंतर्भावें ।
तुष्टले गुणगौरवें । निवृत्तीसी दिधले ॥१२॥

५२
म्हणे विठोजी शंकराचा । प्रत्यक्ष अवतार तुझा साचा ।
स्तुति केली असे वाचा । विस्मयाचा पूर मज ॥१॥
वसति सप्तद्वीप नवखंड । त्यामाजीं अनंत ब्रह्मांड ।
रोमरंध्रीं ज्या अखंड । तो मनुष्यरुपें मेदिनी ॥२॥
निवृत्तिनाथ नाना अवतारीं । तुमच्या सेवेसीं श्रीहरी ।
जें जें प्रेरसी कामारी । सांगितलें करी उगाचि ॥३॥
म्हणे देवाधिदेवा आतां । सांगाल तें करुं तत्वतां ।
हरुं भवार्णवाची चिंता । या त्रैलोक्याची ॥४॥
तंव निवृत्तीनें लोटांगन । म्हणे नाहीं तुज समान ।
आम्हांकारणें नारायण । साहाकारी होसी ॥५॥
आमुचा तपें समर्थें । तुवां सिद्धी पावविली जगन्नाथें ।
सरते करुनियां आम्हांते । विष्णुमार्गें लाविलें ॥६॥
देव म्हणे तूं आधीं । विष्णुमार्गींची सकळ सिद्धी ।
जाणतां तूं एकत्र शुद्धी । निवृत्ती होसी ॥७॥
नामा म्हणे ऐसे लळे । पाळिले तयाचे गोपाळें ।
देऊनियां समाधिसोहळे । विष्णुधर्म प्रतिष्ठिला ॥८॥

५३
ऐसा निवृत्ती स्थिरावला । महाविष्णु संतोषला ।
मग सोपानदेवें आरंभिला । स्तुतिवाद परियेसा ॥१॥
जयजया तूं रामकृष्णा । भक्तभाविकां हरी तृष्णा ।
देहीं दीपक सहिष्णा । रामकृष्ण म्हणतांचि ॥२॥
नरहरि नरकेसरी । टाळी वाउनियां गजरीं ।
टाळ मृदंग झणत्कारी । जयजय कृष्ण म्हणों आम्हीं ॥३॥
एक हरिविण नाहीं सखा । त्रिभुवनीं आत्मा देखा ।
समाधिसुखाविशेखा । चरणरजें डौरवावें ॥४॥
धन्य हे भूमिका देश । आपण हरि जगन्निवास ।
ज्ञानदेवीं केला वास । समाधिसुख घेऊनी ॥५॥
निवृत्ती ऐसा श्रेष्ठ गुरु । तोहि समाधीसी होय स्थिरु ।
तरि पुढें काय करणें विचारु । तो सांगावा स्वामिया ॥६॥
देव म्हणे ब्रह्मावतारा । या अवघिया चराचरा ।
श्रेष्ठ तूंचि निर्धारा । मनुष्यरुपें अवतलासी ॥७॥
सकळ हे तुझे व्यापक । चराचर हें त्रैलोक्य ।
अधर्मं जालिया चाळक । अवतार घेती तिघे ॥८॥
ऐसें बोले पाडुरंग । सोपान निवाला सर्वांग ।
म्हणे सांकडें फेडिता श्रीरंग । तूंचि श्री विठठला ॥९॥
नामा म्हणे सोपानदेवें । मागुती स्तुति आदरिली भावें ।
जेणें करुनियां बरवें । समाधिसेजेची ॥१०॥

५४
मुक्ताई म्हणे देवा । तूं विसावा सर्वां जीवां ।
गुण गौरव अनुभवा । आम्ही जाणों तुज ॥१॥
सत्य सत्य जनार्दना  । सत्य सत्य नारायणा ।
सत्य सत्य तूं आमुचें धना । जगज्जीवन जगदाकारा ॥२॥
तुझेवांचेनि त्रिभुवनीं । दुजा न देखों नायकों कानीं ।
वेदशास्त्रपुराणें । अगाध महिमा तुझा ॥३॥
तूं देवा देवोत्तम । योगियांचा विश्राम ।
शिवाचा ही आत्माराम । ऐसा नेम वेदाचा ॥४॥
तरी भक्तांलागीं ऐसा । पावसी तूं ह्रषिकेशा ।
तुजविण नाहीं भरंवसा । आणिकां देवांचा ॥५॥
तूं परत्रीचें तारुं । तुझा आगम निगम विचारु ।
तुज चिंतलिया संसारु । निरसे हेंचि सत्य ॥६॥
देव म्हणे मुक्ताबाई । चित्त समरसें जैं माझ्या ठायीं ।
तैं तया जन्मचि नाहीं । हें सत्य जाणावें ॥७॥
नामा म्हणे ऐसी स्तुति । मुक्ताबाई नंव करिती ।
तंव संत विनविती । महाविष्णूसी ॥८॥

५५
तंव पुंडलिक पुढारला । कर जोडोनि वदला ।
म्हणे वेदादिकां अबोला । तुझिया रुपाचा ॥१॥
तो तूं प्रकट श्रीरंगा । भीमातटीं पांडुरंगा ।
येउनि आमुचिया लोभा । भक्तजनां तारिसी ॥२॥
नेणों कोण भक्तपण । नेणों तुमचें महिमान ।
कोण तप कोण साधन । कोणें जन्मीं केलें होतें ॥३॥
नीरे भिवरेचां संगमीं । चंद्रभागेचां उगमीं ।
वेणुनाद परब्रह्मीं । गोपाळ गजरें गर्जती ॥४॥
तरी स्वामी दयाळा । महाविष्णू गोपाळा ।
भक्तालागीं कृपाळा । तारावया दासासी ॥५॥
माझें करुनियां मिस । राहिलास युगीं अठठावीस ।
धरुनि सगुण गुणास । माझे भक्ति लोधलासी ॥६॥
तूं नियंता ईश्वरमूर्ति । सकळ गोसावी श्रीपती ।
तुजवांचोनी नेणें मती । दयामूर्ति परब्रह्मा ॥७॥
नामा म्हणे पुंडलिका । देवें म्हणती पुण्यश्लोका ।
स्तुति आदर केला निका । धैर्य विवेक तूंचि होसी ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP