श्रीज्ञानेश्वरसमाधी महिमा - अभंग २१ ते ३०

श्रीसंतज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतलेली पाहून श्रीनामदेवांना भरून आले आणि त्यांनी श्रीसंतज्ञानेश्वरांच्या स्तुतीपर हे अभंग लिहीले.


२१
ऐसें परियेसिलें विठठलें । तंव रुक्मिणीनें विनविलें ।
याचें करिजो जी म्हणितलें । हाकारिजो पुंडलिका ॥१॥
धन्य धन्य धरातळीं । वोळले वोळले वनमाळी ।
वैष्णवी पिटली टाळी । जयजय शब्दें करुनियां ॥२॥
गरुडासी सांगे केशव । कैसा भेटे यासी ज्ञानदेव ।
पुंडलिकासी जाऊनी सर्व । वृत्तांत सांगे येथींचा ॥३॥
तेणें नमस्कारुनि हरी । निघाला पक्षाच्या फडात्कारीं ।
भेटला पुंडलिका झडकरी । यथाविधि सांगितलें ॥४॥
पुंडलिकें विस्मित चित्तीं । म्हणे धन्य धन्य ज्ञानमूर्ती ।
ज्या कारणें वैकुंठपती । आळंकापुरीसी गेले ॥५॥
धन्य धन्य विठोबाचे चरण । धन्य धन्य माझे नयन ।
धन्य नामा रुपीं संपन्न । विष्णु भक्त सखा माझा ॥६॥
मग गरुडासि पूजिलें । ज्ञानदेवा हाकारिलें ।
दिव्य विमानीं बैसविलें । चला म्हणितलें आळंकापुरीसी ॥७॥
नामा असे खेद करीत । केशव तयासी संबोखित ।
तुम्हा दोघांचा येकांत । माझेनि संगें पुरेल ॥८॥

२२
पुढें चालिला गरुड । आक्रमित अवघें ब्रह्मांड ।
विमान शुभ्र चंड । पुंडलिक आणितसे ॥१॥
धन्य हरिभक्तांचा मेळ । धन्य धन्य तो गोपाळ ।
धन्य धन्य आळंकापुरी सुढाळ । ज्ञानदेव येतसे ॥२॥
दुरोनी लक्षित रुक्मिणी । हरुषें सांगे चक्रपाणि ।
पैल विमान येतसे गगनीं । दाखविजे नामया ॥३॥
मग नामयासी सावध । करुनियां तो गोविंद ।
म्हणे तुझा पुरविला रे छंद । पैल ज्ञानदेव येताहे ॥४॥
नेत्र विकसित पाहे । तंव गगनीम विमान दिसताहे ।
पुंडलिक गरुड आहे । दिव्य देहीं दिव्य विमानीं ॥५॥
ऐसा जंव तटस्थ घटिका । तंव उतरलें निमिष्य एका ।
नामा पावला संतोषा । ज्ञानदेवा देखोनी ॥६॥
विमानघंटी गर्जत । नामा पुढाराम चालत ।
जी जी रुक्मिणी म्हणत । वेगु कीजे ज्ञानदेवा ॥७॥
नामा ज्ञानदेव भेटले । पुंडल्कें विष्णु नमस्कारिले ।
भक्तीं जयजय शब्द केले । देवीम पुष्पवृष्टि केलिया ॥८॥

२३
आलिंगन पडिलें दृढ । मिठी पडिली न सुटे गूढ ।
पुंडलिक म्हणे मज चाड । या विठठल चरणाची ॥१॥
तुझे दरुषण माझा लाभ । जैसा ज्ञानदेवावरी लोभ ।
नामयावरी स्वयंभ । तैसाचि करी विठठला ॥२॥
नामदेवेम आळंगुनी प्रीती । शिर चरणावरी अवचितीं ।
ज्ञानदेवाच्या ठेवी पुढतीं । म्हणे धन्य क्षितीं मी एक ॥३॥
पुंडलिक म्हणे नामया । धन्यधन्य तुझा थाया ।
क्षितीम आणिलें वैकुंठराया । ज्ञानदेवाचेनि स्मरणें ॥४॥
धन्य युगानयुगीं तुम्ही । धन्य देखिलें तीं आम्ही ।
धन्य आळंकापुर जन्मीं । उपजोनी जो देखेल ॥५॥
पंढरीहुनी हें मूळपीठ । जुनाट पैं वैकुंठ ।
पूर्वीं येथेम होते नीळकंठ । ब्रह्मविष्णुरुद्रइंद्र ॥६॥
तें हें शिवक्षेत्र प्रत्यक्ष । पूर्वे मातुलिंग साक्ष ।
तेथेंही केशव प्रत्यक्ष । चतुर्भुजरुपें असे ॥७॥
दक्षिण पुण्येश्वर देवो । पुण्यस्थळ महादेवो ।
मूळपीठीं नागेंद्रीं पाहा हो । त्रिवेणीरुपीं वाहातसे ॥८॥
पश्चिमे इंदोरिये देवो । ब्रह्मेश्वर उत्तम ठावो ।
उत्तरे सिद्धेश्वर देवो । खेटकग्रामीम भागीरथी ॥९॥
मध्यस्थळीं हे इंद्रायणी । सरसी भागीरथी वाहिनी ।
सिद्धेश्वर शोभे स्थानीं । ज्ञानेदेवो सहित ॥१०॥
ऐसिये दक्षिण वाहिनीसी । स्नान घडताम अहर्निशीं ।
कोटि तीर्थें प्रयाग काशी । प्रसन्न होती हरिहर ॥११॥
ऐसिये तीर्थीं देवा । समाधि दिधली ज्ञानदेवा ।
पुंडलिक विनवितसे केशवा । धन्य भाग्य नामयाचें ॥१२॥

२४
स्वर्ग मृत्यु पाताळ तिन्हीं ताळे उदर । विराटले थोर विश्वरुप ॥१॥
समाधिसंजीवन निवृत्ती फावले । तें निधान देखिलें आम्ही तुम्ही ॥२॥
निवृत्ति सोपान ज्ञानदेव निधी । मुक्ताई सिद्धि आळंकापुरीं ॥३॥
पंढरी प्रत्यक्ष केली ज्ञानदेवें । उभारुनि बाहे सांगे आम्हां ॥४॥
कळिकाळासीं त्रास विठठल उच्चारीं । हरी चराचरी भरला असे ॥५॥
सर्वत्र सबाह्य अंतरंग रुपडें । तें रुप फाडोवाडें पारखिलें ॥६॥
चिंतामणीचें सार कल्पतरु उघड । दावुनियां मूढ तारियेले ॥७॥
सुवर्णाचा पिंपळ तिहीं केला ठाऊका । त्या समीप देखा कल्पतरु ॥८॥
सिद्धेस्व्हरलिंग सिद्धिबुद्धि दाता । जड जीवा मुक्तता देतु हरी ॥९॥
ऐसिये स्थानकीं ज्ञानदेव राहिले । राहुनी तारिले मूढजन ॥१०॥
नामा म्हणे ज्ञानदेव हा दातार । जडजीवाम उद्धार विठठल हरी ॥११॥

२५
तंव तेथें नवल वर्तलें । आकाश असे विमानीं दाटलें ।
म्हणती मूळपीठ वैकुंठ देखिलें । पुंडलिकासगट ॥१॥
पंढरीहुनि आलें कैसें । पुंडलिक देव सरिसे ।
ज्ञानदेवासवें नामा असे । आणि विष्णुभक्त अपार ॥२॥
राही रुखमाई सत्यभामा । गाई गोपाळ मेघःश्यामा ।
म्हणती पाहाहो महिमा । या विष्णुभक्तांचा ॥३॥
सवें ध्रुव प्रल्हाद अंबऋषी । रुक्मांगद सूर्यवंशी ।
आणि ऋषीमुनी तापसी । ऐसिया समवेत वनमाळी ॥४॥
बळी भीष्म नारद । उद्धव अक्रुर विद्‌गद ।
आणि बिभीषण सुबुद्ध । हनुमंतादि करुनि ॥५॥
हा हा हु हु गंधर गाती । रुणुझुणु रुणुरुणु विणे वाजती ।
देवांगना आरतिया ओवाळिती । देशभक्तासहित ॥६॥
ऐसा शुभ काळ समयो । जाला भाग्याचा उदयो ।
ज्ञानदेव नामदेव पाहाहो । धन्य धन्य धरातळीं ॥७॥
ज्ञानदेवो निजमानसीं । विष्णुमूर्तीसी लीन जाला ॥८॥

२६
तंव बोलत उद्धव । धन्य धन्य हा देवाधिदेव ।
धन्य धन्य ज्ञानदेव । निजभक्त आवडता ॥१॥
धन्य तीर्थ इंद्रायणी । धन्य प्रत्यक्ष शूळपाणि ।
तारक ब्रह्म त्रिवेणी । मिश्रित रुपें वहातुसे ॥२॥
चिंतामणि हे पाषाण । दिव्य वनवल्ली जाण ।
जेथें लागले हरिचे चरण । ते धन्य आळंकापुरी ॥३॥
जेथें समाधिसी बैसतां । इंद्रादि सामोके येती तत्वतां ।
वैकुंठा जाईल निभ्रांता । रामकृष्ण उच्चारित ॥४॥
यम न पाहे इकडे । काळ नमस्कारी वाडेंकोडें ।
म्हणती पाहा हो केव्हढें । भाग्य या ज्ञानदेवाचेम ॥५॥
ऐसें उद्धव सांगे रुक्मिणी । होय म्हणती चक्रपाणि ।
पंढरीहुनि हे जुनाटपुराणी । शैवागमीं बोलिलेसे ॥६॥
ज्ञानदेवेम नमस्कार केला । नामा ह्रदयीं धरिला ।
प्रीतीनें पुढती अलिंगिला । म्हने धन्य धन्य रे सखया ॥७॥
नामा लोळत गडबडां । चरणजालागीम जाला वेडा ।
केशव म्हणे तूं धडफुडा । विष्णुभक्त साचार ॥८॥

२७
ऐसी प्रदक्षिणा करुनी विष्णुभक्ता । नामा जालासे सरता ।
रुक्मिणी म्हणे यातं तत्वतां । वैकुंठासी न्यावें जी ॥१॥
नामा म्हणे नेघे मुक्ती । मज पंढरीची आर्ती ।
विठठलनामें करीन कीर्ती । नित्यकाळ जीवन्मुक्त ॥२॥
मज नित्यमुक्ता जन्म नाहीं । केशवासी माते पुसोनि पाही ।
युगनयुगी अवतार दाही । याचेनि संगें मज घडती ॥३॥
तिहीं त्रिभुवनीं उदार । मुक्ति तुम्हापाशीं साचार ।
परि भक्तिविण मुक्ति असार । कोण पामर इच्छिल ॥४॥
मुक्ति फलकट नैश्वर । फळ एक विठठल सार ।
विष्णुभक्तीसी ज्याचा निर्धार । त्याचे चरण वंदीन माथां ॥५॥
विष्णुविण कीर्तन न करीं । भक्तिविण नसे क्षणभरी ।
कीर्तन करीन गजरीं । रामकृष्णगोविंद ॥६॥
मज नामाचें अमृत । माझें मुक्ति दास्य करी ।
तूं मूळमाता जाणसी जरी । तरी तुजसीं हें गुह्य बोलिलों ॥७॥
नामदेव परतोनी पाहे । तंव ज्ञानदेवें उभारिले बाहे ।
म्हणे विष्णुभक्ति ऐसी आहे । आइक माते इचा बडिवारु ॥८॥

२८
भक्त अमर स्वस्तिक्षेम । चरणरजें डौरलें व्योम ।
मग कैलासीं मंदाकिनी सोम । नीळकंठे सिरीम धरियेली ॥१॥
धन्य विष्णुचरणींची गंगा । स्नपन होत महालिंगा ।
भीमरथीं मृत्युलोकीं सवेगा । इंद्रायणीसमरसें ॥२॥
भोगावती पाताळ गेली । मग विष्णुचरणीम गुप्त ठेली ।
मग पुरोनियां उरली । त्र्यंबक सिखरीं ॥३॥
मग कितेका काळें भागीरथी । भगीरथें आणिली भारथीं ।
सगर उद्धरिले त्वरितीं । विष्नुतीर्थें करुनियां ॥४॥
ऐसी त्रिभुवनीं ज्याची थोरी । तो मुकुटमणे हा हो श्रीहरी ।
त्यातें सोडिलिया मुक्ति चारी । काय आम्हां तारिती ॥५॥
सर्वे तीर्थे ज्याचे रंक । आम्ही तयाचे सेवक ।
ज्याचेनि नामें हें त्रैलोक्य । नाम घेताम तरत ॥६॥
तो पूर्ण बीजमंत्र आम्ही जाणों । विष्णुविण कांहीं नेणों ।
पूर्ण ब्रह्म काय म्हणों । हा महिमा तूं जाणसी ॥७॥
ज्ञानदेव्म नमस्कारिले हरी । निवृत्ति सोपान झडकरीं ।
मुक्ताई भेटली लवकरीं । ज्ञानदेवा करीं धरियलें ॥८॥

२९
मग संतोष जाला हरिभक्तां । ज्ञानदेव झाला बोलता ।
निवृत्तीसी म्हणे तुम्ही जावें आतां । त्र्यंबका सीखरीं ॥१॥
करुनि नमस्कार हरिसी । वेगीम यावें वैकुंठासी ।
नित्य हरिचरणापासीं । तुम्हीं आम्हीं सोपान ॥२॥
मुक्ताई म्हणे ज्ञानदेवा । मज विठोबासी निरवा ।
मजवरी लोभ असों द्यावा । रुक्मिणीमाता आदिकरुनि ॥३॥
पुंडलिकासी निरवावें । समस्तांसी क्षेम सांगावेम ।
कृपादृष्टी अवलोकावेम । मतलागीम ज्ञानदेवा ॥४॥
ज्ञानें करुनि विज्ञान । भक्तीसी करावें निरुपण ।
द्यावे समाधिसंजीवन । तुम्ही यावें शीघ्रवत ॥५॥
निवृत्तीने दिधलें उत्तर । आम्ही जाऊं वेगवत्तर ।
सोपानासी मार्गीं निरंतर । समाधीसी बैसवूनि ॥६॥
तंव बोलिला यादवराणा । तुम्ही सांगितल्या समाधीच्या खुणा ।
परी नामयावरी जाणा । माझी कासवदृष्टी ॥७॥
नामा म्हणे विठोबासी । तूं स्वामि दीनाचा होसी ।
गेलें निधान ज्ञानदेव दाखविशी । मज नयनीं प्रत्यक्ष ॥८॥

३०
ऐसें बोलोनियां हरी । रुक्मिणीसीं विचार करी ।
यासी भोजनें परोपरी । अन्नें निफजवावीं ॥१॥
संतोष जाला हरिभक्तां । जेथेम स्वयें हरी भोक्ता ।
कर्ता आणि करविता । सर्व चाळक विठठल ॥२॥
तंव दिव्यग्राम उभवुनि । भक्तीं देखिले नयनीं ।
विश्वकर्मा येऊनी । उत्तरापंथें निर्मिले ॥३॥
तंव अष्टमहासिद्धी । सर्व सामोग्रीसी समृद्धि ।
कर जोडोनी कृपानिधी । विनविती आनंदें ॥४॥
दिव्यवनें दिव्यवल्ली । दिव्यसुमनें समग्र जालीं ।
वैकुंठीहुनि आलीं । महाविष्णुकारणें ॥५॥
तेथें सुगंध परिमळ । जवादि कस्तुरी निर्मळ ।
चिंतामणी देती ढाळ । नानाकीळ दीप्तीचे ॥६॥
चंदनाचे खांब उभारिले । पवळ वेलीचे शोभले ।
मुक्ताफळाचे घोस मिरवले । रत्नखचित दामोदरें ॥७॥
चंपक सुमनाचियां हारी । सेवंती वाटोगर नानापरी ।
नानापुष्पें परिमळ आगरीं । दिव्यवनें कीं शोभती ॥८॥
आंबे खजुरिया पोफळी । फणसें नारिंगें नारिकेळीं ।
कर्दळी वाडिन्नलीया सरळी । उदक पाट वाहताती ॥९॥
तेथें भ्रमर रुणुझुणु करित । कोकिळा सुश्वरें बोलत ।
पारवे आनंदें घुमघुमित । सुखें संवादती निजगजरें ॥१०॥
ताललोरी गीती गाती । गोपाळ वीणे वाजवती ।
नाना परी बागडे धरिती । देव पाहती विमानीं ॥११॥
थकलीं योगियांचीं ध्यानें । निश्चळ राहिलीं आसनें ।
निवृत्ती सोपानें । तेथें देवडे उभे असती ॥१२॥
नामा जातो लोटांगणीं । वैकुंठ उतरलें मेदिनी ।
आळंकापुर पाटणीं । उत्तरापंथें देखिलें ॥१३॥
जेथें त्रिभुवनिचें निधान । स्वयं आपण भगवान ।
तेथेम सकळ काम होती पूर्ण । जाणती खुण अंतरंग भक्त ॥१४॥
नामा म्हणे ऐसीं विंदानें । भक्तीलागीं जगजीवनें ।
प्रत्यक्ष वैकुंठ भुवनें । दासा सुखसंपन्न करावया ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP