खंड ६ - अध्याय २५
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
॥ श्रीगणेशाय नमः ॥ देवेश भ्रुशुंडीस विचारिती । देवमुनींनीं केली स्तुति । महानदीची ब्रह्मदेवासाठीं ती । तें सुतिस्तोत्र सांगा आम्हां ॥१॥
सुखप्रद तें स्तोत्र होईल । ऐसी प्रार्थना ऐकून विमल । भ्रुशुंडी तयांसी प्रेमल । वृत्तान्त सांगे सविस्तर तो ॥२॥
नाना तीर्थजळांत स्नान करित । परी ब्रह्मा शुद्ध न होत । तीर्थजळें झालीं असमर्थ । ब्रह्मदेवाचें पाप हरावया ॥३॥
तेव्हां सारे देव विचार करित । तुरीय तीर्थासी कर जोडित । भक्तिभावें त्याचें स्तोत्र गात । देवांनो तें आतां ऐका ॥४॥
सर्वादिभूत जें त्रिगुणीं स्थित । तीर्थांत सर्वविकाररहित । पापविनाशीं दक्ष अत्यंत । ऐश्य तुरीय तीर्था नमितों ॥५॥
गंगादि नद्यांचा उगम त्यापासून । जें सर्वांन्तरंगीं स्थित पावन । आत्मरूप नादात्मक चालक होऊन । त्या तुजला नमितों आम्हीं ॥६॥
पुराणें ज्याचें गीत गातीं । विधीच्या पापाची जें करी क्षती । कमंडलूंत ज्याची वसती । अप्रमेय परम जें असे ॥७॥
अपार तीर्थांत आत्मभाव धरित । त्यायोगें देहधर त्यास नमित । नाथ विधातृपद भूषवित । तो जरी पापी जाहला ॥८॥
तरी त्यासी वचवित । विश्वाचा नाश टाळित । दयाळू ऐसें जें तीर्थ । त्या तुरीयास नमितों आम्हीं ॥९॥
गंगास्वारूपा तुजा नमन । ब्रह्मात्मज अरूपधरासी वंदन । वेणीस्वरूपा पुष्करा अभिवादन । तापीप्रभासा सर्वतीर्थरुपा ॥१०॥
प्रयाग नर्मदा कालिंदीरूपा । कृष्णा ककुद्मती देवनदीस्वरूपा । पयोष्णी गोदावरीरूपा । क्षिप्रा सिन्धुस्था तुज नमन ॥११॥
महीस्वरूपा कावेरीस्थिता । सरयूस्वरूपा कमंडलूवान उदात्ता । साडेतीन कोटि तोर्थयुक्ता । तीर्थोत्तमा तुज नमन ॥१२॥
अनंततीर्थप्रवरा मयूरस्थिता । सागरस्था सरोवरवापीस्था । कूपस्था तीर्थोत्तमा तुज आतां । आदरभावें नमितों आम्ही ॥१३॥
जें जें जळ सूर्यापासून । घनरूपें पृथ्वीवरी करी अवतरण । तें तुझेंच रूप शोभन । ऐश्या तुला नमितों आम्हीं ॥१४॥
तूं पसरविलें हें विश्व सर्व । चराचरांत जलयुक्त थोर । कृपाकटाक्षअमृतधारा अपूर्व । वाहवून रक्षण आमुचें करी ॥१५॥
दाखवी स्वरूप आम्हांसी । ऐसें स्तवनकर्त्यां त्या देवमुनींसी । दाखवी तेजोमय जलरूपासी । सुरर्षि नमिती आदरें ॥१६॥
तैं महातीर्थ त्यास म्हणत । हर्षयुक्त चित्तें वचन उदात्त । भ्रुशुंडी सांगे देवांप्रत । देवेश मुनींनो वर मागा ॥१७॥
जो जो मागाल वर । तो तो मी देईन समग्र । तुम्ही रचिलेलें हें पुण्यस्तोत्र । प्रीतिवर्धक मज सर्वदा ॥१८॥
यांत संदेह नसत । भुक्तिमुक्तिप्रद हें नितांत । पाठका वाचका अविरत । स्नानाचें फळ लाभेल ॥१९॥
सर्वं पापांचा नाश करील । वाचितां ऐकतां स्तोत्र हें विमल । सर्वतीर्थांचें हें वचन अमल । सुरर्षि हर्षित फार झालें ॥२०॥
देवेश जोडून करसंपुट वंदिती । त्या तीर्थासी तेव्हां सर्व प्रार्थिती । महातीर्था प्रसन्न जरी सांप्रती । पितमहासी शुद्ध करी ॥२१॥
त्याच्या कमंडलूंत स्थिर वसती । करावी तेणें वाढावी महती । सर्वतीर्था तुझी ख्याती । ब्रह्मकमंडलूनामें व्हावी ॥२२॥
तुझ्या प्रसादें हाचि वर लाभावा । तथाऽस्तु म्हणे तें तीर्थ देवां । देवविप्रांच्या इच्छेला मान द्यावा । ऐसी प्रीती तयांवरी ॥२३॥
देवेश भ्रुशुंडीस प्रार्थित । ऐकिलें सर्व संशयहर पुनीत । तथापि मन पूर्ण तृप्त । न झालें कथामुतपानानें ॥२४॥
महातीर्थाचें माहात्म्य अद्भुत । वर्णिलें विप्रा तूं आम्हांप्रत । पूर्वी कोणास सिद्धि प्राप्त । त्याचें चरित्र सांसावें ॥२५॥
भ्रुशुंडी म्हणे तयांप्रत । पूर्वी होता द्विज भारद्वाज कुळांत । तो मूर्ख संध्यादि विद्यावर्जित । चिंतामग्न याचे मायबाप ॥२६॥
त्यास घेऊन ते जात । नदीमूल जेथ विराजत । ब्रह्मकमंडलू तीर्थ अद्भुत । परमभावभक्तीनें ॥२७॥
नदीजलांत स्नान करून । करिती गणेशाचें पूजन । कमंडलुतीर्थंतीरीं विधि आचरून । भक्तियुक्त त्या वेळीं ॥२८॥
तेव्हां आश्चर्च एक घडत । त्यांचा पुत्र पंडित होत । सुबुद्धियुक्त तो म्हणत । वेदादी अस्खलित समस्त ॥२९॥
आपुल्या सुतासी घेऊन जाती । होऊन हर्षनिर्भर । चित्तीं । गावीं आनंदें राहती । अंतीं मुक्ति लाभली तयां ॥३०॥
ऐसे नाना जन लाभत । स्नान करितां सिद्धि इष्ट । कळत अथवा नकळत । कमंडलुनीर्थदर्शनानेंही ॥३१॥
दुसरा एक वृत्तान्त । कथितों तुम्हांसी सांप्रत । रविवंशज क्षतिय सुरथ असत । मालव देशीचा नरपति ॥३२॥
स्वराज्य धर्मनीती चालवित । सचिवांचा सल्ला मानित । परवीरांचा दर्प हरित । विदर्भाधिपतिअ एकदां झाला ॥३३॥
दिग्जयार्थ तो संचार करित । माळव्यावरी चालून जात । तेव्हां सुरथ राजा युद्ध करित । घनघोर तयासवें ॥३४॥
परी दुदैंवें सुरथ पराजित । होऊन कान्तारीं पळून जात । अन्य राजांचें साहाय्य घेत । पुनरपि लढे निश्चयानें ॥३५॥
घोर संग्रास तैं होत । त्यांतही पुन्हा पराजित । तेव्हां तो मयूरेश्वरक्षेत्रांत । आश्रयार्थ पातला ॥३६॥
ब्राह्मणांसी विचारित । मध्ममेश्वर तीर्थी स्नान करित । तदनंतर शंकरासी पूजित । प्रणाम करी तयासी ॥३७॥
तदनंतर सेना जमवून । गेला विदर्भ नृपावरी चालून । त्या युद्धांत विजय मिळून । मिळविलें स्वराज्य परत त्यानें ॥३८॥
अंतीं त्यास मुक्ति लाभत । स्नानाचें हें माहात्म्य अद्भुत । ऐशापरी जाणतां वा अजाणत । सिद्धि लाभली तेथ जनांसी ॥३९॥
दुसरें एक पुण्यप्रद चरित । प्राज्ञांनो ऐका श्रद्धायुक्त । गौतमवंशीय द्विज पंडित । स्वधर्मनिष्ठ ज्ञानधन ॥४०॥
परी त्यासी यश न लाभत । दीक्षादिकांत प्रयत्नें सतत । ब्राह्मण त्याचें कर्म पाहत । दोषदृष्टीनें सर्वकाळ ॥४१॥
त्यायोगें अतिखेदयुक्त । तो ब्राह्मण सर्वतीर्थांची यात्रा करित । विचार करून स्नान करित । गौतमवंशकुलोत्पन्न तो ॥४२॥
हृषिकेशास पूजन । त्याला वंदन करून । तो स्वगृहीं गेला परतून । पुनरपि वैदिक कर्मे करी ॥४३॥
आतां अन्य द्विजांस तें मान्य होत । ते त्यासी न निंदित । तो जें जें कर्म करित । तें तें होई यशस्वी ॥४४॥
अंतीं तो मुक्त होत । तीर्थसेवनपुण्यें जगांत । ऐसें जाणून नजाणताही जे जात । तीर्थास ते मुक्त होती ॥४५॥
त्यांची गणना अशक्य असत । अन्यही ऐका एक चरित । दंडकारण्यदेशांत । होता एक चांडाळ पापी ॥४६॥
वनांत जाऊन द्विजहनन । करी तो परस्त्रीचें अपहरण । रानांत एकटी पकडून । बलात्कारें भोगी तिजला ॥४७॥
ऐसीं तो विषयलंपट करित । नानाविध पापें कामासक्त । एकदा एक धानिक वाणी दिसत । पाठलाग त्याचा तो करी ॥४८॥
हातांत शस्त्रें घेऊन । मागें जाई करण्या हनन । मार्गांत ब्रह्मकमंडलूद्भव सरिता पाहून । चांडाळ गेला तिच्या जवळीं ॥४९॥
परी जलस्पर्शादिक न करित । अत्यंत दुर्मति तो असत । तदनंतर योजनमात्र चालत । ठार मारी त्या वाण्यासी ॥५०॥
त्याचें द्र्व्य लुटून । स्वगृहासी गेला परतून । पुढें तो नीचयोनिज मरत । यमदूत त्यासी पकडिती ॥५१॥
ताडिट अत्यंत ते निष्ठुर । यमपुरीस नेती सत्वर । यमधर्म त्या दूतांस क्रोधपर । वचन म्हणे धर्मयुक्त ॥५२॥
जरी हा महापापी असत । तरीही सोडा यास त्वरित । सर्वतीर्थाचें दर्शन पुनीत । यास घडलें होतें पूर्वी ॥५३॥
वाण्यास ठार मारण्या इच्छित । तैं मार्गीं हें तीर्थ पाहत । त्यायोगें पाप नष्ट होत । यास मानवी देह द्यावा ॥५४॥
हा शुभाशुभ कर्में करील । तेव्हा पुढें उद्धरेल । विचक्षण दूतांनो प्रभाव विमल । जाणा तीर्थदर्शनाचा ॥५५॥
त्या यमवचनानुसार । बंगाल देशांत जन्मत नंतर । ऐशियापरी तो शूद्र । तीर्थदर्शनें दुरितमुक्त ॥५६॥
या तीर्थाच्या जलबिंदूचा । स्पर्श होता पुण्यवृष्टीचा । योग येऊन मानवाचा । उद्धार जगीं होतसे ॥५७॥
याविषयीं एक चरित । सर्वज्ञ देवहो ऐका एकचित्त । कोण्या एका वनांत । व्याध होता महापापी ॥५८॥
तो ब्रह्महत्याहि पापें करित । एका धनिकास दैवें पाहत । खड्ग उगारून मारण्या धावत । तेव्हां तो धनी पळाला ॥५९॥
तो शेटजी पुढें धावत । व्याध पाठलाग त्याचा करित । वाटेंत कमंडलूद्भव गंगा लागत । दैवयोगें त्या उभयतांच्या ॥६०॥
त्या गंगेस उल्लंघून जात । तो धनिक भयभीत । तो व्याधही नदींत उतरत । पैलतीरीं जात उल्लंघून ॥६१॥
त्यायोगें त्या तीर्थाचें जल स्पर्शत । व्याध पडतां कुंडांत । तो धनिक पळून जात । प्राण वांचवी आपुला ॥६२॥
व्याध निश्वास टाकित । तदनंतर स्वगृहीं परतत । पापें असंख्य आचरित । अंतीं मरण पावे तो दुर्मती ॥६३॥
यमदूत त्या व्याधास । बांधून नेती यमपुरास । धर्मराज पाहून त्यास । प्रेमयुक्त वचन तैं बोले ॥६४॥
महाभागांनो हा पुनीत । शुद्ध सर्वपापवर्जित । ब्रह्मकमंडलूतीर्थांत । पडला होता धावतांना ॥६५॥
त्या समयीं तीर्थजळाचा स्पर्श । होऊन पवित्र यास । तीर्थदर्शनेंही विलयास । दुरितें याची सर्व गेलीं ॥६६॥
अनेक जन्मांची पापें नासतीं । या तीर्थजलाच्या दर्शनस्पर्शनें जगतीं । त्यानंतर पापकर्में जीं घडतीं । तीं यातनाप्रद होणार ॥६७॥
तथापि हा योग्य नसत । यातना भोगण्या सांप्रत । काश्मीरदेशी ब्राह्मण कुळांत । जन्मासी याला घालावें ॥६८॥
ती आज्ञा पालन करिती । त्या नरासी तैसेचि करिती । देशावरी नाना जन होती । पापहीन या प्रकारें ॥६९॥
ऐसाचि एक पूर्ववृत्तान्त । सांगतों तुम्हां वंगदेशांत । होता शूद्र एक पापी अत्यंत । श्याम नांव तयाचें ॥७०॥
तो श्याम शिश्नउदरपरायण । चौर्यकर्म करी नित्य नूतन । शस्त्रधारी करी हनन । बहुविध जनांसी तो नित्य ॥७१॥
नगरांत तैसेंचि वनांत । जनांस तो मारित । मद्यमांस भोगी सतत । तो एकदां गेला वनांत ॥७२॥
तेथ उत्तम धनिक वाणी पाहत । तो दुष्ट त्यांचा पाठलाग करित । ते वाणी जाती दंडकारण्यांत । तो शूद्रही जाई तेथें ॥७३॥
चोरीच्या आशेणें तेथ जात । तैं ते मार्गस्थ तृषार्त । जलहीन सारे भटकत । पोहोचले ब्रह्मकमंडलूतीर्थावरी ॥७४॥
त्या तीर्थाचें पाणी पिऊन । सारे परतले ग्रामीं प्रसन्न । रात्रीं असतां निद्रामग्न । त्या चोरामें त्यांस ठार मारिलें ॥७५॥
देवेंद्र नगरांत सारे गेले । पुण्यप्रभावें मुक्त झाले । ब्रह्मकमंडलूच्या जलपानानें झाले । इंद्रपुरीचे निवासी ॥७६॥
त्या वणिग्जनांना मुक्त मिळत । तिकडे तो चोरही होत मृत । यमदूत त्यास पकडून नेत । दुष्ट कर्मांनीं तयाच्या ॥७७॥
त्यास यमराजापुढे नेती । तेव्हां ते दूतांसी म्हणती । हा शूद्र जरी पापी जगतीं तरी तेवढाचि पुण्यवान ॥७८॥
सर्व तीर्थमयींत केलें जलपान । त्या जलाच्या स्पर्शें हा पावन । दर्शनस्पर्शनपानें पुण्यवान । त्रिविध परीनें हा झाला ॥७९॥
त्या ज्मांतले पाप नष्ट झालें । तीर्थदर्शनानें तें निमालें । अनेक जन्मांत जें घडलें । तीर्थस्पर्शे विनष्ट पाप ॥८०॥
हया तीर्थांच्या पानानें लाभलें । यास इंद्रपदप्राप्ति पुण्य हें भलें । त्यानें अंतर्बाहय पाप लोप पावलें । हा झाला पूर्ण पुण्ययुक्त ॥८१॥
म्हणोनि यास घेऊन । जावें इंद्राकडे विनत होऊन । हा तेथ भोग भोगील प्रसन्न । यांत संशय मुळीं नसे ॥८२॥
तेथ सुखोपभोग भोगून । पुण्य सरतां पुनरपि होईल पतन । याचें पृथ्वीवरी हें निश्चित वचन । तें ऐकता यमदूत म्हणती ॥८३॥
स्वामी आम्हीं तैसें करतों । यास इंद्रनगरींत नेतों । आपुली आज्ञा पाळितों । दास आम्ही आपुले ॥८४॥
ऐशियापरी नाना अमर । तैसेचि सिद्धि पावले विविध नर । त्यांचें वर्णन समय । शतवर्षानींही न पूर्ण होय ॥८५॥
ऐसाच एक हतिहास पुरातन । महाभागांनो सांगतो मीं प्रसन्न । स्नान करतां सिद्धि लाभून । धन्यता लाभती सर्व प्राणी ॥८६॥
धनप्रिय नावाचा एक सुतार । बंगालांत होता दुष्ट चोर । तो पापें करी अनिवार । द्रव्यार्थ वधिलें मातापित्यांसी ॥८७॥
विष देऊन त्यासी मारित । ब्राह्मणादींस प्रणाम करित । तदनंतर त्यांसही वधित । विष त्यांसी देऊनी ॥८८॥
पापनिष्ठ तो दुर्मति । बाहेरून साधुभाव दावून अती । दुरात्मा ठेवी दुष्ठभाव चित्तीं । त्यायोगें जन सारे ॥८९॥
ते त्याच्या होती अधीन । विश्वास त्यांच्या मनीं निर्मून । द्रव्यार्थ ठार मारी तो दुर्मन । विश्वासघात करूनिया ॥९०॥
ऐसा बहू काळ जात । त्या दुष्टाचें कर्म अघटित । नृपासी झाले विदित । राजदूत त्यास पकडिती ॥९१॥
त्याचें सर्व धन करिती हरण । मारिती त्यासी अति दारुण । स्वदेशांतून देती घालवून । राजा धर्मपरायण होता ॥९२॥
तो धर्मनीती राज्य करित । सदैव लोकांचें पालन करित । तिकडे तो सुतार दंडकारण्यांत । पुत्रदारासहित गेला ॥९३॥
तेथील एका गांवांत । निवास करी तो मोदयुक्त । पुनरपि तैसीच वृत्ति आचरित । पापें तींच करीत असे ॥९४॥
एकदां एक वाणी पाहत । त्याचें धन त्यास मोहवित । त्यास विष देण्याचें ठरवित । दुष्टबुद्धी तो कारुक ॥९५॥
त्या वाण्यास भुलविण्यास । साधुलक्षणें धरी खास । मार्गांत महानदींत स्नानास । सर्वतीर्थमयींत तो वाणी करी ॥९६॥
तो पापीही अनुकरण करित । धर्माचरणाचें सोंग वठवित । दुसर्या दिवशीं मार्गात । विष देऊन वधिलें त्यासी ॥९७॥
त्या स्नानपुण्यें तो वाणी जात । शुक्त गतीनें महेश्वराप्रत । कमंडलूतीर्थस्नानें लाभत । क्रममुक्ती तयासी ॥९८॥
धनप्रिय तो चोर मरत । यथाकाळ स्वगृहांत । त्यासही मोक्ष प्राप्त होत । महादेवांनो स्नानप्रभावें ॥९९॥
कमंडलूतीर्थाचें पावन । सांगतों तुम्हां चरित महान । महासिद्धिप्रद अन्य शोभन । गुजरात देशींची ही कथा ॥१००॥
गुर्जंरदेशीं वैश्यकुळांत । धर्म नामक एक स्वधर्मनिरत । तो आदरें नित्य कर्म करित । एकदां ऐके स्कंदपुराण ॥१०१॥
त्या स्कंदपुराणीं ऐकत । कमंडलूतीर्थाचें माहात्म्य अद्भुत । मनीं होत अत्यंत विस्मित । म्हणे धन्य ही तीर्थश्रेष्ठ नदी ॥१०२॥
हया नदीचें होईल दर्शन । तरीच सफळ माझा जन्म पावन । तो धर्म नित्य करी स्मरण । त्या महानदीचें भक्तीनें ॥१०३॥
तदनंतर एकदां येत । कोणी एक क्षत्रिय यात्रारत । त्यानेहीं ब्रह्मकमंडलूचें नांव अद्भुत । ऐकिलें त्या वैश्याकडून ॥१०४॥
तो मार्गस्थ प्रातःकाळीं उठत । आपुल्या स्नानासी निघून जात । नंतर बहु काळ लोटत । धर्मवैश्य मृत्यु पावला ॥१०५॥
तो स्वर्गीं जाऊन भोगत । विविध स्वर्गीय भोग अद्भुत । पुनरपि पृथ्वीवरी जन्मत । अत्रि कुळांत द्विजवर्णीं ॥१०६॥
शिवदत्त ऐशा नामें ख्यात । तो करी तीर्थयात्रा अविरत । एकही नदीतट न सोडित । स्नानपुण्य जोडी सर्वत्र ॥१०७॥
पूर्वपुण्यबलें उत्तमतीर्थसेवन । करून झाला तो पावन । योगी होऊन आलें मरण । तीर्थोत्तमस्मरणानें तयाला ॥१०८॥
ब्रह्मांत तो लय पावत । होऊनिया ब्रह्मभूत । देवसत्तमांनो ऐशापरि होत स्मरणेंही गतिप्रद हें तीर्थ ॥१०९॥
ज्या क्षत्रियें होतें ऐकिलें । सर्वतीर्थाचें माहात्म्य भलें । त्यानें पापकर्म न सोडिलें । आसक्तीच्या प्रभावानें ॥११०॥
तो क्षत्रिय जेव्हां मृत्युअ पावत । तेव्हां यमदूत त्यास पकडित । ताडन करून ते नेत । भानुपुत्रासमोर ॥१११॥
त्यास प्रणास करून । मागती आज्ञा प्रमाण । ती मिळता टाकिती नेऊन । महा घोर नरकांत तयासी ॥११२॥
तो नंतर श्वानयोनींत । जन्मला अत्यंत पापरत । दंडकारण्यांत हिंडत । महानदीतटीं गेला ॥११३॥
तेथ कीटक माश्या त्रास देत । तैं तो स्नान करी महानदींत । पूर्वसंस्कारयोगें मरत । श्वानरूप तो त्या क्षेत्रीं ॥११४॥
त्या पुण्यप्रभावें मोक्ष लाभत । यांत संशय अल्पही नसत । एकदाच ऐकतां नाम पुनीत । तीर्थंचें त्या हें पुण्य ॥११५॥
धन्य धन्य वृक्षलता । ज्या ब्रह्मकमंडलूतीरीं वाढतां । पावती पावनत्व तत्त्वतां । जें अन्यत्र ना राज्य लाभेंही ॥११६॥
ज्या महानदीच्या तीरावर । मृत्यु येतां तो नरवर । शुक्लगति पावे ब्रह्म अमर । अन्यत्र मरतां पुनर्जन्म ॥११७॥
देवेशांनो ऐसें सर्वत्र । ब्रह्मकमंडलूसरिता पवित्र । मयुरेशपरायण मात्र । शुभदा पूर्वगा ख्यात असे ॥११८॥
चतुर्मुखासी वा शिवासी । ह्रषीकेशासी वा अन्य देवांसी । दुर्लभा ही नदी सर्वांसी । कमंडलूतून जी जन्मली ॥११९॥
या कमंडलूच्या मुळांत । कोटि तीर्थां असती स्शित । मध्यमभागीं अंतीं वर्तत । कोटी कोटयार्ध तीरावरती ॥१२०॥
मीं संक्षेपानें कथिलें चरित । महादेवांनो तुम्हांप्रत । त्या ब्रह्मकमंडलु अद्भुत । पापहर वाचनें पठणें हें तीरावरती ॥१२१॥
ओमिति श्रीमदांत्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे षष्ठे खंडे विकटचरिते ब्रह्मकमंडलुतीर्थचरितं नाम पंचविंशतितमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP