खंड ६ - अध्याय ३७

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ अन्य शक्ति आदिशक्तीस प्रार्थिती । विकट माहात्म्य ऐकलें भावभक्तीं । त्यायोगें विशेष हर्ष चित्तीं । योगामृतमय वाटला आम्हां ॥१॥
तथापि देवि न तृप्त । आमुचें संपूर्णतया चित्त । रसर्धक कथा ऐकण्या अविरत । उत्सुक आमुचें अंतःकरण ॥२॥
पुनरपि विघ्नेश्वराची कथा । सांगून करी दूर व्यथा । विकट जे अन्य अवतार घेत । त्यांची कथा सांग आम्हांसी ॥३॥
आदिशक्ति तैं निरूपित । विकटाचें चरित्र अद्‍भुत । चक्रपाणि राजा राज्य करित । गंडकी नगरींत धर्मशील ॥४॥
त्याची पत्नी उग्रा पतिव्रता । होती अत्यंत गुणान्विता । नीतिपरायण तो नृप होता । देव विप्र अतिथि पूजी ॥५॥
पंचयज्ञ नित्य करित । भूमंडळ सर्व जिंकित । देवमान्य संपत्ति भोगित । बाहुबलानें तो नृप ॥६॥
परी एक दुःख त्यास जाळित । जें जें अपत्य त्यास होत । तें तें उपजतांच मरत । होतें वंध्यत्व दंपतीसी ॥७॥
त्यास्तव विधियुक्त दान देत । व्रतें वैकल्यें आचरित । तथापि एकही संतति न जगत । परमेश्वराची कृपा नसे ॥८॥
म्हणोनि राज्य अमात्या हातीं । सोपवून वनास जाण्याप्रती । स्त्रीसहित दुःखित चित्तीं । उद्युक्त तो जाहला ॥९॥
त्या वेळीं तेथ अकस्मात । शौनक मुनिसत्तम येत । यदृच्छेनें तो योगी श्रेष्ठ । प्रवेश करी नृपसदनीं ॥१०॥
त्या शौनक मुनीनें नृपाप्रत । उपदेशिलें सूर्याचें व्रत । नराधिप तें भक्तीनें करित । त्यायोगें तुष्टला रविदेव ॥११॥
राणीस स्वप्न दृष्टान्त होत । गर्भवती तो होई त्वरित । सूर्यतजयुक्त गर्भ उदरांत । धारण करण्या असमर्थ ती ॥१२॥
दाहयुत अत्यंत पीडित । समुद्राम्त गर्भ त्यागित । तेथ सागरीं बाळ जन्मत । त्रिनेत्र चक्रधारक ॥१३॥
तो समुद्राचें पाणी शोषित । ब्राह्मणरूपें तैं चक्रपाणि नृपाप्रत । समुद्रा जाऊन सांगे वृत्त । त्या नृपाच्या पुत्राचें ॥१४॥
त्या नृपसुतास नृपाच्या स्वाधीन । करुन समुद्र अंतर्धान । जाहला तैं नृप प्रसन्न । पुत्रलाभें त्या वेळीं ॥१५॥
सर्व प्रजाजनाम्समवेत । पुत्रजन्मोत्सव करित । त्या बाळाचें जातकर्मादि करवित । द्विजहस्तें हर्षभरें ॥१६॥
त्या पुत्राचें नांव ठेविअत । द्विजानुमतीनें सिंधु प्रख्यात । अपारवीर्यवंत तो सुत । बलशाली बहु निपजला ॥१७॥
आज्ञा घेऊन वनांत जात । तपाचरणास उत्कंठित । शुक्राचार्य त्यास मंत्र देत । विधियुक्त सूर्यदेवाचा ॥१८॥
तदनंतर सिंधु आचरित । उत्तम तप एकपादस्थित  । निराहार तो व्रती राहत । सूर्यास त्यानें तोषविलें ॥१९॥
दोन सहस्त्र वर्षें जात । तैं काश्यप सविता प्रकटत । वर मागण्यास सांगत । त्रैलोक्यवैभव त्यास देई ॥२०॥
अमृतपानक त्यास देत । त्रिगुणभावें जो हीन असत । ब्रह्मशास्त्रग देहयुक्त । तोचि एक तुज वधिल ॥२१॥
अन्यथा अमृत काढून । कोणी मारू न शकेल बलवान । त्रैलोक्यांत अजिंक्य होऊन । राज्य अबाधित करशील ॥२२॥
ऐसें सांगून स्वभक्ताप्रत । सविता अंतर्धान पावत । सिंधु स्वगृहा परत जात । मातापिता आनंदले ॥२३॥
त्याचें स्वागत करिती । तेजःपुंज त्याची कांति । त्यास राज्य देऊन जाती । राजाराणी वनांत ॥२४॥
तदनंतर सिंधु जिंकित । सप्तद्वीपवती धरा समस्त । वरदान त्यास जैं अद्‍भुत प्राप्त । तें कळतां असुर एकवटले ॥२५॥
शूंब अतिशुंभ वृत्र कमळ । शंख कोलासुर सबळ । इत्यादि असुरवीर महाबळ । त्याच्या आज्ञांकित जाहले ॥२६॥
त्यांच्या सहित तो जिंकित । शुंभु मुख्यादि देवांस स्वर्गांस । शंकर वनीं पळून जात । सोडून कैलास आपला ॥२७॥
विष्णु सूर्य विधि इंद्रादींस पकडून । बंधनांत त्यां टाकून । देवेंद्रां त्या जिंकून । वर्चस्व आपुलें स्थापिलें ॥२८॥
ऐश्यापरी त्रैलोक्य जिंकित । महा असुर तो शक्तियुक्त । दैत्येंद्रासी स्थापित । देवस्थानांत सर्वजागीं ॥२९॥
ऐसा बहुकाळ जात । महा असुर तो क्रोधयुक्त । त्वेषानें देवतीर्थादिक भंगवित । कर्मकांड नष्ट करी ॥३०॥
आपुल्या प्रतिमा करून । भूमंडळीं सर्वत्र स्थापून । देशोदेशीं प्रतिनगरीं पूजन । प्रजेकडून करवी त्यांचें ॥३१॥
तेव्हां सर्व हाहाकार करिती । वर्णाश्रमी जन जगतीं । स्वाहा स्वधादी कर्म निश्चिती । नष्ट जाहलें सर्वत्र ॥३२॥
आतां शक्तींनो त्या असुराचा । वध कैसा साचा । जाहला नंतर तयाचा । वृत्तान्त पुन्हां मीं सांगेन ॥३३॥
शंकर आपुल्या गणांसहित । त्रिसंध्या क्षेत्रीं जात । गौतमादींच्या सहित । स्त्रियांसह वास करी तेथें ॥३४॥
ध्यान लावून विघ्नेशा भजत । शंकर तैं भक्तियुक्त । एकदा पार्वती त्यास विचारित । संशयाकुल मानसीं ॥३५॥
देवींनो ती विनययुक्त । म्हणे ईश तूं जगतांत । सर्व देवांचा म्हणून ईश्वर ख्यात । वेदशास्त्रें हें सांगती ॥३६॥
महेश्वर तूं देव थोर । कोणाचें ध्यान करिशी नम्र । सांग रहस्य संशयहर । पदकमलाची मी दासी तुझ्या ॥३७॥
शिव तेव्हां तिज सांगत । ईश अनीशांस जो निर्मित । त्या गणेशासि मीं भजत । ब्रह्मपतीस भक्तीनें ॥३८॥
गकार अनीश स्मृत । णकार ईशमय ख्यात । त्यांचा स्वामी गणेश ज्ञात । चारुहासिनी हें वेद सांगती ॥३९॥
त्याचें तें वचन ऐकत । तेव्हां पुनरपि त्यास विनवित । त्या गणेशाची प्राप्ति मजप्रत । कैसी होईल तें सांगा ॥४०॥
ऐश्या गणेशाचें ज्ञान । नसे मजला मी अज्ञान । त्याच्या प्राप्त्यर्थ साधन । उपाय कोणता मुख्य असे ॥४१॥
शिव तैं सांगे पार्वतीप्रत । एकाक्षर मंत्र घे विधियुक्त । त्याच्या जपानें अविरत । तप करी पार्वती ॥४२॥
ध्यान करून तोषवी । देवा गजाननाचा कृपौघ वळवी । जेणें सिद्धि तूं आघवी । प्राप्त करशील मत्प्रिये ॥४३॥
ऐसें बोलून तिज देत । गणेश मंत्र तो पुनीत । त्याचा स्वीकार करित । प्रणास करून पार्वती ॥४४॥
तदनंतर ती देवी जात । लेखनाद्रीवरी त्वरित । त्या मनोहर स्थानीं आचरित । तप घोर पर्वतसुता ॥४५॥
वायुही भक्षण न करित । तपमग्न ती ध्यान करित । ऐशा रीती आराधित । ढंढी गजानन ती तोषवी ॥४६॥
शंकर वर्षे ऐसीं जात । तैं वरद गणेश प्रकटत । म्हणे वर माग मीं संतुष्ट । पार्वती तैं प्रार्थितसे ॥४७॥
म्हणे विघ्नपा माझा सुत । होई देवा तूं भविष्यांत । त्या वेळीं तुझी सेवा अविरत । विशेषभावें करीन मी ॥४८॥
तूं आमुचा होतां सुत । आम्हीं बंधहीन होऊ त्वरित । मातापिता गणेशाचे ख्यात । ऐसें द्यावें वरदान ॥४९॥
पार्वतीस देत वरदान । भाविकाचा मनोरथ मान्य करून । विघ्नेश्वर पावला अंतर्धान । पार्वती स्थापना करी त्याची ॥५०॥
विप्रहस्तें स्थापना करित । गणेशासी भक्तिभावें पूजित । तदनंतर जाऊन शंकराप्रत । वृत्तान्त त्यास सांगितला ॥५१॥
तो शिवही अति हर्षित । जाहला ऐकून तो वृत्तान्त । पार्वती तन्मन होत । वरद प्रभूसी स्मरतसे ॥५२॥
भाग्यगौरवें सर्वत्र पाहत । गणराजास ती सतत । भाद्रपदमासीं मूर्ति करित । शंकरासह पूजिली तैं ॥५३॥
शुक्तपक्ष चतुर्थी सोमवार । माध्यान्ही स्वाती नक्षत्र । त्यावेळीं ती मूर्ति मनोहर । सजीव झाली वरप्रभावें ॥५४॥
वरप्रद विकट चेतनायुक्त । स्वतेजानें दिपवीत । शिवपार्वती पाहूं न शकत । स्तुति करिती मनोभावें ॥५५॥
देवा तुला उग्रतेजयुक्त । पाहण्या आम्हीं असमर्थ । तरी आतां कृपावंत । होऊन ध्यावें सौम्यरूप ॥५६॥
तिची प्रार्थना ऐकून । सौम्य तेज जाहला गजानन । शिव पाही त्यास प्रसन्न षड्‍भुज चंद्रासम कांति ॥५७॥
ब्राह्मणांकरवी करवित । जातकर्मादि विधियुक्त । अकराव्या दिवशीं बारसें करित । गुणेश तैं नांव ठेविलें ॥५८॥
शिवपार्वती ब्राह्मण पूजन । करिती हर्षयुक्त मन । गुणेश जन्मला हें वृत्त ऐकून । आनंदलें त्रैलोक्य ॥५९॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे षष्ठे खण्डे विकटचरिते गुणेशावतारवर्णनं नाम सप्तत्रिंशत्तमोऽध्यायः  समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP