खंड ६ - अध्याय २९

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ भ्रुशुंडी देवांसी सांगत । द्वारयात्रा निरूपिली तुम्हांप्रत । तीच क्षेत्रप्रदक्षिणा यत्नयुक्त । देवदेवेशांनो करा आतां ॥१॥
जेव्हां पुण्यकर्म करण्या इच्छित । त्यासाठीं प्रयत्न करित । तैं पापें फसवितीं विशेषयुक्त । मानवासी हें जाणावें ॥२॥
नित्य यात्रा मयूरक्षेत्रवासीयांची । अन्यांचीही सांगतों साची । तीं एकचित्तें ऐकून मनाची । निश्चित तयारी तुम्ही करा ॥३॥
मयूरेशास अर्चूंन । करावें परिवाराचें पूजन । तदनंतर अष्टगणपक्षेत्रपूजन । नदीकुंडांसही पूजावें ॥४॥
शमी मंदार दूर्वा पूजून । चतुर्थीचेंही आराधन । मुदुगल शुकयोगीशा वंदून । नंतर जावें मंडपांत ॥५॥
पूर्वादिक्रमें चार वेद पूजावे । धर्मादिक यथावकाश नम्रत्वें वंदावें । पुनः गणेश्वरासी नमावें । तदनंतर जावें स्वगृहासी ॥६॥
ऐसी जो नित्य यात्रा करित । तो गणेशप्रिय होय जगांत । ही नित्ययात्रा न करिता नराप्रत । क्षेत्रवासफळ पूर्ण न लाभें ॥७॥
नित्य यात्रा न करित । भैरवी यातना त्यास अंतीं लाभत । म्हणून नियमानें क्षेत्रास्थित । नरें यात्रा ही करावी ॥८॥
आतां गणेश प्रीतिस्तव । अन्य यात्रा अभिनव । संपूर्ण भक्तिदा सर्वथैव । गाणेशी गणप्रिय सांगतों ॥९॥
गर्भागारीं चार दिशांत । विघ्नेश्वर असती स्थित । छपन्न विश्वेश्वर ते असत । त्यांतील मुख्यांसी पूजावें ॥१०॥
दिक्पालांचीं महा अस्त्रें वर्तत । त्या विघ्नेश्वराच्या पुढें विलसत । पांच धनुष्यें अंतरावर गणपरत । सर्वही तीं भक्तिभावें ॥११॥
चौदा प्रमाणांत स्थित । सभोवती दिशांत गणप वर्तत । त्याचें पूजन करितां होत । गाणपत्य नर या जगीं ॥१२॥
बल्लाळ कपिल ढुंढि वक्रतुंड । महोदर हेरंब गणनाथ । उदंड । गणनाथ विघ्नेश विघ्नहारक प्रचंड । भालचंद्र शूर्पकर्ण ॥१३॥
ज्येष्ठराज गजानन । महोत्कट हे पूर्व दिशेंत प्रसन्न । राहती देवेशांनो त्यांचें पूजन । क्रमशः साधकें करावें ॥१४॥
एकेकापासून पंचवीस धनुष्यें दूर । है गणेशान संस्थित सुंदर । ऐसें जाणावें रहस्य मनोहर । भक्तगणांनी सर्वदा ॥१५॥
पन्न्स धनुष्यें अंतरावर । दक्षिणस्थ गणप बसले थोर । शंभर धनुष्यें असती दूर । पश्चिमेस गणप असंख्ख ॥१६॥
पंचाहत्तर धनुष्यें अंतरावर । उत्तरेस गणप असती थोर । ऐश्या क्रमानें पूज्य ते समग्र । सिद्धिप्रदायक सर्वही ॥१७॥
आतां दक्षिण दिशेस जे असती । त्या गणेश्वरांची सांगतों गणती । ज्ञानेश कर्मरक्षक महागणपति । योगेश सिद्धिविघ्नप ॥१८॥
चिंतामणि बुद्धीश पूर्णानंद । लक्ष्येश सहजेश एकदंत मोदप्रद । लंबोदर धुम्रवर्ण क्षिप्रप्रसादकर । हे दक्षिणेस गर्भागारीं ॥१९॥
आतां करितों वर्णण । पश्चिमेस जे गणेश्वर महान । विनायक विकट शोभन । आशापूरक धूम्रकेतू ॥२०॥
प्रमोद मोद सुमुख दुर्मूख । पाशपाणि परेश लाभेश संमुख । धरणीधर मंगलेश सुरेख । मूषकध्वज तेथ असती ॥२१॥
देवदेवेशांनो त्यांचें पूजन । करावें पाळून सर्व विधान । आतां उत्तरस्थ विघ्नपांचें वर्णन । भक्तचालकांचें सांगतों ॥२२॥
मयूरध्वज राजेश विद्रुमेश्वर । ओंकारेश गुणेश वरद उदार । सिद्धिबुद्धिपति गणेश थोर । चतुर्बाहुधर त्रिनेत्र ॥२३॥
गजमस्तक निधिप गजकर्ण । चिंतामणि गणेश्वर विभूषण । ऐसे हे पूजनीय महान । यात्रिकांसी देती इच्छित फल ॥२४॥
आतां देवालयांत जे देव स्थित । त्यांची यात्रा तुम्हांस सांगत । मुख्य जी सर्वार्थप्रद पूर्ण वर्तत । यात्राकर्त्या जनांसी ॥२५॥
अयोध्या मथुरा द्वारका असत । पूर्वमंदिरीं विलसत । महाविष्णू पूजनीय विशेषयुक्त । देवांनो तेथ जाणा ॥२६॥
काशी माया अवंती । तेथ कैलासवासी शिवाची वसती । गौरी स्कंदासहित भावभक्ती । दक्षिणेस मुख्यत्वें पूज्य ते ॥२७॥
महाकाली महालक्ष्मी महासरस्वती । हया तीन आदिशक्ति । पाश्चिम दिशेस पूजनीय असती । तैसीच विष्णुकांचिका ॥२८॥
विधाता अग्नि जडभरत । दिवाकर शिवकांची उत्तरेस मंदिरांत । पूजनीय जनांस वर्तत । ऐसें रहस्य देवागाराचें ॥२९॥
हया देवागाराची यात्रा करित । त्यास सर्व सिद्धि प्राप्त । हें यात्राविधान तुम्हांप्रत । संक्षेपें मीं निरूपिलें ॥३०॥
यात्रा करितां जनांस होत । हें सर्व सिद्धिप्रद सतत । देवांनो जा तेथ त्वरित । मयूरेशाच्या क्षेत्रांत ॥३१॥
तेथें भक्तियुक्त राहून । गणेशाचें करा पूजन । त्याचें करितां मनन ध्यान । इच्छित सर्व लाभाल ॥३२॥
आदिशक्ति म्हणे अन्य देवींप्रत । ऐसें बोलून भ्रुशुंडी थांबत । त्याच्यापासून मुख्खदेव घेत । दीक्षा एकाक्षर मंत्राची ॥३३॥
विधियुक्त महामंत्र घेऊन । त्या योगीशास प्रणास करून । प्रदक्षिणा देवासी घालुन । ते पांचही देव परतले ॥३४॥
ते सर्वही हर्षयुक्त । मयूरेशक्षेत्रीम जात । पुढील कथा रसयुक्त । असे पुढच्या अध्यायीं ॥३५॥
ओमिति श्रीमदांत्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे षष्ठे खंडे विकटचरिते भ्रुशुण्डीदेवेंद्रसंवादसमाप्तिवर्णनं नामैकोनत्रिंशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP