उद्यानचूडाव्रतबन्धदीक्षा विवाहयात्रा च वधूप्रवेश : ।
तडागकूपत्रिदशप्रतिष्ठा बृहस्पतौ सिंहगते न कुर्यात् ॥१३॥
गुरुशुक्रांच्या अस्तांत जीं कृत्यें करूं नयेत म्हणून वर लिहिलें आहे , तीं कृत्यें सिंहराशीस गुरु असतांनाही करूं नयेत .
सिंहस्थ गुरूविषयीं अपवाद .
सिंहे गुरौ सिंहलवे विवाहो नेष्टोथ गोदोत्तरतश्च यावत् ।
भागीरथीयाम्यतटे हि दोषो नान्यत्र देशे तपनेऽपि मेषे ॥१४॥
गोदावर्युत्तरतो यावद्भागीरथं तटं याम्यम् ।
तत्रं विवाहो नेष्टः सिंहस्थे देवपतिपूज्ये ॥१५॥
भागीरथ्युत्तरे कूले गौतम्या दक्षिणे तटे ।
विवाहो व्रतबन्धो वा सिंहस्थेज्ये न दुष्यति ॥१६॥
सिंहराशीला गुरु असून सिंह नवांशी असेल त्या वेळीं मात्र विवाह करूं नये , म्हणजे सिंह राशीच्या इतर नवांशांत गुरु असतां गोदावरीच्या दक्षिणभागांत विवाह केला असतां सिंहस्थाचा दोष नाहीं . गोदावरी आणि भागीरथी ह्या दोन नद्यांमधील प्रदेशांत मात्र विवाहादि शुभकार्यांना सिंहस्थाचा दोष आहे . इतर देशांत नाहीं . तसेंच , सिंहस्थांत मेषराशीला सूर्य असतां सिंहस्थाचा दोष नाहीं किंवा गंगागोदावरीच्या मध्यवर्ती प्रदेशांत मात्र सिंहस्थ गुरूचा दोष मानावा , अर्थात् गोदावरीच्या दक्षिण भागांत व भागीरथीच्या उत्तरभागांत सिंहस्थ गुरूचा दोष मानूं नये . सिंहस्थाचे तीन अपवाद आहेत . परंतु देशाचाराप्रमाणें आचरण करावे . देशाचाराची म्हणजे समानाची संमति असेल तर शास्त्राची हरकत नाहीं . इतकेंच येथें सांगितलें आहे .
गुरू शुक्रास्त व मलमासादिकांचा अपवाद .
गर्भाधानादिका अन्नप्राशनांता मलिम्लुचे ।
आकर्णवेधा : कर्तव्या नान्या इत्याह भास्कर : ॥१७॥
सीमंतजातकादीनि प्राशनांतानि च क्रमात्
कर्तव्यानि न दोषोऽस्ति पंचाननगते गुरौ ॥१८॥
मासप्रयुक्तकार्येषु मूढत्वं गुरुशुक्रयो : ।
न दोषकृन्मलो मासो गुर्वादित्यादिकं तथा ॥१९॥
गर्भाधानापासून अन्नप्राशनापर्यंत जे अष्टविध संस्कार आहेत ते , अधिक मासांत , गुरुशुक्रादिकांच्या अस्तांत किंवा सिंहस्थांत करण्यास प्रत्यवाय नाहीं . त्याचप्रमाणें प्रतिमासांत केलीं पाहिजेत अशीं आवश्यक धर्मकृत्येंही गुरुशुक्रांच्या अस्तांत व मलमासांत करणें दोषावह नाहीं .