अभंग ५१ ते ६०

 श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

५१
जरि तूं न येसी राघवा । मी न ठेवीं माझ्या जीवा ॥१॥
जाणु-नि निश्चय तूं हा माझा । त्वरित येरे श्री रघुराया ॥२॥
माझी आवडी आपणावरि भारीं । आपुला धीर मज संसारीं ॥३॥
येरे धांवत मेघश्यामा । प्रभु संतमनो विश्रामा ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा ॥ येरे सोडुनियां हट आतां ॥५॥

५२
कृपा समुद्रा राम राया । नाशिवंत हे तों काया ॥१॥
आतां लाऊं नको ऊशीर । देउनि दर्शन करिं मन स्थीर ॥२॥
आपणा विषयीं तळमळतों मी । चकोरासी इच्छा सोमीं ॥३॥
तैसें तुजवरि माझें मन । विषय वाटती वमन ॥४॥
अंतर्साक्षी तूं रघुनाथा । विष्णु कृष्ण जगन्नाथा ॥५॥

५३
आपणा पाहेन आवडी । ऐसें आठवतें घडि घडि ॥१॥
कधीं भेटसी दातारा । आत्म स्वरुपीं द्याया थारा ॥२॥
येरे लगबग ऊतावेळीं । राम राया तूं वनमाळी ॥३॥
आत्म विषईंची खंती । उरों नेदि हेचि विनंती ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । वेगें दर्शन दे मज आतां ॥५॥

५४
येथें अखंडात्म दर्शन द्वारें । स्फुरविं आनंद जगिं सर्व प्रकारें ॥१॥
नवविधा भक्ति घडविं जनाला । आत्म प्रेमें लावीं निजभजनाला ॥२॥
रामा हेचि माझी चरणिं विनंति । कृपेनें संभाळीं आदि अंतीं ॥३॥
करा-वया आमुचा वंशोद्धार । रामा आला तूं झाला आनंद फार ॥४॥
प्रभु विष्णु कृष्ण जगन्नाथा । नित्य आयकों हे काळ आत्म पथा ॥५॥

५५
एक विनवणि माझी परिसावी । राजि व नयना लक्षिं असावी ॥१॥
आत्मपदीं मज द्यावा रहिवास । स्वरुप विस्मृति न पाडिं या जिवास ॥२॥
सच्चिदानंद स्वरुपा राम राया । ढळों नेंदी जैं पडेल माझि काया ॥३॥
अलक्ष लक्षविं तुज स्वप्रकाशा । स्वानंद घोंटविं नेदुनि अवकाशा ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथापरमानंदा । सच्चित्सुख आधार तूं मज मतिमंदा ॥५॥

५६.
ज्याचें नामचि तारक लोकां । त्या तुज पाहिला जानकि नायका ॥१॥
झालें डोळ्यांचें पारणें । मनोवृत्तीचें थारणें ॥२॥
आत्म दर्शनाचा योग । अधिकाधिक वाढवि सुखभोग ॥३॥
आत्म महिमा वर्णूं किति । भक्त कनवाळू सितापती ॥४॥
विष्णू कृष्ण जगन्नाथा । आठवण तुझी दे रे येतां जातां ॥५॥

५७.
मना ऐसा महाराज आहे कोठें । आत्म भक्तां विषयीं प्रेम ज्यासि मोठें ॥१॥
धर्म संस्थापना दुष्टांचा संहार । स्वभक्तरक्षाया धरि नाना अवतार ॥२॥
उपमन्युसी दीधला क्षीरनिधी । ध्रुव बैसविला जेणें अढळ पडीं ॥३॥
सुदामासी दिधली सोन्याची नगरी । प्रर्‍हादास्तव झाला स्तंभीं नहरहरी ॥४॥
सदय राम विष्णु कृष्ण जगन्नाथ । सच्चिदानंद स्फुरे त्या लक्षी आंत ॥५॥

५८.
सत्य सत्य श्रीराम दयासिंधु । स्वभक्तांतें न सोडी दीन बंधु ॥१॥
प्रत्यय झाला स्वानुभवें बहुतांसी । कळवि सच्चित्सुखमय आपणासी ॥२॥
नाहीं ऐसा कृपाळू जगामाजी । स्वयें धांवे जो आपुल्या भक्तकाजीं ॥३॥
त्यजितां विषयांचें चिंतन । आत्म दर्शन दे रामा आनंद घन ॥४॥
राम विष्णु कृष्ण जगन्नाथ । व्यापक एक अनंत कोटि ब्रम्हांडांत ॥५॥

५९.
तुज ऐसा देव न दुजा । ऐसा निश्चय झाला माझा ॥१॥
चतुर्मुखा नलगे पार । स्वगुण वर्णितां अपार ॥२॥  
तो तूं भेटला रामराजा । संगें जाच्या जानकि भाजा ॥३॥
आत्म दर्शन आनंद । स्फुरतो जो हरि भवबंध ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । तूंचि मोक्ष सुखचा दाता ॥५॥

६०.
पिताराम तूं माता सीता । मज संरक्षिसि भवभय भीता ॥१॥
न ढळवीं हा माझा धीर । प्रतापी तूं श्री रघुवीर ॥२॥
तुज भक्तांची आवडी । हरिसी जन्म मरण कावडी ॥३॥
आरुंत संगें आत्म लाभा ॥ दिधल सच्चिदानंदा स्वयंभा ॥४॥
विष्णु कृष्ण लगन्नाथा । तूंचि मोक्ष सुखाचा दाता ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : June 08, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP