अभंग १११ ते १२०
श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.
१११.
तो मज सांपडला तूं आजी । ज्याचे चरण ब्रम्हा पूजी ॥१॥
झाला वंशाचा उद्धार । आपण भेटला जगदोद्धार ॥२॥
तुज गाइन नित्य वाचे । तेणें समाधान होय या जिवाचें ॥३॥
तुझें दर्शन घेइन डोळां । होय आनंदाची वृद्धी वेळोंवेळां ॥४॥
तुझ्या चरणीं ठेउनि माथा । करिन सेवा विष्णु कृष्ण जगन्नाथा ॥५॥
११२.
डोळे यांचा न पुरे प्रेमा । तुज पाहुनियां श्रीरामा ॥१॥
सर्व सुखाचें निधान । आपण माझें समाधान ॥२॥
झाला आत्म लाभ मोठा । आपण विरहित प्रपंच हा खोटा ॥३॥
त्या तुज निरखिन वेळोवेळां । सांडुनि मायेच्या या खेळा ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । आत्म वियोग न घडविं कधीं आतां ॥५॥
११३.
कठिण आहे अंतकाळ । कोण जाणें कैसी वेळ ॥१॥
तरि मज न पडों दे विस्मृति । अखंड स्फुरवीं आत्म स्मृति ॥२॥
सच्चिदानंद आपण सारा । प्रगटुनि दे स्वरुपीं थारा ॥३॥
पुढति पुढति हेचि विनंति । नुरविं जन्म मरणाची खंति ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा रामा । माझा तुजवरि जडविं प्रेमा ॥५॥
११४.
प्रभो हे अयोध्यानाथा रामराजा । जानकिसह माझ्या ह्रदयीं राही ॥१॥
ग्रंथ रचना स्फूर्ति स्फुरवुनियां मज । नुरवी दु:ख बीज आत्म बळें ॥२॥
सर्वार्थीं सहाय होईं रे मारुती । राम सितापती देखावया ॥३॥
तुजवीण माझें साधी कोण काम । आपण एक राम भेटावया ॥४॥
आत्म प्रीतीं विष्णु कृष्ण जगन्नाथा । आहे हें सामर्था जाणसी तूं ॥५॥
११५.
सुखमय आहे प्रपंच हा सारा । नलगे जरी वारा अभिमानाचा ॥१॥
एक अभिमान नाडितो सर्वांसी । दावि दु:ख राशी कल्पुनीयां ॥२॥
कल्पुनी मी माझें फिरवी दारोदारीं । नाचवितो संसारीं एकलाची ॥३॥
रडवी हांसवी बैसवी उठवी । करी उठाठेवी एकटाची ॥४॥
पडुनि याच्या तोंडीं जीव झाले मुर्ख । भ्रमती सच्चित्सुख विसरोनी ॥५॥
सज्जन जाणती जयाचा अभाव । सुषुप्तींत नांव नाहीं याचें ॥६॥
अवस्थात्रय साक्षी सच्चित्सुख तूं एक । जरी हें अनेक विश्व भासे ॥७॥
तो तूं माझ्या हाकीं ग्रासुनी मीपणा । उघड आपणा कळवीं रामा ॥८॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा तुज ठावें । मुळ जें उपटावें मी पणाचें ॥९॥
११६.
कां रे रामराया अजुनी तुं न येसी । मौज पाहतोसी काय माझी ॥१॥
माझी अनाथाची पहातोसी मौज । हेंची मज चोज वाटतसें ॥२॥
ऐसें न करीतां धांवूनियां येईं । आत्म भेटी देईं रामा मज ॥३॥
तरिच होय माझ्या जिवा समाधान । आनंद निधान तूंचि माझें ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा सुखधामा । भेट दे श्रीरामा दयानीधे ॥५॥
११७.
न सुचे करावा कोणता ऊपाय । आत्म भेटि होय जेणें मज ॥१॥
नाशिवंत क्षणभंगुर हे काया । कधीं पद ठाया पाहेन मी ॥२॥
ऐसी आपणाची लागली तळमळ । तुज ना कळवळ कैसी माझी ॥३॥
दे रे भेटी रामा बारे आनंदघना । आपणाविण मना सुख न वाटे ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा पूर्ण कामा । संत मनो विश्रामा भेट वेगीं ॥५॥
११८.
तुजसाठीं जीव होतो कासावीस । जानुनि तूं जानकीश कां न येसी ॥१॥
येतां वाटे तुज सांपडले संत । काय माझा अंत देखसी तूं ॥२॥
अंत नको पाहूं दीनाचा या माझा । आपण रामराजा जिवन माझें ॥३॥
न करिं विलंब ये झडकरीं आतां । स्वामी सिताकांता रामराया ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा झालों कष्टी । करुनी कृपाद्दष्टी यावें स्वामी ॥५॥
११९.
कोण मी हा मज कळेना श्रीरामा । नाहिं माझा प्रेमा जेव्हां तुज ॥१॥
जरी असता प्रेमा धांउनी तूं येता । कळतें मज सीताकांता रामा ॥२॥
न येसी तूं जेव्हां खरा ठरलों पापी । म्हणो तरि अद्यापी निश्चय नोहे ॥३॥
पापी मी जरी साचा राम गातों वाचा । आत्म दर्शनाचा हेतू मज ॥४॥
पुण्यवंत म्हणा ऐशी साझी दशा । आत्म भेटी आशा परली नाहीं ॥५॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा हा घोटाळा । नुरवीं आत्मकळा दाउनि मज ॥६॥
१२०.
उगीच रहातां येना मज आतां । काय सिताकांता करुं मी सांग ॥१॥
सांग पुढें माझी कैसी होय गती । स्वामी रघुपती रामराया ॥२॥
रामराया माझें जाय वय वायां । काया हे पडाया वेळ नाहीं ॥३॥
माय बापा केव्हां भेटसी राघवा । जिव हा आघवा आला कंठीं ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा दया निधी । आतां मी त्रिशुद्धी वांचेना कीं ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : June 08, 2014
TOP