अतिशयोक्ती अलंकार - लक्षण २

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


(अतिशयोक्तीचें) उदाहरण :---
“(कलिंद पर्वताची कन्या जी यमुना त्या) यमुनेच्या तीरावरील वनाचा प्रदेश प्रकाशित करणारा; सदा मार्गावरील प्राण्यांचे येण्याजाण्याचे मोठे श्रम हरण करणारा; चकाकणार्‍या सोन्यासारखी कांति असलेल्या नूतन लतांनीं वेष्टिलेला; असा (कोणीएक) तमालवृक्ष, माझ्या श्रमांचा त्वरित व संपूर्णपणें परिहार करो.”
ह्या श्लोकांत तमालवृक्ष या विषयीनें भगवान् श्रीकृष्णह्या विषयाचें निगरण केलें आहे; व त्या निगरणाला मदत करण्याकरतां, श्लोकाच्या पहिल्या तीन चरणांतील विशेषणें, विषय (श्रीकृष्ण) व विषयी (तमाल) यांचे साधारणधर्म म्हणून, (ह्या श्लोकांत) प्रत्यक्श शब्दांनीं सांगितलीं आहेत; चवथ्या चरणांतही, ‘तमालद्रुम: श्रमान्हरतु’ या शब्दांनीं चवथें विशेषण सांगितलें आहे. तें वैयाकरणांच्या मतें नव्हे, (तर न्यायशास्त्र्यांच्या मतें). वैयाकरणांच्या मतें, श्लोकांत शब्दांनीं सांगितलेली जी श्रमहरणक्रिया तिचा तमालहा कर्त आहे. या क्रियेवरून अनुमानानें, तमालांतील कर्तृत्व तमालसद्दश श्रीकृष्णांतही आहे असें मानलें जातें. (व अशारीतीनें, या क्रियारूप विशेषणाकडून, तमाल व श्रीकृष्ण या उभायांना साधारण एक धर्म तयार केला जातो.) प्रस्तुत श्लोकाच्या द्वितीय चरणांत, पथ या पदानें, उच्चनीच योनींत फिरत राहणें, या अर्थाचें निगरण केलें आहे. व लता या पदानें गोपींचें निगरण केलें आहे. हीं सर्व विशेषणकक्षेंतील निगरणें, मुख्य असलेल्या विशेष्याच्या (येथें श्रीकृष्णाच्या) निगरणाला मदत करतात. अशारीतीनें या श्लोकांतील अतिशयोक्ति सावयव अतिशयोक्ति आहे. पण ज्या ठिकाणीं मुख्या निगरणाला मदत करणारी इतर निगरणें नसतात व ज्यांतील साधारण धर्म शुद्ध असतो (म्ह० निगरणरूप वगैरे नसतो) तिला निरवयव अतिशयोक्ति म्हणतात.
निरवयव अतिशयोक्तीचें उदाहरण :---
“डोळ्यांना होणार्‍या आनंदाच्या भराला अत्यंत समृद्ध करण्यास समर्थ, अशी कोणी (अवर्णनीय) मेघमाला माझा संताप त्वरित हरण करो.”
या श्लोकांत भगवान् श्रीकृष्णाच्या (मेघश्याम) मूर्तींचें निगरण केलें आहे. दोन नामार्थांचा अभेदसंबंधानें होणारा विशेष्य - विशेषणभाव व्युत्पत्तिशास्त्राला मान्य आहे; व म्हणूनच (त्या द्दष्टीनें) रूपकालंकारांत, अभेद्रसंबंधानें होणारा विषय व विषयी यांचा विशेष्य - विशेषणभाव, उचित म्हटला पाहिजे; पण प्रस्तुत अतिशयोक्तींत, विषय व विषयी यांचा विशेष्यविशेषणभाव मानणें योग्य होणार नाहीं; कारण अतिशयोक्तींत विषयीच्या विशिष्ट धर्मानें युक्त असें विषयाचेंच (केवळ) भान होत असल्यानें, येथें अभेदसंबंध मानण्याचा प्रसंगच नाहीं, आतां या अतिशयोक्तीला अभेदप्रधान अतिशयोक्ति असें जें नांव पडलें आहे, त्याचें समर्थन खालीलप्रमाणें करतां येईल :---
अभेदसंसर्गानें, विषयीचा विषयावर आरोप ज्यांत केला जातो त्या रूपकाप्रमाणें (म्ह० त्या रूपकाला ज्याप्रमाणें अभेदप्रधान रूपक म्हटलें जाते त्याप्रमाणें) अतिशयोक्तींत विषयाचें विषयीच्या विशिष्ट (अवच्छेदक) धर्मानें भान होत असल्यानें, विषयी व विषय यांच्यांत भेदाचा अभाव म्ह० अभेदरूपसंबंध आहे असें मानलें जातें; (आणि म्हणूनच अतिशयोक्तीला अभेदप्रधान असें नांव पडलें आहे);  विषयीचा अवच्छेदक (खास  विशिष्ट) धर्म ह्या अतिशयोक्तींत असा असतो कीं, “हा केवळ विषयाचा खास धर्म नाहीं; अथवा हा (धर्म) स्वत:चें अधिकरण जे विषयी त्यावर राहणार दुसरा एखादा धमही नाहीं, अशी गोष्ट लोकांत प्रसिद्ध असते. तरीपण ह्या (अशा विलक्षण) विषयितावच्छेदक धर्माचा उपयोग, विषयीनें विषयाच्या केलेल्या निगरणाला द्दढ करण्याकडे कधीं कधीं होतो. उदा० ‘कलिन्दगिरि० ’ इ० श्लोकांतील तमालत्व हा विषयितावच्छेदक धर्म.
कुठें कुठें, अतिशयोक्तींत आलेलीं विषयीचीं विशेषणें, प्रसिद्ध (म्ह० विषयीला योग्य आहेत अशी प्रसिद्धि नसलेलीं अशीं) असून कवीनें तीं आपल्या प्रतिभेनें कल्पिलेलीं असतात. ज्याप्रमाणें, कल्पितोपमेंतील उपमान (अप्रसिद्ध असूनसुद्धां) कवीनें स्वत:च्या प्रतिभेनें कल्पिलेलें असतें, त्याप्रमाणें अतिशयोक्तींतील (विषयीचीं) विशेषणें अप्रसिद्ध असून कवीनें कल्पिलेलीं असतात. (पण) (कल्पितोपमेंतील) धर्मीप्रमाणें, (अतिशयोक्तींत) धर्माची ही कल्पना करण्यांत विरुद्ध असें कांहींच नाहीं.
अप्रसिद्ध आणि कल्पित (विषयि -) धर्म जिच्यांत आहे, अशा अतिशयोक्तीचें उदाहरण :---
“स्मृतापि तरुणातपम् ।” (हा श्लोक रसगंगाधराच्या प्रारंभीं मंगलाचरण म्हणून आलेला आहे). अथवा (दुसरें उदाहरण) :---
“ज्योत्स्नारूप नव्या चुन्यांनी (चुन्याच्या लेपानें) सारें जग भरून टाकणारा, लोकांचा त्रिविधताप तत्काळ शांत करणारा, (आणि) वृन्दावनाचा आश्रय करणारा व अखिल देवांच्या समूहानें वंदिलेला, असा (एक) नवीन मेघ, माझ्या अंत:करणांतील अंधकार नाहींसा करो.”
या श्लोकांत विषय जो श्रीकृष्ण, त्याच्या धर्मानें विशिष्ट अशा (लोकोत्तरत्व या) रूपानें, एका (लोकविलक्षण अशा) मेघाची प्रथम कल्पना केली आहे; व त्या मेघाच्या रूपानें भगवान् श्रीकृष्णाचा निर्देश (लक्षणेनें) केला आहे. या लोकोत्तरत्व धर्माशीं समानाधिकरण होऊन राहणारीं (इतर) कल्पित विशेषणें, जलधर व श्रीकृष्ण ह्या दोहोंमधील तादात्म्याला अनुकूलच आहेत. अशारीतीनें, निगरणांत सर्वच ठिकाणीं विषयाचें विषयीच्य अवच्छेदक धर्माच्या रूपानेंच भान होतें, विषयीशीं अभिन्नरूपानें विषयाचें भान होत नाहीं; अशी वस्तुस्थिति असल्यानें, “निगरणानें होणार्‍या (तादात्म्य) निश्चयाचे योगानें, रूपकातिशयोक्ति होते” असें सांगू न कुवलयानंदांत, (पुढें) जें म्हटलें आहे कीं, “ह्या अतिशयोक्तीला रूपक हें जें विशेषण दिलें आहे तें, रूपकांत दाखविलेले प्रकार ह्या अतिशयोक्तींतही होतात. हें रुपकाच्या द्दष्टांतावरून दाखविण्याकरतां, म्हणूनच (रूपकाप्रमाणें) अतिशयोक्तीचेही अभेदातिसयोक्ति, ताद्रूप्यातिसयोक्ति असे प्रकार मानावें.” तें कुवलयानंदाचें म्हणणें खण्डित झालें असें समजावें.” असें नवीनांचें म्हणणें.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP