(याचें) उदाहरण :---
“रसिकांनीं सतत आस्वाद घेण्याला योग्य अशी ज्याची वाणी ऐकण्याची, वारा पोटभर पिणारे जे नाग त्यांच्या वंशांतला मुख्य शेष, एकाग्र चित्त करून, इच्छा करतों.”
(ह्याचेंच तिसरें) उदाहरण :---
“अंधकार, शरद्दतूंतील चंद्र, तारका, प्रवाळ, चांफ्याच्या फुलाची कळी - हीं सर्व यदाकदाचित् एकत्र आलीं तरच, तिच्या मुखाच्या थोडया अंशाशीं त्या सर्वांची आम्ही तुलना करूं”
पूर्वींच्या (दोन्ही) श्लोकांत, संबंध निश्चितपणें सांगितला आहे; पण ह्या श्लोकांत, संबंधाचा संभव सांगितला आहे. हा (पूर्वीच्यांत व ह्यांत) फरक.
असाच एक दुसरा (म्हणजे चवथा) प्रकार आहे. त्यांत संबंध असूनही, तो नाहीं म्हणून सांगितलेला असतो.
उदा० :--- दुधाच्या खर्वसासारखी तुझी वाणी, थोडीसुद्धां, जे पितात त्यांना, सुंदर स्त्रीच्या अधरोष्ठाच्या माधुर्याचा फवारा (सुद्धां), अगदीं आनंद देत नाहीं.
येथें आनंद देत असून, आनंद देत नाहीं असें म्हटलें आहे. वरीलप्रमाणें आणखी एक (पाचवा) प्रकार आहे. त्यात कारण व कार्य यांचें जें पौर्वापर्य (म्ह. प्रथम कारण व नंतर कार्य असा कालक्रम) त्याची उलटापालट केलेली असते (म्ह० कार्य प्रथम व नंतर कारण असें उलटें वर्णन येतें). ही उलटापालट दोन तर्हेनें होते :--- (१) कार्य व कारण ही दोन्हीं एकाच वेळीं उत्पन्न होतात असें म्हणण्यानें. (२)
व कार्यानंतर दोन्हीं एकाच वेळीं उत्पन्न होतात असें म्हणण्यानें. (२) व कार्यनंतर कारण उत्पन्न होतें असें सांगण्यानें, पैकीं पौर्वापर्याची उलटापालट होण्याच्या पहिल्या प्रकाराचें उदाहरण :---
“(आपल्या घोडयांच्या) टापा दगडावर आपटतांक्षणींच त्यांतून वर उसळणार्या विजेच्या, वेलीप्रमाणे पसरणार्या, ठिणग्यांचीं जाळीं निर्माण करणार्या घोडयांच्या :---”
घोडयांच्या या वर्णनांत, वर उसळणें हें कारण, व ठिणग्यांच्या विजेच्या वेली बनणें हें कार्य :--- हीं दोन्हीं एकाच वेळीं उत्पन्न झाल्याचें सूचित केलें आहे. (ह्यांतीलच) दुसरा प्रकार :---
‘हे राजा ! तुझ्या शत्रूराजांचीं शहरें प्रथम जळून खाक होतात;
आणि मग तुझ्या उंच (म्ह० वर चढविलेल्या) भुंवयांतून क्रोधरूपी अग्नीच्या ठिणग्या उसळतात.”
वरील दोन्हीही प्रकारांत, कारण उत्कृष्ट असल्यानें, कार्यांतही अत्यंत शीघ्रता हा त्याचा गुण उतरल्याचें सूचित होतें.