पण कीर्ति या विषयावर, स्वर्गंगेंत प्रवेश करणें (शब्दश: स्वर्गंगा जिचें कर्म आहे अशी जी प्रवेशक्रिया तिचा कर्ता होणें) ह्या विषयीची संभावना ह्या ठिकाणीं आहे, (म्ह० या ठिकाणीं भेदसंबंधानें उत्प्रेक्षा केली आहे,) हें (जगन्नाथाचें) मत मानलें तर, स्वर्गांत जाणें हा उत्प्रेक्षेला निमित्त होणारा धर्म येथें नसल्यानें, ही अनुपात्तनिमित्ता उत्पेक्षा आहे (असें म्हणावें लागेल). पण भ्रमणश्रान्ता (भ्रमण केल्यामुळेंच कीं काय, थकलेली) हें जें कीर्तीचें विशेषण त्याचीच हेतूत्प्रेक्षा येथें आहे असें मानलें (म्ह० भ्रमणश्रान्ता या पदांतील भ्रमण हा श्रान्त होण्याचा हेतु आहे, अशी संभावना केली) तर, (म्ह० या मतीं) प्रथम, स्वर्गांत जाणें या क्रियेशीं प्रवेश करणें या क्रियेचें तादात्म्याध्यवसान करून, त्याच्या बळावर एक उपात्त धर्म तयार करून, त्याला या हेतूत्प्रेक्षेचें निमित्त मानावें लागेल. (वरील मतांपैकीं कोणतेंही मत मान्य केलें) तरी, ह्या ठिकाणीं गम्योत्प्रेक्षा आहे. (तसेंच, तुल्यन्यायानें) ‘सौधाग्राणि पुरस्यास्य स्पृशन्ति विधुमंडलम् ।’ या ठिकाणीं ही, अत्यंत उंच ससलेल्या प्रदेशाच्या संयोगावर चंद्रमंडलाच्या स्पर्शाची तादात्म्योत्प्रेक्षा मानून, अत्यंत उंच प्रदेशापर्यंत पोचणें ह्या अनुपात्त धर्माला येथील उत्प्रेक्षेचें निमित्त मानावें लागेल; आणि (याच श्लोकार्धांत) चंद्रमंडलाला स्पर्श करणारा (जणु कांहीं) अशी कर्तुत्वोत्प्रेक्षा आहे असें मानलें तर, तिच्यांत, अत्यंत उंच प्रदेशाचा संयोग हा (येथें न सांगितलेला) धर्म निमित्त आहे, (असें समजावें लागेल), तरीपण ही सुद्धां गम्योत्प्रेक्षाच आहे. (अतिशयोक्ति नाहीं. हें निश्चित). तेव्हां, ‘असंबंधे संबंधातिशयोक्ति’ ह्या प्रकाराचें (तुम्हाला) उदाहरण द्यायचें असेल तर, ज्यांत उत्प्रेक्षेची (मुळींच) सामग्री नाहीं. असेंच उदाहरण देणें योग्य होईल. उदा० आम्ही दिलेला,‘धीरध्वनिभि:०’ इत्यादि श्लोक. आणि, (अतिशयोक्तीचें अनुगत लक्षण दिल्यानंतर ही) ‘सुदंर असून वाक्यार्थाला उपकारक असेक तो अलंकार,’ हें अलंकाराचें सामान्य लक्षण येथेंही सांगायचें विसरू नये.
ही अतिशयोक्ति वेदांतही आढळते. उदा० :--- ‘बरोबर राहणारे व परस्परांचे मित्र असे दोन पक्षी एकाच वृक्षाला बिलगून राहिले आहेत; त्यांपैकीं एक पक्षी पिंपळाचें गोड फळ खातो व दुसरा पक्षी कांहीं न खातांच, वघत बसतो.’ (ऋग्वेद १,१६४, २०).
(याचा अध्यात्मपर प्रस्तुत अर्थ असा :--- प्राणिशरीरांत जीवात्मा व परमात्मा असे दोघेही राहतात; त्यांपैकीं जीवात्मा कर्मफलांचा उपभोग घेतो, व परमात्मा अलिप्त राहून आनंदांत मग्न असतो.)
स्मृतींतही (ही अतिशयोक्ति आढळते) :---
उदा० :--- “जी सर्व प्राण्यांची रात्र तेथें स्थितप्रज्ञ जाग्रत असतो; आणि सर्व प्राणिमात्र जेथें जाग्रत असतात ती या ज्ञानवान् पुरुषाची रात्र. (भ. गी. २ । ६९).
(परमात्म्याला जाणण्याच्या बाबतींत सर्व लोक अंधारांत - अज्ञानांत असतात, पण आत्मज्ञानी पुरुष प्रबोधपूर्ण असतो; उलट सांसारिक बाबतींत जगांतील सर्व प्राणी जागरूक असतात तर, त्या बाबतींत आत्मज्ञानी पुरुष नेहमीं उदासीन असतो. हा या श्लोकाचा अध्यात्मपर प्रस्तुत अर्थ).
आतां या अतिशयोक्तीच्या ध्वर्नाचें उदाहरण :---
“हे भगवंता, तुझ्या केवळ दर्शनानेंच पुण्याच्या राशी नाहींशा होतात; आणि तुला न पाहिलें कीं सर्व पाप नष्ट होतें.”
(शास्त्राप्रमाणे पाहतां) पुण्य व पाप यांचा नाश (अनुक्रमें) सुख व दु:ख यांचा उपभोग घेतल्यानेंच होतो. त्यामुळें, दर्शन व अदर्शन यांनीं (अनुक्रमें) त्या दर्शनामुळें होणार्या सुखाचा व अदर्शनानें होणार्या दु:खाचा आक्षेप केला आहे; त्याचप्रमाणें, राशि व अशेष या दोन शब्दांनीं शेकडो जन्मपर्यंत ज्यांचा उपभोग घ्यावा लागेल अशा सुखदु:खाचा आक्षेप केला आहे; व त्या आक्षेपाच्या बळावर, जन्मशतोपभोग्य सुखदु:ख या दोन (पुढच्या) विषयींनीं पूर्वीं (प्रथम) सांगितलेल्या भगवंतांच्या दर्शन व अदर्शनामुळें होणार्या सुखदु:ख या दोन विषयांचें निगरण व्यंजनाव्यापारानें केले आहे, कुणी म्हणतील :--- ‘(याच्या उलट कां नाहीं होणार ? म्हणजे) भगवद्दर्शनादर्शनानें होणार्या सुखदु:खांनीं जन्मशतोपभोग्य सुखदुखांचें येथें निगरण कां नाहीं होणार ?’ पण असें विचारणें योग्य नाहीं. कारण (प्रचंड सुखदु:खांच्या उपभोगानें प्रचंड पुण्यापापांचा नाश होतो, (या शास्त्राच्या नियमांत सांगितलेल्या) नाशाची उक्ति (वाचकांना) योग्य रीतीनें पटावी म्हणून, जन्मशतोपभोग्य प्रचंड सुखदु:खांचा, ‘(पुण्यापापांचा) नाश करणें या विशिष्ट धर्मानें युक्त’ या रूपानेंच बोध होणें आवश्यक आहे; (त्यांचा ठसठशीत उल्लेख शब्दानें होणेंच योग्य आहे; निगीर्णरूपानें त्यांचें सूचन फारसें परिणामकारक होणार नाहीं; म्हणून) त्या (प्रचंड) सुखदु:खाचें निगरण करणें शक्य नाहीं. शिवाय (भगवद्दर्शनादर्शनानें उत्पन्न होणारी सुखदु:खें हीं उपमेय असून ती जन्मशतोपभोग्य सुखदु:खांच्या मानानें छोटीं आहेत; म्हणून) मोठया असलेल्या उपमानानें, क्षुद्र अशा उपमेयाचें महत्त्व स्थापित करण्याकरतां निगरण करणें हेंच उचित होय.
ह्या अतिशयोक्तिध्वनीच्या उदाहरणानें, तदप्राप्तिहादु:ख इत्यादि काव्यप्रकाशांतील श्लोकाचेंही विवेचन होऊन गेलें (असें समजावें).
येथें रसंगंगाधरांतील अतिशयोक्ति प्रकरण संपलें.