अशा रीतीनें, ‘वरील पांचही प्रकारांपैकीं कोणताही एक प्रकार असणें, हें अतिशयोक्तीचें सर्वसामान्य लक्षण’ असें प्राचीनांचें मत.
दुसर्या कांहींचें म्हणणें असे :---
संबंध असतांना तो नाहीं असें म्हणणें, व तो नसतांना तो आहे, असें म्हणणें, ह्या दोन्ही ही प्रकारांना अतिशयोक्ति म्हणूं नये. कारण, अशा प्रकारचें अतिशयोक्तीनें सांगणें, स्वभावोक्ति सोडून बाकीच्या रूपक, दीपक, उपमा, अपहनुति वगैरे बहुतेक सगळ्या अलंकारांत असतें. बरें वस्तु जशीं असेल तशी सांगणें, यांत चमत्कार कांहींच नाहीं. शिवाय, कार्यकारणांच्या कालक्रमाची उलटापालट ह्या प्रकाराचा, संबंधमूलक अतिशयोक्तीच्या दोन्ही प्रकारांतच समावेश होत असल्यानें, तो निराळा प्रकार आहे असें म्हणतां येणार नाहीं. (म्ह० संबंधमूलक दोन प्रकारांत फारसा चमत्कार नसल्यानें, त्यांना अतिशयोक्ति म्हणूं नका असें म्हटल्यास, या प्रकारालाही अतिशयोक्ति म्हणतां येणार नाहीं.) म्हणून (१) विषयीनें विषयाचें केलेलें निगरण (२) विषयालाच निराळे मानणें (३) जर (यदि) तर वगैरे शब्दांनी असंभवित वस्तूची कल्पना करणें, (४) व कार्यकारणाच्या कालक्रमाची उलटापालट; ह्यांपैकीं कोणताही एक प्रकार असणें म्हणजें अतिशयोक्ति (असें ह्या लोकांचें म्हणणें).
या बाबतींत नवीनांचें म्हणणें असें :---
निगरणानें होणार्या अभेदाध्यवसायालाच (फक्त) अतिशयोक्ति म्हणावें. बाकीच्या वर सांगितलेल्या अतिशयोक्तीच्या प्रकारांत सर्वांना साधारण असें रूप (धर्म) नसल्यानें, त्यांना निराळे अलंकार मानावें. आम्हाला (नवीनांना) कुणी विचारतील, ‘तुम्ही असा निगरणमूलक अतिसयोक्तीचा एकच प्रकार कसा मानतां ? निगरणाचे दुसरेही प्रकार संभवतात.) उदा० (१) प्रस्तुत विषयाला निराळाच मानणें या प्रकारांत भेदानें अभेदाचें निगरण केलें आहे. (भेद सांगितला असला तरी वस्तुत: अभेदच आहे; तेव्हां या प्रकारांत अभेदाचें निगरण मानणें प्राप्त आहे.) (२) संबंध नसतांना संबंध आहे असें मानणें म्ह० संबंधानें असंबंधाचें निगरणच. (३) संबंध असतांना संबंध नाहीं असें मानणें या प्रकारांत, असंबंधानें संबंधाचें निगरणच केलें आहे. (४) कार्यकारणाचें पौर्वपर्य उलटें होणें या प्रकारांत क्रमाचें निगरणच आहे; असे हे निगरणाचे दुसरे प्रकार, रत्नाकर - विमर्शिनीकार इत्यादिकांनीं सांगितलेल्या पद्धतीप्रमाणें अवश्य संभवतात. (मग तुम्ही अतिशयोक्तीचा एकच प्रकार काय घेऊन बसला ?) (यावर आमचें, नवीनांचें, म्हणणें असें) :--- हें तुमचें विचारणें बरोबर नाहीं. कारण, वरील निगरणाच्या सर्व स्थलीं. एखादी वस्तु स्वत:हून अन्य भासणें, यांतच खरा चमत्कार आहे (निगरणांत नाहीं). (अभेदाच्या निगरणानें) वस्तु स्वत:च्या रूपानें, भासणें यांत चमत्कार नाहीं; आणि अशा भासण्यांत चमत्कार आहे असें मानणें, हें अनुभवाशीं जुळत नाहीं. “या सर्व प्रकारांपैकीं कोणताही एक प्रकार असणें म्हणजे अतिशयोक्ति, असें लक्षण सर्व अतिशयोक्तींच्या प्रकारांत अनुगत आहे.” असेंही (प्राचीनांना) म्हणतां येणार नाहीं; कारण, वरील (अतिशयोक्तीच्या) प्रत्येक प्रकारांत, स्वत:चा असा विशिष्टा चमत्कार (विच्छित्ति) निराळा असल्यानें, ‘या प्रकांपैकीं कोणताही एक प्रकार असणें म्हणज अतिशयोक्ति’ असें (प्राचीनांनीं केलेलें अनुगत) लक्षण व्यर्थ आहे. हें आमचें (म्ह० नवीनांचें) म्हणणें मान्य नसेल तर, “ उपमा, रुपक वगैरे अलंकारांपैकीं एक असणें अथवा सर्व अलंकारांपैकीं एक असणें म्हणजे अतिशयोक्ति,व उपमा वगैरे अलंकार हे त्या अतिशयोक्तीचेच प्रकार आहेत,” असें कां नाहीं म्हणत ? तुम्ही (प्राचीन) म्हणाल, “वरील अतिशयोक्तीच्या प्रत्येक प्रकाराला निरनिराळा अलंकार मानणें यांत गौरवदोष आहे;” पण तसेंही तुम्हांला मानतां येणार नाहीं. कारण या (निराळे) अलंकार मानतों, ह्या आमच्या कल्पनेंत असिद्ध वस्तूची कल्पना असती तर, तिच्यांत गौरवदोष झाला असता. प्रधान अर्थाचा उत्कर्ष करण्यास कारण होणें म्हणजेच अलंकार होणें, हें तुम्हांलाही (प्राचीनांना) मान्य आहे. बरें, अलंकारांना (एकमेकांपासून) निराळे पाडणारे धर्म (उपाधि) किती असावेत याची गणना माणसांच्या मर्जीवर अवलंबून आहे. (मग नव्या उपाधींमुळें नवे अलंकार कां होऊं नयेत ?)” (हें या बाबतींत नव्यांचें म्हणणे). (आतां)
“ आकाशांत फिरणारें (चंद्ररूपी) जलबिंब पूर्ण आहे, असें जाणते लोक कसें बरें म्हणतात ? (खरें म्हणजे) दशरथाच्या अंगणांत हिंडणारा व ह्रदयाचा ताप हरण करणारा चंद्रच परिपूर्ण आहे.”
ह्या ठिकाणीं विषयी जो चंद्र त्याचें नेहमींचें राहण्याचें ठिकाण जें आकाश त्याचा निहनच (निषेध) केल्यामुळें, येथें द्दढाध्यवसानातिशयोक्ति झाली आहे.
आतां क्वलयानंदांत,
“अतिशयोक्तींच्या पोटांत अपहूनव असेल तर, तिला सापहनवातिसय़ोक्ति म्हणावें. उदा० :--- “हे राजा ! तुझ्या वचनाच्या ठिकाणींच अमृत आहे; (पण) भ्रांतिष्ट लोक तें (अमृत) चंद्राच्या ठिकाणीं आहे असें समजतात.”
या ठिकाणीं पर्यस्तापहनुतिगर्भा अतिशयोक्ति आहे असें म्हणलें आहे, तें चुकीचें आहे. तुमच्या पर्यस्तापहनुतीला अपहनुति अलंकार म्हणणें ही गोष्ट, ज्यांचें बोलणें प्रमाण आहे अशा लोकांना मान्य नाहीं, हें आम्ही पूर्वींच सांगितलें आहे. शिवाय, त्यांनीं च (कुवलयानंदकारांनीं) “संबंध नसतांना संबंधाची कल्पना करणें ही संबंधातिशयोक्ति; उदा० :---
‘या नगरांतील राजवाडायांची शिखरें चंद्रमंडलाला जाऊन भिडतात’.” असें म्हटलें आहेत, त्यांतही अर्थ नाहीं, कारण (आम्ही त्यांना असें विचारतों कीं) वरील उदाहरणांतील अर्थ नाहीं. कारण (आम्ही त्यांना असें विचारतों कीं) वरील उदाहरणांतील उत्तरार्धांत, स्पृशन्तीवेन्दुमण्डलम् ।’ (जणुं चंद्राला भिडतात,) असा फरक केला तर, कोणता अलंकार होईल ? तुम्ही म्हणाल ‘उत्प्रेक्षा.’ तर मग येथें (ह्या उत्तरार्धांत) इव वगैरे शब्दांचा अभाव असल्यानें, हिला गम्योत्प्रेक्षा मानणेंच योग्य होईल. इव वगैरे शब्दांचा अभाव असल्यानें, हिला गम्योत्प्रेक्षा मानणेंच योग्य होईल. इव वगैरे शब्द असल्यामुळें जी वाच्य उत्प्रेक्षा असतें, तीच इव वगैरे शब्द नसल्यास गम्योत्प्रेक्षा होते, हा नियम सर्वांना मान्य आहे. “तुझी कीर्ति भटकून थकल्यामुळेंच कीं काय. स्वर्गंगेंत शिरली.” ही तुम्ही दिलेली गम्योत्प्रेक्षा, व ‘सौधाग्राणि०’ ह्या (तुमच्या) श्लोकार्धांत असलेला संभावनेंचा अंश, या दोहोंत फरक कांहींच दिसत नाहीं. कसें तें पहा :--- ‘त्वत्कीर्ति०’ इत्यादि श्लोकार्धांत, ‘फार दूर भटकणें अथवा स्वर्गांत जाणें या विषयावर स्वर्गगेंत प्रवेश करणें ह्या क्रियेची तादात्म्योत्प्रेक्षा आहे,’ यामतीं, स्वर्गाचा संबंध असणारी कीर्ति हें उत्प्रेक्षेचें निमित्त येथें शब्दानें सांगितलें नसल्यानें, ही अनुपात्तनिमित्ता उत्प्रेक्षा आहे (असें म्हणावे लागेल).