प्रतिवस्तूपमा अलंकार - लक्षण १
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
प्रथम आम्ही, ‘ज्या ठिकाणीं साद्दश्याचा चमत्कार असतो तेथे उपमा अलंकार होतो’ असें सांगितलें; व त्या उपमेंतील साधारणधर्माचे, जे जे होणें शक्य आहेत ते ते सर्वही प्रकार सांगितले. साद्दश्यानें उपस्कृत
अशा दुसर्या पदार्थांचा (एकधर्मान्वय, अभेद वगैरेंचा) चमत्कार होत असतां होणारे, भेदप्रधान अलंकार (दीपक व तुल्ययोगिता) व अभेदप्रधान (रूपक भ्रान्तिमत् वगैरे) अलंकारही सांगितलें. वरील सर्व ठिकाणीं, साधारणधर्म कोणत्या कोणत्या वेळीं, कसे कसे होणें शवय आहेत, हे ही दाखविलें. आतां वस्तुप्रतिवस्तुभावापन्न साधारणधर्मावर उभारलेली व वाक्यार्थांत येणारी प्रतिवस्तूपमा सांगतों.
‘उपमा पदार्थगत असते व प्रतिवस्तूपमा वाक्यार्थांत (सबंध वाक्यांत मिळून) असते, असा उपमेहून हिचा भेद आहे, अशी भ्रांति करून घेऊं नये; कारण ‘दिवि भाति यथा भानुस्तथा त्वं भ्राजसे भुवि’ (आकाशांत जसा सूर्य तळपतो तसा, तूं पृथ्वीवर चमकतोस.) यासारख्या वाक्यार्थांतहि उपमा असणें शक्य आहे. (तेव्हां वाक्यार्थगता असेल ती प्रतिवस्तूपमा, व पदर्थगत असेल ती उपमा असेंही म्हणतां येणार नाहीं.) यावरून (अघानें हेंही सिद्ध झालें कीं), वाक्यांतील एकच धर्म निराळ्या शब्दांनीं (दानदां) सांगणे, हें प्रतिवस्तूपमेचें वैशिष्टय आहे, असेंही म्हणणें शक्य नाहीं. कारण, वरील “दिवि भाति” या ठिकाणीं एकच ‘प्रकाशणें’ ह्या धर्माची प्रतीति, ‘भा’ व ‘भ्राज्’ या दोन निराळ्या शब्दांनीं उपमेंतही होत आहे. तेव्हां प्रतिवस्तूपमेच्या लक्षणाला अनुसरून तिचा इतर अलंकाराहून निराळेपणा समजून घेतला पाहिजे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP