उदा) :--- ‘भैरभ्रें भासते चन्द्रो भुवि भाति भवान्बुधै:’ (आकाशांत नक्षत्रांसह चंद्र शोभतो; पृथ्वीवर तूं पंडितांसह शोभतोस).’
येथें शंका अशी कीं, या अलंकारांत सर्वत्र साद्दश्य सूचित होतें, असें कसें म्हणतां येईल ? कारण मागें सांगितलेल्या वैधर्म्यानें होणार्या प्रविव्स्तूपमेंत, दोन वाक्यांतील साद्दश्य (तर उलट) बाधित झालें आहे; (उदा० पूर्वार्धात, ‘पूज्यते पुरुष:’ आणि उत्तरार्धात ‘न महिमानं प्रयाति’, हे अगदी परस्परविरुद्ध वाक्यार्थ आले आहेत, मग त्यांच्यामध्यें साद्दश्य कसें ?) ‘पचति’ व न पचति’ या दोन वाक्यांच्या अर्थामध्यें पाकक्रिया ही समान आहे, एवढयाचवरून (एकांत पाकाचा विधि व दुसर्यांत पाकाचा निषेष असल्यानें,) औपम्य (साद्दश्य) सूचित होणार नाहीं; कारण, उत्तरार्धांतील वाक्यांत पाकक्रिया, ही निषेधीची (न - नाहीं, या अभाववाचकाच्या अर्थाची) प्रतियोगी असल्यामुळें, (म्ह० नाहीं काय, हें सांगण्याकारताच पाकक्रिया आली असल्यामुळें) तिचा म्ह. पाकक्रियेचा उदयच होत नाहीं. (तिचें अस्तित्वच नाहीं - मग एक आहे व एक नाहीं, अशा दोन पदार्थांत साद्दश्य कुठून असणार ?) या शंकेला उत्तर असें :--- अप्रकृत वाक्यार्थानें आक्षिप्त (उदा० वंशभवो० यांतील तुम्बीफलविकल० इत्यादि वाक्यार्थानें आक्षिप्त (उद० वंशभवो० यांतील तुम्बीफलविकल० इत्यादि वाक्यार्थानें आक्षिप्त त्या अप्रकृत अर्थाहून उलट असा जो वाक्यार्थ, (म्ह. तुंबडा असलेली वीणेची दांडी वाखाणली जाते हा,) तोच पूर्वार्धांतील वाक्यार्थाशीं होणार्या साद्दश्याचा आश्रय असतो. (म्ह० त्या अक्षिप्त अर्थानें निरूपित जें साद्दश्य तें पूर्वार्धांतील अर्थावर राहतें व अशा रीतीनें दोहोंत औपम्य जुळतें.) ‘कुणी म्हणतील, मग लक्षणांत दोन वाक्यार्थांचें आर्थ औपम्य असतें ती प्रतिवस्तूपमा असें म्हटलें आहे त्याची सांगति कशी लावावयची ? (येथें तर अप्रकृत वाक्यार्थाचें औपम्य नसून त्यानें आक्षिप्त अशा दुसर्या अर्थाचें औपम्य आहे.)’ यावर उत्तर हें कीं, वाक्यार्थ या लक्षणांतील शब्दाचा अर्थ, ‘वाक्यानें प्रतीत होणारा अर्थ’ (मग तो साक्षात् शब्दप्रतिपादित अर्थ असो किंवा आक्षिप्त असो, कसलाही चालेला) एवढाच घेणें इष्ट आहे. उदा० :---
“काव्याचें गूढ मर्म या जगांत विरळाच जाणतो; भुंग्यावांचून फुलांतील मधाची खरी गोडी जाणणारा (असा दुसरा) कोण आहे ?”
या ठिकाणीं ‘विरळा (च) जाणतो’ हा वाक्यार्थ विधिरूपानें (म्ह० जाणतो या अस्तिरूपानें) सांगितला असला तरी, ‘अशा विशिष्ट (रसिक) पुरुषावांचून दुसरा कुणीही (बाकीचे कुणीही -) जाणत नाहींत’ ह्या विशिष्ट अर्थांतच (या विधिरूप प्रकृत) अर्थाचा शेवट होतो; अर्थात् हा जो दुसरा अर्थ निषेधरूप, त्याचें, त्याच्याच सारख्या असलेल्या दुसर्या म्ह० अप्रकृत वाक्यार्थांशीं (उदा० मधाचा मर्मज्ञ कुणीही नाहीं, या निषेधरूप वाक्यार्थांशीं०) स्पष्ट रीतीनें साद्दश्य सूचित होतें.
आतां ‘वशभवो’ या पूर्वीं दिलेल्या (वैधर्म्यप्रतिवस्तूपमेच्या) उदाहरणांत, प्रकृत वाक्यार्थ विधिरूप आहे ही गोष्ट, ‘सगविशेष या कारणामुळे (माणसाची) पूजा होते, या अर्थांवर येथें तात्पर्य (विधेय) आहे,’ या गोष्टीवरून निश्चित होते; (आणि या विधिरूप वाक्यार्थांशीं उत्तरार्धांतील निषेधरूप वाक्यार्थांचें साद्दश्य नाहीं हें खरें, तरी पण) या ठिकाणीं सुद्धां, हेतुता म्ह० कारण ज्यांतील घटक आहे असा जो वाक्यार्थ त्याचा व्यतिरेक म्हणजे अभाव हा सुद्धां येथें गौण रीतीनें (का होईना) प्रतीत होतो. या अभावरूप वाक्यार्थांचें दुसर्या म्हणजे उत्तरार्धातील अप्रकृत वाक्यार्थांशीं साद्दश्य बिनधोक प्रतीत होते; (तेव्हां येथेंही वैधर्म्यानें प्रतिवस्तूपमा मानायला कांहीं हरकत नाहीं.) (मात्र येथें हें ध्यानांत ठेवले पाहिजे कीं,) ही प्रतिवस्तूपमा, सामान्यविशेषभावानें अनापन्न म्ह० रहित असे दोन वाक्यार्थ असतील तरच होते; करण सामान्यविशेषभाव नसेल तरच तेथें साद्दश्य सूचित होतें. पण वाक्यार्थांपैकी एक सामान्यरूप व दुसरा विशेषरूप वाक्यार्थ असेल असेल तर, त्यांच्यांत साद्दश्य प्रतीत होत नसल्यानें, त्यापैकी एक समर्थ्य वाक्यार्थ व दुसरा समर्थक वाक्यार्थ होऊन त्यांचा अर्थातरन्यास अलंकार होतो, हे आम्ही पुढें सांगणार आहों.
आतां, कुवलयानंदकारांनीं, वैधर्म्याची (वैधर्म्यप्रतिवस्तूपमेची), ‘विद्वान हाच विद्वानांचा परिश्रम जाणतो, वांझ बाई प्रसूतीच्या तीव्र वेदना जाणत नाहीं.
‘माणसांत, गुण असतील तर ते आपोआपच प्रगट होतात; कस्तूरीचा सुवास शपथ घेऊन कांहीं जाहीर करता येणार नाहीं (तो आपणहूनच प्रगट होतो)’
हीं दोन उदाहरणें दिलीं आहेत. यांपैकी ‘विद्वानेवहि०’ हे पद्य वैधर्म्याचें उदाहरण, कसें तरी माना; पण ‘यदि सन्ति०’ हे पद्य मात्र वैधर्म्याचें उदाहरण मानणें योग्य नाहीं. वैधर्म्यप्रतिवस्तूपमा म्हणजे, प्रस्तुत विशेष प्रकारचा जो धर्मी त्याच्या, श्लोकांत प्रतीत होणार्या अर्थाला दृढ करण्याकरतां, त्या प्रस्तुत अर्थानें (स्व) आक्षिप्त जो स्वत:चा अभाव (म्ह० स्वत:च्या उलट वाक्यार्थ) त्या अभावरूप वाक्यार्थाशी सारखा (समानजातीय) असा दुसर्या धर्मीचा प्रतीत होणारा अप्रकृत वाक्यार्थ सांगणें. आतां, ‘यदि सन्ति०’ या प्रकृत श्लोकांत, “गुण असतील तर आपोआपच प्रकट होतील” हा प्रस्तत अर्थ; ह्या अर्थाचा व्यतिरेक (म्ह० याच्या उलट अर्थ) “गुण नसले तर ते, दुसरे कांहींही उपाय केले तरी, प्रकट होत नाहींत.” हा. आतां, ह्या व्यतिरेकरूप अर्थाशीं समानजातीय असा अर्थ श्लोकांतील उत्तरार्धांत (मुळींच) जोजलेला नाहीं; (तसें असतें तर हें वैधर्म्याचें उदाहरण झालें असतें; पण) उत्तरार्धांत तर, ‘स्वत: प्रकट होतात; दुसर्या उपायानें प्रकट होत नाहींत’ हा प्रस्तुत अर्थाशीं सजातीय (सारखा) अर्थ, योजलेला आहे (तेव्हां येथे फार तर साधर्म्यप्रतिवस्तूपमा आहे, असें म्हणता येईल; पण वैधर्म्याचें हें उदाहरण तर मुळींच होणर नाहीं) ‘शपथेनें कळत नाहीं; पण आपोआपच कळतात हा (उत्तरार्धांतील अर्थ) शेवटी प्रकृत अर्थाला अनुरूप अशाच प्रकारचा आहे. वैधर्म्याच्या उदाहरणांत, प्रकृताला अनुरूप असा अप्रकृत अर्थ असणें, हें अजिबात जुळत नाहीं; कारण, (वैधर्म्याशीं) ती अनुरूपता विरुद्ध आहे. (व्याघातात् = विरुद्ध असल्यामुळें) म्हणून साधर्म्याचें हें उदाहरण आहे हें म्हणणेंच जुळतें, वैधर्म्याचें हें उदाहरण असें म्हणणें जुळत नाहीं. तुम्ही (कुवलयानंदकार) म्हणला, “दुसरे उपाय चालणार नाहींत, ह्या अर्थानें म्ह० उपायान्तरनिवृत्तीनें) युक्त - घटित - नसलेला जो प्रस्तुत वाक्यार्थ, (यदि सन्ति हा) त्याचें, उपायान्तराच्या निवृत्तीनें युक्त अशा उत्तरार्धातील वाक्यार्थाशीं साद्दश्य मानणें कसें बरें योग्य होईल ?” यावर आमचें उत्तर हें कीं, ‘विकसन्त्येव ते स्वयम्’ ह्यांतील ‘एव’ हा शब्द विकसन्ति ह्याच्या जवळून काढून ‘स्वयम्’ ह्याच्या जवळ (खेचून) आणून ठेवला म्हणजे, ‘ते स्वयमेव विकसन्ति’ असें वाक्य तयार होते; व त्याचा अर्थ, ‘स्वत;च, दुसर्या उपायांनीं नाहीं.’ असा होऊन प्रस्तुत वाक्यार्थात, ‘दुसर्या उपायांची निवृत्ति’ हाच अर्थ होतो. (मग प्रस्तुत अर्थ उपायान्तरनिवृत्तीनें घटित नाहीं, असें कसें म्हणतां ?)
(वरील वाक्यांतील विकसन्ति या पदाजवळचा एक शब्द उचलून स्वयमच्या जवळ ठेवणेंच योग्य आहे. कारण) - “ क्रियापदाच्या जवळ येणार्या ‘एव’ काराचा (म्ह० ‘एव’ ह्या शब्दाचा) अत्यन्तायोगव्यच्छेद हा अर्थ, उत्तरार्धांतील वाक्यार्थाशी जुळत नसल्यानें, त्या ‘एव’ शब्दाला क्रियापदाच्या (विकसन्तिच्या) जवळ ठेवणें (समभिब्याहार = बरोबर उच्चार करणें) जुळत नाहीं. (अर्थात दुसर्या वाक्यांतील अर्थाला अनुसरून त्या एव शब्दाला ‘स्वयम’ च्या जवळ ठेवणेंच योग्य आहे.) “माणसांचे असलेले गुण (माणसांत गुण असलें म्हणजे ते) स्वत:च प्रकट होतात; दुसत्याकडून प्रकट होत नाहींत. कस्तूरीचा सुवास, शपथ घेऊन, कळवावा लागत नाहीं.”