ह्या ठिकाणीं, ‘सुवास स्वत: होऊन अनुभवाला येतो’ अशा शेवटी होणार्या उत्तरार्धांतील वाक्यार्थांशीं, पूर्वार्धांतील वाक्याचें जसें साधर्म्य आहे, वैधर्म्य नाहीं, तसेंच ‘यदि सन्ति’ या श्लोकांतही साधर्म्य आहे, (वैधर्म्य नाहीं). अशी वस्तुस्थिति असतां आपण, (म्ह० कुलयानंदकार) केवळ नञ या शब्दाच्या आश्रयामुळे (म्ह० उत्तरार्धांतील वाक्यामध्यें असलेल्या नञ शब्दाच्या प्रयोगामुळें,) येथें वैधर्म्य आहे असें म्हणाला; पण यांत आपण सूक्ष्म द्दष्टीनें कांही पाहिलें नाहीं. आतां ‘यदि सन्ति’ या श्लोकाचा उत्तरार्ध बदलून त्याच्या ऐवजी, ‘वाचा वाचस्पतेर्व्योन्मि विलसन्ति न वल्लय:’ असें केलें तर, प्रकृत अर्थाच्या उलट अर्थ होत असल्यानें, येथें वैधर्म्य आहे असें म्हणणें योग्य होईल.
आतां, “दुष्ट लोक स्वजनांच्या हितांत विघ्न आणण्यांत तरबेज असतात; साप (बिचार्या) निरापराधी लोकांचे प्राण हरण करण्यांत पटाईत असतात.”
या ओबडधोबड (अव्यवस्थित) वाक्यांत, (वाक्यार्थात) अतिप्रसंग होईल (म्ह० या वाक्यांत प्रतिवस्तूपमा आहे असे म्हणण्याची वेळ येईल.) कारण (मुळांतील) कुशल व निपुण या दोन शब्दांनीं एकच धर्म येथें सांगितला आहे. ‘येथें साद्दश्य सूचित होतच नाहीं’ असें म्हणणें शक्यच. नाहीं; कारण निपुण व कुशल या दोन शब्दांनीं सामान्यरूपानें प्रतीत होणारा जो ‘पटाईत’ हा धर्म, त्यामुळे दुष्ट व साप यांच्यामधील साद्दश्य येथें (अवश्य) प्रतीत होत आहे. या श्लोकांत खल व फणि या धर्मीमधील साद्दश्य जरी प्रतीत (सूचित) होत असलें तरी, त्या धर्मीनीं विशिष्ट जे दोन वाक्यार्थ त्यांच्यामधील साद्दश्य सूचित होत नाहीं, असेंही म्हणता येत नाहीं; करण येथें अवयवांमध्यें साद्दश्य असलें कीं, त्यांच्या द्वारां अवयवी (येथे धर्मी हे अवयव व वाक्यर्थ हे अवयवी) मध्येंही साद्दश्य सूचित होतें, शिवाय (या ठिकाणीं नुसत्या शब्दार्थरूप साधारण धर्मामुळें औपम्य सूचित होत नसून) ‘स्वभावसिद्ध’ (म्ह० नैसर्गिक), या येथें शब्दानें न सांगितलेल्या, साधारण धर्माच्या योगानेंही, (म्ह० निरपराधी लोकांचा प्राण घेणें हें सापाला जसें स्वाभाविक, तसें स्वत:च्या हितांत विघ्न आणणें हे दुष्ट माणसालाही स्वाभाविकच) औपम्य (खल व साप यांच्यातील) सूचित होतें.” (व त्यावरून येथें उपमा मानतां येईल.) यावर आमचें उत्तर :--- (हें म्हणणें बरोबर नाहीं.) प्रतिवस्तूपमा असायला वस्तूप्रतिवस्तुभाव पाहिजे असें आम्ही जे म्हटलें आहे, त्याचा, “दोन शब्दांनीं एकच धर्माला सांगणें, हा साधारण धर्माचा वस्तुप्रतिवस्तुभाव तर हिच्यांत पाहिजेच, पण शिवाय या एकधर्माहून इतर म्ह० जो धर्मी त्याच्या विशेषणें वगैरे पदार्थांत बिंबप्रतिबिंबभाव पाहिजे व वाक्याच्या रचनेंतही एकमेकाशीं अनुरूपता असली पाहिजे,” असा अर्थ करणें येथें इष्ट आहे. (ह्या द्दष्टीनें पाहतां) प्रस्तुत श्लोकांत, खळ व फणी या दोहोंत, व प्राणी व हित या दोहोंत बिंबप्रतिबिंबभाव असला तरी, हरण व प्रत्य़ूहकरण या दोहोंचा शेवटी अर्थ (अनुक्रमें) नाश व प्रागभाव होत असल्यानें, या दोहोंत अनुरूपता नाहीं. अर्थात् ठसठशीत बिंबप्रतिबिंबभाव येथें नसल्यानें ह्या श्लोकांत प्रविवस्तूपमा मानण्याचा अतिप्रसंगरूपी दोष नाहीं. किंवा, (असली तर) असू द्या येथें प्रतिवस्तूपमा; पण , असंष्ठुलतारूप (म्ह० विषमपणा हा) वाक्यार्थाचा सर्वसामान्य दोष येथें असल्यानें, दुष्ट उपमा वगैरेप्रमाणे, चमत्कार उत्पन्न करणारी नाहीं. सखोळ अभ्यासानें ज्यांचीं अन्त:करणें निपुण झालीं आहेत; व नानाप्रकारच्या पदार्थांची रचना करणें व ती (मनाला वाटेल तशी) फिरवणें यांत जे समर्थ आहेत अशा कवींनीं एखादा वाक्यार्थ योजिला, रचला, तरच त्यात कांहीं और सौंदर्य प्रतीत होते एरव्ही नाहीं.