प्रतिवस्तूपमा अलंकार - लक्षण ७
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
उदा० :--
“आपल्या वडिलांच्या (भीम राजाच्या) सेवेकरतां आलेली ती (दमयंती) भाट लोकांच्या येण्याच्या वेळेवर दररोज टपून बसायची (ती वेळ तिला फार आवडायची); आणि ते भाट दर एक राजाचें वर्णन करीत असतां, (त्यांतील) नलाचें वर्णन ऐकून (आनंदामुळें वप्रेमामूळे) ती अत्यंत रोमांचित व्हायची.” ह्या नैषधीयचरितांतील (१-३४) पद्यांत रज्येत व अजनि या दोन क्रियापदांतील क्रियांचा उद्देश्यबिधेयभाव असल्यानें म्ह० रज्यते स्म यांतील ‘टपून बसणें’ ही क्रिया दमयंतीचें विशेषण असल्यानें उद्देश्य कोटीत जाते (अत एव ती गौण क्रिया आहे); व ‘विनिद्ररोमाऽजनि’ यांतील रोमांचित होणें ही क्रिया (वाक्यार्थाचें तात्पर्य असल्याणें) विधेय आहे (अर्थात् ती प्रधान आहे). असें असतां या श्लोकांत वरील दोन क्रियांचा गौणप्रधानभाव कवीनें स्पष्ट दाखविला नसल्यानें, ९हा एक दोष) व बन्दी या पदाचा एकदा षष्ठयंत व एकदा सप्तम्यन्त असा दोनदा प्रयोग केल्यामुळें (हा दुसरा दोष) कवीनें या श्लोकांतील वाक्यार्थ उंटाप्रमाणें विषय (वांकदातिकडा) करून टाकला आहे.
हाच वाक्यार्थ निराळ्या रीतीनें, उदा) :---
“वडिलांच्या सेवेकरतां ती आली असतांही (दररोज) भाटांच्या वर्णनाकडे मन लावून ते भाट राजे लोकांची राजद्वारावर स्तुति करतांना त्यांतील नलाची स्तुति ऐकत असता अत्यंत रोमांचित होई (होत असें)” या शब्दांत सांगितल तर, सुंदर स्त्रियांच्या अवयवांच्या (प्रमाणशीर) ठेवणीप्रमाणें, तो किती सुंदर दिसेल तें सह्रदय वाचकांना सहज समजण्यासारखें आहें. अशाच रीतीनें
“अमृत स्रवणार्या तुझ्या चरणकमलाच्या ठिकाणीं ज्यांचें चित्त जडलें आहे असा माणूस, इतर पदार्थाची कशाला इच्छा करील ? मधानें तुडुंब भरलेलें कमळ जवळ असतां, भुंगा, तालमखान्याच्या फुलाकडे बघणार नाहीं.” ह्या प्रतिवस्तूपमेचें उदाहरण म्हणून कुवलयानंदांत दिलेल्या विष्णूच्या स्तोत्रांतील पद्यांत, ‘न वीक्षते’ (पाहत नाहीं) यांतील नुसतें बघणें (पाहणें) कुणालाच टाळता येत नाहीं; त्यामुळें त्याचा निषेध (पाहत नाहीं असा) करणें हें योग्य नसल्यामुळें, ‘इच्छापूर्वक पाहणें’ या क्रियेचाच येथें निषेध केला आहे. आता हा निषेध जरी पाहणें या क्रियेचा असला तरी, त्या क्रियेचें विशेषण जो इच्छारूपी धर्म त्याच्या निषेधांत वरील विशेष्याच्या निषेधाचें पर्यवसान (शेवट) ‘सविशेषण०’ या न्यायानें होतें. तेव्हां इच्छानिषेध हा धर्म या दोन वाक्यांत भिन्न शब्दांनीं सांगितला असूनही एक आहे असें म्हणणें सोपें आहे; (व त्यामुळें येथें प्रतिवस्तूपमा आहे असेंही म्हणणें सोपें आहे). अथवा या श्लोकांत द्दष्टांतालंकार आहे असें (वाट्लें तर) म्हणा. पण कांहीं म्हटलें म्हटलें तरी, ‘पादपङकजे निवेशितात्मा’ ही जी आधारसप्तमी (कमलाचे ठायीं ही सप्तमी) तिच्याशीं ‘अरविंदे स्थिते सति’ ही सतिसप्तमी अनुरूप नसल्यामुळें, या श्लोकांत विषमतारूपी दोष कायमच आहे. “स्थितोऽरविन्दे मकरन्दनिर्भरे” असा वरील श्लोकांत फरक केला तर चांगलें होईल.
तेव्हां या चर्चेचा एकंदरींत तात्पयार्थ हा कीं, अशा तर्हेच्या दोन वाक्यार्थांमध्यें औपम्य सूचित करणार्या अलंकारांत, पूर्वार्धांतील वाक्यांतील नामार्थांना अनुरूप असें उत्तरार्धाच्या वाक्यांतील नामार्थ असावेत; पूर्वार्धाच्या वाक्यांतील विभक्तींना अनुरूप उत्तरार्धांतील विभक्ति असाव्यात; व पूर्वार्धांतील अन्वयाला अनुरूप असा उत्तरार्धातील अन्वय असावा. ह्या बाबतीत (वाटल्यास) सह्रदयाच्या ह्रदयाला विचारावे.
“चंदनाचें जाड सापांना बाळगते; दिवा डोक्यावर काजळी धरतो. चंद्रही धडधडीत कलंकाला धारण करतो; राजे लोक दुष्ट लोकांना थारा देतात.”
या श्लोकांतील वहन, आधान, भजन, भरण या क्रिया वस्तुत: एकरूपच असल्यानें ही प्रतिवस्तूपमा, मालारूप आहे.”
येथे रसगंगाधरांतील प्रतिवस्तूपमा प्रकरण संपलें.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP