‘योग्यता नसलेला संबंध म्हणजे विषम अलंकार’ (प्रथम) अनुरुप हा, योग्यता या अर्थी, रूपस्य योग्यं अनुरुपम् असा अव्यय़ीभाव समास होतो; (मग) ‘अनुरुपं यत्र न विद्यते’ असा नञबहुव्रीहि समासाचा विग्रह केल्यास, योग्यतारहित असा अर्थ होतो, योग्यता म्हणजे,
‘हे योग्य आहे’ अशा लोकांतील व्यवहाराला विषय होणें. वर सांगितलेला संबंध (म्ह० ओग्यतासंबंध) दोन प्रकारचा असतो. (१) उत्पत्तिरूप संबंध व (२) संयोगरूप संबंध; पैकीं (१) उत्पत्तिरूप संबंधाची अयोग्यता हीं, कारणाच्या स्वत:च्या गुणाहून विलक्षण म्हणजे निराळ्या गुणानें युक्त अशा कार्याची उत्पत्ति झाल्यानें व (२) हें इष्टसाधन आहे म्हणून निश्चित केलेल्या कारणापासून अनिष्ट कार्याची उत्पत्ति झाल्यानें, संयोगरूपी संबंधाची अयोग्यता सिद्ध होते. वरील प्रत्येक संबंधांतील जे दोन संबंधी, त्यांच्यापैकीं एकाच्या गुणाला अथवा स्वरूपाला झाकून टाकणारे, दुसर्या संबंधीचे गुण अथवा स्वरूप असेल तर, त्या ठिकाणीं संबंधाचें अयोग्यत्व आहे असें समजावें. अशा रीतीनें, अयोग्यसंबंध या सामान्य द्दष्टीनें सांगितलेले व पुढें सांगितले जाणारे सर्व (विशिष्ट) प्रकार या विषय अलंकारांत अंतर्भूत होतात.
क्रमानें उदाहरणें :---
‘अमृताच्या लाटाटा, चंद्राचें चांदणें, लक्ष्मीचें वदनकमल इत्यादिकांना फिक्के पाडणार्या, व अमर्थाद कृपेचा महासागर अशा, तुझ्यापासून, हे राजा ! हा अत्यंत उग्र व कल्पांतीच्या अग्नीच्या ज्वाळांच्या जाळ्यानें भरून गेलेला असा हा तेजाचा लोळ, कसा उदय पावला बरें ?’
ह्या ठिकाणीं माधुर्य, शीतलपणा, आल्हादकत्व, प्रसन्नता इत्यादि अनेकगुणयुक्त कारणापासून, त्या गुणांच्या विरुद्ध गुणांनीं युक्त अशा प्रतापाची उत्पत्ति होते म्हणून, अयोग्य असा कार्यकारणभाव येथें दिसून येतो. ह्या ठिकाणीं अभेदाध्यवसानरूप अतिशयानें प्रतापाचें समवायिकरण जो राजामधील असह्य तेजोगुण तद्रूपानें, प्रतापाचें निमित्तकारण जो माधुर्यादिगुणरूप राजा तो राहत असल्यानें (हा एक पक्ष); अथवा निमित्तकारण जो माधुर्यादिगुणयुक्त राजा, त्याचें कार्य जें प्रसन्नरमणीय दर्शन, तें प्रताप या समवेत कार्यरूपानें राहत असतां (हा दुसरा पक्ष), विषयरूप अंश (राजा हा विषयरूप अंश माधुर्यादिगुणयुक्त असा घेऊन पाहिलें असतां), विरोध (प्रथम) प्रतीत होतो खरा; पण नंतर तेजोगुणयुक्त राजा हा विषयीचा अंश ध्यानांत घेतां, (प्रथमप्रतीत, माधुर्य व उग्रप्रताप यांमधील) विरोध नाहींसा होतो. एवंच, प्रस्तुत श्लोकाच्या विषमरूप अर्थांत, अभेदाध्यवसाय अनुप्राणक म्ह० सहायक होतो; व त्या अभेदाध्यवसानामुळें उत्थापित झालेला विरोधही या विषमालंकाराचा परिपोष करतो. हाच अभेदाध्य्वसानरूप अंश कवीनें स्वत:च्या प्रतिभेनें निर्माण केला असल्यानें, तो ह्या अलंकाराचें बीज आहे.