अशारीतीनें इष्टाची अप्राप्ति व अनिष्टाची प्राप्ति या उभयानें होणारी जी संसर्गाची (संबंधाची) अयोग्यता ती सामान्यरीतीनें सांगितली. पूर्वीं सांगितलेल्या चार प्रकारच्या इष्टाच्या अप्राप्तीचें, पूर्वीं सांगितलेल्या तीन प्रकारच्या अनिष्टाशीं मिश्रण केलें असतां, त्याचे बारा प्रकार होतात. पैकीं स्वत:च्या सुखसाधनरूप वस्तूची अप्राप्ति व दु:खदायक वस्तूची प्राप्ति या दोन्हीमुळें होणारा विषमाचा प्रकार वर उदाहरण देऊन सांगितला.
आतां स्वत:ला दु:खसाधन म्हणून वाटणार्या वस्तूची निवृत्ति न होणें, व दुसर्या प्रकारच्या दु:खाला कारण होणार्या वस्तूची प्राप्ति होणें, या दोन कोटींनीं होणार्या विषमाचें उदाहरण हें :---
‘रूपाविषयी (रूपय्क्त म्ह० सर्व द्दश्य पदार्थांविषयीं) वाटणारी अरुचि नाहींशीं करण्याकरतां श्रीहरीच्या मुखरूपी चंद्राच्या लावण्याचें रसपूर्वक सेवन करणार्या सुंदरीच्या मनांत हरहर ! स्वत:च्या शरीरासकट सर्व जगाविषयी अरुचि उत्पन्न झाली.’
ह्या ठिकाणीं, ब्रम्हासाक्षात्कार झाल्यानंतर, सर्व जगाविषयाचा वैराग्यरूप अरुचि (नावड) उत्पन्न झाली असूनही, (ओंगळ दिसणार्या पदार्थाविषयीं वाटणारी) अगदी निराळ्या प्रकारची विशिष्ट अरुचि (नावड) श्रीहरीच्या मुखाच्या लावण्याला पाहून नाहींशीं झाली, असें म्हणणें शक्य आहे. (म्ह० रूपाविषयींची अरूचि म्ह० तुच्छता नाहींशीं होण्याकरतां गोपीनें श्रीहरीच्या अत्यंत कमनीय मुखाकडे पाहिलें आणि त्यामुळें जगांत सर्वत्र ओंगळ पदार्थच आहेत असें वाटून तिला जी प्रथम अरुचि वाटत होती ती नाहींशी झाली, असें म्हणणें शक्य आहे, व त्या द्दष्टीनें, प्रस्तुत आर्येच्या उत्तरार्धांतील ‘तरीसुद्धां जगाविषयींची अरुचि कायम राहिली’ हें विधान असंगत वाटणें शक्य आहे.) तथापि, जगाविषयींचि वैराग्यरूप अरुचि व सकलद्दश्य पदार्थाविषयीं वाटणारी तुच्छतारूप अरुचि, या दोन अरुचींचा अभेदाध्यवसाय मानल्यास, श्रीहरीचें मुख पाहूनही गोपीची अरुचि कायम राहिली, असा अर्थ होऊन, हें विषमालंकाराचें उदाहरण होईल. पण असें न मानलें तर, वैराग्यरूप (सुखरूप) अरुचि दुसर्या एका दु:खाला कारण झाली, असा (विषमालंकाराला अनुकूल) अर्थ, या आर्येंतून काढणें कठिण होईल; म्हणून दोन अरुचींचा अभेदाध्यवसाय मानून हें वर सांगितल्याप्रमाणें उभयविध विषमाचें उदाहरण समजावें.
शत्रूला दु:खसाधन वाटणारी वस्तु त्याला प्राप्त न होणें, व स्वत:च्या दुसर्या एका दु:खाला कारण होणार्या वस्तूची प्राप्ति स्वत:ला होणें, अशा दुहेरी विषमाच्या प्रकाराचें उदाहरण हें :---
“माझ्यासमोर प्रत्यक्ष भगवान शंकार आले तरी, त्यांच्यावर मी शरसंधान करीन, अशी स्वत:च्या भुजबलाची प्रौढि, गालावर रोमांच उभे राहिले आहेत अशारीतीनें, देवांच्यासमोर घोषिट करणार्या मदनाचे, देवांगनांच्या डोळ्यांच्या पुष्पमालेनें पूजिलेलें शरीर, अहो, काय आश्चर्य सांगावें, एकदम शंकराच्या कपाळावरील अग्नीनें भस्म होऊन गेलें.”