केवळ अनिष्टाच्या प्राप्तीचें उदाहरण :---
“डोळे मिटून, स्वत:चें गंडस्थळ, एका विषारी झाडाच्या बुंध्यावर खाजवीत असतां (एका) हत्तीचा देह, एकाएकीं उत्पन्न होणार्या आगीच्या डोबांनीं व्याकुळ झाला.”
ह्या ठिकाणीं इष्टाप्राप्ति नाहीं, (म्ह० इष्टप्राप्ति तर आहे) कारण, ‘डोळे मिटून’ या श्लोकांतील शब्दांनीं, गंडस्थळ खाजविण्याचें सुख हत्तीला होत होतें (असें स्पष्ट दिसतें). पण त्याला केवळ अनिष्टाची प्राप्तीच झालेली आहे. या अनिष्टप्राप्तीचे दोन भेद, योग्य प्रकारें स्वत: शोधून काढावें. ग्रंथाचा विस्तार होईल या भीतीनें येथें त्यांचीं उदाहरणें देत नाहीं. इष्टसाधन म्हणून निश्चित असलेल्या कारणापासून अनिष्ट कार्याची प्राप्ति होणें, ह्याचे होणारे वरील प्रकार, पुढें येणार्या विषादन अलंकाराशीं मिश्रित असेच असतात, हे त्या अलंकाराच्या प्रकरणांत आम्ही सांगणारच आहोंत.
आतां ‘अनिष्टस्याप्यवाप्तिश्च तदिष्टार्थसमुद्यमात्’ असें विषमाच्या प्रकारांचें लक्षण निर्माण करून, त्याचा (आपल्याला इष्ट वाटणारा) अर्थ अप्पय्यदीक्षितांनीं खालीलप्रमाणें केला आहे - (इष्ट वस्तूविषयीं प्रयत्व करीत असतां त्यापासून इष्ट तर मिळतच नाहीं, उलट अनिष्टाची प्राप्ति होते, हा त्यांच्या लक्षणाचा शब्दश: अर्थ). ‘या आमच्या लक्षणांतील ‘अपि’ शब्दानें हातीं येणार्या इष्टाच्या अप्राप्तीचाही समावेश करून, त्या प्रत्येकाचा विषम पदार्थाशीं अन्वय करावा. [म्हणजे (१) इष्टाची अप्राप्ति हा एक प्रकार (२) अनिष्टाची प्राप्ति हा दुसरा प्रकार व (३) इष्टाची अप्राप्ति व अनिष्टाची प्राप्ति मिळून तिसरा प्रकार असे तीन प्रकार होतील] असें जे कुवल्यानंदकाराम्नीं म्हटलें आहे तें चुकीचें आहे. कारण वरील लक्षणांत व्युत्पत्तीचा अभाव दिसून येतो. ‘ह्या गांवांत, देवदत्ताला द्रव्याचाही लाभ आहे,’ ह्या वाक्यांत, द्रव्य शब्दापुढें आलेल्या अपि शब्दानें संगृहीत केलेल्या विद्या वगैरेंचा, द्रव्याचा ज्याच्याशीं (म्ह० ज्या लाभपदाशीं) अन्वय आहे, त्या लाभपदाशीं अन्वय होतो. (अपि शब्दानें सुचविल्या जाणार्या विद्या वगैरेंचाही लाभपदाशीं अन्वय होणारच.) म्हणून, ‘देवदत्ताला द्रव्याचा लाभ होतो व विद्येचाही लाभ होतो” असा या वाक्याचा अर्थ प्रतीत होतो, हें निर्विवाद आहे. आतां विषमाच्या प्रकृत लक्षणवाक्यांतही अनिष्ट शब्दाचा (म्ह० शब्दार्थाचा) अवाप्ति या शब्दाशीं (म्ह० आप या धातूच्या अर्थाशीं) अन्वय झाला आह; आणि लक्षणांतील तत् शब्दानें दर्शविलेल्या विषम अलंकाराशीं इष्टानवाप्तीचा अन्वय झाला आहे, असा ‘द्रव्यस्यापि०’ या वाक्यांत व ‘अनिष्टस्या०’ या वाक्यांत निराळेपणा (अन्वयाच्या द्दष्टीनें) आहे. इतकेंच नव्हेंतर उलट, लक्षणवाक्यांतील अपि शब्द विपरीत अर्थ सुचवितो; कारण ‘अनिष्टस्य अपि अवाप्ति:’ या शब्दांतून ‘इष्टाची पण अवाप्ति’ असा उलटा अर्थ प्रतीत होतो. आतां च नें (म्ह० च या मुळांतील शब्दाच्या अर्थानें) संगृहीत होणार्या ‘इष्टाच्या अप्राप्तीचा’ अनिष्टप्राप्तीशीं एकदां संबंध जोडून, त्याचा तत् शब्दानें सुचवलेल्या विषमाशीं अन्वय केल्यानें एका प्रकार, व इष्टाची अप्राप्ति व अनिष्टाची प्राप्ति असे, याच वाक्याची आवृत्ति करून होणारा अन्वय दोन वेळां केल्यानें होणारे दोन प्रकार, मिळून विषमाचे तीन प्रकार येथें होतीलही; पण ते अपि शब्दाच्या जोरावर आम्ही सुचवले आहेत, अशी बढाई मारू नका. आतां, विषमाचें म्हणून, त्यांनींच पुढील उदाहरण दिलें आहे - ‘भक्ष्याशयाऽहिमज्जूषां दष्टवाऽखुस्तेन भक्षित:’ (खायला मिळेल या आशेनें एका उंदरानें सापाची करंडी कुरतडली, व त्यांतून सापानें बाहेर येऊन त्या उंदराला गट्ट केलें). या ठिकणीं दष्टवा यांतील ‘त्वा’ प्रत्ययाची प्रकृति जी दंशनक्रिया तिच्या कर्त्यानेंच पुढें सांगितलेली दुसरी क्रिया केली असली पाहिजे. (असा नियम आहे); परंतु त्या दुसर्या क्रियेचा प्रयोग येथें नाहीं; व ती दुसरी क्रिया सूचितही होत नाहीं. म्हणून ‘प्रविष्ट:’ हें पद येथें अवश्य पाहिजे होतें; पण तें ह्या श्लोकांत नसल्यामुळें न्य़ूनपदत्व (म्ह० एक पद कमी पडणें) हा यांत दोष आहे.