आतां दीक्षितांनीं ‘केवळ इष्टाची प्राप्ति न होणें’ याचेंजें उदाहरण दिलें आहे तें असें :---
“तूं थकला आहेस; सोडून दे आतां या पर्वताला; आतां आम्ही उचलून धरतों याला, असें ते गोप बोलत असतां, श्रीकृष्णानें (गोवर्धनाखालीं असलेला) आपला हात जरा ढिला केला; त्यामुळें गोवर्धनाच्या भारानें त्या गोपांचे वर उचललेले हात वाकू लागले; तें पाहून हसणार्या श्रीकृष्णाचा जयजयकार.” हेंही उदाहरण बरोबर नाहीं. कारण. गोवर्धनाच्या भारानें त्यांचे हात वाकले असें म्हटल्यानें, त्या गोपाच्या हातांतल्या हाडांचे सांधे मोडले हें अनिष्टच झालें व तें साक्षात् शब्दानें सांगितलें आहे. त्याचप्रमाणें, त्यांचे सर्व अंग खिळखिळें झालें, व त्यांचा गर्व पार उतरला, हीं दोन्ही अनिष्टेंही येथें सुचविलीं आहेत, म्हणून येथें अनिष्टाची प्राप्तीही घेतलीच पाहिजे. मग ह्या ठिकाणीं केवळ इष्टाची अप्राप्तीच आहे, असें तुम्ही कसें म्हणतां ? वरील विवेचनावरून, ‘गोवर्धन डोक्यावर पडणें ही अनिष्टाची प्राप्ति, भगवान् श्रीकृष्णाच्या करकमलाच्या स्पर्शाच्या म्हात्म्यामुळें समजून आली नाहीं,’ असें जें कुवलयानंदकारांनीं म्हटलें आहे, त्यांतही राम नाहीं. कारण या श्लोकांत प्रतीत होणारी अनिष्टांची प्राप्ति आम्ही वर सांगितलीच आहे.
अशारीतीनें, उत्पत्तिरूप संबंधाची अयोग्यता येथपर्यंत उदाहरणांनीं सांगितली. आतां संयोग वगैरे संबंधांच्या अयोग्यतेचें उदाहरण हें :---
“रानांत खेळत असतां सशाचें पिल्लु पाहून घाबरुन गेल्यानें भयहरण करणार्या नवर्याच्या हाताचा जी एकदम आश्रय करीत असे, ती ही सीता, शिव ! शिव ! आज ज्यांच्या कानावरून हाडांच्या कवटयांचीं टोकें लोंबत आहेत, अशा तरुण राक्षसिणींनीं वेढलेली अशी राहत आहे. (हें केवढें आश्चर्य ?)”
या ठिकाणीं पतिव्रता स्त्रियांचा शिखामणी (म्ह० श्रेष्ठ) जी रामाची धर्मपत्नी सीता, तिचा प्रभाव अत्यंत थोर असल्यानें, तिचा राक्षसींकडून नाश होणें शक्य नसलें तरी, (व या द्दष्टीनें हा विषमालंकार होत नसला तरी), राक्षसाकडून नाश होण्याची ज्यांची योग्यता आहे अशा मनुष्यत्व धर्मानें युक्त मनुष्याच्या जातींत सीतेच्या जन्म झाल्यामुळें, तीही मनुष्यजातीचीच आहे; या द्दष्टीनें, तिच्या शरीराचा, व राक्षसांच्या दर्शनानें तिचें सौंदर्य, नाजुकपणा वगैरे गुणांचा, नाश होणें शक्य असल्यामुळें (सीता व राक्षसिणी या) विरुद्ध प्रकारच्या दोन व्यक्तींचा एकत्र संयोग होणें या प्रकारानें येथील संबंध अननुरूपच (म्ह० अयोग्यच) आहे. (या द्दष्टीनें येथें विषमालंकार जुळतो).
येथें एक शंका अशीं कींम ‘कुठे शिंपा आणि कुठें मोती, कुठें चिखल आणि कुठें कमळ, कुठें हरिणें व कुठें कस्तुरी, विधात्याच्या शहाणपणाला धिक्कार असो. (शिंपा व मोती या एकमेकांना न शोभणार्या वस्तु एकत्र आणणार्या विधात्याच्या अकलेचें दिवाळेंच निघालें म्हणायचें.)’