रूपक - शेत

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


१.
संसार शेत सुलभ थोर भूमी वाहिलीं नवही द्वारें । पांचही आउतें मेळवुनी तेथें जुंपियेली दोन्ही ढोरें ।
उखीतें करी येति जाती भारि नव्हती कोण्हि स्थिरें । बुनादि शेत वाहिलें तें काय सांगूं अपाररे ॥१॥
संसार शेत करि कांरे आल्या देहाचिया लाहे परि । भक्ति उंच माळा उभा राहुनि हरिनाम सोंकरिरे ॥२॥
हरिश्चंद्र राजा सात्विक भला तेणें बाहो केला । सत्त्व नांगर त्रिगुण तिफणि निर्वाण कुळव धरिला ।
भक्ति कुर्‍हीवरी उभा राहूनियां बहुत भाग्य पिकला । खळेदाणे तेणें दिधले ब्राम्हण युगायुगीं तरलारे ॥३॥
शिराळ शेटी कुळवाडी मोठा बहु सोसियेल्या वेठी । आलिया गेलिया जेववी राड भक्ता देतो थोर सृष्टी ।
भला म्हणोनि जगीं वाखाणिला देव आला त्याचे भेटी । मुक्ति शेत तया इनाम दिधला ठाव दिला वैकुंठीं ॥४॥
रावणाचें शेत चवदा चाहुर दाटल्या दुर्बुद्धी पेढी । गर्व अहंकार दाट खुंट झाडें शेत आलें तेणें पडी ।
किडा मुळिंजो बैसला बीज गेलें तेणें वोढी । बटकर बाण अंगीं जो सेकला तोही झाला देशधडीरे ॥५॥
अवघी कुळवाडी कौरवें केली नाटोपेचि दुर्योधन । अर्ध वांटेकरी धर्म दुराविला शेतासि नाहीं रक्षण ।
अधर्म टोळीं शेत जें खादलें बिज गेलें चौपट होऊन । हरिभक्तिविण फलकट जालें न जोडे कृष्ण निधानरे ॥६॥
पांचही पांडवीं नवाट काढिलें वाहिलें सद्वैत वन । निरंजन वन शेत जें पिकलें आपण कृष्ण रक्षण ।
द्रौपदी सुंदरी डाहोरा जो केला दुर्वासा दिधलें भोजन । अनंत खंडी सांजे जे पिकली जोडलें कृष्ण निधानरे ॥७॥
ज्ञानदेव चांगदेव वटेश्वर निवृत्ति मुक्ताई सोपानदास । परसाभागवत सांवता सालया रसाळ चोखा मुधेश ।
परमानंद जोगाजनमित्र नागा गोरा दागा कूर्मदास । इतुके शेतकरी त्यांचा अंगेवाटे करी नामा विष्णुदासरे ॥८॥
२.
याहो क्षेत्र केलें जुंपिलीं आउतें । अठारा धान्यें तेथें पेरियेलीं ॥१॥
मेघ:शाम मेघ वर्षें सर्वा धारीं । बीज विटेवरी सिन्नलें ॥२॥
जगाचें जीवन पंढरी पिकली । चराया सोकलीं भुतें जाणा ॥३॥
घालूनियां माळा रक्षी कळिकाळा । काय कलिमळा संसाराची ॥४॥
पापा सोंकरणें भक्ति हे गोफण । भूस सांडी कण वेंचिताती ॥५॥
वेदशास्त्र ऐसे बोल बोलविता । गूढ वेगळितां लाभ हेती ॥६॥
नामा म्हणे स्वामि विठ्ठल सुकाळ । अन्न ब्रम्हा फळ त्रिभुवनीं ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : January 15, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP