रूपक - हरिजागर
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
कैलास भुवनीं । देव वैसले सिंहासनीं । आपण भवानी । कर जोडुनी उभी असे ॥१॥
भक्तिरस द्यावा । तेथील अनुभव ध्यावा । नित्य हरिजागरू सांगावा । कोण फळ तयाचें ॥२॥
तंव चंद्रचूड संतोषला । देवी प्रश्न बरवा केला । अमृतवोघ प्रचर्तला । दुजें बोलती व्यापकें ॥३॥
या हरिजागराचें फळ । तुज सांगेन सोज्वळ । महादेव ऐसें बोलिले । प्रेमभावें गिरजेसी ॥४॥
परिसा हरिजागरू । गिरजेसी सांगे महेश्वरू । नवविधा भक्तीचा प्रकारू । शिवतत्त्वीं बोलतों ॥५॥
प्रथम अश्विनीचा भरू । पूर्ण तिथि जी शंकरू । करुनी व्रतांचा स्वीकारू । मास दीनपर्यंत ॥६॥
मग मिळोनि संतसज्जन । करावें हरिजागरण । गीतवाद्य सुलक्षण । नृत्य विलास तांडव ॥७॥
मग सारोनि देवासी मार्जन । वरी गंगोदकें स्नान । मग वस्त्रें परिधान । देवासी करावीं ॥८॥
यज्ञोपवीत अलंकार । करोनि पूजा नमस्कार । आणि नैवेद्य नानाप्रकार । भगवंतासी अर्पावा ॥९॥
सद्यस्तृप्त घृत पूर्ण । वरी षड्रस पक्कान्न । भावें सर्वांसी पूजोन । नमस्कार भावें करावा ॥१०॥
मग करावी वैष्णवांची पूजा । मनीं भाव न धरावा दुजा । स्वयंभ मूर्ति मीच सहजा । सदा संतां जवळिकें ॥११॥
संत मार्जनादि भेदू । जेंवी मिळणी गंगासिंधू । अखंड वाचे परमानंदू । हरिकीर्तन करावें ॥१२॥
त्या हरिजागराचें महिमान । दुजें नाहीं समाधान । सकळ तीर्थ केलिया पुण्य । परी सरी न पवशी ॥१३॥
सकळ तीर्थांची परवडी । दान देतां पृथ्वी थोकडी । या हरीजागराची प्रौढी । ते तयाहूनि अधिक ॥१४॥
पहिले पक्षीं मज अर्पिला । दावा विष्णु थोर झाला । दुजा पक्षु सांगाजी वहिला । म्हणोनि नमस्कारिलें शंकराशी ॥१५॥
परिसे गिरिजे देवी । कथा सांगेन बरवी । फळ पावती मानवी । अंत:करणीं कल्पिलें ॥१६॥
दुजा पक्षु प्रथम तिथी । वैश्वानरेसी प्रीत्यर्थीं । बीज ब्रम्हया सांगती । ऋषीसहित उपचारू ॥१७॥
पंचमी अष्ट्मी नागकुळा । शेषादिका सकळां । प्रीत्यर्थ पावो नागकुळा । षष्ठी स्वामी कार्तिक ॥१८॥
भानु सप्तमीं जागरीं । जैसा समुद्र सरिता सागरीं । अष्टमीची अवधारीं । माझारीं मृत्युलोक ॥१९॥
नवमीच षष्ठी योगिनी । आणि चार कोटी कात्यायनी । दुर्गेसहित भवानी । दशमी यम पवित्र गुणी ॥२०॥
तेहतीस कोटी एकादशी । ब्रह्मा हरिहर वोरसी । नंदी धेनु तेरेसी । आणि चतुर्दशी परियसा ॥२१॥
पौर्णिमा चंद्रतारा । इंद्रादिकां देवां सकळां । इत्यर्थ पावो देवां सकळां । जे बोलिया वेदश्रुति ॥२२॥
संतोषोनिय यमापती । ऐसें पुराणें बोलती । या हरिजागराची स्थिती । तुजप्रति सांगितली ॥२३॥
हें सकळ मीच भोक्ता । येर परिवार देवता । भ्रांति मीच भाविता । भावेंविण न कळे मी ॥२४॥
जेथें भाव तेथें देवो । आन न धरावा संदेहो । विश्वसृष्टी एकचि पहा हो । तरी मी असें जवळीकें ॥२५॥
विष्णुदास नामयासी । हरिचें नाम सदा मानसीं । राम हा मंत्र उपदेशी । भवसागर तरावया ॥२६॥
N/A
References : N/A
Last Updated : January 15, 2015
TOP