करुणा - अभंग ९ ते १२
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
९.
अगा रुक्मिणीनायका । सुरा असुरा प्रिय लोकां ॥१॥
ते तूं धांवें माझे आई । सखे साजणी विठाबाई ॥२॥
अगा शिवाचिया जपा । मदन ताता निष्पापा ॥३॥
आपुली म्हणवुनी । अपंगावी दासी जनी ॥४॥
१०.
नाहीं केली तुझी सेवा । दु:ख वाटतसे माझे जिवा ॥१॥
नष्ट पापीण मी हीन । नाहीं केलें तुझें ध्यान ॥२॥
जें जें दु:ख झालें मला । तें त्वां सोसिलें विठ्ठला ॥३॥
रात्रंदिवस मजपाशीं । दळूं कांडूं लागलासी ॥४॥
क्षमा करावी देवराया । दासी जनी लागे पायां ॥५॥
११.
येरे येरे माझ्या रामा । मनमोहन मेघ:श्यामा ॥१॥
संतमिसें भेटी । देईं देईं कृपा गोष्टी ॥२॥
आमची चुकवी जन्मव्याधी । आम्हां देईं हो समाधी ॥३॥
जनी म्हणे चक्रपाणी । करीं ऐसी हो करणी ॥४॥
१२.
अहो नारायणा । मजवरी कृपा कां कराना ॥१॥
मी तो अज्ञानाची राशी । म्हणोन आलें पायांपाशीं ॥२॥
जनी म्हणे आतां । मज सोडवीं कृपावंता ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : January 24, 2015
TOP