असंगृहीत कविता - पहिला पाऊस
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
[ वृत्त : वधूवल्ली ]
भिरभिर वारा नाचत आला,
धूळ उधळली दिशादिशांला
गुदमरला जिव, व्याकुळ झाला
रंग गगनाला ये धूसर, धूमल, काळा. १
कृष्णवीर दक्खनचे चढले,
क्षेत्र व्यापुन व्यूढ जाहले,
टणात्कार मग होऊं लागले,
तरू रे श्याम लागले डोलुं बेफ़ाम. २
म्लान तप्त थकलेली अवनी
क्लेश उमटले तिचिया वदनीं
डोळे लावुन वरती गगनीं
पडली अबला सांगेल दुक्ख कवणाला ? ३
गगनश्रीला थोर उमाळा
आईच्या प्रेमाचा आला,
कण्ठ दाटला, ऊर दाटला,
पोटचा गोळा ! मग जिता असाच जिव्हाळा. ४
सुवास वत्सलतेचा सुटला,
दिरंग कुठला ? पान्हा फ़ुटला--
पाऊस पीयूषाचा पडला
गढुळ जळपाट लागती वाहुं सैराट. ५
ढगछत झालें विरल जरासें,
आडुन गगनश्रीचें हांसें
ममता उधळित विलसे खासें
तजेला आला पृथिवीच्या क्लान्त मुखाला. ६
नवबाल्याचें कुतुक उगवलें,
गतकाल स्मृतिचित्र पुसटलें,
अनघ बाल-मन गाऊं लागलें,
ये रे पावसा ! देईन तुला मी पैसा ! ७
१५ जून १९१२ ( १९१५ ? )
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP