असंगृहीत कविता - प्रेम आणि आशा
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
आपुले प्रेम सम्भवलें
आशेस पंख पालवले तेधवां. १
चिमुकले पंख मेणाचे
हलवीत उडे वा नाचे पांखरूं. २
कल्पनाप्रवाहासंगे
नव उत्साहीं ती रंगे गुंगुनी. ३
धिक्कारुनि भूमितलाला,
हिणवूनि दीन शल्याला वर चढे ४
प्रत्यक्ष रवीचा ताप
लागतांच आपोआप पंख ते ५
वितळूनी पडली खाली,
खडकावर रुधिरीं न्हाली आस ती ! ६
तो झाला थोर अनर्थ
मरणाची इच्छा व्यर्थ मग तिची; ७
तिजविना प्रेम परि दुबळें
जोरांत कधीहि न उफ़ळे हृत्सरीं. ८
१७ फ़ेब्रुवारी १९१३
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP