योगसंग्राम - प्रास्ताविक ९
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
आचार देहाचे व विचार मनाचे; हेच विशेषतः ‘आत्म्या’ला जसे नागवतात तसेच मुक्ततेसहि कारणीभूत होतात. शेख महंमदांनी याचा चौथ्या प्रसंगांत व इतरत्रहि विस्तार केला आहे. ते लिहितातः
‘‘पाप आचारितां होय नरिये जोडी । अनेक दुःखे भोगिती आत्माकुडी। तें सांगो आरंभिली परवडी। उन्मत्त निववावया ॥२३॥...
पहा कसें बावन कसी सोनें। नग करितां डांके झालें उणें । तैसा तुम्ही आत्मा वोळखा खुणें । देहासंगें हीन झाला ॥२५॥
हे स्थूल देहाचेनि संगती जाण। अनेक अनेक पापें करी गहन । भावें आठवेचिना निर्गुण । भ्रमण करीतसे ॥२६॥
आतां पापाचा कंटाळा धरावा । क्षमा दया शांति सद्गुरु आराधावा । द्वैतें द्वैताचा ठाव पुसावा । चित्तापासूननियां ॥२७॥.....
तैसा जीव दुःख भोगी सावकाश । हे कुडीचेनि संगे ॥३०॥
तैसी विषयांची भरउभरी जाणा । अंतकाळीं दुःख भोगी आत्माराणा। यालागीं धरूनी अकराव्या श्रेष्ठ मना । वरी बैसावें ॥३१॥...
वोळखा विषयांचे मारे । देहसंगें आत्म्यासी ॥३२॥’’.
शेख महंमदानें शिष्याशिष्य लक्षणांत देहाचे कोणते आचार आत्म्याच्या मुक्ततेस पोषक व कोणते मारक याचा सविस्तर विचार सांगितला आहे. त्याचप्रमाणें दुकाळे गुरु व सद्गुरु, साधु व भोंदू यांची लक्षणे सांगतांना व तसेंच संन्यासी, फकीर, जंगम वगैरेंबद्दल विवरण करतांना कोणत्या वृत्ति प्रवृत्ति चांगल्या व कोणत्या नाशकारक यांचेंहि दिग्दर्शन केले आहे. शब्दमहिमा विस्तृतपणें वर्णिला आहे. त्यांतहि वाणीच्या शुद्धाशुद्धतेचे बरेवाईट परिणाम सांगितलें आहेत प्रकृतिपुरुष लक्षणांत शेख महंमद लिहितातः
‘‘जैसी लहरी आवरेचि ना समुदा। तैसी कृति आवरेचि ना चतुरां । नेऊनि आदळली अशुभ अनाचारा । परतोनि पस्ताविले ॥१०४॥
स्थूळ देहाच्या जाचणीबद्दल विवरण करतांना गर्भवास, बाळपण, तारुण्य व वृद्धावस्था या चारीहि अवस्थेंतील आचारविचारांमुळे उत्पन्न होणार्या भवयातनाहि विस्तारानें सांगितल्या आहेत. पिंगळेच्या दृष्टांतानें बाह्य देहशुद्धीपेक्षां मनशुद्धीच श्रेष्ठ याची साक्ष पटविली आहे. तसेच अभक्त व अभावाबरोबर काम्य भावापासूनहि देहाची जाचणी कशी होते याचेंहि विस्तृत विवरण आहे. ही सारी अविद्येचीं लक्षणे मार्गभ्रष्ट करण्यास कशीं मदत करतात हेंहि स्पष्ट दाखविलें आहे. सारांश, हा आचारविचाराचा भाग शेख महंमदांनीं विषयानुरोधानें पुष्कळच विस्तारानें मांडला आहे. त्याची येथें पुनरावृत्ति करित नाही. वाचकांनीं तो त्यांच्याच ग्रंथांतून पाहावा हे बरे. असो. विषयेंद्रियें व अविद्या यांपासून उत्पन्न होणार्या दुःखांतून मुक्ततेची आवश्यकता भासते. त्या मुक्ततेच्या मार्गाबद्दल सद्गुरूंचे मार्गदर्शन हा उपाय मुख्यता प्रतिपादला आहेच. त्यांतील गुरूच्या मार्गदर्शनांतील थोडासा भाग येथे उद्धृत करतो. शेख महंमद लिहितातः
‘‘कांही न करितां साधी उपाधि । निवांत राहे सहज समाधि । ऐसी सांगावी जी मजला बुद्धि । सद्गुरु कृपा करूनी ॥२१॥
आतां सद्गुरुराज स्वयें बोलती । बापा जे जे उठेल वृत्ति । ते जेथील तेथें धरावी निरुती । उमटे उमटे तोवरी ॥२२॥’’.
तसेंच ते पुढें मनाच्या अनावरपणाबद्दल तक्रार करतात की,
‘‘दहा सहस्र तोंडांचें मन । तें मजला न होयचि जतन । आतां सांगावा जी सद्गुरु प्रयत्न । मन आवरे ऐसा ॥२५॥
चंचळ मन वासना कल्पना । हें मज थोर अरिष्ठ गा निर्गुणा । यावेगळें करी भवछेदना । आपुलिया सत्तामात्रें ॥२६॥
सद्गुरु म्हणती ऐक शिष्या उत्तर । मन हैंचि की सर्वांचे सार । या मनेंचि होईंजे उदार धीर । ईश्र्वरभजनालागी ॥२७॥
पाहातां मन मर्कटोन्मत्त हस्ती । विषयासंगे लागलिया करी मस्ती । मुरडोनि लाविल्या सद्गुरुचे भक्ति । सायोज्यता प्राप्त होय ॥२८॥
सद्गुरु म्हणती ऐके प्रौढी । मनेंचि होईजे ईश्र्वराची जोडी । मनेंचि भोगिजेती नरकाच्या कोडी ॥ भ्रष्ट झालियां मन ॥२९॥
न कळतां या मनाचें श्रेष्ठ वर्म । म्हणती मन हेंचि कर्म अधर्म । गुह्य कळल्या मन साधी परब्रह्म । पहा दिसत असे ॥३०॥’’.
मनाच्या व्यापारांत अहंकार हा मोठाच शत्रू होय. परंतु त्यांतील जाणिवेचा अहंकार हा अधिकच नाशदायक होय. अविद्येपासून उद्भवणारी वासना व विकल्प हींहि तितकींच तापदायक होत. अहंकारानें आत्मज्ञानाची नागवण होते तर वासना व विकल्प आत्म्याचाच विस्मर पाडतात. सारांश, ज्यांनी मनाच्या वृत्तिप्रवृत्तींचा निरोध केला, प्रवृत्तीला ताब्यांत ठेवली व वासना अहंकाराचें दमन केले त्यांचेच आचार विचार शुद्ध राहातात व तेच मुमुक्ष योगसंग्रामासाठी शत्रूची हेरी करण्यास व सद्गुरूचें मार्गदश्रन मिळविण्यास योग्य होतात.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP