योगसंग्राम - प्रास्‍ताविक १०

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


‘‘पंच महाभूतें सबळ सगुण। त्‍यांचे पंचविस गुण विकारण । त्‍यामाजी शक्ति घेती अवतरण । कल्‍पनेसंगे ॥३॥...
तत्त्वीं कैसा शक्तींचा मेळावा । भंगल्‍या कोणतीचा कोण बोलावा । होय स्‍वामिया ॥५॥
.....चिवट तंतुसुताचा गुंडाळा । आडवा उभा विणला परकळा । तैसा पांचा शक्तीचा एकवळा । महद्‌भूतें देखिला ॥१४॥
शक्ति पांच महद्‌भूतें जाण । ऐसी झालीं ईश्र्वरापासून । खेळ आरंभावयालागून । इच्छा इच्छियेली ॥१५॥’’.

याच पंचमा शक्ती राग, द्वेष, मद, मोह, मत्‍सर, कल्‍पना, विकल्‍प, संकल्‍प, वासना आदि खल प्रवृत्ती जागृत करून ‘आत्‍मा कुडी’ स विविध उपसर्ग देण्यास उद्युक्त करतात.  या पंचमा शक्तीचें रूप, लक्षण, प्रभावादीचें शेख महंमदानें निरनिराळ्या प्रसंगानुरोधानें बरेच विस्‍तारपूर्वक वर्णन केले आहे. ह्याच शक्ती आत्‍म्‍याच्या दुःखाला मूळकारण आहेत. या पंचमा शक्ती म्‍हणजे कृपा, चैतन्या, महदा, अविद्या व निद्रा ह्या होत. जो कृपेसंगें अवतरला तो सात्‍विक साधु झाला समजावे. स्‍वप्न, सुषुप्ति, तुरिया, जागृति-निजलेपण सावध करणें हे कृपेचें लक्षण होय. कृपाशक्तीचें रूप गोरें, महा सुंदर व गोजिरें, जशी काय सारजाच होऊन आत्‍मज्ञानाची नानापरीची चर्चाच करीत आहे असें जाणावें. शेख महंमद सांगतातः

‘‘कृपाशक्ति परा वाचा असे ।.....आत्‍मज्ञान कृपेचे आभास भासे ।’’.

दुसरी शक्ति चैतन्या.
जो इच्यासंगे अवतरतो तो ब्रह्मराक्षस पाखांड अनुवादास प्रवर्ततो. चैतन्या शक्ति चेतना करते.

शेख महंमद लिहितातः
‘‘चैतन्याची वैखरी दिसोनि न दिसे ।......चैतन्याची मध्यमा असे वाणी ।’’.

तिसरी शक्ति महदा.
हिच्यासंगे जन्मलेला प्राणी असुरकोटींतील, अपवित्र बाष्‍कळ व उग्र असतो. महदा रूपानें सांवळी व

‘मध्यमा’ (वाचा) महदेची विश्र्वास असे । जनामध्ये प्रसिद्ध ॥८८॥
(आत्‍मज्ञानाची) उचकी लागे महदेची घालणी । कृपा निवांत करी ॥९१॥’’.

चवथी शक्ति अविद्या.
हिचें वर्णन शेख महंमदांच्याच शब्‍दांत देतो.

‘‘अविद्येसंगें जो अवतरला । तो महा प्रचंड हिंसक झाला । कंटाळा न ये त्‍या दृष्‍टाला । विश्र्वासघात करितां ॥९४॥
अष्‍ट अंगीं क्रियानष्‍ट दोषी । जेथें जाय तेथें चांडाळ अपेशी । धिग झाले आवडे ना जनासी । फटमर म्‍हणती ॥९५॥’’....
राग हा अविद्येचा असे जाणें ।. अविद्या निजवितसे अघोरी । निद्रेच्या अंगसंगें ॥९१॥’’.
‘‘कष्‍ट बोलणे अविद्येचें मुख रुसे ।......अविद्या तान्हेली कृपा पाजी पाणी ।’’.

कृपा आणि अविद्येचा परस्‍पर विरोध दाखवितांना शेख महंमद लिहितातः

‘‘कृपेसंगें रामाचा अवतार । अविद्या प्रसवली तो दशशीर । तेणें चालविल वैराकार । रघुनाथासी ॥८२॥
कृपेसंगें कृष्‍ण अवतरले । कंस दुर्योधन अविद्येसी जाले । दावा धरूनि मृत्‍यूनें पावले । विरोधभक्तीनें ॥८३॥’’.

पांचवी शक्ति निद्रा.
    ‘निद्रा शक्ति महा काळी। या तिही शक्तीवरी जयेची धुमाळी । सुषुप्तींत गोजिरी होऊनि छळी । लिंगदेहसंगे ॥९२॥
.... सांगतो निद्राशक्तीचे घर त्रिकुटातळीचें असे विवर । तेथूनि लढती किन्नर । मदन चैतन्याचे ॥९४॥’.

परंतु कृपाशक्तीचा ज्‍याला आसरा आहे त्‍याला या निद्राशक्तीपासून ताप नाही.

‘लिंग निद्राशक्तीची पश्यंती । वाचा स्‍थूळ देहसंगे बरळती । हें तंव लहानथोरां प्रचिति । चर्माची म्‍हणोनियां ॥८९॥’.
निद्रा आणि अविद्येचे भांडण सतत चालूच असते. शेख महंमद सांगतात की, ‘‘जैसें श्र्वान भुंकतसे परक्‍यास । तैसे योगियानीं भुंकावें अविद्येस । परब्रह्मीं लावूनियां विश्र्वास । सर्वस्‍व समस्‍तेंसी ॥५४॥’’. सारांश, या पंचमा शक्तींनीं देहांतील भूतें पोसली जात असल्‍यानें त्‍यांच्याशी संग्राम करून त्‍यांना मारल्‍याशिवाय गत्‍यंतर नाहीं असें शेख महंमदास त्‍यांचे गुरु आज्ञापितांना सांगतात की,
‘‘तुझे शरीरी भूतांचा मेळा । ते तुज होऊं नेदी सोंवळा । त्‍यासी वोळखोनियां वेल्‍हाळा । श्रोत्‍यांसी नांवें सांगें ॥३६॥
नांवें सांगोनियां परोपरी । मग त्‍या भूतांचा संग्राम करी । तेव्हां तूं होशील अंबरीं । अविनाश तैसा ॥३७॥’’. अशा तर्‍हेनें

शत्रूसैन्याच्या बलाबलाची हेरी करून संग्रामाची तयारी केली. संग्रामाच्या कारणपरंपरेबद्दल व आवश्यकतेबद्दल शेख महंमद लिहितात की,

‘‘पांगुळका अष्‍टधा प्रकृति । ह्याच देवता माराव्या निगुति । तरीच लाधेल आत्‍मस्‍थिती । तत्त्व अनुभवाची ॥८४॥ अष्‍टधा प्रकृतीचीं नांवे । ते पुढिले प्रसंगी सांगेन स्‍वभावें । समस्‍त कुळीं सावध व्हावें । व्याकरणालागीं ॥८५॥
परोपरी सांगेन गुजभेद । ऐकतांच खंडेल अनुवाद । लागेल ब्रह्मसुखाचा भेद । भोळा भाव धरिलिया ॥८६॥
प्रबंध प्रकृतीची चिथावणी । सद्भाव धरूं नेदीत मनीं । अवगुण संचरे तत्‍क्षणीं । अहं विकाराचें ॥८७॥
अनंत तेतीस कोटी देवता । देहामध्यें वोळखे गुणवंता । त्‍या घात करितील स्‍वहिता । नरा नारी समस्‍तांच्या ॥८८॥
त्रिगुण भूतावळभ्‍चें शरीर । शुच करूं नेदीत कर्म आचार । ईश्र्वरभजनासहि अंतर । त्‍याच्यानि गुणें ॥८९॥
एक त्‍यजूनियां गृहास्‍थाश्रम । करूं पाहाती योगधर्म । चंचळ प्रकृतिचेनि श्रम । शीघ्र मांडियेले ॥९०॥
अंगसंगें अवगुण देवता । बाहेर निखंदती वाघा भूता । त्‍यांनीं घात केला स्‍वहिता । पढतमूर्ख बुद्धिहीन ॥९१॥
शरीर औट हात देव्हारा । तेथें देवता पातल्‍या अविचारा । ब्रह्मा विष्‍णु रुद्र साधकेश्र्वरा । नाडियले त्‍यांनीं ॥९२॥
आधीं सेवूनियां सद्‌गुरुराजा । देहामाजी क्षेत्र करावें बोजा । तें पुढें सांगेन भक्तिकाजा । शूरत्‍व श्रोत्‍यांप्रती ॥९३॥’’.


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP