योगसंग्राम - प्रास्ताविक ११
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
देहसंग्रामाचें भांडण आरंभण्यापूर्वी कोणती योगसिद्धी साधन करून मनाच्या चंचलतेला पायबध घालावा व अविद्येचा परिहार करावा हें शेख महंमदांनीं अगदीं तपशिलवार सांगितलें आहे. तसेंच मन स्थिर केल्यानंतर मनास त्रिवेणींत बसवण्यापर्यंतचा मार्ग यशस्वीपणें आक्रमतांच सहज समाधि कशी लागते याचें निवेदन केले आहे. यानंतर संग्रामास सुरूवात होते.
‘‘ऐसे हे मन चंचळ दारुण । होतें अहंकाराचें प्रधान । तें धरिलें स्वयें पाताऊन । सद्गुरुकृपेनें ॥९४॥
अष्टदळावरी होतें मन । औट औट पळे करी उड्डाण । त्याचें घोडें केले जाण । स्वार व्हावया ॥९५॥’’.
अशा तर्हेनें मन तेजियावर चित्त जिन घालून आत्मा राऊत विवेकें विवेकाचें तीर सोडित चालिला. तेथून पुन्हां शिवचक्रांत येऊन झुंजण्यास सुरूवात केली. प्रथम विकल्पाचा पाडाव केला. नंतर संकल्प पुढें आला त्याचा पाडाव केला. अहंकारहि मारला जातांच त्याचे काम क्रोध मद मत्सर हे वजिरहि मारले गेले. दंभ प्रपंच मोह या सरदारांचाहि नाश केला. तेव्हा अभाव स्वभाव हीं अहंकाराचीं श्र्वानें भुंकू लागली. त्यांना चुचकारून ईश्र्वराकडे पाठवून दिले. ईश्र्वर संतुष्ट झाले. अहंकाराचा शिलेदार अंगमोडा पुढें सरसावला. तेंव्हा त्याचा व नंतर दीपाचाहि पाडाव झाला. पुढें अहं सोऽहं व अहंकाराचा मेहुणा संताप शोक करूं लागले. तेव्हां अहंकाराची सासू सत्ता हिनें संतापास आत्म्याचा सूड घेण्यास प्रवृत्त केले. संताप व त्याचा पाठीराखा आळस हे दोघे गुणावगुणास बरोबर घेऊन रणांत उतरले. अहंकार मारला गेला तो ‘अग्निचक्र दिव्य दळ’ फितुर झाले म्हणून. तेव्हां त्यावर उपाय योजून हे स्वार पुढें येत आहेत हें जाणून आत्म्यानें मेघःश्यामाकडे मदत मागितली. तेव्हां खाशांचे हशम मदतीस आले. तेव्हां ‘क्षमा दया निज शांति। यावेगळ्या चारी मुक्ती शिवाय अष्टमा सिद्धी तोंडावर देऊन ‘आत्मनाथा’ नें आळसाचें कटक बुडविलें. तेव्हां संताप पळाला. परंतु त्यानें समरांत मदनहस्ती लोटून आत्म्यास कासावीस केले. त्याचवेळी चेतना हस्तिनी महाकुंटिण निद्राशक्ति याहि पुढें सरसावल्या. परंतु त्या सर्वांस ‘करार’ बाणानें विंधून टाकले. संतापहि धरणीवर पडला. तो म्हणो लागला.
‘‘मना आलें ज्याच्या हातां । त्यासी आमचें कांही न चले तत्त्वता । सद्गुरुपदीं बैसला तो ॥२०३॥’’. सर्व कटक पळून गेले. अहंकाराची माता महद्माया आक्रोश करू लागली. आशा, मनसा, कल्पना, तृष्णा या अहंकाराच्या स्त्रिया त्याहि सत्या गेल्या. शंका लज्जा या अहंकाराच्या बहिणी त्याहि रडत बसल्या. अहंकाराचे कारकून मान अपमान यांना मार दिला. अहंता ममता दोन वेश्या, गर्व कोतवाल, चिंता श्र्लाघ्यता पैंडारिणी या सर्वांची वाट लाविली.
‘‘ऐसे क्षेत्र केलें रहिरास । आत्मा राउता आलें यश । आतां गड घ्यावया सायास । आरंभिला ॥२३३॥
दीर्घ गड ब्रह्मांड शिखर । लाग नाहीं नेत्र फिरती गरगर । कडे कपाटैं चौफेर दिसे भयासूर । मन तेजी मागे सरे ॥२३॥’’.
मन तेजी दमला म्हणून,
‘‘उतरोन पाहिजे आसुदा केला । विशुद्ध कंठकमळीं ॥२३५॥
आत्मा विशुद्धा आला मुरडोनी । तेजी बांधिला अधिष्टानी । बोध-गुळाची चांचणी । चारून सावचित केला ॥२६६॥.’’
नंतर पुन्हा आत्मानाथ मन तेजियावर स्वार झाला. उर्ध्वगड न्याहाळून विहंगमाची वाट धरिली. मीन मार्ग चोखट लागला.
‘‘तेथें महा थोर कपाट । मुंगीच्या डोळ्याएवढी वाट । औट मातृका सहस्त्रदळ नीट । तेथें तेजी उभा केला ॥२२॥’’.
तेथून त्रिकुट, श्रीहाट, गोल्हाट असा मार्ग आक्रमिला. गोल्हाटाहून ब्रह्मरंध्रापर्यंत चढाई केली. आपोआप समाधि लागली. नंतर नामस्मरणानुसंधान राखले. कारण नामापाशी ईश्र्वर आहे. असो, अशा तर्हेनें संग्रामकार्य पूर्ण झाल्यानंतर नाम म्हणजे कोणते, त्यांत प्रेम कसे राखावें, वगैरे बद्दल विस्तारपूर्वक चर्चा केली आहे. सारांश, ईश्र्वर नामस्मरणाचा प्रभाव उपभोगावयाचा असेल तर हटयोगानें म्हणा किंवा भक्तितत्त्वांतील सुलभ योगमार्गानें म्हणा मनाचें चांचल्य दूर करून विकारादिकांचें प्रथम दमन करणें प्राप्त आहे. हें जोपर्यंत साधलें नाही तोपर्यंत नुसत्या हरिनामोच्चारानें पराप्राप्ती होणें शक्य नाही. हें सर्व अनुभवी संतसाधूंनीं आपल्या स्पष्टोक्तीनें सांगितलें आहे. शेख महंमदांच्या या ‘योगसंग्रामा’ नें जसें आचारविचारांच्या शुद्धीचें ज्ञान मिळते, तसेंच मनाची स्थिरता साधल्यावर देहाच्या उपाध्या दूर करण्याचा यशस्वी उपक्रम कोणता त्याचेंहि अनुभवपूर्ण मार्गदर्शन मिळते.
शेख महंमदांच्या ‘योगसंग्रामा’ची धांवती ओळख करून दिली आहे. मूळ ग्रंथ वाचकांपुढें असल्यानें अधिक विस्ताराची आवश्यकता नाहीं. वाङमय विषयक चिकित्साहि येथें करण्याचें कां टाळलें आहे याचा खुलासा शेख महंमदांच्या चरित्र भागांत केलाच आहे. शेवटी शेख महंमदांच्या भक्तिभावावरील विवेचनाचा थोडासा परिचय करून देतो. शेख महंमदांनीं साधु व भक्ति यावर बरीच चर्चा केली आहे. ती सर्व निर्गुण अविनाश ईश्र्वराच्या भक्तीची होय. दांभिक भजन-भक्तिचें त्यांनी निखंदन केले आहे. दांभिक भजनानें प्राणी भूषण वाढवून घेईल, परंतु त्याचे पदरी पुण्याचा शुन्यांशच पडेल; उलट जो देही असून देहाची निरास बाळगील व जनीं विजनीं सोऽहं उदास राहील त्याचेच सद्गुरुसेवेनें गर्भवास चुकतील अशी शेख महंमदांची स्पष्टोक्ति आहे. ईश्र्वर एकच आहे याचें विवेचन करतांना शेख महंमद लिहितातः
‘‘ऐका हरि अल्ला जरी दोन असते । तरी ते भांडभांडोच मरते । वोळखा कांही ठाव उरों न देते । येरूनयेराचा ॥९५॥’’.
शेख महंमदांचा पराप्राप्तीचा दृष्टिकोनहि त्यांनी ठिकठिकाणी स्पष्ट केला आहे. शेख महंमद म्हणतातः
‘‘निर्गुणा नलगे तुझें सर्वत्र। चारी मुक्ती दिसती अपवित्र । त्या लांचक्या दासींचा अंगिकार । मी न करी सत्य बापा ॥७७॥
जेव्हां सद्गुरुकृपा झाली पुरती । तेव्हां रिद्धिसिद्धी वोळंगती । मी तंव त्याकडे न पाहेच सती । तुझ्या नामाचा घोष करी ॥७८॥’’
तसेंच शेख महंमद साधुअसाधूंबद्दल सांगतांना लिहितात की, ज्याला ईश्र्वराचें ज्ञान होईल त्यालाच ईश्र्वर भासेल; इतर ईश्र्वररूपाची आपापल्यापरीनें उदंड वर्णनें मात्र करितील. ईश्र्वरकीर्ति ही जशी ईश्र्वरप्रचीति तशीच वैराग्य भावभक्ति ही ‘सोऽहं’ स्थिति होय. शेख महंमद तुकारामादि संतांप्रमाणेंच नामघोषालाच अधिक महत्त्व देतात. ठिकठिकाणी पुढील उक्तींसारखे स्पष्ट बोल आढळतातः
‘‘हरि म्हणे नारदा ऐके वचन । जेथें माझ्या नामाचा घोष संपूर्ण । तेथें मी तिष्ठत उभा जाण । कर जोडूनियां ॥८०॥’’.
पुन्हां आणखी एका ठिकाणी लिहितातः
‘‘प्रेमनामाचा होतसे गजर। भाविक बैसले सुरनर । तेथें उभा परमेश्र्वर । तिष्ठत असे ॥२२६॥’’.
भक्तीवरील शेख महंमदांच्या टीकेंत भगवद्गीतेंतील बर्याच श्र्लोकांचा अनुवाद आढळतो. इतकेंच नव्हें तर अशा बहुतेक स्थळीं भगवान अगर हरि म्हणे म्हणून आपण अनुवाद करीत आहोत हें तें सुचवितात. भक्तियोगांतील पराप्राप्तीचें मुख्य साधन म्हणजे केवलकुंभक साधणार्या मंत्राचा उच्चार. या मंत्रसामर्थ्याचा शेख महंमदांच्या मनावर किती पगडा बसला आहे हें त्यांच्या पुढील उक्तीवरून दिसून येईल. शेख महंमद लिहितातः
‘‘नित्य सा शत एकविस हजार (मनुष्य २१,६०० वेळां श्र्वासोश्र्वास करतो असें योगशास्त्रात मानलें आहे)। मन सोऽहं मण्याचा करी उच्चार । ते माळ अधिकारिती ईश्र्वर । भक्ताचे सेवक होउनी ॥४८॥
हे तत्त्वमाळा फेरूनि उदास । मग घरबारी अथवा वनवास । त्यास कदा काळीं नसे अपेश । वेषधारी मिथ्या असे ॥४९॥
ऐसा होईल त्या नांव योगीराज । तेणें सत्य साधिलें जन्मकाज । त्यासी शेख महंमद सहज । लोटांगण घाली ॥५०॥’’.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP