प्रसंग अकरावा - पिंगळेची कथा-दृष्टांत
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
काशीखंडीं तपोनिध कर्णकुमारी । शत वर्षे ईश्र्वरभजन करी । मृत्युकाळी तीस व्यथा मांडली थोरी । हात वैद्यास दाविला ॥३४॥
वैद्यें नाडी पहावया धरिला कर । तयेची कल्पना धाविन्नली भोगावर । निमालिया वेश्या जाली महा सुंदर । पुरुष भोगी वासनेसी ॥३५॥
पूर्वी राजकन्या होऊनि केलें तप । पुन्हां वेश्या होऊनि भोगिले उमाप । असंख्य करी सुष्टादुष्टांसी पाप । उद्धरिली तें सांगेन श्रोत्यापें ॥३६॥
पूर्व तप फळासी आलें तत्त्वतां । ते म्हणवी वेश्या आणि पतिव्रता । राव रंक दृष्टीं पाहे समता । विषम पडों नेदी कांहीं ॥३७॥
हे मात ऐकोनि कैलासपति । उतरले तिची पहावया प्रचीति । वेष पालटूनि काबाडी म्हणविती । आले वेश्येच्या मंदिरा ॥३८॥
लंगोटी जीर्ण घोंगडें खांद्यावरी । हे देह कुश्र्चळ माशा वारी । म्हणे आम्हासी संग करी वो सुंदरी । आजचिये निशीं भावें ॥३९॥
तुझी बहुत दिवस असोसि कामिनी । मोळिविका म्हणे धरीत होतो मनी । कष्टी मेळविलें बारा रुक्यांलागुनी । तुजला द्यावयालागीं ॥४०॥
वेश्येने उठोन केला नमस्कार । मंचकी बैसवोनि केला आदर । त्या बारा रुक्यांस वाढविला कर । म्हणे स्वामी रजनीस यावे ॥४१॥
तंव तो मोळीविका उठोनि गेला । रंकाचा राजा होऊनि आला । तें वेश्येसी काय बोलता जाला । शीघ्रवत सेज करी ॥४२॥
मग ते वेश्या बोलली रायास । हा देह निरोपिला आज एकास । तुम्ही दुसरे वेळें यावें सावकाश । माझें दास्यत्व घ्यावया ॥४३॥
हें ऐकतांच वेश्येचे उत्तर । राजा क्रोधायमान जाला थोर । म्हणे मजपुढें काय सांगितला मजुर । काय देईल तुज ॥४४॥
राजा म्हणे देईन लक्षानुलक्ष धन । दवडीन ते मी रंक मारून । वेश्या म्हणे न राहे पतिव्रतापण । म्यां चरणीं तोरड बांधिला ॥४५॥
तुम्ही मजवरी कराल बलात्कार । तुम्हांवरी कोपती ईश्र्वर । रायें देखोनि वेश्येचा निर्धार । मग उठोन चालता जाला ॥४६॥
वेश्येनें सेज करूनी मनोहर । म्हणे देवा धाडी मोळीविका भ्रतार । कां लागला यास उशीर । दोहींस भेट नाहीं का जाली ॥४७॥
प्रेमें धांवा वेश्येचा ऐकूनि । आले मोळविकें शूळपाणी । आंघोळ करूनि बैसविलें भोजनीं । जयजयकार करिती जाली ॥४८॥
चूळ भरूनि दिधला विडा । वेश्या म्हणे स्वामी मंचकी पहुडा । येरे देखोनि तिचा भाव गाढा । समाधिसुखें निद्रा केली ॥४९॥
कोंडूनि मन पवना लावी टाळी । दशव्या द्वारें नीळकंठ तात्काळीं । कैलासी गेलें भवानीजवळी । सत्त्व वेश्येचें सांगावया ॥५०॥
इकडे ऐका वेश्येचा वृत्तांत । पति निवर्तला म्हणवून करी आकांत । राजा लोक संबोखिती समस्त सती निघेन म्हणे ॥५१॥
चंदन बेल काष्टीं केलें दहन । सती निघाली मोळविक्या घेऊन । उचित लाधली वैकुंठभुवन । पिंगळा नांव पावली ॥५२॥
म्हणोनि वेश्या आणि पतिव्रता । तयेचा दृष्टांत घेतला पुरता । ग्रंथ अनुसंधानी वक्ता । शेख महंमद सद्गुरु ॥५३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP