येथपर्यंत विवाह्य स्त्रीच्या गुणांच्या परीक्षेविषयी लिहिताना धर्मशास्त्रग्रंथात व ज्योतिष, सामुद्रिक वगैरे बर्याच अंशी कल्पनामिश्रित शास्त्रात सांगितलेल्या गोष्टींविषयी विवेचन करण्यात आले. या विवेचनात स्त्रिया शरीराने निरोगी असाव्या; त्यांच्यापासून वंशात व्याधीचा प्रसार न व्हावा; त्या पतीच्या नेत्रांस आनंद देणार्या असाव्या; त्यांनी भांडखोर असू नये; त्यांची अंगे मृदू व वाणी सौम्य असावी, इत्यादी कित्येक गोष्टी वर्णिल्या, त्या व्यवहारदृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत, व संसारात जो काही उपयोग व्हावयाचा तो या गुणांपासूनच पुष्कळ प्रसंगी होतो हेही नि:संशय आहे. तथापि या गुणांपैकी पुष्कळसा भाग स्त्री संसारात पडल्यानंतर बर्याच अवकाशाने अनुभवास यावयाचा असतो; व काही थोड्याशा भागाचे ज्ञान मात्र जेव्हाच्या तेव्हा होऊ शकते. स्त्रीपुरुषांचे नाते विवाहाच्या योगाने एक वेळ जुळते म्हणजे ते जन्मभर कायमचे समजावयाचे, हा आर्य लोकांच्या धर्मशास्त्राचा ठरीव सिद्धान्त आहे; व आपल्या लोकांत ज्या जाती वरिष्ठ प्रतीच्या म्हणून मानिल्य जातात, त्या सर्वांमध्ये प्राय: याच सिद्धान्ताचे अनुसरण होते. अर्थात विवाहाचे कायमचे नाते जुळवून घ्यावयाचे असते एवढ्यासाठीच पुढेमागे शंकेस जागा सहसा न राहावी, या हेतूनेच साक्षात धर्मशास्त्राशिवाय आणखीही इतर शास्त्रांचे साहाय्य घेऊन वरवधूंच्या मातापितरांनी हरएक प्रकारे त्यांच्या भावी संसाराची व्यवस्था चांगली लावण्याविषयी खटपट करावी, असा मूळच्या रूढीच्या प्रचारकांचा स्तुत्य हेतू असावा यात संशय नाही. यात चूक मिळून इतकीच की, मूळ रूढी पाडताना जी काही परिस्थितीत पुढे केव्हाही फ़ेरफ़ार होणार नाही, व त्यामुळे प्रचलित केलेली रूढी अबाधित चालेल अशी तिच्या अनुयायांनी दृढ समजूत घेतली; पण पुढे परिस्थितीत स्वाभाविक क्रमाने अंतर पडत गेल्याने मूळच्या हेतूचा व फ़ळाचा विपर्यास होण्याचा प्रसंग आपोआप येत गेला. हाच क्रम आजमितीपावेतो सतत चालत आला आहे.
पण याचा परिणाम असा झाला आहे की, दुर्दैवाने मूळचा हेतू जागच्या जागीच या देशी प्रौढविवाहाची व स्वयंवराची पद्धती होती, ती पद्धती आजमितीस चालू असती, तर हा दुरुपयोग होण्याचे मान पुष्कळ अंशी कमी राहिले असते; परंतु ज्या स्त्रीपुरुषांचे विवाहजन्य नाते व सुखदु:खांचे संबंध ही त्यांचे जीवमान असे तोपावेतो अबाधित व कायमची चालावयाची, त्यांनी स्वत: या नात्याच्या जुळवाजुळवीच्या भानगडीत पडूच नये; व आईबापे किंवा कुटुंबांत प्रमुखपणा भोगणारी वडील नात्याची, वडील मानाची इतर माणसे यांनी आपल्या लहरीप्रमाणे लहान लहान अर्भकांचे बाहुलाबाहुलीच्या खेळासारखे विवाह जुळवून आणून तेवढ्या वेळेपुरती आपल्या मनाची चैन यथेच्छ साधून घ्यावी, ही नवीन पद्धती सुरू झाल्यमुळे तिचे परिणाम एकंदर समाजास साहजिकच घातक झाले. अर्थात विवाहस्थितीत शिरणार्या वधूवरांच्या भावी कल्याणाकडे मातापितरे व वडीलधारी माणसे यांचे दुर्लक्ष होत गेल्याने वधूच्या संसारोपयोगितेच्या परीक्षेचे सार काय ते खूपशी हुंड्याची रक्कम; व्याही, विहिणी, करवल्या इत्यादिकांचे मानपान अथवा करणी; वधूपक्षाकडील व वरपक्षाकडील जेवणावळीच्या संख्या; लग्नाच्या वेळी व पुढेही उभयपक्षाकडून होणारे वाटचालीचे खर्च; इत्यादी बाबतीबद्द्लचे ठराव आपापल्या मनाप्रमाणे करून घेता येणे व एका गोष्टीत येऊन बसले आहे.
४४. प्रस्तुतची कन्या पाहण्याची रीती, साखरपुडा इ. : वरील कलमात लिहिल्याप्रमाणे सांप्रतकाळी सामान्यत: स्थिती झाली आहे, तथापि तेवढ्यवरून ‘ कन्यापरीक्षा ’ या नावाच्या कृत्यास अजीबात फ़ाटा मिळाला आहे असा अर्थ समजावयाचा नाही. कारण बुगड्या गेल्या, पण कानांची भोके होती तशीच कायम राहिली आहेत, या न्यायाने हा कन्यापरेक्षेचा नाटकी प्रकार ‘ साखरपुडा ’ इत्यादी नावाखाली कसाबसा तरी होऊन जातोच. विवाहाच्या बाबतीत देण्याघेण्याच्या वगैरे मुद्द्याच्या गोष्टी अगोदर ठरून चुकल्या असतातच, व उभयपक्षांकडे वधूवरांचुया तसबिरा वगैरे दाखवून कन्या पसंत होण्याचे काम अगोदरच होऊन गेले असते; तेव्हा अशा स्थितीत वरपक्षाकडून पाहण्यात आलेल्या वडील मंडळीपुढे तिला नुसती आणा म्हणून सांगावयाचे, व तिनेही अगोदर शिकवून ठेविल्याप्रमाणे लाजत लाजत येऊन माहेरच्या मंडळीजवळ खाली मान घालून बसावयाचे, व नंतर वरपक्षाकडून ‘ मुली, तुझे नाव काय ? तुला भाऊ किती आहेत ? बहिणी किती आहेत ? ’ इत्यादी काही औपचारिक प्रश्न विचारण्यात आले असता तिने त्यांची उत्तरे अर्धवट हळू आवाजाने, पण आवाज अडखळू न देता द्यावयाची; की लागलीच तिच्या हातात साखरपुडा पडून तिला घरात उठून जाण्याविषयी निरोप मिळावयाचा. एवढे किंवा अशाचसारखे काही किरकोळ प्रकार होण्याचे बाकी राहतात, व तेवढे ते झाले म्हणजे कन्यापरीक्षेचे कृत्य सांग झाले असे लौकिकात मानण्यात येते.