येथपावेतो वर्णिलेली शोचनीय स्थिती वस्तुत: का प्राप्त व्हावी, हा एक मोठा प्रश्न आहे, व त्याचे म्हटल्यास ते या स्थितीचे कारण रूढी होय असे देताही येईल. परंतु रूढी ही सर्वकाळ सारखी असत नाही, व ती कालक्रमाने हळूहळू बदलत जाते. यावरून पाठीमागच्या काळाच विचार करू गेल्यास प्राचीन काळी कन्येची संसार दृष्टीसंबंधाची परीक्षा हल्लीहून अधिक व्यावहारिक रीतीने होत असली पाहिजे असे अनुमान करण्यास हरकत नाही.
या परीक्षेचे एक उदाहरण दशकुमारचरित ग्रंथात आले आहे, व ते फ़ार मार्मिक असल्यने ते तात्पर्यरूपाने येथे नमूद करण्यात येत आहे. मागे क. ३७ येथे व परिशिष्ट ( ब ) मध्ये सामुद्रिक विषयाबद्दल लिहिताना ज्या कन्येची सामुद्रिक लक्षणे वर्णिली आहेत, त्याच कन्येची परीक्षा शक्तिकुमार नावाच्या एका श्रीमंत गृहस्थाने घेतली. आपल्या मनाजोगा संसार चालवू शकेल, तरच विवाहसंबंध करावयाचा एरवी करावयाचा नाही, असा त्याचा निश्चय असल्यामुळे त्याने वेश बदलला, व आपल्या धोतरात पायली अर्धी पायली साळी ( भात अगर डांगर ) बांधून घेऊन तो गावोगाव कन्येचा शोध करीत चालला.
जाता जाता कावेरी नदीच्या दक्षिण भागी शिबि देशातील एका नगरीत तो गेला असता एका गरीब स्थितीत पोचलेल्या घरात त्याच्या दृष्टीस ही कन्या पडली, व तिच्या सामुद्रिक लक्षणांवरून त्याचे तिजवर मनही बसले. घरात ती कन्या व तिची एक दाई एवढी दोनच काय ती माणसे होती. अशा स्थितीत तो त्या घरी गेला, व ‘ मजजवळच्या या साळी घेऊन यापासूनच मला चांगले अन्न तयार करून घालण्याचे कौशल्य तुझ्या अंगी आहे काय ? ’ असा त्याने तिला प्रश्न विचारला. या प्रश्नास ‘ होय ’ म्हणून उत्तर दिल्यावर तिने चांगली झाडसारव केलेली जागा त्यास उतरावयास देऊन त्याजपासून ते धान्य घेतले, झटकून सवरून झाल्यावर तिने उन्हात वाळविले. नंतर ते धान्य हलक्या हातांनी मिळून तिने त्याची टरफ़ले तुसे न मोडू देता काढिली, व ती सोनाराच्या दुकानी विकावयास पाठवून त्यांचे दाम सोनार देईल ते खर्चून त्यांचे वाळलेले सर्पण व अन्न शिजविण्याच्या बेताची भांडी व एक झाकणी आणण्याविषयी दाईस सांगून तिने तिला पाठवून दिले.
दाई परत येईतोपावेतो ते धान्य तिने कांडून पाखडून निसून चांगले स्वच्छ केले; व सर्पण आणि भांडी आल्यावर त्या धान्याचे बनलेले तांदूळ धुवून ते तिने चुलीवर शिजत लाविले.
काही वेळाने त्या तांदुळास कढ येऊ लागला तेव्हा भांड्याया तोंडावर स्वच्छ फ़डके गुंडाळून तिने पेज गाळिली, व त्या देशच्या रिवाजाप्रमाणे पाहुण्यास पिण्यास दिली. त्याचे पेज पिणे होते आहे, इतक्यात चुलीतील धमधमीत निखारे बाहेर काढून तिने ते विझविले; व त्यांपासून कोळले झाले ते बाजारात विकावयास पाठवून त्यांच्या किमतीत भाजी, तूप, दही, तेल, आवळकाठी व चिंच जेवढी मिळू शकली तेवढी आणविली. एकीकडे भाजीपाला व सार होण्याची तयारी, तो दुसरीकडे पाहुण्य्चे अंगास लावण्यास तेल व वाटलेली आवळकाठी हजर. याप्रमाणे पुढीलप्रमाणे व्यवस्था लागल्यावर पाहुण्याचे स्नान - भोजन झाले. मध्येच त्याने पिण्यास पाणी मागितले, ते चांगल्या स्वच्छ घासलेल्या भांड्यातून तिने त्यास घातले, व शेवटी त्यास आचमनोदक देऊन त्याचे आटोपल्यावर ताज्या शेणाने उष्टी निघाली. अस्तु.