स्त्रीशिक्षणाची अनास्था
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
स्त्रीशिक्षणाची अनास्था पुष्कळच जुनी आहे : आताच्या या लिहिण्यावरून संसारोपयोगी शिक्षण मुलीस कशा प्रकारचे पाहिजे याचे सामान्य स्वरूप कोणासही सहज समजू शकेल; व या स्वरूपाच्या तुलनेने सांप्रत काळच्या स्त्रीशिक्षणातील गुणदोष थोडेबहुत तरी मनात आल्यावाचून राहणार नाहीत. हे गुणदोष अमुकच आहेत हे सांगत बसण्याचे या स्थळी प्रयोजन नाही. यासंबंधाने एक गोष्ट सर्वांनी ध्यानात ठेवण्यासारखी आहे ती ही की, घरात काय किंवा शाळांतून काय, स्त्रीस गृहिणीपद आल्यानंतर तिच्या संसारकृत्यास अत्यंत आवश्यक अशा प्रकारचे शिक्षण स्त्रीवर्गास मिळण्याची असावी तशी सोय प्रस्तुत काळी नाही. धर्मशास्त्रावरील ग्रंथात विवाह्य गुणांबद्दल ज्या निरनिराळ्या गोष्टी लिहिल्या आहेत, त्यांत खर्या व्यावहारिक महत्त्वाच्या अशा अनेक गोष्टी आल्या आहेत; परंतु त्यांत स्त्रीजातीच्या संसारोपयोगितेबद्दल अर्थात तशा उपयुक्तपणास आवश्यक जे स्त्रीशिक्षण, त्याबद्दल एक चकार शब्दही लिहिला गेला नाही हे पाहून कदाचित कोणास आश्चर्य वाटेल; परंतु हल्लीची शास्त्रे म्हणजे स्मृती व पुराणे या ग्रंथाधारे अर्वाचीन निबंधकारांनी लिहून ठेविलेल्या व्यवस्था असा प्रकार असल्याने ते आश्चर्य वाटण्याचे तादृशसे प्रयोजन नाही.
स्त्रीजातीच्या विद्यार्जनासंबंधाची ही अनास्था नवीन आजकाल प्रचारात आली अशातला प्रकार नसून, त्या अनास्थेची परंपरा पाठीमागे नेत नेत थेट मनुस्मृती - काळाच्या पूर्वीपर्यंतही न्यावी लागेल. ही अनास्था होण्याचे कारण स्त्रियांच्या अंगी निसर्गत:च अपात्रता असते असेही कोणास म्हणता यावयाचे नाही; अर्थात पुरुष ज्याप्रमाणे विद्या शिकतात, त्याप्रमाणे विद्या शिकण्याची योग्यता स्त्रियांच्या अंगी असल्यास, त्यांना तुम्ही शिकू नका, तुम्हांला शिकण्याचा अधिकार नाही, हे म्हणणे कोणत्याही रीतीने युक्तीस संमत होणार नाही. मन्वादी स्मृतिकारांनी स्त्रियांचा अधिकार काढून घेतला आहे ही गोष्ट खरी, पण त्यांच्यापूर्वी उपनिषत्कालीन ऋषिवर्यांनी तरी निदान पुरुष व स्त्रिया यांच्यामध्ये हा दुराग्रहमूलक भेद मानिला नव्हता. पुरुषांचे उपनयन जसे त्यांस संमत होते, तसे स्त्रियांचे उपनयनही ते करून देत असत. मनुकाळाच्या सुमारास जे शास्त्रकर्ते ऋषी झाले, त्यांनी स्त्रियांचा विवाह हाच त्यांना उपनयनाच्या ठिकाणी आहे अशी समजूत घेतली, व विवाहप्रसंगाहून इतरत्र त्यांची गणना शूद्रात करण्यास आरंभ केला. त्याच्यापूर्वी ही समजूत व ही गणना नव्हती, ही गोष्ट इतिहासावरून सिद्ध आहे. फ़ार कशाला, ज्या स्मृतिकारांच्या ग्रंथांवरूनही ही गोष्ट सप्रमाण सिद्ध करून दाखविता येईल.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP