गोविंदचरणीं रमतां, ये शाश्वत निजसुख हाता. ॥ मग कैंची संसृतिचिंता ? ॥ ध्रुवपद. ॥
परीक्षितीप्रति तो शुकयोगी ॥ बोले प्रेमें, विषयविरागी. ॥ भूपति सुकथा हे तुजजोगी. ॥ परिसें मन ठेउनि श्रीरंगीं. ॥ पूर्वीं होता चक्रवर्ति उत्तानपद नृप. त्याच्या दोघी कुटुंबिनी, पतिदेवता, सती, निजतनुकांतिविजितरतिरूपा. सुनीति नाम्नी ज्येष्ठा, तैसी सुरुचि कनिष्ठा, युवतिवरिष्ठा, पतिशुश्रूषणरता. तयांप्रति पुत्र जाहले बहुत चांगले. तयां निरखुनी अवनीजानी मनिं संतोषुनि मानी निजभाग्योदय जाला. परंतु ससुता वडिल गेहिनी नावडे तया. कोण्ही येका दिनिं भद्रासनिं द्वितीय गृहीणीसहित बैसुनी कनिष्ठात्मजा उत्तमाप्रती खेळवीत असतां, तंव तेथें सुनीतिसुत तो अकस्मात पातला. विलासें, प्रीतिपडिभरें तया निजांकीं बसवी राजा. तेव्हां अति रोषवती सुरुची त्यातें बोले. “ ऐकें, ध्रुवा विमूढा, बरवें. वनीं राहुनी व्रतें, तपें आचरुनी नियमें, हरिचा प्रसाद संपादिसि जरि, पावसि शेखीं शाश्वत राज्यपदासि, अर्भका. ये रिति मातृवचन ऐकुनियां वदे शिशू तो “ वना जातसें आतां. ” ॥१॥
सापत्नांबावचन स्वहिता । मानुनियां, त्यजि सकळहि ममता. ॥ विषयविरागें दंडुनि चित्ता, ॥ भावें आठवि तैं भगवंता. ॥ निज जननीतें वंदुनि, तीची आज्ञा घेउनि, वना निघाला. मार्गीं सारासार विचारा करि हृदयीं तो. “ जीव कोण ? शिव कोण ? सर्व जग केंवि जाहलें ? कर्ता यासि कवण ? नेणें मी. कर्म, धर्म, निजवर्महि न कळे. आतां आर्तत्राणपरायण, शरणागतवत्सल, करुणावरुणालय, श्रीमन्नारायणचरणाविण आन नसे गति मजला. ” ऐसा निश्चय करुनि, विवेकें नृपबालक काननीं चालिला. बहुत भागला; भुके पीडिला; दिवाकरकरें पोळला भला; तथापि अवलंबुनि धैर्यातें वेगें जातां, तेथ शचीपति धरुनि मनीं तोकाची मृसि नृपतोकाची स्थिती वळखाया, घेउनि जननीचा वेष, पाठीसीं त्वरें पातला. म्हणे. “ वांसरा, कां, रे. मातें येकलितें मोकलुनी जासी ? न कळतांचि म्यां निरोप दिधला तुजला. बाळा, आतां वियोगलव न साहवे. तुजसाठीं बहुंसाल नवसही केले. बापा, सवतीनें निजवैर साधिले, तुला बोधिलें, दुर्वाक्यशरें मजहि विंधिलें; यास्तव आले वना लगबगां. राहीं, राहीं. परतुनि पाहीं. तान्हूल्या, बहु पान्हा दाटुनि तटतटती कुच. ” यापरि मोहक वचने वदे पुरुहूत. तरी ध्रुव निश्चलमानस, केवळ लक्ष्मीवल्लभांध्रिकमंलध्यानीं तो तत्पर होउनि, न लेखीच तद्वचनातें. तंव लाजुनि बलरिपुं गेला सुरलोकासि. म्हणे मग, “ भगवद्भक्ता नसे मोह, भय, ममता. ” ॥२॥
ऐसा एकट तो ध्रुव विपिनीं ॥ विचरे. कामक्रोधां वधुनी, । शमादि साधनही साधूनी, ॥ मुमुक्षु जाला सादर भजनीं. ॥ अकस्मात तंव विपश्चिदुत्तम, अच्युतचिंतननिश्चलचित्त, विपंचीवादनचटुल, सुरार्चित विरिंचिनंदन तूर्ण पातला. म्हणे, “ बाळका, काय अपेक्षा धरुनि मनीं, या वनीं हिंडसी ? ” ऐसें वचन मुनीचें ऐकुनि, नृपतितनय तो वंदुनि चरणा, सविनय विनवी. “ स्वामी, माझा परिस मनोरथ. गमनागमनरहित सुखधाम असे जें, त्याप्रति मातें पावविं. संसृतितारक पोत तूंचि. मी पोत नेणता. तात, माय तुजवीण नसे मज. ” ये रिति मात तयाची परिसुनि, वदे ऋषी तो, “ श्रीपतिभजन करीं भावें, मग तरसिल, बापा. ” “ स्वामी, मजला मंत्र, तंत्र तें किमपि कळेना. पूज्य हरी तो, पूजक मी कैसा जालों ? हे गति उमजेना. ” तंव ऋषिराज रिझुनि निज चित्तीं, द्वादशाक्षरी मंत्र तया उपदेशी. स्नेहें महावाक्य वाक्यार्थहि बोधी. मग तो शिष्य ध्रुव बहु विनयें पुसे. “ सद्गुरो, ब्रह्मीं माया जन्मली कशी ? जीवशिवांचें ऐक्य केंवि ? हें सांगें. करुणा करीं ” म्हणुनियां नमुनि मुनिवरा, हात जोडुनी उभा राहिला, स्मरुनि मनीं भगवंता. ॥३॥
नारद सांगे नृपतनयातें. ॥ “ परिसें, बाळा, निर्मल चित्तें. ॥ छेदुनि समस्त संदेहातें ॥ पावसि शाश्वत आत्मपदातें. ॥ पूर्ण ब्रह, सनातन, निर्गुण, नित्य, निरंजन, तेथें जाली अहंस्फूर्ति ते माया जाणें. सूर्यीं जैसी प्रभा विराजे, रत्नीं जेंवि असे कीं; कील स्वरूपीं तसी अभेदेंचि चिच्छक्ति शोभते. तीच्या योगें ईश्वर म्हणती. सांख्यविद तयां प्रकृतिपुरुष म्हणुनी व्यवहारिति. जगदुपादान तोचि समज तूं. सर्वनियंता, समस्तकर्ता, सर्वज्ञाता, सर्वज्ञाता, सर्वसाक्षि, सर्वांतर्यामी, ऐसा ईश्वर अविद्यावशें जीवहि म्हणवी. निजस्वरूपा विसरुनि, मग ‘ मी देही, मी स्थूल, कृश, सुखी, दु:खी, माझीं गृहसुतदाराक्षेत्रपशुधनें ’ म्हणोनि बरवें सद्गुरुवचनेंकरुनि महावाक्यार्थ विचारुनि सोपें द्विज हे जहदजहल्लक्षणा करुनियां तदेतद्देशकाळ त्यागुनि, पुरुषमात्र तो घेइंजे जसा, तेंविचि उभयत्रहि पावे. ” ये रिति गुरुनें बोधितां तदा ‘ ब्रह्मैवाहं ’ ऐसा अनुभव बाणला तया. तदुपरि तो ध्रुव देशिकचरणा वंदुनि बोले. “ स्वामी, मातें मज भेटविलें. मद्विना दुजें न दिसे, नसेचि. ” अष्टभावयुत, पुनरपि तो ते दशा जिरवुनी, वदे मुखें. “ श्री कृष्ण, विष्णु, सुखदाता. ” ॥४॥
जाला ध्रुवतो पूर्णज्ञानी. ॥ तत्पर अखंड बह्गवद्भजनीं. ॥ आज्ञा सद्गुरुची घेवोनी ॥ आला यमुनातटासि मौनी. । तेथें पावन वनीं राहुनी, धरुनि नियम, दृढ करी तपातें. कितेक दिन मग सुकलीं पानें भक्षुनि राहे. निर्मल नीर प्रसृतिपूरक प्राशन करुनी क्रमिले कतिपय वासर. तदुपरि पवनाहारी होउनि, आत्मध्यानपरायण असतां, तेव्हां दिविषदभिनुत, त्रिलोकपोषक, सुजनतोषक, श्रीपुरुशोत्तम, शंखसुदर्शनकौमोदकीसुपंकजविलसत्पंचशाख, सुखदायक विश्वंभर प्रगटला. निरखुनि देवा, भवें वंदन करुनी, बालक स्तवावया असमर्थ यास्तव जोडुनि उगा सन्मुख स्तब्ध राहिला. वासुदेव तंव कंबुकोटिनें तालुवरी कुरवाळी स्नेहें. तत्क्षणींच औत्तानपादि नुति करी यथामति. म्हणे; “ मुकुंदा, चित्सुखकंदा, मुचकुंदोद्धरक, वृंदारकवंदितांघ्रि, वंदारुलोकमंदार, पाहि मां. ” ये रिति स्तवें तोषुनि माधव आलिंगुनि बोले मग. “ बोला. मनोरथ. देइन वर तुजला, मम वत्स. ” “ स्वामी, तवपदभजनाविण मज नसे अपेक्षा. ” पुनरपि देव वदे. “ तूं भूवरि षट्त्रिंशत् संवत्सर करूनि राज्या शेखीं शाश्वतपदा पावसी. ” ऐसा वर देऊनि श्रीहरी गुप्त जाहला. नृपसुतही निजसदना येउनि जननीजनकां वृत्त निवेदुनि, सुखें राहिला. ऐशी भगवद्भक्तकथा जे कथिती, ऐकति त्यांतें संतति, संपति देउनि, तारी संतत नरहरितनयत्राता. ॥ गोविंदचरणीं रमतां, ये शाश्वत निजपद हाता. ॥ मग कैंची संसृतिचिंता ? ॥५॥