मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|स्फुट कविता संग्रह|
भैरव

भैरव

विविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.


आत्मीया चरणासि ठेवि पुढती निम्नोच्च भूमीवरि,
वेंची जो स्वकरेंचि पुष्प तरुचें, शंका श्रमाची धरी,
तल्पीं त्याहि मृगत्वचाविरचिता निद्रा स्वभागें करी,
अंत:प्रेमगरालसा प्रियतमा शंभू निजांगें धरी.  १
काव्यांत वर्णिति अनेक रसां रसज्ञ
श्रृंगार भूपति असें म्हणताति विज्ञ
आलंबना करितसे रतियुक्तकांता
वर्णी म्हणोनि कवि तो कुटिलालकांता.  २
विद्वत्कुलीनकविमानसभृगपंक्ति
सत्काव्यकल्पतरुपुष्परसावसक्ती
पावो निरंतर, म्हणोनि विचित्रलीला
श्रीभानुमिश्र करितों रसमंजरीला.  ३
नेत्रीं गतागत, कुतूहल तें अपांगीं,
हास्यच्छवी विरमते अधराशि आंगीं,
वाचा प्रिय श्रुतिसि गोचर, ते सकोपा
चित्तीं विरे, कुलवधू प्रकटी न कोपा.  ४
आज्ञापिलें नियत काममहीपतीनें;
काळीं बरेंहि तरुणत्व महामतीनें
राहावयासि करि वास्तुविधी विचारें
एणीदृशातनुवरी विविधप्रकारें.  ५
दृष्टी वरी रुचिर खंजनचातुरीला,
आस्यच्छवींतचि सुधाधर माथुरीला
वाचा बलावित असेहि सुधासमुद्रा
लावण्य भूसुरपतीसि सुधीं समुद्रा.  ६
नीरांतुनी प्रियतमा उपतीर आली;
आकर्णलोचन असें न कळोनि झाली
शंका तयीं श्रवणिं उत्पल लग्न आहे
जाणावयासि कर ठेवुनि काय पाहे.  ७
शैवालअंकुर अशी धरुनीहि शंका,
रोमावळी पुशि शशीमुखि ते विशंका.  
श्रांती मुहुर्भज गमे सखये सुजाणे
ऐसें पुसे, तदपि श्रोणिभरा न जाणे.  ८
नीलोत्पलाभनयने, हि तुझा स्वयंभू
भासे पयोधर निरंतर जेंवि शंभू.
कोणा नखकरुनि होईल चंद्रचूड
धन्याचिये सदय ज्यावरि, चंद्रचूड.  ९
हस्तीं धरूनि जरि बैसविली पलगीं,
आलिंगिली, तदपि बाहिर जाय वेगीं,
जाणों अशीं नव वधू मग त्यासि वश्य,
जो पादरा स्थिर करील करें अवश्य.  १०
कांहीं करूनि मुकुलापरि नेत्रपाळी,
नीवीनिबद्धभुज, बद्धउरु-द्वयाली,
हस्तीं धरूनि कुच, विश्वसिता नवोढा
स्वापा करी प्रियसमीप जडोनि गाढा.  ११
निद्रेंत कांतमुखवीक्षणहानि आहे,
जागेपणीं प्रियक्रग्रहणासि पाहे;
ऐसी सरोजवदना करुनीहि चिंता,
स्वापा करूं न करुं कां म्हणुनी सचिंता.  १२
स्पर्शोनी स्तन, आंकळोनि वदना, भेटोनि कंठस्थळा,
चुंबूनी अधरासि, अंबर तसें सांडूनि, पाहे भला;
सोडूनी चिकुर प्रभातसमया जाणावया शंकला,
वामाक्षी वसनांचळें लपवितें तैं कर्णनीलोत्पला.  १३
नखक्षत उरस्थळीं, अधरिं कंप दंतव्रणें,
तुटे बकुळमालिका, गलित फार मुक्ताफळें;
रतांतसमयांत म्यां सकळ हेंचि आलोकिलें
नसे स्मृति रतीपुढें, सखि, वृथाचि शिक्षापिलें.  १४
ज्यामाजि लोल अलिपुंज अशा निकुण्जीं
जातां बहुश्रमजळांकितअंगकीं जी,
याकारणें करुं मि इच्छितसें हिंवारा
तो धीर पद्मिनिदळेंहि महा उदारा.  १५
त्वां केला रजनीस जागर, मला आरक्तता लोचनीं,
तूं प्यालासि मधु प्रकृष्ट, मजला संमोह झाला मनीं;
भ्राम्यद्भृंगघनीं निकुंजभवनीं त्वां पाविजे श्रीफळां,
मारी तो मज पंचबाण दहनक्रूरां शरीं कोपला.  १६
कांतानुरागचतुरा, सुमनोहरा तूं
आहेसि नाथ नवयौवन, सुंदरा तूं;
ऐसें म्हणोनि करिते वदनीं प्रियाचे
नि:श्वासबाष्पयुत पात दृगंचलाचे.  १७
नो तल्पा भजसी, न बोलसि सुधाधारेपरी चांगलें,
दृक्पाता न करीसि तूं परिजनीं क्रोधप्रकाशच्छळें,
ऐसें, केतकसुंदरी, करिसि तूं कोपासि संगोपना,
तें होईल हॅंसों नये जरि सखीवक्रीकृता आनना.  १८
आत्मीय प्रतिबिंब पाहुनि बरा चंद्रा कळेअंतरीं,
शंभूमस्तकिं अन्य राहत असे कोणेक, हो, सुंदरी;
ऐसें शंकुनियां गिरींद्रतनया ते तर्जनेतें करी
शंभूतें वलयप्रभासुरुचिरें त्या कंपयुक्ता करीं.  १९
तल्पा सन्निध आलिया निजपती, ग्रीवेसि जे फीरवी;
सप्रेमें हॅंसतांहि वक्त्रहसितें शोभा कपोलीं धरी;
एणाक्षी धरितां करीं पुनति ते लाक्षारसें रंजिता
प्रोष्ठीपादसमान कांति करि त्या दृष्टीहि विस्फारिता.  २०
एके हो शयनीं सराजनयना त्या निद्रिता भावुनी,
एकीतेंहि पठावगुंठित अशी उत्कंधरें पाहुनी,
अन्येचेहि समीप येउनि बहुव्यालोलहस्तांगुली -
व्यापारीं वसनांचलासि हरुनी जागी प्रियेतें करी.  २१
अंत:कोपित कामिनीद्वय बरें पाहोनियां तें वनीं,
वेंचाया कुसुमांसि नम्रवदनें एकीस हो योजुनी,
अर्धान्मीलितलोचनांकितमुखें जे शोभते चांगली,
स्मेरार्द्राधरपल्लवा नववधू ते अन्य आलिंगिली.  २२
धैर्याधैर्यपरिग्रहग्रहिल जा एणीदृशा त्यांचिये
प्रीतीला अतिकांतिरत्नयुग तें ठेवूनि हातीं, सये,
एकीच्या करिं घेववूनि पहिलें रत्ना, परेच्या प्रियें
हस्ताहस्तिमिषें स्पृशोनि कुच, तो स्वानंद होय स्वयें.  २३
असे रेवाकुंज स्मरविपुलसेवाउचित तो;
तसा वारा वेलानवविदलदेलासुरभि तो;
तशी प्रावृड् धन्या नवजलदमालाकुल असे;
पराधीना चित्ता अघटित कराया सुख असें.  २४
श्वश्रू क्रोध करू, सुहृज्जन तसा विद्वेष हो आदरू,
निंदेलागिं करूत यातृ सकळा, त्या मंदिरा नादरूं;
ज्यामध्यें मुषकग्रहासि बहुधा उड्डीयमाना मला
मार्जारी स्वनखेंकरूनि करित्ये हे दुर्दशा आकळा.  २५
मल्लीतमालघननादितनीळकंठीं,
वल्लीविराजितवनीं भवनोपकंठीं,
पांथा, तुला उचित वास निदाघकाळीं.
गंगातटीं सदय होत असे कपाळी.  २६
दासासि जो भवननाथ वदे तटाकीं
हे तोडुनी बदरि तूं बहु दूर टाकीं.
हेमंतिं ऐकुनि असें हरिनायताक्षी
पाण्यांत टाकुनि कुठार सशंक्त लक्षी.  २७
जें जाहलें जाणच तें असोही. । होणार तें होइल सर्वथाही.
आतांहि जें होत असे, असो तें. । किमर्थ कोपश्रम व्यर्थ तूतें ?  २८
देती नीरकणांसि मेघ, पुरुषवृष्टीस हो टाकुनी;
तैसे पर्वत शाड्वलांसि वमिती त्या नायकां सोडुनी;
त्रैलोक्यांत तरू फळें प्रसवती, त्या हो जनांवांचुनी;
धात्या तूं रचिलेंसि काय कुलटाप्रीतीसि हो सोडुनी.  २९
आला जईं कुसुमचापसहाय चैत्र,
झाल्या लवंगलतिका सकळा विपत्र;
पाहोनि नीलकमलायतलोचनाली
तालीदलद्युतिसि आंकळिते कपोलीं.  ३०
जांमाजि केकिमिथुनें असती, कपोत
व्याधूतनूतनमहीरुहपल्लवांत,
तेथें अशीं प्रियवनें नसती किती हो,
टाकूनि खेद, सखि, चाल प्रियगृहा हो.  ३१
कर्णीं रसाळधृतमंजरिच्या परागें
जे पिंजरीकृतकपोल प्रियानुरागें,
अश्रूमिषें बसुनि मौक्तिकवृष्टि अंकीं
राधा मुरारिमुख सादर तें विलोकी.  ३२
गोष्ठीं वसेहि पति तो बधिरा ननंद
भर्तार - भ्रातृ - युवती नयनांसि मंद
ऐसें वदोनि तरुणी कुच - कुंभसीमा
रोमांचकंचुकित दावि मनोभिरामा.  ३३
कांहीं कुंचित हार फार सरळ, भ्रू - वल्लि वक्रास्मितें
हातें फाडुनि उत्पळेंहि युवती कर्णावतंसीकृतें,
गंडा खाजवि अंगुळीं करुनियां साशंक हो राहते
ऐसी राज - कुमारिका सुकृतितें सव्याज ते पाहते.  ३४
देखोनी निजअंगणीं बहु धना देणार आला असें,
ते वक्षोज परस्परां क्रमिति हो एणी - दृशेचे तसे
आनंदाश्रुपयें हि कुंतळ तसे माळा - मिषें सोडिती,
दृष्टी त्या धनलाभ सांगत तशा कर्णांतिका भेटती.  ३५
न जाउनी पापिनिकेतनांतीं, । तूं गेलिशी कुंजवनांत दूती,
आंगीं तुझे किंशुक - भूषणाली । हे अन्यथा दृष्टिपथा न आली.  ३६
तूझ्या प्रभू तनुसि भूषवि रत्नभूषा,
धन्या म्हणौनि सखि तूं निजवंश - भूषा
मत्कांत दृष्टि तनु अंतरिं भीतिभीत
भूषाविभूषित मला न धरी मनांत.  ३७
नेत्रांसि कांत करितो कमलोपमान,
वाचा सुधारससमा करि साभिमान,
या कारणें सखि ! मि काय करूं तयासी
माझें सहिष्णुपण दोष गमे मनासी.  ३८
स्वेदांबु - पूरित कृशोदरि ! अंग कांहीं
कोठें सकंटक तुझें दिसतें तसेंहि,
अन्योसि पाहुनि विभूषवितां प्रियानें,
कोठें तुझाहि पद ठेविल मान नेणें.  ३९
जो मी त्वरें करुनियां वदलों सपत्नी -
नामासि, तेथ भ्रमकारण जाण पत्नी,
हें अन्यथा जरि असे, शपथा करीन,
रोमादि - लक्षण महा - भुजगा धरीन.  ४०
पाहोनियाम दयित - भाळिं अलक्त - रागा
पायांचिये सवतिच्या, युवती सरागा
ते दाखवी कमललोचन कोण कांती
आकर्ण - मुक्त - शिखरोपम तीव्रकां ती.  ४१
दु:खा दीर्घतरा धरी, परि सखीसंगें न बोले घरीं
शैवाला - शयनीं कदापि न निजे ( लज्जा धरी अंतरीं ? )
कंठीं गद्गद शब्द होउनि, दृशे बाष्पोदका नादरी,
संतप्ता हृदयांत अंबुजमुखी जाणों मनोभूसखी.  ४२
सासूनें दिधलेंहि पद्मनयनप्रांतेंचि जे आकळी,
हस्त - स्पर्श कदापि त्यासि न करे जे मर्मरा शंकली,
जावेच्या वचनीं सखीजन - मुखें प्रत्युत्तरातें करी,
विश्वासा धरिते हुताशन - समा जे अंतरीं सुंदरी  ४३
मुक्ता हार नवीन - अंबुजमयी मालाहि कांचीवरी
जातां तो प्रभु हो हरी युवतिचीं संप्रस्थितें ती खरीं,
आणी मी सखि सांगतेम धमनितें किंवा असे हा नसे,
जाणाया मग हेंचि कंकण करीं मूळासि हो जातसे.  ४४
विरह - विहित - गूढ - प्रेम जाणोनि कांते,
पुनति फिरुनि येतां द्रव्य देईल मातें,
ह्मणुनि मरिच नेत्रीं घालुनी अश्रुधारा,
प्रतिदिन करि वेश्या द्वारदेशीं अपारा.  ४५
तें हेंचि वस्त्र, वलयें तशिं तींच साचीं,
तैशीचि हे जघनिंची सखि रत्नकांची
भृंगस्वरें सकळ आजि वसंत - काळीं
तें भासतें अधिक सांग निदाघकाळीं.  ४६
हें काय हो कलशअंकित वक्ष आहे,
ऐसें पुसों पतिसि काय म्हणोनि पाहे,
प्राणेश तों युवतिया नयनांसि हातें
झांकी, त्वरें करुनियां करि विस्मितातें.  ४७
वक्षोज - चिन्हित उरस्थळ तें प्रियाचें
पाहोनियां, न करि निश्वसिता, न वाचे
प्रातर्जलें पुशितसे वदनासि कांता,
ते अश्र दूर करुनि कुटिलालकांता.  ४८
माझें पाहुनियां विपक्षवनितापादानुरागें तसें
आलिप्तानन, कामिनी नत - मुखी चित्रापरी होतसे,
ते रूक्षा न वदे, न कोप नयनीं, विश्वास हो नादरी
प्रातर्मंगळ दाखवी करतळीं आदर्श तें सुंदरी.  ४९
पाहोनि कांत वलयांकित कंठदेशी,
जे अन्य भीति न वदे परुषाक्षरासी
दूरामुखीं हरिणकातरलोचनातें
दूराहुनी सजलसा धरि लोचनातें. ५०
तूझा हा उर हा पयोधरभरें आक्रांत कोठें श्रमा,
दे माझें धन हो पुरा नियमिलें, राहो तुझी हे रमा,
ऐसें वारवधू संकपहृदया कांतास हो बोलली,
त्याचें कंकण हातिंचें धरुनि ते ओढावया लागली.  ५१
लज्जेनें समजाविना पतिसि जे रंभेपरे चांगली,
बोलेना सखि भीतशी किमपि जे अभ्यंतरीं कोपली,
येतां तो मलयानिल प्रकट हो शामा नवोढा घरीं,
शून्या त्या हृदया करूनि बसली ते काय सांगों परी ?  ५२
सांगीतल्याविण नसे, सखि ! खेद - शांतीअ
सांगावया हृदयिं लाज असे मला ती,
ऐसा अधोमुखिं विचार करी, न सांगों
किंवा सखीस कलहाप्रति आजि सांगो ?  ५३
नेत्रां किमर्थ धरिलें अरुणत्वभावा ?
कां मर्त्छिलेंस करकोकनदस्वभावा ?
केलासि कां कलह कोपवशें रसज्ञे ?
दैवें वियुक्त हित टांकिति अर्थ सूज्ञे.  ५४
ज्यासाठीं गुरु तो लघू परि तशी गोष्टी कनिष्ठापरी,
गेलें धैर्यधनादि हो सहचरी ते नीति केली दुरी,
टांकूनी तृणवत्रपा करितसें गंगाहि बिंदूपरी,
तो क्रोधें अवमानिला निजपती, हा बोल दैवावरी.  ५५
जें पंकेरुहलक्ष्म पाणिकमळीं भाग्यालयीं जो गुरू
वेध्यानें लिहिलें ललाट फलकीं जें भाग्य तैसें गुरू,
तें सारें सखि जो यथार्थ करितो त्याशीं प्रकोपक्रिया,
धिग्मातें, धिगजीविता, धिग तनू, धिक् चेष्टिता, धिग् वया.  ५६
आलीनें शपथें अनेक कपटें कुंजोदरीं आणिली
कां तें शून्य तयासि पाहुनि, मनीं विक्षोभ हो पावली;
ते ठेवी नयनांसि नीरजदृशा कुंजोषकंठीं बळें.
भ्राम्यद्भृंग - कदंब - डंबर - चमत्कारानुरागच्छळें.  ५७
केलिगृहा येउनि शून्य पाहे,
एणीदृशा बहुत नि:श्वसिताधरा हे,
अर्धाक्षरें वदत अर्धविलोचना हे
तांबूल अर्धच धरूनि तटस्थ पाहे !  ५८
कां तें शून्य निकुंज आणि कुटिला कामासि जाणोनियां,
दूतीला न निवेदितां सहचरी प्रश्नासि सांडूनियां,
त्रूलीन् ! शंकर ! चंद्रशेखर ! हर ! श्रीकंठ ! शंभो ! मला
संरक्षीं विरहानळांतिं म्हणुनी धांवा करी आपुला.  ५९
देऊनी चरणासि धैर्यभुजगीं, लज्जानदी लंघुनी,
अंगीकारुनि अंधकार पतिला तन्वी न पाहे वनीं,
संतप्ता घनगर्जिता चहुंकडे भीता असे लोचनीं
क्रोध - क्रांत - कृतांतमत्त - महिष - भ्रांतित्व हो योजुनी.  ६०
त्या नाना रसिकांसि वंचन करी जे वारयोशा, वनीं
कोणैकें कपटैक - चाटु - वचनीं ते वंचिली कामिनी
यासाठीं हंसतो निकुंज चपल - भृंगाक्षि - विक्षेपुनी,
दंता दावितसेहि कोरक - मिषे पुष्पच्छवी घेउनी.  ६१
अद्यापी पति तो नयेहि, बहुधा तो अन्य संगें असे,
ऐसें चिंतुनियां सलज्ज सखितें कांहीं न ते हो पुसे,
दीर्घा निश्वसिता नसोन चकिता न प्रेक्षणातें करी
कांहीं पक्क - पलांडु - पांडुर- रुची त्या हो कपोळीं धरी.  ६२
आणायासि न गेलि काय सखि ते ? भ्याला भुजंगासि तो ?
किंवा क्रद्ध - निषेध - भाषण - मिषें प्राणेश तो वर्ततो ?
ऐसी कर्ण - सुवर्ण - केतकि - रज:पातोपघातछळें
अक्षींपासुनि अश्रु सोडि, परि हो चिंता तिची नाकळे.  ६३
भ्रात्या केलि - निकुंज ! आणि सखि तूं, भो यूथिके ! शर्वरी !
मातें बंधु रसाळ ! तात तिमिरा ! मातें दया तूं करीं,
पृच्छा मी करित्यें घनाभ हरि तो कां येथ आला नसे ?
याचें कारण काय तें तुम्हि वदा अभ्यंतरीं जें दिसे.  ६४
स्नाना वारिदबिंदुहीं रचितसें, तो वास हो काननीं
सीतां चंदन - बिंदुनीं मनसिजा देवासि आराधुनी,
नेली जागरणव्रतें च रजनी लज्जा दिली दक्षिणा
ऐसें मी तप आचरोनि न दिसे तो नाथ संरक्षणा !  ६५
कैसा निकुंजांत नयेहि कांत । ऐसें मनीं चित्त असे नितांत,
कोणेक वेश्याहि धनाभिलाषें । अश्रूमिषें स्नान करी निमेषें.  ६६
मुक्ताहार करूनि गुंफित असे कांचीलते सुंदरी
दीपातें उजळी परंतु बहुला तैला न घाली वरी
ऐशी स्मेर - मुखी करूनि बहुधा कामानुरूप क्रिया
पाहे वासक यामिनीस दुरुनी कांतागमप्रक्रिया.  ६७
दावाया निज शिल्प कौतुकभरें कल्लार - हारा करी,
चित्रप्रेक्षणकैतवें करुनियां द्वारास ये सुंदरी,
घेऊनी नत भूषणा सहचरीभूषा जिकाया मिषें
ऐशी पाहुनि कामिनी स्मर असे स्मेरास्य - तोषा - मिषें  ६८
करी तनुविभूषणा, चिकुर धूपवी चांगली,
करी शयन - संन्निध क्रमुकवीटिकाआवली,
करी हरिणलोचना भवन देहकांतीमुळें
लसत्कनककेतकद्युतिभरें दिना आगळें.  ६९
द्वैधाभाव असे पतीशिं मजशीं सर्वत्र अंगामुळें
या हेतूकरुनी वियोग मजला अभ्यंतरीं आकळे.
अद्वैता भजतां स्मितासि न घडे, अन्योन्यवीक्षा तशी,
स्वप्नी दुर्लभ भासतें म्हणुनियां चिंतातसे मानसीं.  ७०
श्वश्रूतें निजवी छळें करुनियां दीपांकुरा पालवी,
संकेतासि करी कपोतनिनदें चेष्टा द्विजें दाखवी.
वारंवार कुशी वळें युवती ते भस्त्वत्वत्कपोलद्युती
तल्पसन्निद्धि कांतकाय म्हणुनि हस्तासि हो ठेवि ती.  ७१
“ चोळी नीळनिचोळकर्षणि, तसा चूडामणी चुंबनीं,
मी मागेन, ” म्हणे, “ स्तनासि धरितां कांचीलता कांचनी. ”
ऐसी चंदनचर्चितें मृगमदें अंगाधिवासा करी,
तन्वी वारवधू मनोरथपथें ते काय हो नादरी ?  ७२
मध्यातें कृशता, स्तनांसि गुरुता, देहासि सत्कांतता,
श्रोणीला पृथुता, गतीसि जडता, नेत्रांसि ते वक्रता,
लास्यातें दृढता, पटुत्व वचनीं, हास्यादिकीं स्फीतता,
हें कांहींच नसोनियां मजविणें कांतासि कां व्यग्रता ?  ७३
मी तो पतीशिं सुरतीं करितें नकारा,
नीवी करद्वयपुटें धरुनी विकारा
दावीम, तथापि पति पार्श्व धरूनि राहे
हें तो मनांत मज कौतुक फार आहे.   ७४
वक्त्राला, अधरासि आणि वचनीं, हास्यास, लास्यासही
कांतानें स्तविला म्हणोनि युवती त्या धन्य हा भासही
स्वप्नामाजि नये श्रुतीसि नयनीं अभ्यंतरीं भामिनी
अन्यातें मजहून त्या प्रियतमा तो भेद कोठें मनीं.  ७५
स्वीया या असती सरोरुहदृशा केलिगृहाsभ्यंतरीं,
ज्यांचा कंकणकुंडलध्वनि कदा विश्रांतिसी नादरी,
ऐसें तों असतां, सख्ये, पुरपथीं, सौधीं, सखीसनिधीं
मी जातां प्रियदृष्टि ते मजविणे राहे न कोठें, कधीं.  ७६
आहेत प्रतिमंदरीं मृगदशा भास्वत्सुधासागरी
त्या इंदीवरतुल्यलोचन अशा नानाविधा सुंदरी;
हें तो चित्र, विचित्रमन्मथकला वैदग्ध्य हेतोमुळें
तें चेतोहर वित्त देइ मजला, हें काय ते नाकळे.  ७७
आली दूतितडिल्लतासहचरी हे रात्र सांगातिणी;
तो दैवज्ञ पयोद सांगत असे प्रस्थानवेळा वनीं;
वाचा मांगलिकी वदेहि तिमिरस्तोमाख्य झिल्लीरवें
मुग्धे ! हा अभिसारकाळ म्हणुनी टाकीं त्रपा लाघवें.  ७८
मार्गीं त्या भुजगासि हो किमपि तूं भ्यालीसना अंतरीं;
माझां संगमिं तूं पुन: प्रकटिसी कंपासि नानापरी;
तसा तो घनगर्जितें करुनियां संक्षोभ चित्तीं नसे,
माझे त्या वचनासि वक्रवदना होसी करूं कायसें ?  ७९
जे फार स्फुरदुन्नतस्तनभरें आनम्र अंगें दिसे,
तैशी पादतलात्मकें किसलयें चालावया भीतसे;
ऐशी चंचललोचना शशिमुखी रात्रीं वनाअंतरीं
ते जाईल कशी मनोरथरथावांचूनियां, सुंदरी ? ८०
औत्कंठ्यें करुनीहि कांतविषयीं उद्युक्त ज्या कामिनी
कांतांतें गमनासि, त्यांसि सखि ते आदित्य कादंबिनी;
रात्री त्या दिन होति, अंधतम तें तेजापरी, काननें
तीं वेश्मांपरि, ते विमार्ग असती सन्मार्ग, पद्मानने !  ८१
चंद्रोदयीं चंदनचर्चितांगी । हांसोनि चाले मदनकृशांगी
तैं काम कांताहृदया धरूनी । वेधीतसे कुंदशरेंकरूनी.  ८२
पद्मांसीं कुमुदांसिं ज्यासि समता केव्हां नसे, हो, सुखें.
त्यासीं स्वैरवधूविलोचन कसें तें तुल्य बोलों मुखें ?
सूर्याचां उदयीं प्रसन्न न दिसे, चंद्रोदयीं म्लानसें,
पावे केवळ अंधकारसमयीं त्या हो विकासा तसें.  ८३
पल्लीच्या अधिपें सरोजवदना बोलावितां उत्सवीं
तेव्हां सद्मजनीं सहर्ष पुढती तें जाइजे माधवीं;
व्याजें राहुनियां सहर्ष गतजें केलीगृहीं दंपती
होती स्विन्न कपोलकंठ धरुनी तो हर्ष सांगों किती ?  ८४
लोलच्चोल धरूनियां करितसे कांचीलता झंकृति,
न्यंचत्कचुकबंध सुंदर तयीं वक्षोज दावी गती
रत्नांच्याहि विभूषणद्युतिभरें विद्युल्लता चालती
भासे वारवधू निकुंजसदनीं जातांहि धन्याप्रती.  ८५
प्रस्थाना करैती त्वरेन वलयें, रक्तेंहि गेलीं, धृती
राहेना क्षणमातर, चित्त पुढती दावीतसे हो गती;
जाया निश्चित कांत पाहुनि सवें संप्रस्थितें तीं तशीं
जाणें; निश्चित जीविता प्रियसुहृत्सार्थासि कां सांडिसी ?  ८६
प्राणेश्वरेंहि वदतां मग निर्गमातें
क्षामोदरी नतमुखी धरितेहि हातें.
आली त्वरेंकरुनि येउनियां निकुंजीं
उन्मत्तकोकिलरवें करि हो सुखें जी.  ८७
नि:श्वास दीर्घ न करी वदतांहि कांतें
‘ जातों ’ म्हणौनि, रुदिता न करी कदा ते.
भालस्थलीं अलक धांवुनि येति वेगें,
आयुर्लिपी पढुनि होति निराश मागें.  ८८
सोडीना विरहज्वरादिक तनुत्यागीं नतांगीस हो;
यासाठीं पुसतें तुला, यदुपती तें सांग तूं सत्यहो.
तांबूलादि, फुलें, पटीर, जल तें, जें बंधुंहीं दीधलें
अत्रत्यापरि काय तें परतरीं होतें विषाआगळें ?  ८९
ठेवीलें पद सर्पमस्तकिं, गुरूभक्तीस, नीतीसही
सांडूनी, तुजसाठिं तें किति किती केलें नसे पापही ?
अंगांतें शत यातना, नयनिं त्या कोपक्रमा रौरवा
कंमीपाक ननास युक्त, म्हणुनी जातां तुंवां माधवा.  ९०
मुद्रेसि कांत मज देइं तुझ्या वियोगें
हातांतुनी वलय बाहिर जाय वेगें;
ऐसें वदोनि विगलन्नयनांबुधारा
वारांगना प्रिय - करांस धरी उदारा.  ९१
शय्येवरी पति कुचांकितवक्ष आला,
कांताप्रसन्नवचनामृततृप्त जाला,
सुभ्रू स्मितेंकरुनि अर्चितसे तयातें.
वाहोनियां रुचिरलोचनअंबुजांतें.  ९२
कांतानें अपराध तो करुनियां देतां कुचांतें करा,
ग्रीवा वक्र करूनि सोडित असे क्रूरां कटाक्षांकुरां;
सप्रेमें वदतां हॅंसोनि वचनें प्रीतीसि मानापरी
दावी कल्पलतेसमानकरुनी कांतास हो सुंदरी.  ९३
प्रस्थानीं करितो तुझेहि कमलच्छाया मुखेंदूवरी,
श्रीखंडद्रव शीत शिंपित असे सप्रेम मार्गांतरीं,
ऐशाही पतिसीं कशी तुज नसे ते प्रीति हो मानसीं ?
रक्तक्लांतसरोजतुल्यनयने तूं मागुती कोपशी.  ९४
कनकमहीधरसन्निभस्तनांते
सखि लिहित्ये प्रियपाणिपल्लवातें.
हॅंसुनि म्हणे मकरी बरी मुखातें,
कमलमुखी मग वारित्ये सुखातें. ( सखीतें ? )  ९५
सांद्रा शब्दीं मुखरितदृशा मेघपंक्ती करिती,
धारासारें धरणिवलया सेचना आदरीती,
त्या हेतूनें सखि तुजवरी स्नेहपुरा करीत्ये,
नाथ, स्नेहा न धरिशि मनीं, पावत्यें विस्मयातें  ९६
आनंदयुक्त वनमालिविलोकनाला
कुंजासि जा करुनि काय विचारणेला ?
गाणार हो मधुप मत्त, चकोर जाती
तेथें अपार फिरती दिवसांत राती.  ९७
“ भिंतीवरी लिखित हो अवतारमूता,
त्यामाजि सप्तम वदे मज पुण्यकीर्ती. ”
ऐसें सखीवचन ऐकुनि तत्क्षणीं ते
सीता स्मितेंकरुनि दे मग उत्तरातें.  ९८
संज्ञेकरूनि सखिशीं न वदेसि वाचे,
ऐसें हॅंसोनि वदतां मुरवैरि वाचे;
दंतव्रणेकरूनि दु:खित बिंबभागा
राधा विनम्रवदना करित्ये सरागा.  ९९
तें तो वारि कसेंहि दिव्यतुजळीं गंगाधरातेम असे,
तो वन्ही मग दिव्यलोचन असे,  तो सर्प - भूषा दिसे,
तस्मात् द्यूत - विधींत तूंचि हरिल्या हारासि दे लौकरी.
ऐसी शैलसुता हंसोनि वदली शंभूसि नानापरी.  १००
आली समीप रजनी, तम गाढ होतें,
तो कामदेव हृदयीं धरितो सुखातें,
तूं जें मशीं रुचिर बोलशि, तें न टाकीं,
त्यातें मनीं धरुनि विस्मृतिलागिं टाकीं.  १
धात्यानें रचिली प्रदीप - कलिका राधा - धरा - मंडलीं
तीची दैववशें करूनि चरमा ते हो दशा पातली
यासाठीं नत होउनी तुज वदों श्रीरंग नानापरी,
स्नेहातें करुनी त्रिलोक न करीं हें अंधकारापरी.  २
तूं पीयूष - मयूख ! सोडिं शिशिर - स्निग्धा - सुधासीकरा,
तूं भोगींद्र ! फणेन वीजन करीं, सांडीं विलंब त्वरा,
तूं गंगे ! करिं सिंच शीतळ जळें अंगें शिरीषोतमे,
हे तो शैलसुता कठोरकिरणक्लांता मनीं ह गमे.  ३
पृथ्वी ! कोमल होईं तूं, दिनमणी ! तूं शैत्य तें आदरीं,
तूं मार्गा लघुता धरीं, पवन ! तूं खेदादि घालीं दुरी,
सान्निध्या करिं दंडकावन ! गिरी ! तूं मार्ग टाकीं दुरी,
सीता तैं विपिनासि हो मजसवें हे यावयातें करी.  ४
हें तों पुढें दिसतसे शत कामिनींचें,
कोठें निवेशन करुं नयन - द्वयाचें,
ऐसें विचारुनि मनीं नयनां मिटूनी,
राहे हरी पुलकयुक्त तनू धरूनी.  ५
जो हारें दृढबद्ध पाणिकमळीं द्वारांत जो वारिला
तो सुप्ता मग मी म्हणोनि पुनती भीतापरी पातला,
तत्पासन्निधि हेमकंकण करें तें मुक्त हो पाहतां,
पार्श्वी सुप्त तसाच धृष्ट सखि मीं तो देखिला वारितां.  ६
माला मस्तकिं ते धरूनि, करुनी भालांत पत्रावळी,
केयूरांसि भुजाकरीं, कुचयुगीं ठेवूनि मुक्तावळी
विश्वासा मृगलोचने उपजवी कांची - निवेश - स्थळें,
नीविग्रंथि हरीतसे मृदुकरें ते कामिनी आकळे.  ७
शंकाश्रृंखळबद्ध त्याहि नयन प्रांतें न पाहे बरें,
केयूरध्वनि फार भीत न करी आलिंगना आदरें,
दंतांतेंहि न लावितां हळु हळू बिंबाधरा पीतसे,
जेथें हो रणितादि कांहिंच नसे संभोग तो कायसें ?  ८
ज्यामाजि दाम - कलकूजित नाभि पाहे,
पारावत - ध्वनि - विचित्रित कंधरा हे,
उद्भ्रांतलोचनचकोर अनंग - रंगा
त्या इच्छितों हृदयीं वारवधूप्रसंगा,  ९
नेत्र - प्रांत विलोकुनी युवतिच्या शोणारविंदापरी,
जल्पातें न करी, स्मितासि न धरी, वीटीस टांकी दुरी,
तल्पा - सन्निधि भीत येइ पुलकभ्राजत्कपोलद्युति,
ग्रीवा नम्र करूनि गुंफित असे मुक्तावळी त्या किती.  ११०
हास्यें वर्जित आस्य यद्यपि तसें लास्याविणें बोलणें
नेत्रें कोकनदापरी तदपि तूं कोठें तरी राहणें,
गाळां गुंफितसे सखी मकरिका लेखा कुचातें करी
धूपें कुंतल सांवरी अशि दिसे सायंतना सुंदरी.  ११
लज्जा जयासि हृदयांत नसेहि कांही,
तो भीतिलेश न दिसे, करुणा न पाहीं,
त्याचे करीं बकुल - कुड्मलकोमलेतें
मातें न देउनि करीं सखि ये कलेतें.  १२
तूं बाहेर सुधा - समान वदसी, वज्रापरी अंतरीं,
हें ऐकोनि सकोपकांतकपटप्रस्थान तें आदरी,
पाहेना, न वदे, मुखासि फिरवी, प्राणेश तो त्यावरी
दृष्टी त्या कृपणा धरुनि युवती ते रोदनातें करी.  १३
तेव्हां तमोजटिल तीं हरिदंतराळें,
कांहीं निशीशि निघतां दिसती कराळें,
तेव्हां नदीनिकट त्याहि वनांत, कांते,
तो कोण, सुंदरि, करील सहाय तूतें ?  १४
तो कांत हो कनकजंबिर तें धरूनी
हातामध्यें फिरवी सूचन तें करूनी,
भिंतीवरी लिखित भानुस आदरानें
बिंदूस इंदुवदना करिते करोनें.  १५
रंभा ऊरू, नयन कमलें, शैवलें केश झाले,
जीचें चंद्रापरि वदन तें, मध्य भासे मृणालें,
नाभी कूपापरि, करयुगीं पल्लवा आदरीते,
ऐशी कांता हृदयिं धरितां तापवार्ता नुरे ते.  १६
जातां सखी सलिलकेलिकुतूहलातें
गेलों तिचे निकट मी करुनी मिषातें,
तेव्हां स्मितद्युतिचमकृतदृक्तरंगें
अंगीकृता स्मरतसे विविध प्रसंगें.  १७
जे हो कदापि न करी सुटतां निचोल,
तैसा नकार न वदे नयना अलोल,
हास्या करी प्रकट वारवधू उदारा,
तीचा विनोद हृदयीं स्मरतोहि सारा.  १८
शून्या हो सदनीं अनेक रचिल्या भंगी वनीं निर्जनीं,
पुष्पांचें मिष मी करुनि गतहो दृष्टीस विस्फारुनी,
तांबूलाहरणच्छलें करुनियां त्या हो कुचा दावुनी
मीनातें करिते खुणा तदपि तो नेणे मनीं भामिनी.  १९
सांडीं कोपविधी, वदेंहि करुणावाक्यें सुधाशीतळें,
नेणे या धरणीतळांत सकळां आमोद तो आकळे,
तें राहो, प्रियदर्शनोत्सुक तुझे ते नेत्र हो ज्यावरी
कोपातें करिते तयासि नमितों धन्यापरी सुंदरी.  १२०
आला हो कुमुदेश्वर प्रकट तो सर्वेशवायू तसा,
स्फूर्जद्भृंगसमीपभैरव असे प्राणेश तोही तसा,
हें तो सिद्धरसादि मन्मथमहावैद्यापुढें, सुंदरी !
मानव्याधि तुझा, कृशोदरि ? कसा राहेल चित्तांतरीं ?  २१
ते चंद्रसुंदरमुखी मग नंदसूनू
दैवें निकुंजभवनागत मध्य भानू,
याअंतरीं सहचरी करुनी पुटाला
पानीय - पान - कपटें र्‍हद आपटीला.  २२
आणूनि नीरजमुखी शयनोपकंठीं
सोडीतसें हृदयबंध धरूनि कंठीं,
याअंतरीं बहुत कुक्कुटनाद केला,
त्या हो विदूषवरें; मज हास झाला.  २३
स्तब्धा हो चरणीं, धरी स्तनतटी स्वेदासि, रोमांचिता
अंगीं, जे स्वरभंगचाटुवचनीं, बिंबाधरीं, कंपिता,
वैवर्ण्यासि धरी कपोलफलकीं, अश्रू तसे लोचनीं,
लीना जे स्वमनीं क्षणेंकरुनियां श्रीकृष्णसंदर्शनीं.  २४
पाहे विलोलजलदादिक अंतरिक्षीं,
चंद्रस्रवें कलरवेंहि कपोत लक्षी,
मंदाकिनी दिसतसे गळतीहि तारा,
आनंद फार विपरीत - रतीं, उदारा.  २५
व्योमीं येतां नवजलधरा त्वत्पथातें पहाया
आले कंठीं सकळ असु ते कामिणीचे हराया,
आणी संगें सदय तुझिया वक्त्रचंद्रा पहाया
तीच्या पक्षें बहुत बिसिनीपक्ष केले सहाया.  २६
त्या कामिनीसुतनुलक्षणसागरातें
हें चित्त आणि नयनादि बुडोनि जातें;
ऐसें असोनि गुरु चित्त जडोनि राहे,
हें तों लघू फिरतसे नयनादि पाहें.  २७
म्यां तो असे आजि विधेय कांहीं । कुंजोपकंठीं कलनाद पाहीं
राधवसंतभ्रमसादरातें । करील नेत्रोत्पळतोरणातें.  २८
पाहे लक्ष्मण दु:खदीर्ह, परि, तो कांहीं व्यथा नादरी,
नि:श्वासा न धरी, कदापि नयनीं अश्रूलवा नादरी,
प्रातर्वातविवर्तमानदहनक्रूरें अनंगज्वरें
झाला हो कृश क्राम चिंतित असे सीता बहू आसरे.  २९
तो स्पर्श हो, स्तनतटीसि धरूनि राहे,
तें हो निरीक्षण गमे, सखिलागिं पाहे,
जेथें कृशोदरिकथाहि विनोद राहे,
तो येक हो समय मी हृदयांत पाहें.  १३०
हा तों विधूगरळपादपकंद आहे,
हस्तीं वसंत - करुणा - नलिनी न पाहे,
हे तों निशा स्मर - महीपतिची कृपाणी,
यानंतरें करुं मि कायहि चक्रपाणी.  ३१
चक्षु प्रियाविण कदापि सखी, न पाहे,
हें चित्त कांतविरहें न कदापि राहे,
प्राणेशअन्यचरणा न शिवेहि पाणी,
हा आजि हो करिल काय ? वदे हि वाणी.  ३२
पाहोनि प्रतिबिंबिताहि विधुला कांतेंजळाअंतरीं
हें कांतामुख हो म्हणोनि रचिला तो हास नानापरी;
तें कांहीं न वदे म्हणोनि तिचिया मानास आशंकुनी,
हस्तें स्पर्श करी पतीपुलकिंतें नानापरी, भामिनी.  ३३
हें कांतामुख अद्वितीय म्हणुनी भूवर्ग टाकी दुरी,
रे चंद्रा ! मदना ! दृगंबुज तिचें पाहोनि तें अंतरीं
झंकारा धरिशी वृथा भ्रमर तूं, तन्वी नसे तादृशी,
कर्मातें धिगहो तुलान पुनती लक्ष्या असे ईदृशी.  ३४
कोंदंडा, विशिखा, मनो निवसती कामापरी चांगली,
भ्रूवल्ली, नयनांचळा, पतिमनीं संवाद तो आकळी
ऐशी हो कुसुमायुधें सम असे, स्वामी लपे तें करी,
तन्वी होउनि हे अनंगविभना जैशी कदा नादरी.  ३५
पाणी कंकणशब्दशून्य, कुच तो नि:कंप वस्त्रा धरी,
दृष्टी निश्चळ, कुंडलें न धरिती तें नृत्य नाना परी,
तैं चित्रार्पित मूर्तिशीं कृश तनू तो भेद कांहीं नसे,
त्वन्नामस्मरणेंकरूनि पुलकारभक्रिया जैं नसे.  ३६
मुक्ताहारा कुचगिरिवरी, हातिंच्या कंकणातें,
कर्णस्वर्णाभरणहि तसें सांडुनी पैंजणातें,
आजि स्वप्नीं बकुलकळिकाभूषणातें धरूनी,
कोणे चोरें हृदय हरिलें नाकळे तें स्मरोनी.  ३७
नीवी हरील, नख लाविल तें कुचातें,
दंतच्छादांसहि डसेल धरूनि हातें,
ऐशा पटीं विलिखिता दयितासि बाला
पाहोनि शंकत असेहि विहारकाळा.  ३८
चेतश्चंचळता त्यजीं, प्रियसखि ! व्रीडे ! न पीडा करीं,
सांडीं, बंधु ! निमेष, लोचनयुगा, कामा ! क्षमेतें धरीं;
बर्हां मूर्धनि, कर्णि जो कुवलया, वंशी करानें धरी,
तो हा सुंदर कृष्ण लोचनपंथीं राहो अनेकांपरी.  ३९

-------------------

जे भानुमिश्रकविनें रचिली उदारा
हे मंजरी, तिजवरी करुनी विचारा
नानाप्रधानवचनें रचिलीं कवीनें
श्रीभैरवें सुगमअर्थपदें नवीनें.  १४०

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP