पांचाळीपतिस म्हणे मय, ‘ कांहीं सांग आपुली सेवा. ’
पार्थ म्हणे, ‘ सख्य असो, अथवा हें माग यादवा देवा. ’ ॥१॥
श्रीपति त्यासि म्हणे, ‘ तूं शिल्पचमत्कारकोटिजनक मया !
निर्मुनि दे रुचिर सभास्थाना निर्दोषरत्नकनकमया. ’ ॥२॥
आज्ञा करुनि असि, प्रभु भेटवुनीं सबहुमान धर्मातें
स्वपुरीस जाय; मग करि भगवदुदित दैत्य विश्वकर्मा तें. ॥३॥
देवानीं हि करावा ज्याच्या स्वेष्टार्थ नवस भात्यातें,
अनृणत्वार्थ मयासुर निर्मुनि दे दिव्य नव सभा त्यातें. ॥४॥
स्थळ तें जळ, जळ तें स्थळ भासे, जीमाजि रत्न- सारस - भा
भुलवि भ्रमरां अमरांस हि, ती चित्रा चि रत्नसार सभा. ॥५॥
भीमाला आणुनि दे वृषपर्व्याच्या गदोत्तमगदेतें,
म्हणति रिपु जिचें दर्शन आधीं भय, मृत्युचें हि मग देतें. ॥६॥
दे देवदत्तशंख स्वत्रात्या अर्जुनास दास मय,
घे मागोनि असें कीं, ‘ मज भेटीला असो सदा समय. ’ ॥७॥
त्या मयसभेंत शोभे धर्म सुधर्मासभेंत वासवसा;
बुध अन्योन्य म्हणति, ‘ कां जातां ? या; हा चि नाकवास; वसा. ’ ॥८॥
अर्थिजनासह धाडुनि गुण दे साधूंसि धर्म सहवास,
कमळाकर मधुपांतें जेंवि प्रेषूनि वायुसह वास. ॥९॥
नव नव नवल कराया न धरी लेश हि इची च आळस भा;
राजर्षि महर्षि सकळ येथें, शून्या चि भूमिपाळसभा. ॥१०॥
नित्य नवे चि महोत्सवकोटींचे त्या सभेंत भर भरती.
विस्तर कशास ? परि हरिदासगृहींची उदंड भरभर ती. ॥११॥
तेथें ज्ञानविशारद, शारदशशिगौर, गौरवार्ह, कवी,
दुस्तरभवाब्धिपारद नारद येउनि सुनीतिला शिकवी. ॥१२॥
तच्चरण प्रक्षाळुनि, जें चिंतिति पर महर्षि, तें पाणी
सेवनि, जोडीले कुरुकुलतिलकें परमहर्षितें पाणी. ॥१३॥
तो मुनि धर्मासि म्हणे, ‘ वात्सल्य करी पिता परम तोकीं,
तैसें भवान् स्वराष्ट्रीं करुनि, निवारूनि ताप, रमतो कीं ? ॥१४॥
जे राजधर्म सुरतरुसख मखसे सुखद उद्धवद नाकीं
त्यांसि जपोनि, गुरूंच्या देसी यश परमशुद्ध वदना कीं ? ॥१५॥
वर्तत आले जैसें पूरुकुळज साधु भीष्मपर्यंत,
वर्तसि तसें चि कीं तूं ? करिसी कीं सद्यशोर्थ अर्यंत ? ॥१६॥
नाम खरें केलें कीं ? सुखद जसा मेघ कोटीकेकींतें,
सुयशा तसा कवींतें, सद्यश कवणा नको ? टिके कीं तें ? ’ ॥१७॥
धर्म म्हणे, ‘ गुरुराया ! बहु काय वदों तुम्हांपुढें देवा !
तुमचा प्रसाद इच्छुनि करितों सत्रास दास मीं सेवा. ॥१८॥
युष्मत्पद, राज्यपद प्रभुजी ! करितों जपोनि परिचरण;
मीत ओं अशक्त मंद चि, तुमचे श्रितकल्पवृक्ष परि चरण. ’ ॥१९॥
यापरि वदोनि हितमितवर्णा कर्णाम्रुता खर्या वचना
मुनिस म्हणे धर्म, ‘ तुम्हीं विश्वाची सर्व जाणतां रचना. ॥२०॥
मयकृत सभा जसी हे, ऐसी कीं ईपरीस जरि बरवी
कोठें असेल, सांगा; सत्य जगच्चुक्षु तूं असा न रवी. ’ ॥२१॥
हांसोनि म्हणे नारद “ भूवरि तों हे चि दिव्यरुचि, राज्या !
ऐक, सभा तुज कथितों देवांच्या ईपरीस रुचिरा ज्या. ॥२२॥
शक्रसभा सार्धशतकयोजनदीर्घा, तसी च वीस्तीर्णा
शतयोजनें, तदाश्रित जनता ती सर्वदुःखनिस्तीर्णा. ॥२३॥
वाल्मीकिमुनि पराशर दुर्वासा याज्ञवल्क्य मूर्तमख,
तेथें शुक्र बृहस्पति जलद हरिश्चंद्र, सर्व वायुसख. ॥२४॥
तीमाजि अप्सराजन नाचे, गंधर्ववृंद आलापी,
या सु - रसा सुरसा जन सुकृती आतृप्ति तेथ आला पी. ॥२५॥
कोट्यब्द तपश्चर्या करितां तनु रात्रिदिवस भागावी,
क्षणमात्र ती पहावी असि सुखदा फार, किति सभा गावी ? ॥२६॥
धर्मा ! यमधर्मसभा शतयोजनविस्तृता असी मोटी,
राजर्षिब्रह्मर्षिप्रवराम्च्या जींत नांदती कोटी. ॥२७॥
जींत ययाति - नहुष - नळ - शिबि - जनक - भरत - मदालसातनय,
मुचुकुंद - दाशरथि - नृग - निमि - शंतनु - पांडु - कुशिक - वैन्य - गय. ॥२८॥
वरुणसभा हि असी च प्रह्लादप्रमुख दितिजनुज राजे
तेथें वासुक्यादिक वसति अहि ख्यात कुरुकुळवरा ! जे. ॥२९॥
गंगा यमुना विदिशा इत्यादि नद्या उपासिती वरुणा,
त्यांवरि वरुणसभेची वत्सांवरि सुरभिची जसी करुणा. ॥३०॥
धर्मा ! जी धनदसभा, ती ही शतयोजनायता रम्या,
शम्यानंदकरी शिवपदपूता तज्जनेतरागम्या. ॥३१॥
शिवसखसभेंत निरुपम सुख; सुर मुनि सिद्ध मूर्तनग वसती;
तेथें चि ते पहावे जे जे अन्यत्र संत न गवसती. ॥३२॥
सुखगीतनृत्य तेथें, मजला ही तो चि एक थारा हो;
स्मरला स्मरहर, भरला कंठ, न वदवे चि ते कथा, राहो. ॥३३॥
जो हा भगवान् तेजोमंडलरूपी जगास भासविता
कथिता झाला पूर्वीं मद्गुरुची मज अगा ! सभा सविता. ॥३४॥
तद्दर्शनकामुक मीं पुसता झालों उपाय तपनातें;
वदला रवि कीं, ‘ तप कर, जपनातें किति ? समर्थ तप - नातें. ’ ॥३५॥
केलें तप तपनोदित दशशतवर्षें हिमाचळीं, मग मीं
झालों कृतकृत्य, तपीं बहु शक्ति, न पारिजातकीं अगमीं. ॥३६॥
ब्रह्मसभा चि गुरु सभा, तन्न्यूना वर्णिल्या सुरसभा ज्या;
देव्युत्थ शाकभाज्या किंवा हे शाक, या सुरस भाज्या ? ॥३७॥
प्रभुमूर्ति सभा झाली पुरवाया काम दासभावाचे,
याहुनि न वर्णवे बहु माझ्या ती कामदा सभा वाचे. ॥३८॥
जें जें असे त्रिलोकीं जंगम कीं स्थाणु सर्व तें व्यक्त
म्यां पाहिलें नृपा ! हरिमूर्तींत जसें चि पाहतो भक्त. ॥३९॥
कथिल्या, विलोकिल्या ज्या, त्या चि सभा तूज पांच वीरा ! या;
येथें तुझी हि अधिका, जसि त्या चौघींत पांचवी राया ! ” ॥४०॥
धर्म म्हणे,‘ गुरुराया ! पुरवीं माझी दुजी हि ही आळ,
त्वां यमधर्मसभेंत चि कथिले कीं प्रायशः क्षमापाळ. ॥४१॥
वरुणसभेंत दितिदनुज सरिदब्धिव्याळ वर्णिले लक्ष;
धनपतिसभेंत गुह्यक राक्षस गंधर्व अप्सरा त्र्यक्ष. ॥४२॥
ब्रह्मसभेंत महर्षि श्रुतिशास्त्रें मूर्तदैवतें सर्व
शक्रादि लोकपाळक कथिले, मुनि बालखिल्य हरि शर्व. ॥४३॥
इंद्रसभेंत सकळ सुर गंदह्र्व वराप्सरा पर - महर्षी
त्यांत हरिश्चंद्र नृपति एक चि सुरनाथसा परम - हर्षी. ॥४४॥
पुण्य हरिश्चंद्राचें काय, प्रिय ज्यास्तव त्रिदशपतिला ?
हें सांगोनि, स्वामी ! या शिष्याच्या प्रमोद द्या मतिला. ’ ॥४५॥
देवर्षि म्हणे, “ नृप तो सम्राट् प्रभु राजसूयमखकर्ता,
इतर करद, परदमिता, एक हरिश्चंद्र सर्वभूभर्ता. ॥४६॥
सत्कार हरिश्चंद्रीं पाहुनि तव तात पांडु वदला हें
कीं, ‘ सांग सुतासि मुने ! जेणें तैसें चि मीं हि पद लाहें. ’ ॥४७॥
सुरपतिसभेंत भोगू सौख्य तव पिता महासवें साधो
हें, नांदसील तूं ही सपितृप्रपितामहासवें, साधो ! ॥४८॥
हा राजसूयमहिमा, परि याची सिद्धि दुर्घट स्पष्ट;
बहुविघ्न क्षत्रक्षय, कर्ता बहु मग हि पावतो कष्ट. ’ ॥४९॥
सांगोनि असें गेला मुनि, कृष्ण पहावयासि तेथूनीं;
कीं सुज्ञ हि न असे जे, घेती भरवुनि निजास्य ते थूनीं. ॥५०॥
धर्म म्हणे, ‘ कष्ट घडो, हो जें होणें असेल, परि तात
व्हावा पूर्णमनोरथ, सत्पुत्र गुरूक्त सर्व करितात. ॥५१॥
पुसता ऋत्विग्, बंधु, व्यास, सचिव, आप्त म्हणति, ‘ देवा ! हूं.
ईश गुरूक्तकरास व्यसननदीं सर्वथा न दे वाहूं. ’ ॥५२॥
धर्म म्हणे, ‘ सिद्धि भजे यन्मंत्रा, जेवि वासवा रंभा,
त्या स्वसख्या पथम पुसों मंत्र, मग करूं शिवा सवारंभा. ’ ॥५३॥
करुनि विचार असा, पटु दूत द्रुत धाडिला मुरारिकडे,
ज्याच्या चरणस्मरणें अत्यघटित सर्वकार्यसिद्धि घडे. ॥५४॥
तो इंद्रसेननामा दूत नव्हे, शुद्ध भाव रायाचा,
कीं तद्भक्तिवधूचा हार श्रीवल्लभा वरायाचा. ॥५५॥
मधुपास जसा पद्माप्रति आणी, बळ करूं न दे वास,
घेउनि आला धर्माप्रति अत्युत्सुक करून देवास. ॥५६॥
त्या संकल्पबिभीषणरामातें सन्मनोभिरामातें
धर्म कथी पितृवाचिकजनितोत्कटराजसूयकामातें. ॥५७॥
कृष्ण म्हणे, ‘ कुरुराया ! धन्य ह्मणतसे सदेव शक्र तुला,
तूं न करिसील बापा ! स्वगुणांहीं कोणत्या वश ऋतुला ? ॥५८॥
परि एक जरासंध प्रबळ क्षितिपाळ काळ आजि तसा,
तो चि पळालों त्रासें, ज्या आह्मां बहु तुम्हीं सभाजितसा. ॥५९॥
करिति जतन वतन, पतन मत न भल्यांला, तथापि तें वरिती;
त्यजिली स्वराजधानी मथुरा अमरावती च भूवरि ती. ॥६०॥
हर आर्जवूनि तेणें राजे षडशीति कोंडिले असती,
हरणार अस हरुनि वसु तदसिलता, न गणिका तसी अ - सती. ॥६१॥
मूर्धाभिषिक राजे पशुसे षडशीति बद्ध आहेत.
पशुपतिपुढें वधावे शत, ऐसा त्या कुबुद्धिचा हेत. ॥६२॥
त्या राज्यांल अमुक्त न करितां, त्या न वधितां जरासंधा,
साम्राज्य राजसूयें कैंचें ? इतरां सुदुस्तरा संधा. ’ ॥६३॥
धर्म म्हणे, ‘ अघटित तूं म्हणसि, तरि घडेल काय अन्यास ?
तरि राजसूय राहो, आज्ञा दे घ्यावयासि सन्यास. ’ ॥६४॥
भीम म्हणे, ‘ देवा ! कां माझ्या अवमानितोसि बाहूंतें ?
वर्णिसि मनमानेसें, चाल जरासंधतेज पाहूं तें. ॥६५॥
अथवा, हे किति त्याला, जो तूं निजबाहुचा अनादरिता,
यच्छ्रितधनुचा न हरुनि रिपुयश फिरला कधीं न नाद रिता. ’ ॥६६॥
कृष्ण म्हणे, ‘ गा ! भीमा ! मतिबळ बळ हें चि मान्य सु - कवीतें;
भुजबळ तें एखादे समयीं तत्काळ ओंठ सुकवीतें. ’ ॥६७॥
जिष्णु म्हणे, ‘ परि एक चि हें आम्हां त्वत्पदानुगां ! ठावें,
सर्वत्र तूं यशस्वी, त्वद्दासें यश सुखें चि गांठावें. ॥६८॥
दुर्घट अरिपरिभव - सव अजित यशस्वींद्र तूं परि सहाय,
म्हणवील काय लोहाकरवीं हि कधीं तरी परिस ‘ हाय ? ’ ॥६९॥
देशिल यश मद्धनुतें अभिमानी तूं वृकोदरगदेतें;
अयशें सिंहासनग न वपु हर्ष यशें वृकोदरग दे तें. ’ ॥७०॥
धर्म पुसे, प्रभु सांगे, मगधवरोत्पत्ति ती असी परिसा :-
“ होता बृहद्रथनृपति सद्गुणसंपन्न, विक्रमी हरिसा. ॥७१॥
अनपत्यत्वसुदुःखित तो वरदा चंडकौशिका ऋषितें
सुखवी करूनि सेवा, चित्तें सुतदर्शनामृतीं तृषितें. ॥७२॥
‘ माग वर ’ असें म्हणतां, सुतवर मागे नृपाळ तो नमुनीं;
आम्रतरुतळीं होता ध्यानस्थ क्षण तपोनिधान मुनी. ॥७३॥
तों अंकीं आम्राचें एक सरस फळ गळोनि उतरे, तें
देउनि म्हणे मुनि, ‘ असो येणें, जरि तुज न होय सुत रेतें. ॥७४॥
पावेल पुत्ररूपें हें फळ परिणाम, दे स्वजायेतें.
जा, निश्चयें नराकृति होउनि, सुख यश गृहीं तुज्या येतें. ’ ॥७५॥
बुडतां जें चिंतेच्या झालें अद्भुत अलाबु ओघीं तें.
देता झाला राजा स्वकरें समभाग करुनि दोघींतें. ॥७६॥
अंतर्वत्नी पत्नी झाल्या व्याल्या सुपुत्रफळशकलें.
त्यजिलीं हि दूर, परि मुनिवच भंगाया न दैवबळ शकलें. ॥७७॥
रात्रौ शकलें त्यजिलीं अश्रुसह चतुष्पथांत दायानीं;
तों राक्षसी जरा ये, काय करावें नृपा ! तदा यानीं ? ॥७८॥
न्यावीं, खावीं, व्हावीं सुवहें शकलें म्हणोनि ती जोडी.
तों तीं जडलीं, धर्मा ! मुनिवचनीं शक्ति काय हे थोडी ? ॥७९॥
आला न सत्प्रसादीं कोणाला ही कधीं हि तोटा हो !
झाला कुमार अद्भुतरूप, करी तत्क्षणीं च तो टाहो. ॥८०॥
बर्हिवनीं घनरवसा गेला अंतःपुरांत तो टाहो.
होय सुकाळ सुखाचा, पडला होता मुहूर्त तोटा हो ! ॥८१॥
मागोनि घे सुतातें नृप पसरुनि राक्षसीपुढें पदर,
विप्रप्रसाद निर्भय; नाहीं तरि गज हि तन्मुखीं बदर. ॥८२॥
नाम ‘ जरासंध ’ असें याकरितां, उपजला असा राया !
कथिल्या तद्वीर्यकथा म्यां साच, नव्हेत गा ! असारा या. ॥८३॥
बहु काय वदों ? कन्यापतिकंसविनाश ऐकतां मागें
फेरे एकोनशत स्वभुजबळें निजगदेसि दे रागें. ॥८४॥
एकोनि योजनें शत टाकी मधुरापुरींत, अशनीची
शक्ति किति ? दृष्टि हि तसी बहुधा उग्रा असेल न शनीची. ॥८५॥
परि भीमार्जुन मज दे, जातों, येतों करूनि कार्यातें;
परमोदार वृकोदरभुज यश देतील शीघ्र आर्यातें. ” ॥८६॥
कुंत्याशी, धर्माज्ञा घेउनि वेषें च विप्रता राया !
सत्वर तिघे निघाले मगधपतिस ते कवि प्रताराया. ॥८७॥
गोष्टीं हरिसे, नगरीं शिरले मारावया मगधराज्या,
प्रथम, ‘ असो पत्यंतर, ’ ‘ हननाश नसो, ’ म्हणे मग धरा ज्या. ॥८८॥
चढले गिरिव्रजाच्या प्राकाराधारगिरिशिरीं हरिसे.
ज्यांसि सकृत् ताडुनियां ध्वनिला जन एकमासवरि परिसे. ॥८९॥
वृषरूप दैत्य मारुनि, तच्चर्में साधु मढविले होते,
अद्भुत तीन असे जे दुंदुभि, ताडूनि फोडीले हो ! ते. ॥९०॥
भंगिति भुजप्रहारें शृंगातें ह्मणति जन ‘ मनूरा ’ ज्या;
शिरले पुरीं अमागें माराया आम्रफळजनू राज्या. ॥९१॥
राजगृहांत हि शिरले, पाहुनि मगधेंद्र ही म्हणे, ‘ यावें. ’
मानुनि वेषें स्नातक भूसुर पूजावया उठे भावें. ॥९२॥
कृष्ण म्हणे, ‘ राया ! हे दोघे मौनव्रती अदीन मुनी
वदतिल, सारुनि नियम, प्रहरद्वय रात्रिचें अतिक्रमुनीं. ’ ॥९३॥
स्थापुनि अग्निगृहीं, मग त्या काळीं तो हुताग्नि वर्चाया
काळांसि विप्र मानुनि आला, झाला हि सिद्ध अर्चाया. ॥९४॥
‘ कुशलं स्वस्त्यस्तु ’ असें वदले ते प्रथम, बसविले भूपें,
पुसिलें कीं, ‘ वेषें तों विप्र तुह्मीं, अन्य भासतां रूपें. ॥९५॥
आला पुरीं अमार्गें कां केला शृंगदुंदुभिध्वंस ?
ब्राह्मण तों मन्नगरीं न क्षोभे, जेंवि मानसीं हंस. ॥९६॥
पूजन हि घेत नाहीं कां हो ! या भूमिदेव दासाचें ?
कोण तुम्हीं ? क्षत्रिय कीं ब्राह्मण ? राज्यापुढें वदा साचें. ’ ॥९७॥
शौरि म्हणे, ‘ रिपुसदनीं अद्वारें शिरति बुध, अगा ! राया !
द्वारें चि सुहृत्सदनीं, आलों तैसें चि कीं अगारा या. ॥९८॥
घेऊं नये चि अरिकृतपूजा, व्रत आमुचें असें आहे. ’
ऐसें श्रवण करुनि, नृप वैर कसें काय, हें मनीं पाहे. ॥९९॥
हासोनि नृप म्हणे, ‘ हो ! विप्रांचा शत्रु मी नव्हें व्यक्त,
सक्त ब्राह्मणभजनीं आहें, त्यांचा चि सत्य हा भक्त. ’ ॥१००॥
कृष्ण म्हणे, “ अस्मद्रिपु ते मोडिति सेतुला नरवरा ! जे.
कां कोंडिले पशु तसे ? बहु रडती करुनि दीन रव राजे. ॥१०१॥
यज्ञ करावा मारुनि पशुसे नृप काय हें बर्बें कर्म ?
येणें प्रसन्न शंकर ? रे ! राज्या ! हा अधर्म कीं धर्म ? ॥१०२॥
ऐसें कोण्हीं हि कधीं केलें नाहीं च कर्म हें मागें;
तूं काय ? भस्म येणें देवांसह होइजेल हेमागें. ॥१०३॥
जरि हा स्वधर्म ऐसें त्वन्मत, तरि हें बरें चि; राया ! हो
आम्हां भवदाज्ञा कीं, ‘ यज्ञ करा, मज करें चिरा, या हो ! ’ ॥१०४॥
तूं क्षत्रिय, आम्हीं ही शंभुप्रीत्यर्थ या नव - क्रतुला
कां न करूं तुज मारुनि ? सरळ वचन हें गमो न वक्र तुला. ॥१०५॥
तोडावे बंध सकळ, सोडावे भूप, हात जोडावे,
राजानें रक्षावे कीं दाटुनि धर्मसेतु मोडावे ? ॥१०६॥
मीं शौरि, हा धनंजय, हा हि तिजा नीट ओळख गदीन.
या बळिखगप्रभुपुढें सर्व बळी अन्य टोळ खग दीन. ॥१०७॥
सोडावे नृप, अथवा रथवाहगजादिराज्यसुखभोग;
हो शीघ्र सिद्ध समरास मराया, तुज न अन्य हितयोग. ” ॥१०८॥
मागध म्हणे, ‘ मखर्थ प्रोक्षित नृपपशु भयें न सोडीन,
कर ईश्वरासि किंवा तद्रूपब्राह्मणासि जोडीन. ’ ॥१०९॥
ऐसें वदोनि सनयीं तनयीं राज्याभिषेक तो करवी;
त्यासि म्हणे, ‘ हर्षद हो सुहृदां, कमळांसि जेंवि तोकरवी. ’ ॥११०॥
विस्तर असो, तयासीं भीमासीं बाहुयुद्ध आरंभे;
पूर्वागता म्हणति किति, ‘ हा उर्वशि ! हा घृताचि ! हा रंभे ! ’ ॥१११॥
आरंभ कार्तिकाचा युद्धाचा तुल्य वर्णिती संत,
भूतातिथिदिवसाचा त्या हि मगधभूमिजानिचा अंत. ॥११२॥
होते हर्षविषादाकुळमानस सार्ध घस्र तेरा जे
प्रभुनें केवळ हर्षाकुळ केले, पुसुनि अस्र, ते राजे. ॥११३॥
जो प्रथम तारकामयसंग्रामीं जिष्णुविष्णुनीं साजे,
तो रथ बृहद्रथसुतें संपादुनि सर्व जिंकिले राजे. ॥११४॥
त्यावरि चढोनि, देउनि अभय जरासंधनंदना अजितें,
आणुनि धर्मासि दिलें यश, आम्हांला हि प्यावया अजि ! ते. ॥११५॥
त्या चि रथावरि बैसुनि मग जाय द्वारकेसि केशिघ्न;
तैं शंभु म्हणे, ‘ याच्या मात्र जना भय न देवि ! दे विघ्न. ’ ॥११६॥