दुसरे दिवसीं नेले पांडुसुत नव्या सभेंत बाहून;
शकुनि म्हणे, ‘ खेळों या; ’ धर्म म्हणे, ‘ अधिक काय याहून ? ’ ॥१॥
भीष्म द्रोण विदुर कृप धृतराष्ट्र, सकर्ण जे शतभ्राते
खळ होते, साधूंचा करणार बळें सभेंत बभ्रा ते. ॥२॥
कपटद्यूतीं लावी प्रथम चि तो साधुगीतकथ रथ रे !
तों शकुनि ह्मणे, ‘ जितिला; ’ तैं थोड्यांचें चि चित्त न थरथरे. ॥३॥
मग धर्म लक्षदासीपण मांडी; ‘ जिंकिला ’ म्हणे शकुनी;
कपटें जिंकूं पाहे हंसाला जेंवि दुष्ट बक - शकुनी. ॥४॥
धर्म म्हणे, ‘ छळ करिसी, मर्यादा त्यजुनि ढाळिसी फांसे;
शकुने ! त्यजितां धर्मव्यवहारपथासि, सत्सभा हांसे. ’ ॥५॥
‘ कोणा व्यवहारीं छळ नाहीं ? दे धरुनि गजवरा खळगा;
भ्यालासि तरि निवर्तें प्रभुला हि म्हणे असें चि तो खळ, गा ! ॥६॥
राजा म्हणे, “ प्रतिज्ञा माझी ‘ नाहीं म्हणों नये ’ असि कीं,
त्यागीन तिला कां मीं, यत्त्यागें निष्फळें यशें असिकीं ? ॥७॥
देवनकर्ता मजसीं मत्तुल्य सभाग्य कोण गा ! आहे ? ”
धर्म असें सत्य वदे, तें दुर्मति तो सुयोधन न साहे. ॥८॥
गर्वें म्हणे, ‘ अहो ! मीं मामाला द्यावया धनें, रत्नें
आहें समर्थ, देवनसाहित्य करीन सर्वथा यत्नें. ’ ॥९॥
धर्म म्हणे, ‘ अन्यासीं अन्याचें द्यूत हें विषम वाटे,
ऐसें हि असो, परि परिणामीं भय, सोडितां सु - नय - वाटे. ’ ॥१०॥
मणि, हार, दास, दासी, रथ, हय, गज, कनकनिधि हि तो लावी
जिंकी कपटी, जी श्री श्रीदश्रीसीं विशंक तोलावी. ॥११॥
कपटद्यूत विलोकुनि विदुर म्हणे, ‘ काय हें अगा ! राया !
कां भ्रमलासि ? स्वकरें अग्नि कसा लाविसी अगारा या ? ॥१२॥
मद्वाक्य तुला न रुचे मरणारा अगदसें अगा बापा !
पुत्र कसें म्हणसी या, नरकीं नेत्या सविग्रहा पापा ? ॥१३॥
कोल्हा चि पाळिला त्वां, आरडला उपजतां चि जंबुकसा.
श्रीद त्यजिले, वरिला अदक्षिणावर्त तुच्छ कंबु कसा ? ॥१४॥
मधुतें चि मूढ पाहे, पाहत नाहीं परि प्रपातातें;
त्वां घातली कुरुकुळीं द्यूतविषमयी वरि प्रपा तातें; ॥१५॥
त्यजिले खळ सुत कविनीं पाहुनि तत्संग्रहांत अत्याग,
न्याय त्याग अशांचा, केवळ अन्याय होय अ - त्याग. ॥१६॥
भोजकुळीं कंस, असा या हि कुरुकुळीं कळंक हा राया !
नांदोत ज्ञानि सुखें, दे आज्ञा पामरासि माराया. ॥१७॥
तो कृष्ण त्या खळाला, तैसा हा कृष्ण या खळासि वधू;
व्याली असंग्रहार्हा म्हण गा भूपा ! अशा मळासि वधू. ॥१८॥
देवूनि काक, घ्यावे पांच तुवां चित्र - बर्ह - शितिकंठ;
घे पंचानन पांच, क्रोष्टा दे; मानवेल शितिकंठ. ॥१९॥
राया ! कुलार्थ पुरुष, ग्रामार्थ कुळ हि समस्त सोडावें,
ग्राम हि देशार्थ, मही आत्मार्थ; बुधें भलें चि जोडावें. ॥२०॥
भाग्यें येउनि बसले स्वर्णष्ठीवी निजालयीं पक्षी,
आमिषलोभांध परम पामर कोण्ही तशां खगां भक्षी. ॥२१॥
मग तळमळे, रडे बहु तो आपण आपला करुनि घात,
तैसें चि तुज हि घडतें, हो सावध, आवरीं नृपा ! हात. ॥२२॥
धनलोभें नुमजे, परि तूं म्हणसील क्षणक्षणीं मग ‘ हा ! ’
आमिषलोभांध जसा तो पश्चात्तप्त मंदधी खग - हा. ॥२३॥
माळाकार तरूंचें घेतो फळपुष्प जेंवि, तेंवि नृपा !
घे पांडुसुतांपासुनि वित्त, असों दे मनांत पूर्ण क्रुपा. ॥२४॥
धनलोभ धरुनि चित्तीं, द्यूतें चरणाश्रितां न गांजावें,
त्वां नरकासि न, घेउनि संगें स्वसचिवसुतानुगां, जावें. ॥२५॥
ऐका, हो ! सर्व तुम्हीं या रायाचें करूनि हित वांचा;
साधुच्छळें कुळक्षय, कीर्तिश्रीभंग संग कितवांचा. ॥२६॥
शकुनि कुनीतिज्ञ कुमति; य्थुनि आतां चि या खळा दवडा;
हा न भला; बुडवाया शिरला या राजमंदिरीं कवडा. ’ ॥२७॥
इत्यादि विदुर बोले तें ऐकुनि ही अचक्षु तो न वळे.
दुर्योधन, पंचाक्षरिमंत्रें परमोग्रभूतसा, खवळे. ॥२८॥
जनकाहूनि परम हित, पर - महित ज्ञानसिंधु जो, त्यातें;
धिक्कारी; उडवी त्या स्वशिवगृहाधारभूत जोत्यातें. ॥२९॥
“ विदुरा ! उगा उगा, गा ! मेळविलें बुडवितोसि यश कां गा ?
कोण तुला पुसतो ? कीं, ‘ अजि ! आम्हां नेणत्यां स्वहित सांगा. ’ ॥३०॥
निपुण असेल निजहितीं, करिल पराचें हि तो चि धीर हित;
स्वामिद्रोहरता तुज काय कळे ? तूं प्रसिद्ध धी - रहित. ॥३१॥
तूं पोष्हिलासि सादर सतत जसा आत्मकाय मत्तातें,
निंदिसि सभेंत दुष्टा ! कर्म विसरलासि काय मत्ता ! तें. ॥३२॥
अस्मदहितहित इच्छिसि, लाविसि आम्हां दहांत बालिशता,
वाचाळ कृतघ्न कुटिल भरतकुळीं तूं चि पात्र गालि - शता. ॥३३॥
राजसभेंत वदावें कैसें तें न शिकलासि अभ्यासीं,
चतुरपण परम दुर्मिळ, तुज परिचय न घडला चि सभ्यासीं. ॥३४॥
तुज काय राजनीतिज्ञान ? अरे ! साप दुखविला साचा,
मृत्यु तसा चि सपत्न हि, कैंचा मग लाभ सुख - विलासाचा ? ॥३५॥
शत्रूच्छेद करावा, करितों, कां लावितोसि अन्याया ?
आह्मीं च साहतों, न दुरुक्ति तुझ्या सोसतील अन्या या. ॥३६॥
जों मृदु लागे तों तों दडपी शिशु फार वून भातातें,
तैसें न करावें त्वां, न बसावें हारवून भा तातें. ॥३७॥
शास्ता एक चि, न दुजा, गर्भीं जीवांसि जो सिकवितो रे !
करितों तच्छिक्षित मीं, बैस उगा, तूं न होसि कवि तोरे. ॥३८॥
हितशत्रु निकट न बरा; जा त्यांप्रति, दयित जे तुला असती.
टाकुनि जाती च बहु प्रेमें जरि सतत सांत्विली अ - सती. ” ॥३९॥
विदुर म्हणे, ‘ न धरील श्रोत्रियवचनें सदाचरण कुलटा,
टाकवितां दुर्व्यसन, द्वेषें इच्छील घात ती उलटा. ॥४०॥
बोध प्रगल्भ हा जरि न करायाचा स्वधर्महानि, बरा;
परि कुरुवरमति न वरी, नवरी जैसी वरा महानिबरा. ॥४१॥
अप्रिय परि पथ्य असें वक्ता श्रोता हि दुर्लभ स्पष्ट,
बहु सुलभ प्रिय वदते वाढविती, चुकविती न ते कष्ट. ॥४२॥
सुप्तव्याघ्रासि नको लावूं दाटूनि शृंग, परिणामीं
संकट पडेल, म्हणतों काय अहित हें मदांधहरिणा ! मीं ? ॥४३॥
स्पष्ट हित अहित कथिता जो होय, सहाय तो चि रायास;
प्रियवाङ् नर कीं नरकीं भोगवितो भोगितो चिरायास. ॥४४॥
सद्य हितकाम जो, त्या असमंजस कर्म पाहवेना गा ! ’
कैसें लावूं द्यावें पद, ज्या लंघन न साहवे नाग ? ’ ॥४५॥
भ्रातृहितेच्छु बिभीषण पावे धिक्कार कीं परम हा ही.
खळ बहु खोटा, त्यासम म्हणति किती कवि भला पर महाही. ॥४६॥
शकुनि म्हणे, ‘ धर्मा ! त्वां हारविलें धन समस्त कीं आहे ? ’
या वचनासि न, पुच्छीं दत्तपदाला भुजंगसा, साहे, ॥४७॥
‘ काय पुससि रे ! अयुतप्रयुत, तथा शंकुपद्म, अर्बुद कीं,
खर्वनिखर्व, समुद्र हि पूर्ण धनीं मीं, जसा उदधि उदकीं. ॥४८॥
हा ग्लह माझा शकुने ! हूं खेळ; च्छळ नको करूं होगा,
कपटें यमदूतवृकव्याघ्रांमध्यें न कोकरूं हो गा ! ॥४९॥
ऐकुनि म्हणे ‘ जितं ’ तो, मत्स्यातें बक जसा, खळ पणातें
ग्रासी, उपमा चि नसे दुसरी त्याच्या विशृंखळपणातें. ॥५०॥
‘ वृष, हय, धेनु, अजाविक, हें धन म्यां लाविलें ’ ह्मणे धर्म,
तों तो ‘ जितं ’ म्हणे; हो ! होय भरतकुळसभेंत हें कर्म ! ॥५१॥
‘ वर्जुनि विप्रधन, सकळ पुरजनपदभू अविप्रपुरुष असें
हें शिष्ट मद्धन ’ म्हणे धर्मात्मा; भावि तें चुकेल कसें ? ॥५२॥
दुर्जन ‘ जितं ’ म्हणे, हो ! मग सर्व अमूल्य निज - कुमार - मणी
द्यूतीं लावी, जिंकी त्या नियति, जएसे हरा उमा रमणी. ॥५३॥
मग धर्म वदे, “ सिंहस्कंध युवा श्याम दीर्घभुज नकुळ,
हें माझें धन, जेणें ‘ धन्य ’ म्हणे कुरुकुळासि सु - जन - कुळ. ” ॥५४॥
‘ इंदमपि धनं जितं ते ’ शकुनि म्हणे, दीप्तपावक पटानें
बांधी मनिभ्रमें, बहु फुगला मलिनस्वभाव कपटानें. ॥५५॥
धर्म म्हणे, ‘ गा शकुने ! न कुनेत्रें जाय रूप, कुज्ञानें;
ज्ञानासि लोचनाहुनि फार जपावें म्हणोनि सुज्ञानें. ॥५६॥
सद्गुणमंडित पंडित दंडि - तपस्वीड्य सद्विवेक - पिता
सहदेव ग्लह माझा, स्वप्नीं हि न यन्मना सिवे कपिता. ’ ॥५७॥
‘ त्वद्बंधुरत्न हें ही द्यूतीं म्यां जिंकिलें ’ म्हणे शकुनी;
साहे महापराध हि, दंड खळाला करावया शकुनीं. ॥५८॥
‘ ग्लह केले माद्रीसुत; परि आताम परम कठिन वाटेल,
सोदरभीमधनंजयपण करितां कंठ फार दाटेल. ’ ॥५९॥
धर्म म्हणे, ‘ मीं ह्मणतों मूर्तिधर बहिश्चर स्व - असु यांतें;
शकुने ! परुषोक्तींतें भ्याल्या श्रुति, कांपतील न सुयांतें. ॥६०॥
सर्व अनिष्ट करावें शकुने ! त्वां कीं परें हि अंत - रतें
परि न वदावें बंधुप्रेमीं जेणें पडेल अंतर तें. ’ ॥६१॥
शकुनि म्हणे, ‘ कौंतेया ! द्यूतीं कितवप्रलाप बहुतर; ते
वदते हित मित, कितव व्यसनीं बुडते कशास ? बहु तरते. ॥६२॥
ज्येष्ठ श्रेष्ठ नृपा ! तूं न धरावे बोल हे मनीं काहीं
द्यूतीं बहु कितवांहीं बडबडिजे, संगरीं अनीकांहीं. ’ ॥६३॥
धर्म म्हणे, ‘ग्लह केला अर्जुन, जरि योग्य हा न या कामीं;
शकुने ! याच्या तेजें झालोंसें विदित फार नाका मीं. ’ ॥६४॥
‘ तो जिंकिला ’ म्हणे खळ, बसला मूळींच नागवायाला,
कीं भेटला कपटमिष साक्षात्कोल्हा चि नागवा याला. ॥६५॥
धर्म म्हणे, ‘ पण केला आतां, ज्याच्या कृतांत भी महिम्या;
अमितबळ सन्नतभ्रू तिर्यक्प्रेक्षी गदींद्र भीम हि म्यां. ’ ॥६६॥
शकुनि म्हणे, ‘ या हि पणा जिंकुनि, पणविजयतत्पर मदक्ष
धर्मा ! ग्लहांतराची वाट पहाताति हे परम दक्ष. ॥६७॥
सुत बंधु हि हारविले, उरलें धन काय गा ! पणास हित ? ’
धर्म म्हणे, ‘ मीं द्यूतीं बुडवी सर्वस्व आपणासहित. ’ ॥६८॥
धर्मास हि जिंकी खळ कपटजयें, परम अक्षम हि माते,
जे व्यसन टाकणारे बुध हा ऐकोत अक्षमहिता ते. ॥६९॥
शकुनि म्हणे, ‘ चुकलासि; ग्लहयोग्य हि संग्रहीं असोनि धन,
जिंकोनि घेतलें कां ? समयीं चुकणें नसो, असो निधन. ॥७०॥
घे आपणासि राया ! सोडवुनि, द्रौपदीस लाव कसा;
श्रीचा कैवारी नृप धन्य, स्त्रीचा सदैव लावकसा. ’ ॥७१॥
धर्म म्हणे, ‘ शकुने ! जी रूपें श्रीला, क्षमागुणें महिला
साजे सखी, अखिन्ना कृत्यभरें, सुमति आमुची महिला. ॥७२॥
शरदुत्पळपत्राक्षी शरदुत्पलपुण्यगंधसमगंधा,
अस्खलित चालवी गृहधर्मीं मज, यष्टि जसि पथीं अंधा. ॥७३॥
आली मखवेदीच्या जी द्रुपदसुकृतभरास्तव कुशीला,
वाटो बरा सु - शीला, वाटेल न हा बरा स्तव कु - शीला. ॥७४॥
आधीं जिनें उठावें, पाहुनि निजलों असें मग निजावें,
रागेजणें सुदुर्मिळ, तें हि जिचें ज्वाळसें गगनि जावें, ॥७५॥
धौम्यापासुनि गोपांपर्यंत जिनें स्वयें समाचार
घ्यावा, श्रिततापहर श्रीगंगेचा जिचा समाचार, ॥७६॥
ती देवी आतां म्यां या दूतीं लाविली. अहाहा ! रे !
छळिसी; द्यूतीं च कसा हारे ? अन्यत्र कां न हा हारें ? ’ ॥७७॥
धर्म नयज्ञोत्तम जो, द्यूतीं स्वकलत्ररत्न तो लावी.
हांसे ‘ जितं ’ म्हणे खळ, कवि हो ! ती गोष्टि काय बोलावी ? ॥७८॥
‘ धिक् धिक् ! ’ सभ्यजन म्हणे, विदुर अधोवदन बैसला उगला;
भीष्मद्रोण ह्मणति, ‘ हा ! भाच्यांसह शकुनि जयसुखें फुगला, ’ ॥७९॥
‘ किं जितमिह ? किं जितमिह ? ’ ऐसें असकृत् पुसे अचक्षु रसे;
रडले सभ्य, तयांच्या हृदयीं तें लागलें वच क्षुरसें. ॥८०॥
सखिहस्तीं हस्त न वृष, पांडवहृदयांत सायका मारी;
क्रोधातें भीम गिळी, गरळातें जेंवि काय कामारी. ॥८१॥
अंधसुत म्हणे, ‘ विदुरा ! कृष्णा दासी सभेसि आणावी,
गृहसंमार्जन करणें, हे सेवा तीस योग्य जाणावी. ’ ॥८२॥
विदुर म्हणे, ‘ शस्त्र वधी गिळितां तत्काळ बोकडाला, हें
तैसें चि कर्म करिसी; रे मंद ! न मृत्यु रोकडा लाहें. ॥८३॥
हरिच्या पुनःपुन्हां कां काड्या नाकांत घालिसी ? शशका !
यश काय पक्षिपतिचें येइल हे चार करुनि तुज ? मशका ! ॥८४॥
ब्रूयात्क्षमी गभीरोऽसीति बत युधिष्ठिरं प्रभुं को न ?
निज नीचपण प्रकटिसि, तूं श्वान भल्यावरी हि भुंकोन. ॥८५॥
पांडव किमपि न वदती, तूं वदसि सभेंत शब्द घाणेरे;
हे सकळखळतिळांचे रगडुनि करणार पिष्ट घाणे रे ! ’ ॥८६॥
दुर्योधन, हित कथितां ‘ धिक्कार तुला असो ’ असें च वदे.
ज्वरितां जसें ससितपय, सद्वचन न दुर्जना तसें चव दे. ॥८७॥
कल्यंश खलशिरोमणि कपटपटु कटुस्वभाव सद्वेषीं,
तो प्रातिकामिनामक सूतातें द्रौपदीप्रति प्रेषी. ॥८८॥
‘ सूता ! जा कृष्णेला घेउनि ये, भय नसे तुला लेश;
सर्वज्ञ न, किंचिज्ञ क्षत्ता; ब्रह्मा नव्हे कुलालेश. ॥८९॥
बहु कतर विदुर, सदा वटवट करितो असी च हा नीच;
या खोट्याला गमत्ये जी अस्मद्वृद्धि ती स्वहानी च. ’ ॥९०॥
जाउनि तो सूत म्हणे, ‘ कृष्णे ! द्यूतांत तूं स्वयें धर्में
हारविलीस, सुयोधनसदनाप्रति ये करावया कर्में. ’ ॥९१॥
हें वाक्य त्या सतीतें बहु दुःसह, जेंवि वज्र कदलीतें;
परि परिसावें, धैर्यें त्यासीं जें ती सुबुद्धि वदली, तें. ॥९२॥
“ सूता ! काय वदसि हें ? द्यूतीं हारविति संपदेतें गा !
‘ श्री ’ म्हण, न ‘ स्त्री ’ म्हण, हें त्वद्वचन मनास कंप देतें गा ! ” ॥९३॥
सूत म्हणे, ‘ आधीं श्री, मग सात्मजबंधुमंडली धर्में
हारविली, निजमूर्ति द्यूतीं, स्त्री सेवटीं असत्कर्में. ’ ॥९४॥
राज्ञी म्हणे, “ तरि अगा ! जा पूस सभेत तूं असें आर्या,
‘ राजेंद्रा ! हारविली प्रथम द्यूतीं स्वमूर्ति कीं भार्या ? ” ॥९५॥
सूत सभेंत विचारी धर्मातें कीं, “ पुसे असे आर्या,
‘ राजेंद्रा ! हारविली प्रथम द्यूतीं स्वमूर्ति कीं भार्या ? ’ ” ॥९६॥
धर्म न कांहीं च वदे; तों दुर्योधन म्हणे, ‘ सभेस तिनें
यावें स्वयें पुसावें, जें पुसणें ज्योजिलें तिच्या मतिनें. ’ ॥९७॥
कृष्णेप्रति सूत म्हणे, “ देवि ! न कांहीं च धर्म वदला गे !
जाणों सभासदांस हि कठिन त्वत्प्रश्नवाक्यपद लागे. ॥९८॥
दुर्योधन वदला कीं, ‘ त्वां चि पुसावें सभेंत, डोलेल
त्वत्प्रश्नश्रवणसुखें, तुज पाहुनियां यथार्थ बोलेल. ’ ॥९९॥
बहुधा सभेंत तुजला नेईल क्षुद्रबुद्धि गांजाया;
नसतां उपाय कांही, आग्रह करिसील तूं हि कां जाया ? ” ॥१००॥
कृष्णा म्हणे, ‘ समर्थ न कोण्ही ही सुज्ञ भावि टाळाया,
जेंवि विधु राहु येतां पर्वीं आत्मप्रभा विटाळाया. ॥१०१॥
रक्षील धर्म समयीं, धरिती त्याचा चि भरवसा सु - कवी;
आर्जविला असतां तो स्वजनव्यसनासि निश्चयें चुकवी. ॥१०२॥
भरतकुळधर्म न बुडो; सभ्यांला पूस एकदा जा, गा !
तन्मत मान्य मला, कीं, नय तच्चित्तीं सदा असे जागा. ’ ॥१०३॥
पुनरपि सभेंत जाउनि सूत म्हणे, “ सभ्य हो ! तुह्मांस सती,
‘ द्यूतांत मीं जिता कीं अजिता, ’ ऐसें मदाननें पुसती. ” ॥१०४॥
दुर्जनदुराग्रहाचे ज्ञाते सभ्य हि न पाहती च वर,
तेथें उत्तर कैंचें ? न चलेसें न वदती कवि - प्रवर. ॥१०५॥
जाणुनि संकट धर्में दूतमुखें कळविलें स्वजायेतें
कीं, श्वशुरासि शरण ये, ‘ गुरु कवच, व्यसन उग्र ज्या येतें. ’ ॥१०६॥
सभ्य न वदती कांहीं, पांडव ही मूकबधिरसम गमती,
पाहुनि असें सुयोधन बोले तों सत्पथोपरम - ग - मती. ॥१०७॥
‘ तीतें चि आण जा; रे ! ती कां स्वमुखें पुसे न येऊनीं ?
सभ्यजनीं हितपृच्छक, शीतार्त हि कोण गा ! नये ऊनीं ? ॥१०८॥
सभ्यानीं प्रश्नोत्तर योजावें नीट, कीं न योजावें ?
आर्तें वैद्यगृहाला, गुण यो, कीं प्राक्तनें न यो, जावें. ’ ॥१०९॥
मत्तें श्वयूथपें श्वा सिंहीप्रति धाडितां धरायाला,
जाईल कसा ? तैसा सूत हि भी कर्म तें करायाला. ॥११०॥
तांतड करी सुयोध, परि सूत पुन्हा म्हणे, ‘ अहो सभ्य !
काय वदों ? प्रश्नोत्तर कृष्णेला कां न होय हो ! लभ्य ? ’ ॥१११॥
कोपें म्हणे सुयोधन, ‘ भीतो भीमासि सूत हा भितरा;
दुःशासना ! स्वयें जा, आण तिला, कर्म हें नव्हे इतरा. ’ ॥११२॥