अजिनें नेसुनि झाले पांडव वनवासदीक्षित, तशांतें
दुःशासन बहु हांसे, गावें ज्यांच्या सुधोत्तमयशांतें. ॥१॥
आजि, पराजिपराजित नव्हते जे, ते च हे पराजित कीं,
आम्हां सुखें चि तितकीं दुःखें जीं आमुच्या परा जितकीं. ॥२॥
आजि अकंटक केलें नृपनयनिपुणें सुयोधनें राज्य,
प्राज्य प्रीतिद झालें सुहृदांला, गाळिलें जसें आज्य. ॥३॥
तात म्हणे, ‘ नित्य असो या धर्मा भव्य भाग्य मत्तनया;
ते हे आम्हां हांसत होते; रक्षी न भाग्यमत्त नया. ॥४॥
हे पंडित, परि पांडव नरकीं श्रीमद धरूनि कां पडले ?
कैवर्तांस अदीक्षित अजिनधर वनांत बंधु सांपडले. ॥५॥
आपण षंढतिळ असें निःसंशय जाणतील हे आतां,
गर्वें फुगले होते फुगवूनि स्वगुण गायकीं गातां. ॥६॥
क्लीबांसि सुता देउनि, सुमति परि द्रुपद फार चुकला हो !
यमभट हो ! बळकट या स्वापत्यविडंबकासि बुकला हो ! ॥७॥
द्रौपदि ! हे कुरु दांत क्षांत सधन, यांत कांत जोडावा;
लाभ नसे, ताप वसे ज्यामध्यें, तो कुसंग सोडावा. ॥८॥
षंढतिल, चर्ममयमृग, काकयव जसे, तसे चि फटकळ गे !
हे व्यर्थ कांकणाचे दावितिल न समरसिंधुतट कळगे. ॥९॥
कृष्णे ! काडी मोडीं, काय तुला दीन मानले शवसे ?
जे राज्यभ्रष्ट कितव, ज्यांचा ठायीं न मानलेश वसे. ’ ॥१०॥
भीम म्हणे, ‘ रे कोल्ह्या ! याचा घेईन सूड जाण खरें,
हाणीन बाण मर्मीं हाणिसि वचनें जसीं च बाण - खरें. ॥११॥
काळातिथिमधुपर्कीं जे पांडवपशु निवेदिले होते,
जाणों न मारिले, वधकातर सोडूनियां दिले हो ! ते. ’ ॥१२॥
‘ गौर्गौ ’ असें म्हणे खळ दुःशासन, अति असंत तो नाचे,
किति वर्णावे सद्गुण सन्नीतिकरूनि संततोनाचे ? ॥१३॥
दुर्योधन आपण मतिवेश्येचा जरिआ नवा ढवा, याला
हांसे गत्यनुकारें, बाळ न भी ज्वलन वाढवायाला. ॥१४॥
हंसखगा काक जसा, कीं धुतरा पुष्पकुळवरा कमळा,
वेडावी, लावाया वांछी अर्कीं हि तो वराक मळा . ॥१५॥
तें अवलोकूनि म्हणे त्यासि निवृत्तार्धकाय भीम असें :-
‘ मंद ! रहा, मंदर हा मीं भीम खळाब्धिमथनयोग्य असें. ॥१६॥
मीं या सुयोधनाचा हंता, जर्हि मन्मनांत अनहंता,
सहदेव या शकुनिचा, कर्णाचा जिष्णु दुष्ट - जन - हंता. ’ ॥१७॥
जिष्णु म्हणे, ‘ कर्तव्य प्रकट न करिती निजाननें आर्य.
पाहूं तें, चौदाव्या अब्दीं यावरि घडेल जें कार्य. ’ ॥१८॥
भीम ह्मणे, ‘ दुर्योधनदुःशासनशकुनिकर्णरक्तानें
भूत्वां तृप्त करावी, ऐकावें गुरुवचोनुरक्तानें. ’ ॥१९॥
पार्थ म्हणे, ‘ करिन, तुझें जें प्रिय, तें चि, प्रसाद जोडाया.
हें किति ? मज उशीर नसे त्वप्रतिकूळ स्वबाहु तोडाया. ॥२०॥
अनुगांसह कर्णातें मारुनि मीं हर्षवीन आर्यातें,
तोडीन स्वभुज हि जरि, हे न तुझ्या साधितील कार्यातें. ॥२१॥
परि अरि राज्य न देइल, जरि हायन लागतां चि चवदावें.
गुरुसीं वाक्य प्रथम चि सुविचार बरा करूनि च वदावें. ’ ॥२२॥
सहदेव म्हणे, ‘ शकुने ! अक्ष म्हणसि, परि नव्हेत हे अक्ष;
मूढा ! सहदेवाचे त्वां वरिले शर रणीं स्व - वधदक्ष. ॥२३॥
कार्यें उरकुनि घे रे !, तेरा वर्षें चि राहिलें आयु,
होतिल चतुर्दशाब्दीं माजे शर सर्प, असु तुजे वायु. ॥२४॥
पोषी जसी पतिशुभाशुभभवमुदमुद्भरें पुलक लंका,
गांधारराजधानी पोषू तैसी च रे कुलकलंका ! ’ ॥२५॥
नकुळ म्हणे, ‘ व्याघ्रशिरीं दिधला हा वाम पाद ओतूनीं.
हा ! तापविली दयिता कर्णीं परुषोक्तिगरळ ओतूनीं. ॥२६॥
कृष्णेसि रुक्ष वदले जे जे, मरतील ते समस्त रणीं;
खळबळनकुळ तसे, तृणदव कीं, किंवा जसे तमस्तरणी. ’ ॥२७॥
एवंविध प्रतिज्ञा करुनि, महासत्व पांडुसुत राया
धृतराष्ट्रा पुसति नमुनि, त्या धर्में आपदब्धि उतराया. ॥२८॥
धर्म पुसे ज्यां ज्यांतें, मागे जाया वनासि आज्ञा ते,
भीष्म द्रोण कृप विदुर होवूनि उदश्रु म्हणति ‘ हा ! ’ ज्ञाते. ॥२९॥
त्यां हि पुसे, स्वाहित जे, वाजविती, न धरुनि त्रपा, टीर,
धर्मासि एक साजे सदसत्समशीळ मित्र पाटीर. ॥३०॥
छळकासि कवि न शापिति, देतें जड कनक काय हो ! गाळी ?
पाळी जो त्यासि मधुर इक्षु, तसा त्य अहि, अदय जो गाळी. ॥३१॥
विदुर म्हणे, ‘ कुंतीचें वपु कोमळ वासयोग्य न वनीं तें.
कष्टांत वृद्धदेहें न उरावें, आतपांत नवनीतें. ॥३२॥
सेवाधिकार मज द्या, ठेवा माझ्या गृहीं स्वमातेतें,
दुर्गत बंधु पहातां दुःख जसें, इतरथा न माते तें. ’ ॥३३॥
पांडव म्हणति, ‘ बहु बरें, पितृतुल्य पितृव्य तूं, बुधा ! सरसें
भवदुपदेशें निवतों, त्वद्भाषण तापल्यां सुधा - सरसें. ॥३४॥
तूं आमचा परमगुरु, न त्वत्सम ऐकिला सदय चुलता,
त्वच्छाया नसतां किति आम्हीं ? या संज्वरें गिरि हि उलता. ’ ॥३५॥
विदुर म्हणे, ‘ बा धर्मा ! व्यसनीं सद्रीतिनीति नव नौका,
करिशील राज्य, झाला काय श्रीरामराय न वनौका ? ॥३६॥
सर्व असा एकमतें, जें युष्मत्प्रिय घडेल सत्वर तें,
कोठें हि कधीं हि चिर स्थिर अनुभविलें न दुःख सत्व - रतें. ’ ॥३७॥
कथिली विदुरें सन्मति, जाणों दिधली तयां सिदोरी ती;
कीं व्यसनकूपपतितां अनुपायज्ञां तयांसि दोरी ती. ॥३८॥
पुत्रवियोगें कुंती बहु तळमळली, म्हणे, ‘ अहाहा ! ’ तें
सांगूं, कीं निंदूं त्या, लिहिला जेणें कुलेख हा हातें ? ॥३९॥
असु जातां तनु विकळा, कीं जातां वत्स जेंवि धेनु, सती
तेंवि ह्मणे, ‘ अळिकीं कां लिपि लिहिली अश्रुदा विधे ! नुसती. ॥४०॥
त्यजिली जसी तुह्मीं हे, सुत हो ! त्यजिली तसी न कां असुनीं ?
हे या संज्वरगेहीं देहीं होतील तप्त कीं असुनीं. ॥४१॥
सुत हो ! शुद्धांस कसें आतळलें व्यसन ? अंक हा रविला.
विपरीत चि हे कुरुकुळदीपानीं स्वप्रकाश हारविला ! ॥४२॥
आलां हतभाग्येच्या पोटाला ह्मणुनि भोगितां ताप;
संसर्गें भोगावें पुण्य जसें, साधु हो ! तसें पाप. ॥४३॥
तुमचा धन्य पिता, ती माता माद्री सती हि धन्या हो !
वंध्यत्व बरें, परि मजऐसी कोणास ही न कन्या हो. ॥४४॥
माझा पुत्रस्नेह, त्यजुनि मला, तुजकडे चि आला गे !
स्वव्रतवत् प्रतिपाळीं, रक्षाया अधिक काय या लागे ? ॥४५॥
वत्से ! कृष्णे ! माझा बाळक सहदेव देवसा, यास
बहु सांभाळीं, व्हावा सुकुमार कुमार हा न सायास. ॥४६॥
म्यां वत्स निरविला तुज हा मदसुन्यास, यास जतन करीं,
विश्वासें दिधलें हें तुझिया जीवनहित स्ववतन करीं. ॥४७॥
रे वत्सा ! सहदेवा ! जावूं दे धर्म भीम वनवासा.
जावू अर्जुन नकुळ हि; कां बा ! झालासि बांधव नवासा ? ॥४८॥
मजविण तुज, तुजविण मज तेरा कल्पांत, ते न वत्सर, हा !
ने मज, नेम जरि अधिक, पाहों तरि दे मुखेंदु, वत्स ! रहा. ॥४९॥
हा ! कृष्णा ! जगदीशा ! काय बरें दैन्य हें, अगा धात्या !
व्यसना रचीं तराया सेतु जसा सागरा अगाधा त्या. ॥५०॥
कृष्णा ! श्रितजनसर्वव्यसनघनघजप्रकंपना ! बापा !
तापाकुळ कुळ कुरुचें संरक्षावें हरूनिया पापा. ॥५१॥
गे बाई कौसल्ये ! संसाराला न हे वृथा आली,
झाली तुहिनकर - कुळीं उत्पन्न दुजी तुजी पृथा आली. ॥५२॥
काय करूं ? चुकला विधि भाळीं लिहितां लिहावया मरण,
बहुमुखमद्विधितेजें पडलें चतुराननासि विस्मरण. ’ ॥५३॥
विदुर तिला समजावुनि, एउनि सदनीं, म्हणे, ‘ नको चि रडों,
जननि ! उगी, धीर धरीं, या चिंतागिरिभरें नको चिरडों. ॥५४॥
सति ! भर आनंदाला जो देतो, तो चि भर विलापाला.
बळजळनिधिनें विधिनें श्रीराममुखीं हि भरविला पाला. ’ ॥५५॥
कौरवपौरवधू बहु रडति, म्हणति, तें कुकर्म परिसून,
‘ वृद्ध श्वशुर च्यवला, न च्यवली गांजिली हि परि सून. ॥५६॥
बाई द्रौपदि ! केली आत्मश्रीची च दुर्दशा कुरुनीं,
गुरुनीं न दंडिले कां ? वारावें काय दुर्जना दुरुनीं ? ॥५७॥
स्तवितील लोक तुज गुरु सुकृतें व्यसनांत बाइ ! तरलीला,
गेया हे या वंशीं त्वल्लीला, असि नसे इतर लीला. ’ ॥५८॥
स्वकृतानय आठवितां धृति पावे नाश अंध रायाची,
आवळिली आधिमहापाशें बांधूनि कंधरा याची. ॥५९॥
उद्विग्नचित्त होवुनि, आणवुनि क्षिप्र सुस्वभावातें,
‘ पांडव वनासि कैसे गेले ? ’ ऐसें पुसे स्व - भावातें. ॥६०॥
‘ नृप मुख झांकुनि गेला, देता झाला जना न पाहूं तें;
पाहत होता जातां विपिनासि वृकोदर स्वबाहूंतें. ॥६१॥
जो सर्वशिष्यवृंदीं द्रोणाला परमतोषकर सिकता,
त्याचा वनासि जातां पेरित होता पथांत कर सिकता. ॥६२॥
नकुळ रजांहीं मळवुनि सर्वांगाला वनासि गेला हो !
सहदेवें ही जाताम सारवुनि मुखेंदु मलिन केला हो ! ॥६३॥
केशानीं मुख झांकुनि, गेली रोदन करीत तव सून,
द्रुपदें विलोकिली जी कन्या देवव्रजासि नवसून. ॥६४॥
कुशदर्भपाणि भगवान् धौम्य परे गात गात गेला हो ! ’
क्षत्ता म्हणे, ‘ तुम्हां म्यां श्रुत तद्गमनप्रकार केला हो ! ’ ॥६५॥
अंध म्हणे, ‘ गा ! माझ्या चतुरा चतुरास्यसुज्ञ भावा ! तें
रूप तसें विविध तिहीं कां केलें ? स्पष्ट सांग भावांतें. ’ ॥६६॥
क्षत्ता म्हणे, “ युधिष्ठिर करिता झाला स्वदृक्पथा पिहित,
यद्यपि भस्म करावे तव सुत, चिंती सदा तथापि हित. ॥६७॥
‘ घालींन गांठि सत्य स्वरिपूंसीं संगरांत बाहूनीं, ’
समजावी भीम असें, तळमळ करितां मनांत बाहूनीं. ॥६८॥
हा भाव अर्जुनाचा कीं, ‘ शत्रूंसीं घडो समर, सिकता
जेंवि अशा इषु सोडिन, माझी समरीं हरासम रसिकता. ’ ॥६९॥
कोण्हीं न ओळखावें हस्तिपुरीं आपणासि, हा नियम
करुनि करिती रजांहीं लिंपूनि स्वस्वरूपहानि यम. ॥७०॥
कृष्णेचा भाव असा, ‘ ज्यांहीं मज गांजिलें अति द्वेषें,
त्यांच्या स्त्रिया समस्ता चवदाव्या वत्सरीं अशा वेषें, ॥७१॥
देउनि जळांजळि स्वप्रियसुतबंधूंसि, म्हणुनि ‘ हा !’ रडत,
सोडूनि मोकळे कच येतील पथीं अशा चि आरडत. ’ ॥७२॥
धौम्याभिप्राय हि हा, ‘ जैं वरिजेतील कुरु परेतत्वें,
गातील पुढें कुरुगुरु दर्भ धरुनियां करीं परे तत्वें. ” ॥७३॥
ऐसें विदुर वदे तों देवर्षि, त्यजुनियां नभा, उतरे,
बोले सभेंत कीं, ‘ हा ! लोभीं कविचा हि हा न भाउ तरे; ॥७४॥
दुर्योधनापराधें भीमधनंजयबळें महागर्व
हे कौरव चवदाच्या वर्षीं मरतील निश्चयें सर्व. ’ ॥७५॥
बोलोनि भविष्य असें भरला नारद मुनींद्र गगनीं च.
द्रोणासि शरण गेले राज्यनिवेदन करुनि मग नीच. ॥७६॥
शरणागत दुर्योधनभूपाला गुरु म्हणे, ‘ अगा ! राज्या !
रक्षील कोण त्याला, दवदहनें व्यापिलें अगारा ज्या ? ॥७७॥
पांडव अवध्य सुरसुत धार्मिक, माझे बहिश्चर असु खरे,
तत्त्यागीं महदसुख, प्राणत्यागीं नसे मज असुख रे ! ॥७८॥
आलां शरण मज तुम्हीं तुमचा ही उचित ओय अ - त्याग,
शरणागतारिच्या हि त्यागें घडतें जनासि अत्याग. ॥७९॥
मन्निधनार्थ द्रुपदें केला उत्पन्न तनय, तो मातें
धृष्टद्युम्न टपतसे ग्रासाया, जेंवि राहु सोमातें. ॥८०॥
भगिनीप्रियर्थ समरीं होइल पांडवसहाय मद्रिपु रे !
काळापुढें किती मीं ? हरिसीं युद्धांत काय अद्रि पुरे ? ॥८१॥
ज्यासि जयश्री न त्यजि तसि, जसि ऐरावतासि अभ्रमु रे !
यच्छरपवनें समराजिरगगनीं शत्रुकटकअभ्र मुरे, ॥८२॥
त्या अर्जुनासवें जें करणें समरांगणीं समागम, तें
मरणशताधिक संकट सत्य मज तदीय पितृसमा गमतें. ॥८३॥
तुजकरितां मज आलें चौदाव्या वत्सरीं रणीं मरणें;
शाश्वत न, तुम्हीं हि करा सत्वर सर्व हि असेल जें करणें. ’ ॥८४॥
अंध म्हणे, ‘ विदुरा ! गुरुवचन खरें, पुत्र वदति तें न खरें,
यां दुःसहें धनंजयशस्त्रें, हरिचीं गजां जसीं नखरें. ॥८५॥
त्यांला वनवास न हो, सत्यव्रतरक्षणार्थ अथवा हो,
परि पादचार न विहित, त्यांसि तयांचा सशस्त्र रथ वाहो. ’ ॥८६॥
गेले वनवासाला जेव्हां ते विष्णुचे सखे दास,
संजय असें पुसे त्या अंधास स्वानयें स - खेदास. ॥८७॥
‘ राया ! सुतविजयीं तुज व्हावा आनंद, खेद कां गमला ?
धर्म बुडविला, हरिली श्री, चुकलें काय कार्य ? सांग मला. ’ ॥८८॥
धृतराष्ट्र म्हणे, ‘ आतां कैंचा आनंद संजया ! मातें ?
चिंतारजनीच्या अनुभवितें मच्चित्तकंज यामातें. ॥८९॥
हृतमणिफणिवैर बरें, बा ! गा ! साहेल कोण वैरा या ?
कळत चि कुकर्म केलें कुरकुळ काळाननांत वैराया. ॥९०॥
विदुरोक्त हित हि, तनुजस्नेहैकपरें न मानिलें कांहीं;
केली म्यां चि, न केली अक्षाहीं, वा न हानि लेंकांहीं. ’ ॥९१॥
भक्तमयूरकरें हें श्रीगुरुनें लिहविलें सभापर्व,
कीं आर्यानंदांचें रसिकांची नित्य हो सभा पर्व. ॥९२॥
----------------------------------------------
इति श्रीरामनंदनमयूरकृतिकृतौ महाभारते सभापर्व समाप्तम् ॥
॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥